आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

आणि मी बँकेचा राजीनामा दिला

  • डॉ. मेधा पुरव सामंत
  • 23.08.25
  • वाचनवेळ 21 मि.
annapurna medha samant

माझा नवरा जयंत याच्या व्यवसायासाठी आम्ही मुंबईहून पुण्याला शिफ्ट झालो. हळूहळू पुण्यात स्थिरस्थावर होऊ लागलो. बँक, घर, नचिकेतची शाळा, जयंतचं ऑफिस सगळं मार्गी लागू लागलं. हाताशी थोडा रिकामा वेळ मिळू लागला. मला आधीपासूनच वाचन, लेखन, चित्रकला, हस्तकला यांची आवड होती. मग कधी कोल्ड सिरॅमिकच्या फ्रेम बनव, तर कधी मोठालेे मातीचे रांजण कोल्ड सिरॅमिकने सजव, असे माझे छंद सुरू झाले. मी पुन्हा कथा, कविताही लिहायला लागले. ‘हेमांगी' मासिकाच्या कथास्पर्धेत माझ्या कथेला बक्षीस मिळालं. मी लिहिलेल्या ‘आई' नावाच्या कवितेला ‘स्त्री' मासिकाच्या कवितास्पर्धेत बक्षीस मिळालं. यातूनच पुढे काही काळ मासिकांतून लेखन, तिथल्या लेखक-संपादक मंडळाशी स्नेहबंध, संपर्क अशा गोष्टी सुरू झाल्या. ‘किस्त्रीम' दिवाळी अंकासाठी मी घेतलेली शबाना आझमीची मुलाखत तेव्हा बरीच नावाजली गेली. ‘स्त्री' मासिकात मी वर्षभर लिहिलेली ‘जसा तवा चुल्ह्यावर' ही लेखमालिकाही वाचकांना आवडली. रोजचा पेपर वाचणं, बातम्या बघणं तर चालूच असायचं.

या काळात देशपातळीवर वेगवेगळ्या घटना घडत होत्या. तेव्हाच्या काँग्रेस सरकारने १९९१पासून (डॉ. मनमोहन सिंग अर्थमंत्रिपदी असताना) ‘खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण' हे धोरण राबवायला सुरुवात केली होती. परिणामतः शिक्षण, आरोग्यसेवा इत्यादी महाग होत चाललं होतं. बँक ऑफ इंडियामध्येसुद्धा मार्केटिंगचे वारे वाहू लागले होते. बँकेतर्फे मार्केटिंगचा पहिला प्रयोग पुण्यातच झाला. त्यासाठी पुण्यातल्या ब्रँंचेसमधून मिळून २५ जण निवडले गेले. त्यांनी सगळ्या ब्रँंचेसना फिरायचं, त्या-त्या ब्रँंचच्या आसपासच्या उच्चभ्रू भागातून फिरायचं, तिथल्या कस्टमर्सशी संवाद साधायचा, त्यांना माहिती द्यायची, बँकेच्या योजना त्यांच्यापर्यंत पोचवायच्या, त्यांच्या अपेक्षा- गरजा समजून घ्यायच्या, असा हा प्रयोग होता. या

२५ जणांच्यात फक्त दोन स्त्रिया होत्या- मी आणि सुजाता हटकर. सुजातासुद्धा मुंबईमधून बदली होऊन आलेली. मुंबईच्या मेन ब्रँंचमध्ये आम्ही समोरासमोर बसायचो. त्यामुळे मैत्रिणीच होतो. आजही आहोत. तर तेव्हा एक वर्षभर आम्ही २५ जण असे फिरलो. कस्टमर्सचे वेगवेगळे अनुभव घेतले. कुणी कुतूहलाने आम्हाला आत बोलावायचं, तर कुणी चक्क दारातूनच नकार द्यायचं. अशा फिरतीशिवाय आमचे ट्रेनिंग प्रोग्राम्स होत, झोनल ऑफिसला रिपोर्टिंग करावं लागे. या फिरतीमध्ये मला पुण्याचे रस्ते समजले, पुण्यातला उच्चभ्रू वर्ग समजला. त्याचबरोबर त्यांच्याच वळचणीला वसलेल्या पुण्यातल्या वस्त्या आणि गरीब वर्गसुद्धा दिसला. मार्केटिंगच्या या वर्षभराच्या प्रयोगानंतर पुन्हा ब्रँंचमध्ये टेबलवर बसून काम करायला लागलो तेव्हा मला ‘कस्टमर रिलेशन असिस्टंट' या पदावर बढती देण्यात आली.

