माझ्या पहिल्या विमानप्रवासाच्या आता खूपच अंधुक आठवणी आहेत. सेऊलला एका क्लायंटकडे जायचं होतं. आधी नीलेश जाणार असं ठरलेलं होतं. त्याचं लग्न ठरलं. मग त्याच्याऐवजी म्हणून माझी वर्दी लागलेली. पुढे माझ्या कोरियन सहकाऱ्यांना मला हे अडतीसशे वेळा सांगावं लागलं होतं, की ‘अहो, आमच्याकडे २५व्या वर्षी लग्न म्हणजे खूप लवकर नसतं.' कल्चरल डिफरन्स हो, आणि काय! पण त्यांना कायमच याचं अप्रूप वाटायचं. हा विषय नाही म्हटलं तरी दर दोन-चार दिवसांनी निघायचाच. परदेशातून एक इसम आपल्याकडे आलाय म्हणून जरा माझं कौतुक होईल अशी अपेक्षा होती माझी. झालंही थोडं कौतुक; पण त्यापेक्षा नीलेशच्या ‘अकाली' लग्नाचंच कुतूहल जास्त! माझी दुसरी परदेशवारीही अशीच. तेव्हा विकास जाणार होता. तो शेवटच्या क्षणी गळाला म्हणून मला धरलेला. त्याचं सुनामी हे कारण होतं. आणि तेव्हा माझं अजून ठरायचं होतं, की सुनामीला घाबरायचं असतं की नसतं.
सगळंच नव्याने कळत होतं. अशातच पहिल्या दोन-तीन छोट्या छोट्या वाऱ्या घडूनही गेल्या. विमानप्रवासाबद्दल काही मतं नव्हती, काही अपेक्षाही नव्हत्या. सगळ्याचं फक्त कुतूहल आणि कौतुक होतं. आता इतक्या वर्षांनी विमानप्रवासाचे इतके अनुभव पदरात पडल्यावर त्या पहिल्या कोरिया ट्रिपकडे मागे वळून बघताना जास्त मजा येतीये.
तर झालेलं असं- शेवटच्या घटकेला माझी वर्णी लागल्याने माझा व्हिसा-बिसा करायचं जरा उशिराच सुरू झालेलं. क्लायंटकडे आधी असलेला माणूस त्यांना पसंत नव्हता. त्याच्या बदली नीलेश जायचा होता; पण आता त्याचंही रद्द झालेलं. तेही त्यांच्या मते जेन्युइन नसलेल्या कारणामुळे. म्हणून त्यांनी आधीच बोंब मारायला सुरू केलेली होती. अशामुळे आमच्याकडे ‘निवांत करू या' हा पर्याय नव्हताच. पटापट कागदपत्रं द्या, व्हिसा काढा आणि पळा, असं असणार होतं. यातली घाई मला तेव्हा फारशी माहिती नव्हती. माझे खूप ‘बेसिकमध्ये वांदे' सुरू होते. म्हणजे पासपोर्टवर एक ‘ईसीएनआर' (की ‘ईसीआर') म्हणून शिक्का असावा लागतो, तो माझ्या पासपोर्टवर नव्हता म्हणे. त्याचा काही तरी गोंधळ सुरू होता. व्हिसाच्या फॉर्मवर ‘इमिग्रेशन चेक नॉट रिक्वायर्ड' म्हणून एक क्लॉज असतो, त्याच्या पुढे ‘येस' किंवा ‘नो' यातलं एक लिहायचं असतं. तिथे नेमकं काय लिहायचं हे समजून घ्यायला मला का कोणास ठाऊक पण ‘य' वर्षं लागली. पासपोर्टवर शिक्का आहे म्हणून चेक आवश्यक नाही, म्हणून ‘नो' लिहायचं की शिक्का आहे म्हणून ‘येस' लिहायचं, या प्रश्नाने मला अनेकदा छळलं. मीही दरवेळी व्हिसा फॉर्म भरताना खूप विचार करून हा प्रश्न रिकामा सोडायचो. त्या काळी मुंबई एअरपोर्टला पण तुम्ही उडायच्या आधी एक फॉर्म भरून घेतला जायचा, त्यातही हा प्रश्न असायचा. तो पाहिला की वाटायचं, प्रवासी आता विमानाच्या दारापर्यंत आला की आता तरी सोडून द्यावं, अजूनही का छळतायत? असो. तर कोरियन व्हिसा काढायच्या वेळी तो ‘ईसीएनआर' शिक्का असल्यामुळे की नसल्यामुळे मला चार जादा कागदपत्रं जोडावी लागणार होती. तरी त्यात मध्येच शोधाशोधही सुरू होती, की कोरियाला जाताना ‘ईसीएनआर'चा संबंध असतो का नाही. म्हणजे तो मला छळणारा प्रश्नच निकालात निघतो का ते बघायचा उगाच केविलवाणा प्रयत्न!
