मनमोहन सिंग यांचं खरं योगदान
आजमितीला काँग्रेसचा वैचारिक स्तर पाहता आपण मनमोहन सिंग यांचे आभार कशासाठी मानत आहोत, हे कितीजणांना माहीत असेल हे त्यांचं त्यांनाच माहीत! दहा वर्षांपूर्वी सोनिया गांधींनी पंतप्रधानपद नाकारल्यानंतर ती जबाबदारी मनमोहन सिंग यांनी स्वीकारली आणि दहा वर्षं सक्षमपणे निभावली, याबद्दल आपण त्यांचे कृतज्ञ असल्याचीच भावना कार्यकारिणी सदस्यांमध्ये आणि देशभरातील काँग्रेसजनांमध्ये असण्याची शक्यता अधिक आहे. प्रत्यक्षात मनमोहन सिंग यांचं देशाला आणि विशेषत: काँग्रेस पक्षाला त्याहूनही मोठं आणि महत्त्वाचं योगदान आहे, ही बाब बहुतेक काँग्रेसजनांच्या गावीही नसण्याची शक्यता आहे.
विरोधी पक्षांनी आणि बडबड्या वृत्तवाहिन्यांनी मनमोहन सिंग यांना ‘दुबळे पंतप्रधान' असं कितीही हिणवलं, तरी त्यांनी एक दशकभर आघाडी सरकार चालवलं आणि जागतिक अर्थव्यवस्था मंदीच्या फेऱ्यात सापडलेली असताना भारताला त्याची कमीत कमी झळ बसू दिली, ही वस्तुस्थिती आहे. आधी अर्थमंत्री असताना आणि नंतर पंतप्रधानपदावर असताना त्यांनी देशात एक आधुनिक आणि प्रगतीशील अर्थव्यवस्था आकाराला आणली, ही गोष्ट नाकारता येण्यासारखी नाही. पक्षीय आघाडीवरही त्यांनी यूपीए अध्यक्षांसोबत असं समीकरण बसवलं होतं, जे दहा वर्षं काम करत राहिलं. मात्र, याही पलीकडे मनमोहन सिंग (व सोनिया गांधी) यांचं काँग्रेस पक्षाला योगदान राहिलेलं आहे, जे आज दुर्लक्षित राहिलेलं दिसतं.
स्वातंत्र्यानंतर जवाहरलाल नेहरू यांनी जी समन्यायी विकासाची दृष्टी बाळगली होती, ती नव्वदच्या जागतिकीकरणाच्या लाटेत मागे पडत चालली होती. काँग्रेसने नव्या आर्थिक सुधारणांची तळी अशी काही उचलून धरली, की त्यामुळे देशात पैसा आला; मात्र तो नव्याने उदयास आलेल्या नवमध्यमवर्गाच्या खाली पोहोचू शकला नाही. त्यातून गरीब व पैसेवाल्यांमधील दरी आणखीनच वाढली. परिणामी, देशातील गरीब, वंचित जनता (जी काँग्रेसच्या आशेने जगत होती) काँग्रेसपासून दूर गेली. १९९६, १९९८, १९९९ या तीनही लोकसभा निवडणुकांत त्याचं प्रत्यंतर आलं. मात्र, १९९९ ते २००४ या भाजपशासित काळात ‘इंडिया शायनिंग'च्या स्पष्ट धोरणामुळे या घटकांनी पुन्हा काँग्रेसकडे मोर्चा वळवला व त्यातून २००४ मध्ये काँग्रेस आघाडीचं सरकार दिल्लीत स्थापन झालं. हा एका अर्थी अपघात होता. परंतु काँग्रेसच्या आर्थिक धोरणांमुळे पक्षापासून दूर गेलेला हा मोठा वर्ग २००९च्या निवडणुकीत पुन्हा एकदा काँग्रेसकडे वळला, हा काही अपघात नव्हता. हे घडलं त्याला २००४ ते २००९ या काळातील कम्युनिस्ट पक्षांचा सरकारवरील दबाव हे जसं महत्त्वाचं कारण होतं, तसंच मनमोहन-सोनिया यांच्या युतीतून आकाराला येणारं ‘नवं' आर्थिक धोरणही होतं.