त्याच दरम्यान जागतिक पटलावर काही महत्त्वाच्या घडामोडी घडत होत्या. सोव्हिएत रशियामध्ये मिखाईल गोर्बाचेव्ह अध्यक्षपदी आले. तिथे ‘पेरेस्त्रेोइका-ग्लासनोस्त'चे (पारदर्शकता व बदल) वारे वाहू लागले होते. त्याचीच परिणती म्हणून सोव्हिएत रशिया हे संघराज्य फुटलं आणि त्यातले छोटे छोटे देश स्वतंत्र झाले. बेकारी, गरिबी, भूक यांचा आगडोंब उसळला. मी अगदी लहानपणापासून साम्यवादी विचारसरणीत वाढलेली असल्यामुळे सोव्हिएत रशिया हे साम्यवादावर आधारित आदर्श संघराज्य आहे, असा माझा विश्वास. मार्क्सने लिहिलेल्या सिद्धांताच्या आधारे लेनिनने प्रत्यक्षात उतरवलेलं हे साम्यवादी राष्ट्र सर्व नागरिकांना समान संधी देतं, मूलभूत गरजांची पुरेपूर काळजी घेतं, इथे धर्म-जात-वंश-भाषा-लिंग याच्या पलीकडे जाऊन सर्व माणसं समान गणली जातात, असं ऐकत माझी पिढी लहानाची मोठी झाली होती. मार्क्सवाद मानणाऱ्या सर्वांचीच ही धारणा होती. सोव्हिएत रशियातल्या घडामोडींमुळे अचानक या विश्वासाला धक्का बसला.

इकडे बँकेत माझी बदली करण्यात आली. एस.एन.डी.टी. वुमन्स युनिव्हर्सिटीमध्ये कर्वे रोड ब्रँंचचा एक एक्स्टेन्शन काउंटर होता. फक्त एस.एन.डी.टी.चे कर्मचारी, विद्यार्थिनी यांच्यासाठीची ती सोय होती. काही महिन्यांसाठी मला तिथे काम करायचं होतं. एस.एन.डी.टी.च्या कर्मचाऱ्यांचे पगार, मुलींच्या फीज इतकेच व्यवहार तिथे चालायचे. त्यामुळे त्या काउंटरला महिन्याच्या ठराविक तारखांना खूप काम असायचं. इतर दिवशी मोकळा वेळ उरायचा. माझी मानलेली बहीण अनुताई एस.एन.डी.टी.मध्ये शिकवत असे. तिच्या मदतीने मी एस.एन.डी.टी.च्या ग्रंथालयाचं सभासदत्व मिळवलं. एकीकडे रिकामा वेळ, दुसरीकडे भारतीय आणि जागतिक स्तरावरच्या बदलत्या आर्थिक धोरणांचा विचार. आपण सामाजिक विषयावर लिखाण करावं असंही मला वाटू लागलं. माझे आत्तोबा प्र. श्री. नेरुरकर लेखक होते, त्यांनी अनेक पुस्तकं लिहिली. मुंबईत साहित्य सहवासमध्ये त्यांचं घर होतं. मी कधी कधी दोन-चार दिवस त्यांच्याकडे जाऊन राहत असे. त्यांच्याशी चर्चा करत असे. तरी नोकरी, छंद हेच आपल्या आयुष्याचं ईप्सित आहे असं वाटत नव्हतं. भोवतालच्या जगात मला अस्वस्थ करणाऱ्या अनेक घडामोडी घडत होत्या. ‘मला जे करण्याची इच्छा आहे, ते मी करते आहे' असं मला वाटत नव्हतं. दैनंदिन जगण्यात एक अपूर्णत्वाची जाणीव टोचत होती. जयंतशीही मी याबद्दल बोलत असे.