कंपन्यांमध्ये ‘ट्रॅव्हल डेस्क' नावाचा एक गूढ विभाग असतो. आमच्या कंपनीतल्या त्या डेस्कशी माझा आधी कधीही संपर्क आलेला नव्हता. त्यांच्याबरोबरच हा सगळा रोमान्स सुरू होता. त्यांनी माझं तिकीटही काढून ठेवलेलं होतं. म्हणजे जायची तारीख वगैरे सगळं ठरलेलं. लोकांनी प्रवासविषयक, कोरियाविषयक खास सल्ले देणंही सुरू केलेलं होतं. तेव्हा सेऊल ऑलिंपिकमध्ये कुत्र्यांचं मांस खायला दिल्याबद्दल खूप दंगा झालेला होता. त्यासाठी आणखी चार सल्ले मिळालेले. चुकून नॉर्थ कोरियाकडे कसं जाऊ नको, हेही सांगून झालेलं. एकाने तर सांगितलं, की जितके दिवस राहणार आहेस तितक्या दिवसांच्या चपात्या गोठवून घेऊन जा. ते ऐकून आमच्या मातोश्रींनीही हिरिरीने तब्बल पन्नास-एक चपात्या गोठवून दिलेल्या. पण मुळात मुद्दा असा होता की माझ्याकडे अजून व्हिसा आलेलाच नव्हता. आणि तो नसणं ही पॅनिक व्हायची गोष्ट आहे, हेच मला माहिती नव्हतं. व्हिसा एजंट मुंबईचा होता आणि त्याने व्हिसासहितचा माझा पासपोर्ट पाठवलेलाच नव्हता. मला आता सामान घेऊन मुंबईला जाताना मध्येच उतरून, तो एजंट हुडकून, त्याच्याकडून पासपोर्ट घेऊन पुढे एअरपोर्टला जायचं होतं. आणि या सगळ्यामध्ये कुठलीच गोष्ट कोणालाही वावगी वाटली नव्हती.
पासपोर्टविनाच आमची स्वारी ट्रॅव्हल बसने पुण्यातून निघाली, थेट एअरपोर्टला न जाता मध्येच अंधेरीला उतरली. त्या एजंटचं हापिस कुठे तरी कोपच्यात होतं तिथे जाऊन मी पासपोर्ट घेतला. तोपर्यंत त्या ट्रॅव्हल बसच्या ड्रायव्हरला थांबायला थोडाच वेळ होता? त्याने गाडीतल्या बाकीच्या लोकांना एअरपोर्टवर पोहोचवलं आणि तो मला घ्यायला त्याच ठिकाणी परत आला. हे असं सगळं प्लॅनिंग शेवटच्या मिनिटाला करून आपण सहीसलामत जाऊ शकू याबद्दल किंचितही शंका न वाटल्याबद्दल मला माझंच कौतुक वाटतं काही वेळा. आताची गोष्ट वेगळी आहे; पण पंधरा वर्षांपूर्वी, तेही पहिल्या परदेशवारीच्या वेळी, नक्कीच सवय नव्हती की अशी. तर हा बसचा ड्रायव्हर आला ठरल्याप्रमाणे. मुंबई तेव्हा फारशी माहिती नसली तरी मीही पोहोचलो ठरलेल्या जागेपर्यंत, तेही पासपोर्ट घेऊन. आणि मग पुढे प्रथमच आपण मुंबई एअरपोर्टच्या आतमध्ये शिरलो. पुढचा स्टॉप आता साऊथ कोरिया.
