तेव्हा मी २२-२३ वर्षांचा असेन. दुपारची वेळ होती. मी घरी काही तरी वाचत बसलो होतो. दारावरची बेल वाजली. पाहिलं, तर मुंडासं घातलेला एक अनोळखी माणूस समोर उभा होता. खेड्यावरून खूप मोठा प्रवास करून आल्यासारखा तो दिसत होता.
त्याने मला विचारलं, ''प्रसादसाहेब आपणच का?''
मी मान डोलावताच तो म्हणाला, ''जरा खाली येता?''
''तुमच्यासाठी काही तरी आणलं आहे.''
मला काहीच बोध होईना. खाली आलो. त्याने रस्त्याकडे हात दाखवत म्हटलं, ''हे तुमच्यासाठी.''
समोर काय असावं?
एक उमदा, तरणाबांड घोडा.
काहीच न कळून मी त्याला म्हणालो, ''हे काय आहे?''
तो म्हणाला, ''हा घोडा तुमच्यासाठी साहेबांनी मागवलाय. मी चाळीसगावहून आलो त्याला चालवत. सांभाळा.''
असं म्हणून तो माणूस माझ्या आश्चर्याची पर्वा न करता आला तसा निघूनही गेला.
मी पाहतच राहिलो. घोडा? आपल्यासाठी?
आपले वडील वेगळे आहेत हे मला माहिती होतं, पण ते एक जिवंत घोडा भेट म्हणून देतील असं मात्र वाटलं नव्हतं. मला आश्चर्याचा आणि आनंदाचा धक्का तर बसला होताच, पण आता या घोड्याचं करायचं काय, असा प्रश्नही पडला होता. त्याला ठेवायचं कुठे, खायला काय घालायचं, किती घालायचं, काहीच माहिती नव्हतं. त्यामुळे त्याच्यासाठी गवत पैदा कर, पाणी आण, अशी माझी तारांबळ उडाली.
हा घोडा आमच्या दारात येऊन उभा ठाकला तेव्हा बाबा घरात नव्हते. ते संध्याकाळी आले तेव्हा मी धावतच त्यांच्याकडे गेलो. त्यांना म्हटलं, घोडा आलाय.
ते शांत होते.
म्हणाले, ''तुम्ही उत्तम घोडेस्वारी करता म्हणून तुमच्यासाठी. आणि हेही ठेवा.'' असं म्हणत त्यांनी एक रेशमी कापडात गुंडाळलेली तलवार माझ्या हातात ठेवली. रत्नजडित, धारदार आणि मुख्य म्हणजे वापरातली. मी अचंबित झालो होतो. तो दिवस आजही जसाच्या तसा मला आठवतो.
हा घोडा भेट देण्याला कारणही तसंच होतं. माझं कौतुक करण्याची ती त्यांची खास पद्धत होती.
हा घोडा माझ्या आयुष्यात येण्यापूर्वीची गोष्ट. बाबासाहेब पुरंदऱ्यांची मुलं म्हणजे आम्ही घोड्यांसोबतच वाढलो असणार, असं तेव्हा साऱ्यांना वाटायचं; पण तसं काही नव्हतं. बाबांकडून शिवाजी महाराजांच्या गोष्टी ऐकतच आम्ही वाढलो, पण वयाच्या बाविशीपर्यंत माझा प्रत्यक्ष घोड्यांशी काहीही संबंध आला नव्हता. तसं घोड्यांचं आकर्षण मला होतंच.
पण एके दिवशी बाबांनी मला अचानक हाक मारली. त्यांच्याकडे फणसळकर नावाचे कोणी तरुण गृहस्थ आले होते. बाबांनी माझी त्यांच्याशी ओळख करून दिली आणि ते म्हणाले, ''उद्यापासून तुम्ही यांच्यासोबत जायचंय. तुम्हाला घोडेस्वारी शिकायची आहे.''
बस, एवढी दोनच वाक्यं. का, कशासाठी- काहीच स्पष्टीकरण नाही. मी एकीकडे थोडा गोंधळलो. कारण तोवर बाबांनी कोणावरच एखादी गोष्ट केलीच पाहिजे, अशी सक्ती केली नव्हती. त्यामुळे हे थोडं वेगळंच वाटत होतं; पण दुसरीकडे मला आनंदही झाला होता. आपल्याला हे प्रकरण आवडणार हे बाबांना कसं कळलं, याचंही आश्चर्य वाटत होतं. घोड्यावर बसण्यासाठी माझं तरुण रक्त सळसळत होतं. बायकिंग, रेसिंग, फ्लाइंग- जे जे काही शक्य ते सारं मी तोपर्यंत जिवावर उदार होऊन करून पाहिलं होतं. अंगात प्रचंड जोश होता. माज होता असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे घोड्यावर बसायचं या विचारानेही मला स्फुरण चढलं होतं. दुसरा दिवस कधी एकदा उजाडतो असं मला झालं होतं.
दुसऱ्या दिवशी मी शिवाजी मिलिटरी प्रिप्रेटरी स्कूलच्या मैदानावर पोचलो. तिथे निवृत्त लष्करी अधिकारी घोडसवारी शिकवायचे. आत्मविश्वास एवढा, की मनातल्या मनात असं वाटत होतं की आपल्याला कोणी शिकवायची गरज नाही. हे आपल्याला येणारच. मी तिथल्या अधिकाऱ्यांना त्या गुर्मीतच म्हटलं, ''तुमच्या इथे जो सगळ्यात बदमाश घोडा असेल तो द्या मला चालवायला.''
ते म्हणाले, ''साब, ऐसा नहीं होता। आज आपका पहला दिन है। आप अच्छावाला घोडा ले लो।''
पण मी ऐकायला तयार नव्हतो. “आपण सोळा हॉर्सपॉवरची बाइक चालवतो. एक घोडा त्यापुढे काय चीज?''