अशा दैनंदिन चाकोरीमध्येच माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण आला. माझी आणि शेवंताबाईंची भेट झाली. त्या भेटीतूनच पुढे ‘अन्नपूर्णा'चं बीज माझ्या मनात उमललं.

शेवंताबाई पौड फाटा भाजी मंडईत कांदे-बटाटे विकायच्या. वय चाळिशीतलं. पाचवारी साडी, डोक्यावर पदर, गोऱ्या, हसऱ्या, तपकिरी डोळे. मी बँकेतून घरी जाता जाता त्यांच्याकडून कांदे, बटाटे घ्यायचे. त्या आणि बाकी भाजीवाल्या मोठमोठ्याने हाकारे घालत एकमेकींची थट्टामस्करी करत असायच्या. माझ्या गंभीर प्रकृतीला त्याची गंमत वाटायची. जवळजवळ वर्षभर अशी आमची बऱ्याचदा संध्याकाळी भेट व्हायची. मला त्या आवडायच्या. त्यांनाही मी आवडायचे. यालाही एक कारण होतं. मी भाज्यांच्या दरावरून त्यांच्याशी कधीही घासाघीस करत नसे. आपण मोठ्या दुकानांतून खरेदी करताना कधी घासाघीस करत नाही. कष्टाने कामधंदा करणाऱ्या लोकांशी मात्र आपण हुज्जत घालत बसतो. मला ते कधीच पटत नाही. तर, त्यामुळे त्यांना मी चांगलं गिऱ्हाईक वाटायचे. पहिला मैत्रीचा हात त्यांनीच पुढे केला. कधी कधी मी येताना दिसले की त्या लांबूनच मला ‘येऊ नका, पुढे जा' अशी खूण करायच्या. या असं का म्हणतात ते मला कळायचं नाही. मी एकदा विचारलं, तर म्हणाल्या, “त्या दिवशी माझ्याकडची भाजी शिळी होती. तुम्हाला शिळी भाजी कुठे देऊ? आणि त्या पुढे बसल्यात त्या काय माझ्याच बहिणी-भाच्या आहेत की.”

तर, असं होता होता हळूहळू आमची चांगली ओळख झाली. मला त्यांच्याबद्दल माहिती होऊ लागली, त्यांच्यातले स्तर समजू लागले. हातगाडीवर फ्लॉवर, टोमॅटो वगैरे तीन-चार प्रकारच्या भाज्या विकणारी ती श्रीमंत भाजीवाली, कारण या भाज्या महाग असतात आणि रोजच्या रोज त्यात पैसे गुंतवावे लागतात. लीलाबाई ढोक तशा प्रकारच्या हातगाडीवाल्या होत्या. दुसऱ्या स्तरातल्या भाजीवाल्या म्हणजे कांदा-बटाटा विकणाऱ्या. कांदे, बटाटे रोज घ्यावे लागत नाहीत. एकेक पोतं घेतलं की आठवडाभर जातं. कांदे-बटाटे विकणाऱ्या बायकांकडे हातगाडी असतेच असं नाही. शेवंताबाई, लक्ष्मीबाई या स्तरातल्या. आणि सर्वांत गरीब भाजीवाल्या म्हणजे गोणपाटावर भाजी विकत बसणाऱ्या- मार्केटयार्डातून भल्या सकाळी भाजीचे टेम्पो बाहेर पडले की तिथे मागे उरलेल्या भाजीतून वेचून भाजी आणणाऱ्या. या बायका मिरचीचे, लिंबाचे छोटे वाटे विकायच्या. यांच्याकडे शून्य रुपये भांडवल. भाजीला गोणपाट आणि बसायला जमीन, बस एवढंच. अशा सगळ्या परिस्थितीत त्यांच्या हसत-खेळत राहण्याचं मला अप्रूप वाटायचं. शेवंताबाई आणि लक्ष्मीबाईंशी हळूहळू माझी मैत्रीच झाली. लक्ष्मीबाईंची मुलगी सुलाबाई, धाकटी बहीण चांदाबाई यासुद्धा भाजी विकायच्या. लीलाबाई ढोक, सुशीलाबाई साळेकर, जाहिदाबी जलालुद्दिन यासुद्धा पुढे मैत्रिणी झाल्या.

