आम्ही कोण?
आमची शिफारस 

मत्सराच्या छटा दाखवणारं नाटक- साठेचं काय करायचं?

  • मृदगंधा दीक्षित
  • 15.11.25
  • वाचनवेळ 5 मि.
sathech kay karaych

‘साठेचं काय करायचं?’ या नाटकात मंचावर दोनच पात्रं दिसतात. अभय आणि सलमा. मग हा साठे कोण? नाटकाच्या सुरुवातीला अभयच्या बोलण्यातून साठेची प्राथमिक ओळख होते. आपण साठेची वाट बघत राहतो आणि नाटक पुढे जाईल तसं त्या साठेचं नाव ऐकलं तरी उबग यायला लागतो.

अभय जाहिराती बनवतो. त्याची एजन्सी आहे. त्याच्या क्षेत्रात त्याचं बरं चाललंय. काम आहे, पैसा आहे. पण आर्ट फिल्ममेकर असणाऱ्या साठेवर तो जळतो. साठेला मिळणारी दाद, कौतुक, मान, समाधान यातलं काहीच अभयला जाहिराती करून मिळत नाहीय. साठेचं काय सुरू आहे, त्याच्या पदरात काय काय पडतंय याची अपटूडेट माहिती अभयकडे असते. ‘अभयला साठेविषयी वाटणारा मत्सर’ ही या गोष्टीची एका ओळीतली थीम झाली. पण माणसाचा, मत्सराचा तळ शोधण्याच्या या प्रयोगात किती नि काय काय हाती लागत जातं!

अभयची बायको सलमा. ती इंग्रजीची प्रोफेसर आहे. या जोडप्याचं हिंदू-मुस्लिम असणं हा संदर्भ नाटकात क्वचित एक-दोन वेळा पण अगदी सहजतेने आणि खेळीमेळीमध्ये येतो. स्वाभाविक म्हणून येतो. ही सहजता आणि खेळीमेळीचं स्टेटमेंट लेखकाने ठळकपणे केलेलं आहे. अभय साठेवर जळतो, साठेच्या प्रत्येक कृत्यावर हेतूआरोप करतो. अभयची तडफड होत असते. अभय प्रत्येक गोष्टीत स्वतःची तुलना साठेशी करतो, आपल्या कुठल्याही कामाविषयी साठेला काय वाटत असेल असा विचार करतो, साठेने आपल्याला रेकगनाइज करावं, आपलं कौतुक करावं म्हणून अभय तडफडतो. ती तडफड तुकड्या तुकड्यात तो सलमापाशी बोलतो.

सलमा त्या साठेवरून कधी अभयशी वाद घालते, कधी त्याला टोचणी देते, कधी चिमटे काढते, कधी डिवचते, तर कधी त्याची कानउघाडणी करते. कधी त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करत जवळ घेते. त्या दोघांचं नातं फार सरळ आणि खोल आहे. ते वाद घालतात, पुन्हा विषय सोडून देऊन जवळ येतात. त्यामुळे अभयच्या मनात सलग समांतर चाललेल्या मत्सराचा लवकर उबग येत नाही.

sathech kay karaych

१०० मिनिटांच्या या नाटकात दहाहून कमी प्रसंग असावेत. शिवाय नाटक एके ठिकाणी सुरू झालं आणि एके ठिकाणी जाऊन संपलं असं वर्तुळ नाटकाला नाही. ‘‘आपल्या गप्पांना सुरुवात-मध्य-शेवट असं काही नसतंच. सुरुवात-मध्य आणि मग पुन्हा सुरुवात,’’ असं वाक्य लेखक राजीव नाईक यांनी अभयच्या तोंडी दिलं आहे ते बहुदा यासाठीच.

नाटकात नेपथ्य मोजकं आहे. प्रकाश आणि संगीत पूरक आहे. अभय आणि सलमाचे कपडे समकालीन आहेत. दोघांमधली केमिस्ट्री जमून आली आहे.

ओंकार गोवर्धन याने अभयची भूमिका केली आहे. मत्सराच्या आहारी गेलेला, आपण स्वतः सर्वसाधारण आहोत या जाणिवेने भेदरलेला, सलमाला घाबरणारा अभय ओंकारने सुंदर उभा केला आहे. त्याच्या वागण्याचा वैताग यावा एवढा तो त्रासदायक वाटतो. पण त्याचा रागराग होऊ नये एवढा गोडही वाटतो. ओंकारने ते बरोबर साधलं आहे. सलमाची भूमिका अश्विनी कासार हिने केली आहे. नाटकात आपल्याला अभय आधी भेटतो आणि नंतर सलमा भेटते. त्यातही ती अभयला समजावत, दरडावत असल्याने थोडी आपल्याहून वरची वाटते. सुरुवातीला अभय अधिक जवळचा वाटतो. मग हळूहळू सलमा तिच्या कमजोरी मोकळेपणाने उघड्या करत जाते, तशी तीही जवळची वाटत जाते. ती अभयचा कॉन्शिअस आहे असंही क्वचित वाटून जातं. अश्विनीचा आवाज, मंचावरचा वावर, सहजता यातून सलमा जमून आली आहे.