हे सगळं परत आठवण्याचं कारण काय? आता तीही एक मजा आहेच की. उगाच थोडंच आठवतं काही? तर, नुकताच परत एकदा असाच एक मजेशीर दिनक्रम पार पडला. या वेळी हे सगळं लंडनमध्ये घडलं इतकाच फरक. आपला शेंगन व्हिसा कधी तरी संपणारे हे माहिती असतंच की आपल्याला. फक्त तो आता ४८ तासांनीच संपणारे हे समजल्यावर माझ्या रविवार संध्याकाळला आपसूकच चार चाँद लागले. आणि जेमतेम आठवड्यातच युरोपवारी ठरलेली आधीच. हे ‘आयसिंग ऑन द केक'! पण मग सराईत एजंटसारखं लगेच नव्या व्हिसासाठी ॲप्लिकेशन तयार केला. तो व्हिसा संपायच्या २४ तास अगोदर जाऊन तो सबमिट पण केला. आणि इतक्या लवकर ॲप्लिकेशन तयार केला याचं कौतुक पण वाटून घेतलं. आता, तो पासपोर्ट तयार आहे याचा सुरळीतपणे शुक्रवारपर्यंत ई-मेल आला असता तर मग काय नं! पण ते येण्यात घोटाळा झाला तरी आपला पासपोर्ट तयार असणारच, म्हणून व्हिसा एजन्सीच्या दरवाज्यावर थाप पण देऊन आलो. आणि मग आता आज सोमवार उजाडला. आजच उडायचा दिवस. तेव्हा मीटिंग संपवून, ‘पीक टायमा'ला पळत जाऊन व्हिसा एजन्सीच्या ऑफिसमधून पासपोर्ट घेऊन, तेही व्हिसा मिळालाच असेल असा विश्वास उराशी बाळगून लगेच तिथूनच पुढे हिथरो गाठलं पण! आणि हे सगळं करून फ्लाइट उडायच्या आधी आपल्या फेसबुक-ॲप नसलेल्या फोनवरून हे लिहून फेसबुकवर पोस्ट करून थोडा माज पण केला!
... १४ वर्षं झाली आज असं हवेत प्रवास करून. ३१ ऑगस्ट २००४ ला लागलेला पहिला शिक्का आणि त्याचा पहिला किस्सा. हा लंडनमधला कितवा काय माहिती, पण फार काही बदललंय असं वाटत नाही. म्हणजे कितीही गोंधळ झाला तरी शेवटी आपल्याला फ्लाइट मिळतेच. फक्त बूड हलवत राहणं हा नियम. आता इतक्या वर्षांत भल्या, बुऱ्या, हसऱ्या आणि दुखऱ्या अशा ‘य' आठवणी जमल्यात. महत्त्वाचं म्हणजे त्यांनाच एक ‘हॅपीवाली'वाली फोडणी देऊन परत परत खुषीने आठवण्याचं स्किलही जमलंय, हे या इतक्या भ्रमंतीचं फलित. तशीच ही आणखी एक जुनी आठवण जाता जाता...
मोबाइल फोन नव्हते, क्रेडिट कार्ड्स सवयीची नव्हती तेव्हाची गोष्ट. तीन महिने कामानिमित्त जकार्तात मुक्काम होता. काम आटोपत आलेलं. आता काही दिवसांत परत जायचं म्हणून सामानाची आवराआवर पण झालेली. मनातल्या मनात थेट घरी जाऊन पोहोचलेलोही. अशा वेळी आमच्या मॅनेजरचा ई-मेल आला. म्हणाला, की ‘छान काम केलंस मागच्या तीन महिन्यांत. खूप कौतुक! पण आता आणखी एक आठवडा जकार्तात राहावं लागेल. या आठवड्याऐवजी पुढच्या आठवड्यात परत ये.' ये बात जरा हजम नहीं हुई। झालेलं असं, की जकार्तातल्या तीन महिन्यांत मध्येच एक आठवडा मला सिंगापूरच्या क्लायंटकडे पाठवलं होतं, आलाच आहेस तर त्यांनाही मदत कर म्हणून. हे असले जुगाड तेव्हा मला शून्य कळायचे; पण त्या निमित्ताने सिंगापूर दर्शन होईल म्हणून मी गेलोही. ठरल्याप्रमाणे कामाचे तीन महिने संपले म्हणून बिल लावायची वेळ आली तेव्हा जकार्ताचा क्लायंट घासाघीस करायला लागला, की त्या मधल्या एक आठवड्यात तुमचा माणूस बेपत्ता होता, त्याचे पैसे का देऊ, वगैरे. एकूण काय, तर त्या मांडवलीमुळे मला आता एक आठवडा जादा राहायचं होतं. पुढे मनातल्या मनात प्रत्येक सेकंदाला किरकिर करत का होईना, पण राहिलो बाबा आणखी एक आठवडा. पुढच्या आठवड्यात एकदाचा निघालो. पण पुढे पिच्चर अभी बहोत बाकी था...