annapurna medha samant

पुढे पुढे या बायका धंद्यातल्या, घरातल्या एकेक गोष्टी माझ्याशी बोलू लागल्या. शेवंताबाईंपाशी त्यांची छोटी नात बसलेली असायची. तिचं नाव हीना. नातीचं नाव हे कसं काय, मला उत्सुकता वाटली. मी एक दिवस शेवंताबाईंना विचारलं. त्यावर त्यांनी तिची कथा सांगितली. शेवंताबाईंचा नवरा बिगारी कामगार. मोठी मुलगी मंगल, धाकटी शालन आणि मुलगा गोपाल. मंगलचं लग्न तेराव्या वर्षी यांच्या नणंदेच्या मुलाशीच लावून दिलेलं. त्यांचं घर कोल्हापूरजवळच्या एका खेडेगावात होतं. मंगलची आत्याच तिची सासू, पण ती मंगलला फार छळायची. ही पोरगी शेतात, घरात राब राब राबायची आणि रोज नवऱ्याचा मार खायची. केसांना तेल नाही, खायला अन्न नाही, अशी तिची दशा झालेली. एक दिवस जीव वाचवून ती शेतातून, रानातून पळाली. कशी प्रवास करून आली कोण जाणे, पण पहाटेला पुण्यात शेवंताबाईंच्या दारात उभी राहिली. तिचं ते वाळलेलं आणि काट्याकुट्यातून फरफटत आलेलं रूप पाहून त्या हबकल्याच. ‘पुन्हा मला सासरी धाडू नको' म्हणून पोर रडत होती. पण आपल्याकडे एकदा पोरगी दिली की दिली अशी मानसिकता. त्यामुळे बाप पोरीला ठेवून घेईना. शेवंताबाईंच्या भाषेत सांगायचं, तर ‘हिच्या बापानं मला मारली, पोरीला मारली. तरी मी म्हटलं, मी काय पाठवणार नाही. ती परत आलीय. मी तिचे अजून हाल होऊन देणार नाही. ती इथेच राहणार.' शेवंताबाई ठाम राहिल्या. त्यांनी मुलीला भाजीच्या धंद्यात आणली. तिथे एका रिक्षावाल्या मुलासोबत पोरीची ओळख झाली आणि त्यांचं प्रेम जुळलं. पण तो होता मुसलमान. त्याचं नाव सलीम. दोघांनी लग्न करायचं ठरवलं. घरी, वस्तीत बातमी कळल्यावर माणसं भडकली. पोरीने स्वतःच दुसरं लग्न ठरवलं, ते पण मुसलमान पोराशी, हे त्यांना पचणारं नव्हतं. शेवंताबाईंनी परिस्थितीचा अंदाज घेतला. त्या थेट सलीमच्या घरी गेल्या. त्यांनी त्याला समोर बसवलं आणि डोळ्यांत डोळे घालून विचारलं, “आम्ही मातंग, तू मुसलमान. तरी तुला हे लग्न करायचं आहे?”

“हो..”

“तुमच्यात चार लग्नं चालत्यात, आमच्यात नाही. त्यामुळे एकदा माझ्या मंगलशी लग्न केलंस की ती जित्ती हाय तोवर दुसरं लग्न करायचं नाही.”

“नाही करणार.”

“तीन-चार पोरं झाली की आपरेशन करून घ्यायचं.”

“घेतो.”

“चल, दिली तुला पोरगी.”

अशी लग्नाची बोलणी करून गड जिंकल्यागत शेवंताबाई वस्तीत परत आल्या. पोरीला पाठीशी घालून त्या सगळ्यांसमोर उभ्या राहिल्या आणि म्हणाल्या, “मी हिचं सलीमसंगं लग्न लावणार हाय. मला जावई पसंत हाय. माझ्या पोरीला जावयाला मारायचं असंल तर आधी मला कापावं लागंल. मी अशी मध्ये हुबी हाय.”