म्हटलं, ''नाही, मला साधा-सभ्य घोडा नकोच. मला काही होणार नाही. मला बदमाश घोडाच हवाय.''
खूपच हट्ट धरल्यानंतर त्यांनी शेवटी एका पोऱ्याला आवाज दिला, ''जरा ‘डिंपल' को सॅडल लगाव।''
तो मुलगा ‘डिंपल' नावाच्या घोडीला घेऊन आला. घोडी कसली, खेचरासारखीच दिसत होती ती. तिच्यावर सॅडल म्हणजे खोगीर चढवलं गेलं.
इकडे घोड्यावर बसण्यापूर्वी काय काळजी घ्यायची, खोगीर कसं चढवायचं, पाय कसा ठेवायचा, लगाम कसा धरायचा, अशा सगळ्या सूचना त्यांनी दिल्या; पण माझं त्याकडे लक्ष नव्हतं. कधी एकदा त्या घोडीवर स्वार होतो, असं मला झालं होतं. त्या जोशातच मी रिकिबीत पाय ठेवला आणि दुसरा पाय पलीकडे टाकला, तशी डिंपल अचानक मागच्या पायांवर उभीच राहिली. मला कळेना, आता करायचं काय? असं झालं तर काय करायचं हे काही कुणी सांगितलं नव्हतं. मी घाबरून माझ्याही नकळत लगाम ओढला, तसे डिंपल आणि मी दोघंही मागे उताणे पडलो. डोळ्यांसमोर झांज आली. आपण खाली पडलोय, हेही मला थोडा वेळ कळलं नाही. धडपडत उभा राहिलो. साऱ्यांच्या नजरा माझ्यावर खिळलेल्या होत्या. आता घोड्यावर बसणं हा माझ्यासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न बनला होता. त्यामुळे मी हट्टाने पुन्हा डिंपलवर बसण्याचा प्रयत्न केला आणि पुन्हा पडलो. उठलो, तर डिंपल मला त्या लाकडी रिंगणावरून उडी मारून जाताना दिसली. दोघं-तिघंजण मला सावरायला आले. काही झालं नाही, असं म्हणत मी त्यांना बाजूला केलं. पण माझ्या डोक्याला एक मोठी खोक पडली होती आणि पांढऱ्या शर्टावर रक्ताचा एक मोठा डाग दिसायला लागला होता. माझं पहिल्या दिवशीचं रायडिंग तिथेच ठप्प झालं- घोड्यावर न बसताच.
घोड्याचं आणि माझं प्रेमप्रकरण सुरू झालं ते असं. मनातून मी धसकलो होतो. हे काही तरी वेगळं प्रकरण दिसतंय. हे आपल्या मोटरसायकलसारखं ओबीडियंट नाही. ते स्वतःच्या अकलेने चालतं, हे लक्षात आलं होतं. स्वतःच्या वेडेपणावर मी थोडा वैतागलोही होतो.
दुसऱ्या दिवशी मी परत गेलो, तेव्हा मला एक सभ्य घोडा देण्यात आला. घोड्यावर बसणं आणि त्याला दौडवणं ही गोष्ट इरेला पेटून करता येणार नाही, हे मला पहिल्याच दिवशी कळलं होतं. त्यामुळे शांतपणे घोडा समजून घेण्याच्या प्रक्रियेत मी स्वतःला ढकललं. चार महिने संयमाने मी तिथे घोडा चालवत राहिलो. सकाळ-संध्याकाळ मी तिथे पडीक असायचो. घोड्यांचं वेडच लागलं मला. घोड्याची चाल, घोडेस्वारीचे प्रकार, चांगले घोडे, बदमाश-अडेलतट्टू घोडे असं काहीबाही मला कळू लागलं. या पहिल्या चार महिन्यांमध्ये सर्वांत मोठी गोष्ट कोणती कळली असेल तर ती म्हणजे घोड्यावर बसलात की तुम्हाला राजे झाल्यासारखं वाटतं खरं; पण तिथे तुमची मर्जी चालत नाही. घोड्यावर बसता म्हणजे तुमचा जीव तुम्ही घोड्याच्या ताब्यात देत असता. तो तुम्हाला सांभाळून घेतो तसंच तुम्हीही त्या घोड्याला समजून घेतलं पाहिजे. ही शिकवण पुढे मला कायम उपयोगी पडली. हळूहळू मी घोडा चालवण्यातही तरबेज होत गेलो.
आता मला बाबांना घोडा चालवून दाखवायचा होता, त्यांची शाबासकी घ्यायची होती. मी घोडा शिकावं अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे आपल्याला घोडा दौडवताना त्यांनी पाहावं, असं वाटणं साहजिक होतं.
एके दिवशी खास तयारी करून, चांगल्यातल्या चांगल्या घोड्यासाठी सेटिंग लावून मी बाबांना तिकडे घेऊन गेलो. माझ्या दृष्टीने मी खरोखरच घोडा चांगला चालवला. घोडा तिथल्या माणसांकडे सोडून मी बाबांजवळ आलो आणि अपेक्षेने त्यांच्या चेहऱ्याकडे पाहू लागलो; पण त्यांच्या चेहऱ्यावर काहीच प्रतिक्रिया नव्हती. ते काहीच बोलले नाहीत. आम्ही तसेच परत आलो. किती नाही म्हटलं तरी मी थोडा खट्टू झालोच.
आणि मग पुढे काही दिवसांनी अचानक मला बाबांकडून हा घोडा भेट मिळाला. समशेर त्याचं नाव. तेही बाबांनीच ठेवलं होतं. आपल्या मुलाला घोडा चालवणं आवडतंय हे पाहिल्यावर त्यांनी चाळीसगावच्या डॉ.पूर्णपात्रे यांच्याकडून खास हा घोडा मागवला होता.