एअरपोर्टला पोहोचलो. चेक-इनच्या इथे सामान टाकलं, तर तिथला माणूस म्हणाला, “एअरपोर्ट टॅक्स दे.” हे प्रकरण आपल्याला नवीन होतं. त्याबद्दल कोणी काही सांगितलेलंच नव्हतं. खिशात तेवढे पैसे नव्हते. एटीएममधून काढून आणतो, सांगून तिथून पळालो बाहेर. सामान तिथेच. पैसे घेऊन आलो तोपर्यंत त्या माणसाला नवीन माहिती उलगडलेली. म्हणाला, “सर, तुमचं तिकीट एक्स्पायर्ड आहे.”
“हो, पण पोस्टपोन केलंय की.” मी
“दिसतंय ते मला, पण ते पोस्टपोन केलेलं आता व्हॅलिड नाहीये.”
हे अजिबात झेपलं नाही मला. मी डोळे विस्फारून लगेच ते जाहीर करून टाकलं, “म्हणजे?”
“तुम्ही अमुक अमुक तारखेला आला. तिथून पुढे तीन महिने असतं तिकीट व्हॅलिड. ते तीन महिने उलटले आता. मग आता इन्व्हॅलिड.”
झालं का! तरीही मी बॅटिंग सुरू ठेवली. “परत बघा की सिस्टीममध्ये. आमच्या ट्रॅव्हल डेस्कने मला सांगितलंय की त्यांनी केलंय सगळं.” अहाहा! काय हा विश्वास! पण आता पर्यायही नव्हता.
“नाही सर, नाही केलेलं काही.”
“मग, आता काय करायचं?” आता तू जकार्तामधेच राहायचं, असं थोडेच म्हणणार होते ते!
त्याने जरा फोनाफोनी केली. एक मोठ्ठी बाई कुठून तरी प्रकट झाली. तिने आणि याने मिळून कागदावर काही तरी फराटे मारले. शेवटी म्हणाले, “रिन्यूड तिकीट इश्यू करावं लागेल.”
खोदा पहाड, निकला चूहा! मी म्हणालो, “करा की मग. त्यात काय इतकी चर्चा?” पुढे मनात म्हणालो- प्रिंटचे दोन रुपये मी देतो हवं तर.
दोघांनी माना हलवल्या आणि ती बाई म्हणाली, “ओके, ६३७ डॉलर.”
मी पुन्हा आपले डोळे विस्फारून तोंडाचा ‘आ' वासला. एअरपोर्ट टॅक्स भरायला माझ्याकडे पैसे नव्हते, हे पैसे मी कुठून आणणार? परत बाहेर पळालो. कॉइनवाला फोनबूथ हुडकला. आमच्या ट्रॅव्हल डेस्कला फोन केला. त्यांनी सांगितलं, की आम्ही तर केलंय पोस्टपोन, आता एअरलाइनच्या मुंबईच्या ऑफिसला विचारा. आत आलो. काउंटरच्या लोकांना सांगितलं, तर ते म्हणाले, “आम्ही मुंबईला वगैरे फोन करू शकत नाही. बाहेर फोन करायची आमाला पावर नाई! आमच्या शिष्टीमवर जोपर्यंत नाही तोपर्यंत नाही.” परत बाहेर पळालो आणि मीच मुंबईला फोन केला, तर तिथला मनुष्य म्हणाला, “आमच्या शिष्टीमवर आहे. त्या लोकांना त्यांच्या शिष्टीमवर परत बघायला सांगा.' त्यावर जकार्तावाले म्हणाले, “आता काय परत बघून बदलणारे काय? मुंबईनेच चूक केली असणार.” या प्रत्येक संवादाच्या मध्ये मी चेक-इनचं काउंटर आणि बाहेरचा फोनबूथ यामध्ये पळत होतो. या सगळ्या लोकांनी माझा जवळजवळ मिल्खासिंग केलेला. शेवटी जकार्तावाल्या बाबाने ‘टाइम-आऊट' दिला. म्हणाला, “खूप झाला खेळ. पाच मिनिटांत गेट बंद. पैसे भरलेस तर तुला चान्स आहे अजून, नाही तर मी काय फ्लाइट थांबवणार नाही.”