अशी माझी ही मैत्रीण. आणि म्हणून तिच्या नातीचं नाव हीना. ही माझी मैत्रीण करारी आहे, व्यवहारी आहे, खऱ्याच्या बाजूने उभी राहणारी आहे. शेवंताबाईंची गोसावी वस्तीत टीचभर खोली. दारू पिणारा आणि बायकोवर हात उचलणारा नवरा. डबक्यातून वाट काढत घरापर्यंत पोचावं लागायचं. असं असूनही त्या घर अगदी स्वच्छ, नीटनेटकं ठेवायच्या. नेहमी हसतमुख असायच्या.

एकदा या बायांशी गप्पा मारताना त्यांनी एक अनपेक्षित प्रश्न विचारला- “साहेब कधी तुम्हाला प्रेमाने मारतात का हो?”

“साहेबांनी मारलं तर मीच मारीन परत! काय मारतबिरत नाहीत साहेब..” मी हसत हसत उत्तर दिलं.

कधी तरी गंभीर होऊन मी त्यांना विचारायचे, “कशा गं मार खाता तुम्ही? कसं सहन करता?”

त्या म्हणायच्या, “काय करणार सांगा ताई, कुठं जाणार? आणि नवऱ्याचा तो हक्कच हाय.”

या बायकांची नात्यातच लग्नं झालेली असतात. नवरा म्हणजे यांचा आत्येभाऊ, मामा असाच कुणी तरी असतो. तोही कुठे तरी बिगारी कामगार म्हणून काम करत असतो. बायकोला मारण्यात नवऱ्याची इज्जत असते, अशी त्याची गैरसमजूत. त्यांच्या या आयुष्यापासून मी कोसो दूर होते. आई-बाबांसोबत फिरताना गिरणी कामगार आणि गरजू महिला पाहिल्या होत्या. गरिबी समजत होती. पण तरी यांच्या जगण्याचे हे आंतरिक कंगोरे आधी कधी समजले नव्हते.

या बायकांच्या घरच्या गोष्टी, धंद्यातला दिनक्रम हे तर आता कळायला लागलं होतं. मग एक दिवस त्यांच्या दैनंदिन आयुष्यातली आणखी एक गोष्ट दिसली आणि मी प्रचंड अस्वस्थ झाले. रोज संध्याकाळी दिवाबत्ती झाल्यावर एक लुंगी नेसलेला माणूस त्यांच्या भाजीच्या गाडीवर यायचा. या बाया त्याला रोज प्रत्येकी २५ रुपये द्यायच्या. तो चोपडीवर काही तरी खरडून द्यायचा. त्या बाया ते गोणपाटाखाली सरकवायच्या. मी खोलात जाऊन काही विचारायला लागले तर फार काही सांगायच्या नाहीत. हा आमचा सगेवाला आहे, आमची भिशी असते, इतकं बोलून विषय संपवायच्या. ही शिकलेली बाई, ही आपल्याला काही तरी शहाणपणा सांगून नादाला लावेल, असं त्यांना वाटायचं. अशीच एक बाई याआधी त्यांना भेटली होती. तिने यांना कुठल्या तरी पतसंस्थेचे शेअर्स घ्यायला लावले, पावत्या दिल्या. आणि नंतर तिच्या ऑफिसला टाळं लागलं. ती बाई गायब झाली. यांचे पैसेही बुडाले. त्यामुळे शिकलेल्या बायांकडे आपले पैशाचे व्यवहार बोलायचे नाहीत, एवढं त्या अनुभवातून शिकल्या होत्या.

पुढे आमची जवळीक वाढली, तसं त्यांनी सांगितलं, की तो अण्णा म्हणजे खासगी सावकार होता. या बायांना एक हजार रुपये रोखीचं भांडवल लागायचं. तो ५० रुपये कापून यांना ९५० रुपये द्यायचा आणि कर्ज म्हणून १००० रुपये मांडायचा. मग पुढे सलग ५० दिवस गाडीवर येऊन प्रत्येकीकडून रोज २५ रुपये घेऊन जायचा. मी हिशोब मांडला. हे म्हणजे १५ टक्के मासिक व्याजाचं कर्ज झालं. (वार्षिक १८० टक्के) मी एक दिवस शेवंताबाईंना म्हटलं, “तुम्ही याच्याकडून कर्ज कशाला घेता? हा खूप व्याज लावतोय.” त्या म्हणाल्या, “मग कोणाकडून घेऊ? बँका आम्हाला दारात उभं करत नाहीत.”