हा घोडा घरी आला, तेव्हा माझ्या डोक्यात प्रामुख्याने काऊबॉईजचे वेस्टर्न सिनेमे होते. क्लिंट ईस्टवुड, जॉन वेन, स्टीव्ह मॅक्विन अशा काऊबॉय हीरोंचं मला जबरदस्त आकर्षण होतं. मला आठवतं, त्या वेळीच ‘मॅग्निफिसंट सेव्हन' हा सिनेमा आला होता. त्यातल्या घोड्यांसाठी मी तो सलग सात दिवस पाहिला होता. कमरेला दोन पिस्तुलं लटकवून, फेल्ट हॅट घालून काऊबॉयसारखं घोड्यावर बसून फिरायचं, हे माझं स्वप्न होतं. समशेर घरी आला आणि मला आभाळ ठेंगणं झालं. आज कुणाला खरं वाटणार नाही, पण स्कूटरला किक मारून भाजी आणायला जावं, इतक्या सहजतेने मी समशेरवर बसून पुण्यात फिरायला बाहेर पडायचो. बँकेत जायचं असो, मित्रांना भेटायला ‘वैशाली'त जायचं असो किंवा कोणाच्या घरी. सकाळच्या वेळी वैशालीत आम्हा मित्रांचा गप्पांचा अड्डा रंगलेला असताना बाहेर निवांतपणे माझी वाट पाहत थांबलेला समशेर, असं दृश्य तेव्हा फर्ग्युसन रस्त्यावर अनेकदा दिसायचं. मला ओळखणाऱ्या अनेकांना माझे हे उद्योग आजही आठवत असतील. ही गोष्ट असेल २० वर्षांपूर्वीची. तेव्हा रस्त्यांवर तुलनेने रहदारी कमी होती, तरीही वर्दळ असायचीच; पण घोड्यावरून फिरताना मला त्याचा कधी त्रास झाला नाही. आणि आपण लोकांचं लक्ष मुद्दाम वेधून घेण्यासाठी काही तरी करतोय, असंही मला कधी वाटलं नाही. मी माझ्याच तंद्रीत असायचो. माझा घोडा कसा चाललाय, त्याच्या डोक्यात काय चालू आहे, त्याची बॉडी लँग्वेज सतत वाचत राहणं याच्याकडेच माझं सारं लक्ष असायचं. ही सवारी मला मनापासून आवडली होती. घोडेस्वारीच्या भाषेत याला शाही सवारी म्हणतात. म्हणजे तुम्हाला घोडा रेससाठी दौडवायचा नाहीये किंवा लष्करात त्याला युद्धासाठी तयारही करायचा नाहीये. तुम्ही तुमच्या हौसेखातर शांतपणे घोडा चालवता. अशी शाही सवारी करण्यात एक आगळा आनंद असतो, आगळा रुबाब असतो. हा आनंद मी अनेक वर्षं पुरेपूर लुटला.
पुढे समशेरवर ताण पडू नये म्हणून बाबांनी आणखी एक घोडा घ्यायचं ठरवलं. असं करत करत चाळीसगावजवळच्या सारंगखेडा बाजारातून आमच्याकडे दहा घोडे आले. एक काळ असा होता की घराच्या खालचं अख्खं गॅरेज घोड्यांनी भरलेलं होतं. समशेर, सर्जा, बादल, राणा, समीर, मस्तानी अशी खास बाबांनी त्यांच्या आवडीने ठेवलेली नावं होती या घोड्यांची.
तुम्ही घोडेस्वारी शिकता. चार-दोन वेगवेगळे घोडे चालवता. एक घोडा घरी बाळगता. त्याच्याशी तुमचं मैत्र जुळतं. तुम्हाला घोडा या प्राण्याबद्दल हळूहळू कळू लागतं.....हे सारं ठीक आहे. पण एका वेळी घरात दहा घोडे असणं, हे काही तरी वेगळं होतं. तो निश्चितच साधासुधा अनुभव नव्हता. आधी घोडा हा काही साधासुधा प्राणी नव्हे. तो येतो तो त्याच्या साऱ्या वैशिष्ट्यांसह. आणि आमच्याकडे तर अशा साऱ्या वैशिष्ट्यांसह दहा-दहा घोडे घरात दाखल झाले होते. अचानक ते माझ्या आयुष्याचा एक भाग बनून गेले होते. घोड्यांचा एक वास असतो. घोड्याशी संबंध नसलेला कोणताही माणूस नाक मुरडेल, असाच दर्प असतो तो; पण त्या वासाचंही एक व्यसन असतं. घराच्या खाली उतरलं की त्या वासानेच माझा मूड तयार व्हायचा. त्यांचं खाणं, त्यांचं पिणं, त्यांची मशागत, त्यांचा खरारा, त्यांचा आनंद, त्यांचं खिंकाळणं, त्यांचं दुःख, त्यांचे मूड्स, त्यांचं झोपणं, त्यांचं उठणं, त्यांचा वास, त्यांची आजारपणं.... हे सारं बराच काळ मी जवळून अनुभवलं. मी त्यातला एक भागच झालो होतो.
या काळात घोड्यांसोबत मी अक्षरशः पुणं पालथं घातलं. मला आठवतं, एकदा मी आणि माझा एक मित्र आमच्या दोन घोड्यांवर बसून सिंहगडावर गेलो होतो. डांबरी रस्त्याने नव्हे, पाऊलवाटेने. आमच्यासाठी आणि घोड्यांसाठीही काय थरारक अनुभव होता तो! निसरडी वाट, उभा चढ आणि निर्मनुष्य परिसर. रात्री आम्ही गडावरच मुक्काम ठोकला आणि भल्या पहाटे कोंढणपूरच्या बाजूने कात्रजवरून डोंगर-दऱ्या पालथे घालत पुण्यात आलो. असा अनुभव आपल्याला रोज रोज मिळत नसतो, पण तुम्हाला तो कायमसाठी समृद्ध करतो. तुमचं घोड्यांसोबतचं नातं आणखी बळकट होत जातं.