हेही वाचा - राजकारणातला भला माणूस
मनमोहन सिंग यांची भांडवली प्रगतीची पावलं आणि सोनियांनी त्याला दिलेली लोककल्याणकारी कामांची जोड यामुळेच गेल्या दहा वर्षांत अनेक महत्त्वाचे कार्यक्रम, योजना व कायदे प्रत्यक्षात आले. महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार योजनेसह आदिवासींच्या वनहक्कांसंबंधीचं धोरण, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशन, राष्ट्रीय पुनर्वसन धोरण वगैरे महत्त्वाची पावलं उचलली गेली. माहितीचा अधिकार, शिक्षणाचा अधिकार, अन्नसुरक्षा कायदा, लोकपालाचा कायदा अशाही अनेक महत्त्वाच्या गोष्टी प्रत्यक्षात आणल्या गेल्या. त्यातून भांडवली विकास व कल्याणकारी कार्यक्रम या दोन गोष्टी हातात हात घालून चालूच शकत नाहीत, ही गोष्ट मनमोहन-सोनिया यांनी खोडून दाखवली आहे. नेहरूंच्या काळातील समाजवादी अर्थव्यवस्थेचं स्वप्न आज विरलेलं असलं (आणि अप्रस्तुतही झालेलं असलं) तरी विकसनशील देशात तळच्या लोकांसह प्रगती होऊ शकते, ही नेहरूंची धारणा या दोघांनी प्रत्यक्षात आणून दाखवली. या अर्थाने त्यांनी पंडित नेहरूंच्या काँग्रेसशी आजच्या काँग्रेसची नाळ जोडली. खरं तर या गोष्टीचा एक राजकीय पक्ष म्हणून काँग्रेसने फायदा करून घ्यायला हवा होता व जनतेमध्ये स्वत:चे पाय पुन:श्च रोवायला हवे होते. मात्र,मनमोहन-सोनिया यांच्या प्रयत्नांतून असं काही घडलेलं आहे, या घडामोडींबद्दल स्वत: काँग्रेसच बहुतकरून अनभिज्ञ असल्याने ही बाब जनतेपर्यंत पोहोचणार कशी?
मनमोहन योगदान आणि उद्याची काँग्रेस
सोनिया गांधींनी काँग्रेसचं नेतृत्व स्वीकारल्यापासून काँग्रेसच्या प्रत्येक अधिवेशनात पक्ष कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये जाण्याविषयी आणि लोकांशी संपर्क प्रस्थापित करण्याविषयी कंठशोष केला जातो आहे. मात्र, काँग्रेसचं हल्लीचं स्वरूप तिच्या मूळ संकल्पनेपासून सर्वस्वी फटकून आहे. शिवाय सरकारने जी विधायक, स्वागतार्ह आणि पक्षसंघटना मजबूत करणारी जी पावलं उचलली आहेत, त्याचा फायदा स्वत:साठी करून घेण्याची शक्तीही या पक्षात उरलेली नाही. त्यामुळे मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीत पक्षासाठी त्यांनी जे योगदान दिलेलं आहे त्याचा लाभ उठवण्याची क्षमताही काँग्रेसमध्ये राहिलेली नाही.
खरं पाहता, गेल्या कित्येक वर्षांपासून काँग्रेसची अवस्था ‘बडा घर, पोकळ वासा' अशी आहे. त्यामुळे हे घर पडू न देता त्याला टेकू लावणारं नेतृत्व मिळालं तरी काँग्रेसजनांना ते पुरतं, अशी परिस्थिती आहे. त्यामुळेच कालपर्यंत आवश्यक असणारे मनमोहन सिंग उद्यासाठी कामाचे नाहीत असं वाटू लागल्याने त्यांच्यापासून फारकत घ्यायला पक्ष उत्सुक दिसतो आहे. स्वातंत्र्योत्तर काळात, विशेषत: नेहरू-इंदिरा यांच्या नंतरच्या काळात हेलपाटलेल्या काँग्रेसला समकालीन वैचारिक व धोरणात्मक आधार देण्याचं महत्त्वाचं काम मनमोहन सिंग यांनी (सोनिया गांधींच्या सोबतीने) केलं आहे. मात्र, ते समजून घेण्याची आणि त्या मार्गाने पुढे जाण्याची क्षमता काँग्रेस गमावून बसलेली दिसते.
आता काँग्रेस पक्षात राहुल गांधी यांचं नेतृत्व आकारास येत आहे. त्यामुळे मनमोहन सिंग यांचं पक्षासाठी असलेलं हे योगदान ते तरी उद्याच्या काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत मान्य करतात का आणि हाच मार्ग प्रशस्त करण्याचा विचार बोलून दाखवतात का, यावर काँग्रेसची दिशा आणि भवितव्य निश्चित होईल.
(महाराष्ट्र टाइम्स, १५ जानेवारी २०१४च्या अंकातून साभार. )
सुहास कुलकर्णी | uniquefeatures.portal@gmail.com
सुहास कुलकर्णी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. गेली तीन दशकं ते राजकीय प्रक्रियांचं विश्लेषण करत आले आहेत.