आणि पहिल्यांदाच मला त्यांचं दारिद्य्र, त्यांचे दैनंदिन आर्थिक प्रश्न जाणवले, त्यांची अर्थनिरक्षरता समजली. माझ्या बँकेपासून अवघ्या दीड-दोन किलोमीटरच्या अंतरातच मला प्रचिती आली, की गरजूंना विनातारण, कमी व्याजदराने कर्ज देण्याच्या बँकांच्या योजना बंद कपाटातच शिल्लक राहिल्या होत्या.

...आणि तिथून पुढे माझ्या विचारांना वेगळीच दिशा मिळाली.

एकट्या शेवंताबाई नव्हे, तर पौडफाटा भाजी मार्केटमधल्या अनेक बायकांची हीच दैन्यावस्था होती. बँकांचं राष्ट्रीयीकरण झालं, त्यांचा खेडोपाडी विस्तार झाला, तरीही शहरातील झोपडवस्तीत राहणाऱ्या भाजीवाल्यांना कर्ज देण्याच्या बाबतीत मात्र बँका उदासीन होत्या, हे मला पटेना. मला वाटायचं, आमच्या बँकेने या भाजीवाल्यांना कर्ज का देऊ नये? त्या सावकारांचं कर्ज फेडताहेत तर बँकेचंसुद्धा फेडतील. पण आमच्या बँकेच्या मंडळींचं म्हणणं होतं, ‘असले नसते उद्योग आपण कशाला करायचे? बँकेचे पैसे या बायकांनी बुडवले तर?' उलटपक्षी, मी शेवंताबाई-लक्ष्मीबाईंना समजावून सांगायचा प्रयत्न करायचे, की त्यांनी सावकाराऐवजी बँकेकडून कर्ज घ्यावं. पण त्यांना बँकेपेक्षा सावकार बरा वाटायचा. बँकेचा एखादा हप्ता थकला तर बँकवाले गाडी उचलून नेतात, घराला टाळं लावतात, असे त्यांचे समज होते.

खरं म्हणजे बँकांना ‘प्रायॉरिटी सेक्टर लेंडिंग टार्गेट' असतं. यामध्ये त्यांनी आर्थिकदृष्ट्या मागासवर्गाला कमी दराने कर्ज देणं अपेक्षित असतं. प्रत्येक ब्रँंचच्या एकूण व्यवसायाच्या किमान दोन टक्के रक्कम अशी कर्जाऊ देण्याचा नियम आहे; पण हे टार्गेट कसं तरी पूर्ण केलं जायचं. बँकेतला शिपाई त्याच्या ओळखीच्या काहीजणांना उचलून आणायचा. कागदी घोडे नाचवले जायचे आणि मूळ उद्देश बाजूलाच राहायचा. पैसे बुडवणारे लोक अपवाद असतात आणि ते श्रीमंतांमध्येही असतात. श्रीमंत माणसं कर्ज बुडवून पळून गेलेली आपण पाहत नाही का? पण गरीब माणूस पैसे बुडवणारच असा बँकवाल्यांचा समज. का? कारण गरीब महिला तर तारण, जामीन काहीच देऊ शकत नाही. त्यामुळे तिला बँकांच्या दृष्टीने पतच नाही.

शेवंताबाईंच्या सावकारी कर्जाबद्दल कळल्यानंतर पुढे वर्ष-दीड वर्ष मी बँकेत चर्चा करून बघितली. या महिलांना कर्ज मिळावं म्हणून खूप प्रयत्न केले. पण ‘मॅडम, तुम्ही फारच ध्येयवादी आहात. कशाला नसत्या फंदात पडताय?' या वाक्याच्या पलीकडे माझ्या हाती काहीही लागलं नाही.

