आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

दीक्षांत समारोह

  • जिरो अकागावा
  • 09.08.25
  • वाचनवेळ 8 मि.
jiro akagawa

मोटारीसमोर एक चेंडू गडगडत आला. मुराकामीने सर्व शक्तीनिशी ब्रेक दाबला. “बापरे!” मागे बसलेलं गिऱ्हाईक वेगाने पुढे ढकललं गेलं आणि पार्टिशनच्या प्लॅस्टिक बोर्डवर त्याचं डोकं आपटलं.

“ए! काय चालवलंयस तू?” गिऱ्हाईक खेकसलं.

“मोटारीसमोर चेंडू आला हो गडगडत” पुन्हा एकदा इंजिन सुरू करत मुराकामी म्हणाला.

“नुसता चेंडू आला तर असा अचानक ब्रेक मारतात होय?”

“आणि चेंडूमागे एखादं लहान मूल धावत आलं तर?” मुराकामी उलट गिऱ्हाईकावर खेकसला. “लहान मुलाला गाडीने उडवू का मी?”

मुराकामीचा रुद्रावतार पाहून ते गिऱ्हाईकही जरासं वरमलेलं दिसलं.

“ठीक आहे. कळलं कळलं!” असं म्हणून जरासा कडवट चेहरा करून ते गप्प बसलं.

पुन्हा गाडी चालवत असताना मुराकामीला आपल्या पाठीवरून ओघळणारा थंडगार घाम जाणवला- त्या एका क्षणाची भीती आजही गेली नव्हती.

सहा वर्षांपूर्वीची गोष्ट होती ती. टॅक्सीचालकाचं काम सुरू करून मुराकामीला जवळजवळ दहा वर्षं झाली होती. एकदाही अपघात न झाल्याबद्दल आणि कुणाचीही एकही तक्रार न आल्याबद्दल त्याला पारितोषिकही मिळालं होतं. तो दिवसही नेहमीसारखाच होता. अर्ध्या दिवसात त्याला गिऱ्हाईकंही बरीच मिळाली होती. आता परत जावं का असा विचार करत मुराकामी दुतर्फा घरं असलेल्या एका शांत रस्त्याबाहेर पडण्याच्या बेतात होता. तेवढ्यात विरुद्ध दिशेने एक लहान ट्रक आला. तो तसाच पुढे जाऊ न शकण्याइतकाही रस्ता अरुंद नव्हता. मुराकामीने गाडी डाव्या बाजूला कुंपणाजवळ घेतली आणि सावकाश पुढे नेली. ‘खस्सं' असा आवाज झाला. टॅक्सी ट्रकच्या बाजूने पुढे जात असताना ट्रकचा बाजूचा आरसा एखाद्या झाडाच्या फांदीला अडला की काय, असा विचार करत मुराकामीने एकच क्षण त्या दिशेला नजर वळवली. आणि लगेचच त्याने पुन्हा समोर पाहिलं खरं, पण त्याच वेळी अकस्मात एका फाटकातून लहान मूल धावत आलं.

कदाचित जमीनही फुटली असती इतक्या प्रचंड जोराने मुराकामीने ब्रेकवर पाय आपटला. थडकन झालेली टक्कर त्याला हलकेच जाणवली आणि मुराकामीने घट्ट डोळे मिटले.

“धन्यवाद!”

गिऱ्हाईक उतरल्यावर मुराकामीने घड्याळाकडे पाहिलं. त्याच्या कामाची वेळ संपत आली होती. आज नेहमीपेक्षा जास्त कमाईही झाली होती. आज एवढे पुरेत!

मुराकामीने गाडी सुरू केली- मार्च महिन्यातली दुपारची उबदार वेळ होती. गाडी दुतर्फा घरं असलेल्या शांत रस्त्याला लागली.

‘अजूनही बदलला नाहीये हा भाग..'

होय. याच भागात मुराकामीने त्या लहान मुलाला उडवलं होतं. रोखणं अशक्य असलेला तो अटळ अपघात होता, असं तपासात निष्पन्न झालं होतं. अर्थात मुराकामीनेही त्याला शक्य होती तेवढी नुकसान भरपाई दिली होती.