‘‘प्रत्येकवेळी रडायला कारण कशाला हवं असतं?’’ असं म्हणून ती मोठ्याने रडते आहे असा एक प्रसंग नाटकाच्या मध्यात आहे. या प्रसंगाशी जोडून घेता येणार नाही असा माणूसच नसेल इतका तो प्रसंग युनिव्हर्सल वाटतो.

अभय स्वतःच्या करिअरमध्ये पुढे जातोय, पैसे कमावतोय, अभय आणि सलमा यांचं सहजीवनही चांगलं चालू आहे. पण या सुरळीताच्या खाली संथपणे साठेविषयीचा मत्सर वाहतो आहे. अभय साठेच्या सगळ्या हालचालींवर लक्ष ठेऊन असतो, साठेची प्रत्येक गोष्ट अभय स्वत:ला लागू करून घेतो, आपल्याला हिणवण्यासाठी, खिजवण्यासाठी, अपमानित करण्यासाठी, हरवण्यासाठी साठे हे करतोय याविषयी अभयला खात्री आहे. अभयचा कुठलाही विषय व्हाया साठे जातो.

sathech kay karaych

अभयचे सगळे विषय साठेपाशी येत असले तरी त्यापलीकडे जाऊन माणसामधल्या मत्सराच्या छटा राजीव नाईक यांनी अगदी कलाकुसरीने दाखवल्या आहेत. म्हणजे कधी अभयला वाटतं आपली लायकी असून आपल्याला कौतुक मिळत नाही. कधी त्याला वाटतं साठेची लायकी नसताना त्याला हे सगळं मिळतं. आपण काहीतरी करण्यात कमी पडतोय, किंवा आपल्याला जे करावं वाटतंय ते खरं म्हणजे आपण करतच नाहीय याचं खापरही तो साठेवर फोडतो. आपण करत असलेल्या कामात आपल्याला समाधान मिळत नाही याचं कारणही साठेच ठरत जातो. नंतर नंतर साठे हा ‘आपण सर्वसाधारण’ आहोत हे न स्वीकारण्याचं कारण होत जातो आणि तरी त्या सर्वसाधारणतेतच जगण्यासाठीची साठे हाच पंचिंग बॅग होत जातो.

पहिले काही प्रसंग बघताना वाटतं हा मत्सर अभयला पोखरत जाणार. पण तसं होत नाही. तो मत्सर हा अभयचा भाग होत जातो. आधी सलमा आणि मग अभय स्वत: त्या साठेवर जळणाऱ्या अभयला कंटाळतात. अभयकडून ते ‘साठे, साठे, साठे’ ऐकून नाटकाच्या शेवटाला एक वाक्य प्रत्येक प्रेक्षक कधी मनात, कधी मोठ्याने म्हणतोच ते म्हणजे, ‘अरे या साठेचं काय करायचं?’

विनोद, उपरोध, शृंगार, वाद, दु:ख, हार ते आत्मा विकला जाताना मनात उमटणारी हळहळ अशा कित्येक भावना हे नाटक बघताना आपल्या मनात येतात. नाटक संपल्यावर आपण कुणाचा मत्सर करतो, कुठल्या भावनेने आपल्याला घेरून टाकलं आहे असे विचार एका बाजूला मनात येतात तर दुसऱ्या बाजूला एक फील गुड नाटक बघितल्याचं फिलिंगही येतं. फार फ्रेश नाटक आहे हे!

हे नाटक सुचताना काय मनात होतं याविषयी राजीव नाईक म्हणतात, ‘‘आपली मीडिऒक्रिटी, सुमारपणा ओळखून, पत्करून, तो पचवणं हा एक भयावह, क्लेशकारक आणि होरपळवून टाकणारा प्रकार आहे..आता अभयची समस्या तीच माझीही समस्या आहे. आपल्या ना नक्की उत्तम, ना एकदम भुक्कड अशा मध्यम प्रतीच्या निर्मितीक्षमतेचं करायचं काय?’’..

गेल्या पंचवीस वर्षांत या नाटकाची अनेक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये भाषांतरं झाली, प्रयोग झाले. पंचवीस वर्षांपूर्वीचं हे नाटक आजही समकालीन वाटतं. ही सगळी भट्टी जमवून आणण्याचं श्रेय अर्थात दिग्दर्शकाचं म्हणजे अतुल पेठे यांचं.

लेखक- राजीव नाईक

दिग्दर्शक- अतुल पेठे

अभिनय- ओंकार गोवर्धन आणि अश्विनी कासार

मृदगंधा दीक्षित | mrudgandha.uniqueportal@gmail.com

मृदगंधा दीक्षित युनिक फीचर्समध्ये संपादकीय विभागात कार्यरत असून त्यांना कथा-कादंबरी-कविता लिहिण्यातही रस आहे.







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results