त्यामुळेच हे घोडे घरी येण्याआधीचा मी आणि त्यानंतरचा मी यात बराच फरक आहे, असं मला कायम वाटतं. घोड्यांनी मला खूप शिकवलं, किंवा खरं तर घोड्यांसोबत वाढल्यामुळे मी खूप शिकत गेलो.
घोडा हा एक जिवंत, व्हायब्रंट प्राणी आहे. तो फार विलक्षण आहे. उमदा, हुशार, प्रचंड ताकदीचा आणि अप्रतिम देखणा. उगाच नाही, जगातल्या साऱ्या चित्रकार, शिल्पकारांना या घोड्याला आपल्या कलेतून साकारण्याचा मोह पडला. पण घोड्यासोबत एवढा काळ काढल्यावर मला त्याचं आणखी एक वेगळेपण जाणवतं. ते असं, की हा प्राणी जवळजवळ माणसासारखाच आहे. त्यालाही इच्छा आहेत. राग आहे, आनंद आहे. ईर्ष्या, प्रेम अशा साऱ्या भावना त्याच्याजवळ आहेत. त्या भावना खूप स्ट्राँग आहेत आणि त्या माणसासारख्याच घोड्याच्या वागण्यातून व्यक्तही होत असतात. कधी तो खिंकाळून आपला आनंद व्यक्त करतो, कधी अडून बसतो आणि काय वाट्टेल ते होवो, त्याला जिथे जायचं असेल तिथेच जातो, किंवा हलायचं नसेल तर प्राण गेला तरी हलत नाही. तो माणसाच्या जिवाला जीव देतो तसाच माणसाला नडतोसुद्धा. तुम्ही जसजसे त्याच्या जवळ जायला लागता तसतसे घोड्याचे हे सगळे गुण-अवगुण, स्वभावातल्या खाचाखोचा तुम्हाला कळायला लागतात. तुम्हाला काय म्हणायचंय हे हळूहळू घोड्याला कळायला लागतं आणि घोड्याबरोबर राहणं, त्याला समजून घेणं, त्याचा विचार करणं म्हणजे काय हे तुम्हालाही कळू लागतं, जमू लागतं. ते समजून घेणं, घोड्याच्या दृष्टीने विचार करणं हे एक प्रकारचं व्यसनच आहे. बहुतेक त्यामुळेच घोडे फार लवकर तुमच्या अस्तित्वाचा एक भाग बनून जातात. ऑस्ट्रियात व्हिएन्नामध्ये एक स्पॅनिश रायडिंग स्कूल आहे. (हीदेखील एक मजाच. स्पॅनिश रायडिंग स्कूल कुठे, तर व्हिएन्नामध्ये!) तिथे एका विशिष्ट पद्धतीने घोड्यांना प्रशिक्षण दिलं जातं. त्यांनी स्वत:चं असं एक शास्त्र तयार केलं आहे. त्याला ते स्पोर्ट न म्हणता ‘आर्ट ऑफ रायडिंग' म्हणतात. त्यामागची फिलॉसॉफी अशी, की तुम्ही घोड्याला शिकवत असताना एक वेळ अशी येते, की समोरच्या माणसाला हे कळेनासं होतं की कोण कुणाला ट्रेन करतंय. मला असं वाटतं, की हे एवढं तादात्म्य घोड्यासोबतच शक्य आहे.
घोड्याबरोबरचं सहजीवन हा एक वेगळाच अनुभव आहे. तुम्ही घोड्याशी बोलता ते त्याला समजतं. तुम्ही त्याला काही तरी शिकवता, तोही तुम्हाला शिकवतो. त्यातून तुमचे घोड्याबरोबरचे नातेबंध वाढत जातात. ते न थांबणारे, न संपणारे असतात. मुकं, पण अतिशय जिवंत आणि तितकंच गुंतागुंतीचं जग या घोड्यांमुळे तुमच्यासमोर उलगडतं. पाळीव प्राण्यांकडे पाहण्याची, त्यांना समजून घेण्याची माणसाची एक ठरलेली पद्धत आहे. घोडा हा प्राणी तुम्हाला त्यापलीकडे जायला लावतो. कारण हेच : तो माणसाइतकाच गुंतागुंतीचा आहे. त्याकडे दुर्लक्ष करून चालतच नाही. त्यामुळेच घोडा हा एक प्राणी आहे, तो आपण पाळलेला आहे, याची जाणीव हळूहळू पुसट होऊ लागते आणि तुम्ही एखाद्या व्यक्तीप्रमाणेच त्याच्याकडे पाहू लागता. घरातच घोडे आल्याने हे सारं मी फार जवळून अनुभवलं. जवळपास १० वर्षं आमच्या घरी हे घोडे होते.
नेमकं वर्ष आठवत नाही, पण एकदा आमच्या घोड्यांना काही तरी विषबाधा झाली. त्यात चार घोडे एक-दोन दिवसांच्या अंतराने मेले. त्यांना आम्ही जे गवत खायला द्यायचो त्याच्यावर बहुतेक पेस्टिसाइड मारलेलं असावं. तीनच घोडे शिल्लक राहिले. काय करावं ते मला कळेना. मी हवालदिल झालो. रेसकोर्सवरच्या डॉक्टरांना सांगितलं, सरकारी हॉस्पिटलमध्ये सांगितलं; पण कोणालाच निदान होईना. त्यानंतर उरलेले घोडे एका माणसाकडे सोपवले. पुढचे सहा महिने ते घोडे आमच्या घरी पळून यायचे. पण हा सिलसिला फार दिवस चालला नाही. शेवटी एकेक करून घरातले सारे घोडे संपले. या जिवलग मित्रांचं असं अचानक संपून जाणं ही पचवायला अवघड गोष्ट होती, पण ती स्वीकारणं अटळही होतं.