त्या मुलाच्या कुटुंबातले लोक भरपाईच्या रकमेबद्दल काहीही बोलले नव्हते. त्या गोष्टीमुळे एकीकडे मुराकामी बचावला होता खरा; पण दुसरीकडे तो दु:खीकष्टी झाला होता. कितीही नुकसान भरपाई दिली तरी तो गेलेला मुलगा काही परत येणार नव्हता. आजही मुराकामी कधी कधी या भागातून जायचा. त्याच्या दृष्टीने ते एक प्रकारे त्या लहान मुलाच्या थडग्याला भेट देणंच होतं.

अचानक हात उंचावून टॅक्सीला हात दाखवणारा एक वयस्क माणूस मुराकामीला दिसला आणि त्याने ब्रेकवर पाय दाबला.

“हुश्श! मिळाली एकदाची टॅक्सी!”

त्या वयस्कर माणसाचं वय सत्तरीच्या आसपास असावं. तो पायाने जरासा अधू असल्यासारखं दिसत होतं. पण त्याने सूट आणि नेकटाय असा नीटनेटका पेहराव केला होता आणि तो सुस्वभावी सद्गृहस्थासारखा दिसत होता.

“या भागात टॅक्सी क्वचितच येते. मला वाटलं होतं, बहुतेक हमरस्त्यापर्यंत चालत जावं लागणार की काय?”

“कुठे जायचंय आपल्याला?”

“हं... एन प्राथमिक शाळा असं नाव आहे. कुठे आहे, ते कसं सांगावं बरं...”

“हो, माहिती आहे मला ती शाळा” मुराकामी म्हणाला.

“असं का? मग फारच छान! रस्त्याचं नाव ठाऊक नाही ना मला” त्या म्हाताऱ्याला हायसं वाटल्यासारखं दिसलं. “टॅक्सीत बसायच्या आधीच नीट शोधून ठेवायला हवं होतं खरं, पण नशीबानं जागा तुमच्या माहितीची निघाली.”

“पूर्वी एकदा कामानिमित्त गेलो होतो मी तिथे.” टॅक्सीचा वेग वाढवत मुराकामी म्हणाला.

मुराकामीच्या टॅक्सीने उडवलेल्या त्या लहान मुलाने नुकताच त्या प्राथमिक शाळेत प्रवेश घेतला होता. रिकाम्या टॅक्सीने त्या शाळेजवळून जाताना मुराकामी बऱ्याचदा पटांगणाच्या कुंपणाबाहेर थोडा वेळ टॅक्सी थांबवून खेळणाऱ्या मुलांकडे बघत रहायचा.

तो अपघात झाला नसता तर तो लहान मुलगाही आज इथे खेळत असता, असा विचार मनात आला की दर वेळी मुराकामीचं हृदय पिळवटून निघायचं.

“हवा छान आहे नाही आज?” उच्छ्वास सोडत तो म्हातारा म्हणाला.

“खरंच! शाळेत काही काम आहे का तुमचं?” मुराकामीने विचारले.

“नातवाचा दीक्षांतसमारोह आहे.”

“अरे वा! मग तर अगदी आतुरतेनं वाट बघत असाल तुम्ही!”

“उशीर होईल की काय असं वाटून धस्स झालं होतं मला. पण या वेगानं वेळेवर पोचू आपण!”

“रस्त्यातही रहदारी नाही फारशी.”

शाळा जवळ येऊ लागली, तशी फुटपाथवरून उड्या मारत चाललेली मुलं त्यांना दिसली. बहुतेक दीक्षांत समारोह संपवून ती परत जात असावीत, कारण त्यांच्या हातात गोल कागदी नळीत ठेवलेली गुंडाळलेली दीक्षांत प्रशस्तिपत्रकं दिसत होती. काही मुलं तर त्या गोल कागदी नळकांड्यांच्या ‘तलवारी' बनवून तलवारबाजी करण्यात मग्न होती.