झालं का! आपल्या औकात के बाहरकी ती तिकिटाची किंमत. ती क्रेडिट कार्ड वापरून देता येते का, असे बेसिक प्रश्न होते मनात. वन लास्ट टाइम म्हणून मी परत फोनबूथकडे धूम ठोकली. मॅनेजरला फोन केला. त्याच्याकडून कबुली घेतली, की मी इथे जे पैसे भरेन ते नंतर परत देशील. परत आलो. ते पैसे भरले. उगाच उत्तेजनार्थ बक्षीस म्हणून त्या माणसाने सांगितलं, की ‘हे अमुक अमुक कागद घे. तुझा बँकॉकला स्टॉप-ओव्हर आहे. तिथे पोहोचेपर्यंत जर आमच्याकडे माहिती आली तर आम्ही तुझे पैसे परत देऊ.' हे कसं होणार होतं हे शून्य समजलं मला. तरीही आपली मान डोलावली. म्हणालो, कर लेका काय करतोस ते आणि सोड आता.
ते दोन-तीन जादाचे कागद देऊन त्यांनी माझी सुटका केली. इमिग्रेशन काउंटरवर मोठ्ठीच्या मोठ्ठी रांग होती. तिथे रवानगी झाली. पलीकडे एक सिक्युरिटीवाला उभा होता. तो माझ्यासाठीच होता म्हणे. त्याने काही तरी कुजबूज केली आणि मला थेट लाइनच्या पुढे आणण्यात आलं; पण मी त्या सिक्युरिटीवाल्या माणसापर्यंत पोहोचण्याच्या आधी मघाचाच चेक-इन काउंटरवाला हीरो पळत आला. या वेळी त्याच्या शिष्टीमवर स्टेटस अपडेट आलेलं म्हणे! त्याने त्या सिक्युरिटीवाल्याला हात केला, त्याच्याशी तो बहासामध्ये काही तरी बोलला आणि त्याने मला रांगेतून बाहेर काढलं. आपली स्टोरी काय संपतच नव्हती राव. त्याने नव्याने दोन-तीन ठिकाणी माझ्या सह्या घेतल्या. बरेच कागद माझ्या हातात दिले- नवं तिकीट रद्द केल्याचा एक, जुनं रद्द केलेलं तिकीट रद्द नसल्याचा एक आणि क्रेडिट कार्ड ट्रान्झॅक्शन रद्द केलेला एक. आधीचे पण ठेव म्हणाला आणि त्याने मला परत इमिग्रेशनच्या रांगेत धाडलं.
पलीकडे सिक्युरिटीवाला वाट बघतच होता. त्याने मला पुढे बोलावलं लगेच. पलीकडे पोहोचताच त्याने माझी बॅग उचलली आणि तो म्हणाला, “पळ. एव्हाना फ्लाइट पंधरा मिनिटं तरी लेट झालेली. मला माझं नावही एक-दोन वेळा ऐकू आलं होतं- ‘लास्ट बोर्डिंग अनाऊन्समेंट फॉर...' मी मात्र आपली बॅग घेऊन सिक्युरिटीवाला पळतोय या रॉयल ट्रीटमेंटचा आस्वाद घेत होतो. शेवटी पोचलो बुवा गेटवर. विमानात शिरलो आणि उगाच असं मनातल्या मनात वाटून गेलं, की सगळे प्रवासी माझ्याचकडे बघतायत की काय, की याच्यामुळेच लेट झालो आपण! असो. बघायचं तर बघोत, आपण तर फुल्ल सहकार्य केलेलं. यांच्या शिष्टीमने मान टाकली त्याला मी काय करणार?
जेमतेम बसलो आणि निघाली आमची फ्लाइट. ताबडतोब झोप लागली. पुढे बँकॉकला पहाटे पोचलो. काही तास थांबायचं होतं तिथे. तिथल्या ओस पडलेल्या ‘फलाटा'वरून अर्धवट झोपेत चालताना बाजूने थेट अमिताभ बच्चन गेला तरी समजलं नाही. कारण ‘शेवटी फ्लाइट मिळतेच आपल्याला' या आनंदात होतो तेव्हाही... त्यापुढे बाकी सब झूठ!
(मुशाफिरी सप्टेंबर २०१८च्या अंकातून साभार)