या कटू अनुभवानंतर घरातले घोडे हा विषयच बंद झाला, पण त्यामुळे घोड्याबरोबरचा स्नेहबंध संपला नाही. त्याला निमित्त झालं, नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी म्हणजेच ‘एनडीए'चं. एकदा माझे मित्र जयंत मुळे यांनी मला फोन केला आणि ते म्हणाले, आपल्याला आज ‘एनडीए'मध्ये एका इक्विटेशन ऑफिसरना भेटायला जायचं आहे. इक्विटेशन ऑफिसर म्हणजे लष्कराच्या घोडदळातला अधिकारी. घोड्यांशी संबंध असलेल्या कोणत्याही माणसाला भेटायला मी एका पायावर तयार असायचो. आम्ही ‘एनडीए'त गेलो. मेजर जगत सिंगना भेटलो. मोठा उमदा माणूस होता तो. आमच्या बऱ्याच गप्पा झाल्या. माझं घोडाप्रेम, घरचे घोडे वगैरे ऐकल्यावर त्यांनी विचारलं, ''प्रसादसाब, घोडा चलाओगे?'' मी नाही म्हणायचा प्रश्नच नव्हता. आम्ही त्यांच्या तबेल्यात गेलो. त्यांनी मला त्यांचा डेडिकेटेड घोडा चालवायला दिला. आम्ही एकत्र घोडेस्वारी केली, घोड्यांवर गप्पा मारल्या. एखादा जुना मित्र फार वर्षांनी भेटल्यासारखा आनंद आम्हाला दोघांना होत होता- घोडा या एकाच समान धाग्यामुळे. जाताना त्यांनी मला आवर्जून सांगितलं, ''प्रसादजी, आया कीजिए। साथ साथ घोडेस्वारी करने जायेंगे।'' आणि मी खरोखरच तिथे कायम जात राहिलो. पुढे जगत सिंग यांची बदली झाली. नवे अधिकारी आले. तेही असेच घोड्यांचं वेड असणारे. सगळ्यांशीच माझं ट्युनिंग जुळलं आणि ‘एनडीए'मुळे माझ्या आयुष्यात घोड्यांचं दुसरं पर्व सुरू झालं.
'एनडीए' ही भारतीय लष्करासाठी अधिकारी निर्माण करणारी, वैभवशाली इतिहास असणारी एक संस्था. लष्कराची सगळी ऐट, सगळा सरंजाम, सगळी परंपरा तिथे आपल्याला पाहायला मिळते. घोडे पाळण्याचं परंपरागत शास्त्र आपल्या लष्कराने आजही जपलं आहे. आपल्या लष्करात अजूनही घोडदळ आहे. फार कमी देशांनी असं घोडदळ सांभाळलं आहे. कारण प्रत्यक्ष युद्धात त्यांची आता गरज राहिलेली नाही. आपल्याकडेही प्रामुख्याने हे घोडदळ लष्करातल्या समारंभांसाठी आहे, पण ते आहे हे महत्त्वाचं. त्याचा दिमाख आपल्याला ‘एनडीए'मध्ये पाहता येतो. तिथल्या कॅडेट्सना घोडेस्वारी शिकवली जाते. त्यामुळे लष्कराच्या घोड्यांसाठीच्या मुख्य प्रशिक्षण केंद्रात तयार झालेले दोनशे उत्तम घोडे एनडीएत आहेत.
पुढे मी आयोजित करत असलेल्या ‘एन्ड्युरो' या साहस स्पर्धेच्या निमित्ताने माझं एनडीएमध्ये जाणं-येणं आणखी वाढलं. ‘एनडीए'मुळे घोड्यांचं माझ्या मनातलं जग आणखी विस्तारलं. एक अनुभव सांगतो, म्हणजे हे जग आपल्या बाहेरच्या जगापेक्षा किती वेगळं आहे त्याचा अंदाज येईल.
'एनडीए'च्या आत बरंच दाट जंगल आहे. तिकडे एकदा ‘एनडीए'च्या अधिकाऱ्यांसोबत मी क्रॉसकंट्रीला गेलो होतो. पाऊस कोसळत होता. नुसतं थैमान सुरू होतं. त्या पावसातून घोड्यांची एक टोळी चालली होती. चाळीसेक घोडे. त्यावर बसलेले सारे उत्तम घोडेस्वार. त्या धो धो कोसळणाऱ्या पावसात हे घोडे डोंगरात जाताहेत, जंगलात घुसताहेत, उतारावरून घसरताहेत, मोठाले नाले पार करताहेत. एक घोडा वाहून चाललाय. त्याला माणसं शर्थीने पकडून आणताहेत. पावसाचं पाणी आणि घाम एक होऊन तो त्या घोडेस्वारांच्या, घोड्यांच्या अंगावरून निथळतोय. घोडे दमलेत, माणसंही दमली आहेत. खच्चून दमण्याच्याही पलीकडे सारे गेले आहेत, पण तरीही सारे पुढे पुढे जाताहेत. घोडे आणि माणसं, माणसं आणि घोडे... सारं एक होऊन गेलेलं.
हे असं आजवर आपण सिनेमांमध्येच पाहिलेलं असतं. असं वास्तवात घडू शकतं यावर आपला विश्वास कसा बसणार? पण ‘एनडीए'मध्ये हे घडतं. तिथलं सगळंच वेगळं आहे. फौजी आणि घोडे यांचं वेगळं नातंही तिथेच पाहायला मिळतं. अधिकाऱ्यांचं आणि घोड्यांचं नातं वेगळं, खालच्या फळीतल्या कर्मचाऱ्यांचं वेगळं, कॅडेट्सचं वेगळं आणि घोड्यांची बडदास्त राखणाऱ्या स्टाफचं, ज्याला ते ग्रूम म्हणतात, त्यांचं आणि घोड्यांचं नातं आणखी वेगळं.