लाल सिग्नलला टॅक्सी थांबताच मुलं रस्ता ओलांडायला लागली.

“छान वाटतं ना मुलं पाहून! कधीही पाहिलं तरी!” म्हातारा म्हणाला.

“हा बघा, हा माझा नातू!” असं म्हणून त्या गृहस्थाने एक फोटो मुराकामीच्या खांद्याजवळ नेला. मुराकामीने तो हातात घेऊन निरखून पाहिला...

..मागच्या मोटारीचा हॉर्न ऐकून मुराकामी भानावर आला. त्याने घाईघाईने टॅक्सी सुरू केली आणि फोटो म्हाताऱ्याला परत केला.

“फोटो जरा जुना आहे. पण छान आलाय नाही?”

मुराकामी एकटक समोर पाहत होता. सहा वर्षांपूर्वी काळी रिबीन लावलेल्या फोटोतून मुराकामीकडे बघणारा तो मुलगा... आणि आता म्हाताऱ्याने बघायला दिलेल्या फोटोतला चेहरा... तोच होता, अगदी तोच!

या आजोबांनाही मुराकामी नक्कीच पूर्वी भेटला होता. पण सहा वर्षांत ते चांगलेच वयोवृद्ध दिसायला लागल्यामुळे त्याने त्यांना ओळखलं नव्हतं.

बाजूच्या आरशातून त्याने त्यांचा चेहरा पुन्हा एकदा निरखला. चेहरा थोडासा का होईना ओळखीचा वाटत होता खराच! ते एक कुशल कारागीर होते. त्यांचं शिक्षण झालेलं नव्हतं, पण एखाद्या शांत, मितभाषी अभ्यासकासारखं वागणं होतं त्यांचं.

पण ते काही असो. मुराकामीच्या आठवणीप्रमाणे तो लहान मुलगा त्या आजोबांचा एकुलता एक नातू होता. मग त्याचा दीक्षांतसमारोह... हे प्रकरण नक्की होतं तरी काय?

टॅक्सी शाळेसमोर थांबली.

“खूप खूप आभार!” आजोबांनी टॅक्सीचं भाडं चुकतं केलं आणि मुराकामीने देऊ केलेली मोड परतही न घेता ते शाळेच्या प्रवेशद्वारातून आत शिरले. मुराकामीने गाडी जराशी पुढे घेऊन थांबवली.

आजोबांमागोमाग तोही शाळेत गेला. हॉलसारख्या दिसणाऱ्या मोठ्याशा इमारतीच्या आत शिरणारे आजोबा त्याला दिसले.

“काही काम आहे का तुमचं?” एका मध्यमवयीन माणसाने मुराकामीला हाक मारली- नक्कीच रखवालदार असणार तो.

“नाही. ड्रायव्हर आहे मी. आताच आत गेलेल्या त्या आजोबांनी सोडायला आलो होतो.. ”

“अच्छा! ते होय!” त्या माणसानं मान डोलावली.

“नातवाचा दीक्षांतसमारोह असं म्हणाले..”

“अहो, त्यांचा नातू केव्हाच गेला. गाडीने उडवल्यामुळे. काय म्हणावं असल्या निष्काळजीपणाला! मी असतो ना; तर त्या ड्रायव्हरचा गळाच आवळला असता नक्की!” तिरस्कारयुक्त चेहऱ्याने तो माणूस म्हणाला, “त्यानंतर वर्षभराने त्या मुलाची आईही गेली हो त्याच्या पाठोपाठ!”

आपल्या चेहऱ्यावरचा रंग ओसरत असल्याचं मुराकामीला जाणवलं. हे तर त्याने प्रथमच ऐकलं होतं. त्या मुलाचे वडील बऱ्याच पूर्वी वारल्याचं त्याला माहीत होतं. म्हणजे ते आजोबा आता एकटेच उरले होते. त्यामुळेच त्यांना आपला नातू जिवंत आहे, असा भास होऊ लागला असावा..

“अजून चाललाय का दीक्षांतसमारोह?”