'एनडीए'मधला या घोड्यांचा दिनक्रमही पाहण्यासारखा असतो. सकाळी सगळ्या घोड्यांना एका विशिष्ट पद्धतीने अंघोळ घातली जाते. एक विशिष्ट वेळ झाल्यावर दोन-अडीच एकरांच्या तबेल्यातून घोड्यांचं प्रचंड खिंकाळणं ऐकू येऊ लागतं. कारण ती घोड्यांची खायची वेळ असते. घड्याळ चुकेल, पण घोड्यांच्या शरीरातलं घड्याळ इतकं फिट असतं की त्या वेळेला ते वर्दळीवर येणारच. खाण्याचे कंटेनर्स आणि त्यांना खायला घालणारे ग्रूम्स यांची हालचाल जाणवू लागली की घोड्यांची एक्साइटमेंट वाढत जाते. ॲकॅडमीला सुट्टी असते, राइड करायला कोणी नसतं, तेव्हा एकेका तबेल्यातल्या २०-२५ घोड्यांना बाहेर आणून एका ठराविक जागेवर पळवलं जातं. तो नजाराही डोळ्यांचं पारणं फेडणारा असतो. घोडे रात्री झोपतात तेही पाहावं असंच दृश्य. कोणत्याही वेळी हा प्राणी रुबाबदारच दिसतो. अगदी झोपल्यावरही. घोडा झोपत नाही किंवा उभा राहून झोपतो, असं म्हणतात ते काही खरं नाही. तो झोपतो, अगदी पाठ खाली टेकवून झोपतो. पण तरुण घोडा अतिशय सजग असतो. खुट्ट आवाज झाला तरी तो उठून बसतो. त्यामुळे कदाचित घोडा झोपत नाही असं म्हटलं जात असावं. एकुणात, या घोड्यांचं खाणं-पिणं-व्यायाम सगळं कसं घड्याळाच्या काट्यावर आणि बेतशीर चाललेलं असतं. घोडा हा प्राणी प्रचंड ताकडीचा खरा, पण तितकाच नाजूक. त्याची काळजी घ्यावी लागते- आणि ती घ्यावी तर या फौजींनी, आणि घोडेस्वारी करावी तीही त्यांनीच.
'एनडीए'तल्या प्रत्येक घोड्याची तऱ्हा वेगळी आहे. तिथला प्रत्येक घोडा म्हणजे एक विश्वच. त्याला जगाशी काही घेणं-देणं नसतं. व्यक्ती तितक्या प्रकृती, असं आपण जे माणसांबाबत म्हणतो ते घोड्यांबाबतही किती खरं आहे हे मला इथल्या घोड्यांमुळे कळलं. तुम्ही त्याचा अभ्यास करायचा ठरवला तर तो घोडा मरून जाईल, पण तुमचा अभ्यास पूर्ण होणार नाही.
प्रत्येक घोड्याला जसा एक स्वभाव असतो तशीच एक विशिष्ट चाल असते. ‘एनडीए'त गोपाळ नावाचा एक घोडा आहे. एकदा मी रायडिंगसाठी तिथे पोचलो तेव्हा जवळपास सव्वाशे रायडर्स सवारी करत होते. माझ्यासाठी एकही घोडा शिल्लक नव्हता. आत जाऊन पाहिलं तर तिथे ‘गोपाळ' नावाचा घोडा होता. तिथला ग्रूम मला म्हणाला, ''साब, ये घोडा मत चलाव। ये पीठ का बहुत खराब है।'' पण मी त्याचं ऐकलं नाही. गेलो चालवायला. तो छान चालला. मी त्याला सोडून परत आलो.
रात्री शांतपणे झोपलो. सकाळी एनडीएतल्या एका अधिकारी मित्राच्या फोननेच मला जाग आली.
मी पडल्या पडल्याच फोन उचलला. ते म्हणाले, ''प्रसादजी, कैसी तबियत है आपकी?''
मला काही कळलं नाही. मी म्हटलं, ''माझ्या तब्येतीला काय झालं?''
ते म्हणाले, 'कल आप ‘गोपाळ'पे बैठे थे ना। सोचा, पूँछ लेते हैं। एक आप ठीक तो हो ना?''
मला कळेना, हे असं का विचारताहेत. मला काय धाड भरली आहे? फोन ठेवला आणि तसाच झोपून गेलो.
पण थोड्या वेळाने उठून बसतो, तो मला उठताच येईना. अक्षरशः ब्रम्हांड आठवलं. माझी पाठ अशी काही धरली होती की वाटलं, आता आपण मेलो. उठता येईना की हलता येईना. दोन दिवस लागले त्या दुखण्यातून बाहेर पडायला. बरा झालो, पण पुन्हा ‘गोपाळ'वर बसायचं धाडस झालं नाही. आता हा घोडा ‘पीठ का खराब' का याचं उत्तर मात्र कोणालाच माहिती नाही.
घोड्याच्या स्वभावातल्याही अशा अनेक अनाकलनीय गमती मी ‘एनडीए'मध्ये अनुभवल्या. उदाहरण द्यायचं, तर एका घोड्याचं दुसऱ्या घोड्याशी जमत नाही. अगदी माणसासारखंच. आमच्या घरच्या घोड्यांमध्येही ते पाहिलं होतंच. आमच्याकडे दोन घोडे असे होते की त्यांना जवळ बांधून चालायचंच नाही. पण ‘एनडीए'त पुष्कळ घोडे, त्यामुळे त्यांच्या तऱ्हाही तितक्याच. एखादी घोड्यांची टोळी निघाली की ते सांगतात, 'इन्डोनेशिया'को पीछे रखो।' कारण दुसरा घोडा जवळ आला की हा ‘इंडोनेशिया' नावाचा घोडा त्याला लाथ मारणारच. ‘टायटन'ला ‘बादल'सोबत ठेवायचं नाही, कारण ‘टायटन' फक्त ‘बादल'लाच लाथ मारतो. हे असं का? माहिती नाही. तुम्ही टोळी कशीही ठेवा- अमुक घोडा पुढेच जाणार. कितीही प्रयत्न करा, तो मागे राहणार नाही. काही घोडे अतिशय एकलकोंडे असतात. त्यांचं कुणाशीच पटत नाही. मग त्यांना एका बाजूला बांधलं जातं. तर काही शेजारी-शेजारी सुखाने नांदणाऱ्या जोड्याही असतात. त्या दोघांच्या मनात काय चालू असतं हे त्यांचं त्यांनाच ठाऊक, पण त्यांच्या अशा वागण्याचा थोडाफार अंदाज तुम्हाला त्यांच्यासोबत राहून राहून येऊ शकतो. आणि अशा खाचाखोचांचा खरा अंदाज असतो तो घोडे सांभाळणाऱ्या ग्रूम्सना. त्यामुळे ते ग्रूम्स जो सल्ला देतात तो कायम ऐकायचा. गोपाळच्या बाबतीतही मी ग्रूमचं ऐकलं असतं तर पस्तावलो नसतो.
'एनडीए'त ‘पिकपॉकेट' नावाचा एक घोडा होता. अशी अनेक गमतीशीर नावं तिथे आहेत. हा घोडा कल्पनाही करता येणार नाही एवढा भव्य. त्याच्या जवळ गेलं की तो हमखास लाथ मारणार किंवा पाठीवर बसलेल्या माणसाला खाली पाडणार. ही खाली पाडण्याचीही त्याची एक कला होती. त्याला पाणी खूप आवडायचं. पाणी दिसलं की भले पाठीवर कोणीही असो, तो पाण्याजवळ जाणार आणि त्यात लोळायला सुरुवात करणार. बाकीच्या इन्स्ट्रक्टरना त्याची ही खोड माहिती होती. त्याच्या अंगात ताकद इतकी, की नवख्या माणसाला कळणारच नाही की हा पठ्ठ्या आपल्याला पाण्याकडे का घेऊन चाललाय!
काही घोडे अडेलटट्टू असतात. ते अडून बसतात. आता घोडा अडतो म्हणजे काय? फौजींच्या भाषेत सांगायचं, तर “ये तो बड़ाही अडियल है। काट के दो टुकडे कर दो लेकिन घूमेगा नहीं।'' अनेकदा चालता चालता एका क्षणी घोडा थांबतो. तिथून मागे फिरायचं नावच घेत नाही. तुम्ही त्याला कितीही मारा, काही करा, त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही. एक रेष आखून घ्या, घोडा त्याच्या पुढे पाऊल टाकणार नाही. घोडं अडतं ते असं. अडेलटट्टू, नाठाळ हे शब्द त्यावरूनच आपल्याकडे आले असावेत. याचा अनुभव मी स्वतःही अनेकदा घेतला आहे. आमच्या घरच्या घोड्यांचाही आणि ‘एनडीए'तल्या घोड्यांचाही. घरातून बाहेर पडावं, एखाद्या ठिकाणी जाण्याचं ठरवावं; पण घोड्याच्या मनात नसेल तर काय वाट्टेल ते होवो, तो मला परत आमच्या घरी आणूनच थांबायचा.
घोड्याने एकदा मनावर घेतलं की ते कोणीच बदलू शकत नाही. त्यामुळेच घोडा आणि माणसाच्या नात्याची तुलना फौजी मंडळी बाईच्या प्रेमप्रकरणाशी करतात. ते म्हणतात, सुंदर बाईच्या प्रेमात पडणं फार सोपं आहे, पण ते निभावणं फार कठीण. कारण तुमचं वागणं जरा इकडचं तिकडे झालं तर ती बाई तुम्हाला केव्हा दूर करेल हे तुम्हाला समजणारसुद्धा नाही. तसंच, एखाद्या रुबाबदार घोड्यावर बसण्यात शान आहे; पण तुम्ही घोड्याच्या मर्जीने बसला आहात, हे विसरून चालत नाही. त्याची मर्जी राखण्याची कला तुम्हाला अवगत हवी. तुम्ही एखादा क्ष्ाण जरी बेसावध राहिलात तरी तो तुम्हाला कुठे फेकून देईल हे कळणारही नाही.
थोडा विचार केला की कळतं, यात न कळण्यासारखं काही नाही. मुळात घोडा हा निसर्गत: एक स्वतंत्र, बुद्धी असलेला प्राणी आहे. त्याच्या अंगात मजबूत ताकद आहे. आपल्या पाठीवर कुणी तरी बसावं, हे त्याला नकोच असतं. पुन्हा, त्याला काबूत ठेवण्यासाठी माणूस त्याच्या तोंडात लगाम बांधतो. काहीही झालं तरी तो एक अनैसर्गिक, हिंस्र प्रकार आहे. आपल्या तोंडात लगाम असणार आहे, पाठीवर खोगीर पडणार आहे आणि त्यावर माणूस बसणार आहे, या तीन गोष्टीं घोड्याला स्वीकारायला लावणं अवघड असतं. घोड्याच्या आयुष्यातली ही क्रांतिकारी घटना असते. घोड्यावर बसण्याआधी ती समजून घेतली पाहिजे, असं मला कायम वाटत आलं आहे. ती समजून घेताना तुम्ही मनाने घोड्याजवळ जाता आणि पुढे घोड्याचे मूडस समजून घेणंही तुम्हाला सोपं जातं.