“हो, आता तोच कार्यक्रम चाललाय बघा!”

मुराकामी घाईघाईने हॉलच्या दिशेनं चालू लागला. इतक्या सगळ्या लोकांसमोर किती दु:खीकष्टी होतील ते आजोबा. ती गोष्ट त्याला काहीही करून होऊ द्यायची नव्हती. कल्पनेतला नातू शोधत एव्हाना आतमध्ये चकरा मारत असतील ते बिचारे!

आत शिरताच क्षणभर मुराकामी भांबावून गेला. त्या भल्यामोठ्या, विस्तीर्ण सभागृहात मुलं आणि त्यांचे पालक रांगेने बसले होते आणि समोरच्या स्टेजकडे पाहत होते. आजोबांना शोधणं सोपं नक्कीच नव्हतं. अशा शांत, स्तब्ध सभागृहात त्यांना शोधत फिरणंही बरं दिसलं नसतं. काय करावं ते मुराकामीला कळेना.

“अहो, कोण आहात तुम्ही? काय हवंय तुम्हाला?” एका तरुण स्त्रीने त्याला हाक मारली. ती शिक्षिका असावी असं दिसत होतं.

मुराकामी काही उत्तर देणार तेवढ्यात टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला.

कशाबद्दल टाळ्या वाजताहेत ते बघावं म्हणून मुराकामीने स्टेजच्या दिशेला मान वळवली आणि त्याचा आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसेना.

“ते स्टेजवर आहेत ना, त्यांचा नातू गेला.” ती शिक्षिका मुराकामीला सांगत होती.

“ते स्वत: कधीही शाळेत गेले नव्हते, त्यामुळे ‘नातवाऐवजी मी येईन शाळेत' असं म्हणून सहा वर्षं येत राहिले शाळेत. खरोखर कौतुकास्पद आहेत बाई ते!”

टाळ्यांच्या गजरात अत्यंत अदबीने झुकून मान लववणाऱ्या त्या आजोबांकडे मुराकामी एकटक पाहत राहिला.

शाळेच्या प्रवेशद्वारातून बाहेर पडलेल्या आजोबांनी गाडीच्या खिडकीतून चेहरा बाहेर काढलेल्या मुराकामीला पाहिलं आणि ते खुषीने म्हणाले, “अरे! माझ्यासाठी थांबलात होय तुम्ही?”

“चला, घरी सोडतो तुम्हाला.” आजोबांना बसवून मुराकामीने गाडी सुरू केली.

“अभ्यासक्रम पूर्ण केल्याबद्दल अभिनंदन!”

“ऐकलंत वाटतं तुम्ही? माझाच दीक्षांत समारोह आहे असं सांगायला लाज वाटली मला. त्यामुळे तसं सांगू नाही शकलो तुम्हाला...” आजोबांनी मोठा नि:श्वास सोडला. “डोक्यावरचं ओझं उतरल्यासारखं वाटतंय आता. चिकाटीने अभ्यासक्रम पूर्ण करीन अशी नातवाच्या थडग्यासमोर प्रतिज्ञा केली होती मी...”

मुराकामी काही वेळ काहीच न बोलता गाडी चालवत राहिला. मग तो म्हणाला,

“तुमचा नातू.. त्यावेळी मीच चालवत होतो टॅक्सी- आठवतंय का तुम्हाला?”

आजोबांचं उत्तर आलं नाही. म्हणून मुराकामीने टॅक्सी थांबवून मागे वळून पाहिलं.

दीक्षांत प्रशस्तीपत्रक ठेवलेलं गोल कागदी नळकांडं हातात धरलेल्या आजोबांनी डोळे मिटले होते आणि ते जराही हलत नव्हते...

आजोबांनी आणखी एक अभ्यासक्रम पूर्ण केला होता.

अनुवाद : निसीम बेडेकर

(अनुभव मासिकाच्या ऑक्टोबर २०२१च्या अंकातून साभार)

जिरो अकागावा

जिरो अकागावा हे सुप्रसिद्ध जपानी कादंबरीकार आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results