शेवटी घोड्याला पळायचं आहे. ते त्याचं निसर्गदत्त काम आहे. ते त्याला खुषीने करू दिलं तर तो आनंदाने तुम्हाला सैर घडवतो. त्या वेळी घोड्याची ऐट पाहत राहण्यासारखी असते. घोड्याला बाहेर काढताना त्याच्या पाठीवरून हात फिरवा, त्याच्याशी बोला. सवारीसाठी त्याची मानसिक तयारी करा. हळूहळू तो घोडा रंगात यायला लागतो. त्याच्या तोंडात लगामाचा जो स्टीलचा भाग असतो त्याच्याशी तो खेळू लागतो. दातांवर घासून त्याचा तो एक विशिष्ट आवाज काढू लागतो. त्यामुळे त्याच्या तोंडातून फेस येऊ लागतो. फेस आला की समजायचं, आता घोडा सवारीसाठी तयार आहे. आता त्याला बाहेर काढा आणि एकमेकांच्या कलाने चाला. पण तुमचं व्यक्तिमत्त्व रागीट असेल आणि तुम्ही त्याप्रमाणे दामटून घोडा चालवायचा प्रयत्न केला तर ते घोड्याला आवडत नाही. तो मान खाली घालतो आणि मागचे पाय उडवतो. एखाद्या चेंडूसारखे तुम्ही लांब फेकले जाता.
एकूणच, घोड्यावर सवारी करताना त्याच्याशी सतत संवाद ठेवायला लागतो. प्रत्येक घोडेस्वाराची घोड्याशी संवाद साधण्याची पद्धत वेगळी असते. भाषा वेगळी असतेच. घोड्यांना शब्द कळत नसतील, पण त्यामागचा नाद, भावना समजतात. घोड्याशी सतत बोलत राहिल्याने तुम्हाला काय पाहिजे हे त्याला कळू शकतं. जेव्हा तुम्ही एखाद्या अतिशय अवघड मोहिमेवर जाता तेव्हा तर या संवादाची फारच गरज असते. घोड्याशी संवाद साधण्याचं आणखी एक साधन म्हणजे त्याच्या तोंडातला लगाम. घोडेस्वार लगाम खेचत असतो तेव्हा तो त्याचं नियंत्रण तर करत असतोच, पण एका अर्थाने त्याला आधारही देत असतो. हा खरं तर किती मोठा विरोधाभास आहे! जो लगाम त्याच्या स्वातंत्र्यावर गदा आणतो, त्याच्या तोंडात रुतून त्याला त्रास देतो, त्याचाच अशा प्रसंगात घोड्याला आधारही वाटतो. त्यामुळे कितीही बाका प्रसंग आला तरी तुम्हाला घोड्याला या लगामाच्या साह्याने सतत दिलासा देत राहावं लागतं. परिस्थिती तुमच्या आवाक्यात आहे, असा विश्वास एकदा का घोड्याला आला की तो कितीही अवघड प्रसंगातून तुम्हाला सहीसलामत बाहेर काढतो. प्रत्येक घोडेस्वाराची त्याच्या घोड्याबरोबरची संवादशैली वेगवेगळी असू शकते. एकदा का ती जुळली की त्यांना एकमेकांच्या गोष्टी आपसूक कळू लागतात. भाषा कोणतीही असो, घोडा त्याला अचूक प्रतिसाद देतो. सकाळी घोडेस्वार घोड्याला भेटला की तेव्हाच त्याला कळू शकतं, आज आपल्या घोड्याचा मूड कसा आहे, त्याचं म्हणणं काय आहे.
कधी विचार केला की वाटतं, असं काय आहे घोड्यात ज्यामुळे मीच नव्हे तर जगातले भले भले लोक वेडे व्हावेत? घोडेस्वारी ही केवळ मौज नव्हे, ती पॅशन आहे. मग ती घोडेस्वारी रेसिंगसाठी असो, लष्करातली असो, शाही सवारी असो किंवा घोड्यांसाठीचे खास खेळ असोत. एका वाक्यात सांगायचं, तर रायडिंग इज अ सुपरडिमांडिंग स्पोर्ट. घोड्यावर बसल्यापासून उतरेपर्यंत पायाच्या नखापासून ते डोक्याच्या केसांपर्यंत तुमचं सगळं शरीर काम करत असतं. सतत अलर्ट राहावं लागतं. त्यामुळे घोडा हे माणसाच्या ताकदीला, कौशल्याला मिळालेलं आव्हान आहे.
पण त्याहीपलीकडे जाऊन पाहायचं तर घोडा माणसाच्या भावनिक आयुष्यात मोठी भूमिका बजावत असतो. किमान माझ्या आयुष्यात तरी तसं आहे. मी स्वत:ला घोड्याबरोबर आयडेंटिफाय करतो. घोडेस्वारी म्हटलं की मी सगळं सोडून त्याच्याच मागे धावत सुटतो. व्यक्तिगत आयुष्यातील चढ-उतारांना तुम्हाला जी निरपेक्ष साथसंगत लागते ती घोडा एका वेगळ्या प्रकारे तुम्हाला देतो. किती बोलू? घोड्याबद्दल मला जे वाटतं ते सांगण्यासाठी शब्द सापडणं अवघड आहे. आणि असं वाटतं, की सांगायचं तरी कशाला? घोड्याला माझ्या भावना माझ्या एका थापटीतून कळतात आणि त्याच्या कातडीची थरथर माझ्यापर्यंत त्याचं म्हणणं पोचवते. दोन जिवाभावाच्या मित्रांना आणखी काय हवं असतं?
(अनुभव, दिवाळी २०११ मधून साभार)
(शब्दांकन- गौरी कानेटकर)