पण मला काही गप्प बसवेना. एक प्रयोग करून बघावा असं माझ्या डोक्यात आलं. मी शेवंताबाईना म्हटलं, “तुम्ही एकमेकींच्या विश्वासातल्या १० बायकांचा गट केलात आणि सर्वांनी एकमेकींची कर्जफेडीची हमी घेतलीत, तर मी देते तुम्हाला कर्ज.” दहा बायका एकत्र आल्या तर सर्वचजणी काही कर्ज बुडवणार नाहीत, असा माझा यामागचा विचार. मी स्वतः कर्ज देणार म्हटल्यावर त्यांनी उत्साहाने नात्यातल्या, एकाच वस्तीतल्या अशा दहाजणी गोळा केल्या. तरी त्यातली एक बाई घाबरली आणि आमच्या प्रयोगातून बाहेर पडली. मग आम्ही नऊजणींचाच गट केला. दर शनिवारी दुपारी भाजी मार्केटमध्ये गोणपाटावर बसल्या बसल्या आमच्या बैठका होऊ लागल्या. एकेका मुद्द्यावर त्या बायकांनीच उत्तरं पुरवली. कर्जाची रक्कम किती द्यायची?- ‘अण्णा देतो तेवढीच, म्हणजे एक हजार रुपये. त्यात कांद्या-बटाट्याचं एक-एक पोतं येतं!' कर्जाचा हप्ता कसा घ्यायचा?- ‘ताईने (म्हणजे मी) दररोज भाजी मार्केटला जाऊन प्रत्येकीकडून २५ रुपये घ्यायचे. अण्णाप्रमाणेच!' व्याजाचा दर ‘माहीत नाही' (अण्णाप्रमाणेच), परतफेडीचा कालावधी ५० दिवस (अण्णाप्रमाणेच). सगळं ‘अण्णाप्रमाणेच' होतं, कारण त्या भाजीवाल्यांच्या जीवनात ‘वित्तसेवा' घेण्याचा दुसरा अनुभवच नव्हता. त्यांच्या अनुभवविश्वाच्याच आधारे आमच्या अभिनव प्रयोगाचे चिरे रचले जात होते.

हे काही एका रात्रीत झालं नव्हतं. दोन-अडीच वर्षांचा आमचा परिचय, मैत्री, अनेक आठवडे केलेल्या बैठका यांचं हे फलित होतं. आपण ज्यांच्यासाठी काम करायला निघालोय त्यांच्याशीच चर्चा केली पाहिजे; त्यांच्या गरजा, कुवत, स्वप्नं समजून घेतली पाहिजेत, हे माझ्या डोक्यात पक्कं होतं. आम्ही ‘एकजूट-एकमूठ' या तत्त्वावर काम करणार होतो. तरीही अण्णाच्या अटींपेक्षा या कर्जामध्ये काही मूलभूत महत्त्वाचे बदल असणार होते- हे कर्ज विनातारण होतं, पण गटाने एकमेकींची घेतलेली हमी हा आधार असणार होता. व्याजाचा दर ठरला नव्हता, तरी तो अण्णाच्या दरापेक्षा कमीच असेल हे नक्की होतं. ही ‘डिमांड साइड'ची म्हणजे ‘मागणी'ची व्याख्या ठरली. आता ‘सप्लाय साइड' म्हणजे ‘पुरवठा' कुठून, कसा करायचा हे ठरवायचं होतं. माझ्यासमोर तीन पर्याय होते- बँकेच्या डीआरआय (डिफरंशियल रेट ऑफ इंटरेस्ट) योजनेतून भांडवल उभं करणं किंवा आईकडून, म्हणजेच अन्नपूर्णा महिला मंडळातून पैसे घेणं किंवा स्वतः पैसे घालणं.

मी बँकेतील सहकाऱ्यांशी पुन्हा एकदा चर्चा केली. पण एकंदर लक्षात आलं, की डीआरआय स्कीममधून मागणीनुसार पुरवठा होण्याची शक्यता नव्हती. अशा गरजू महिलांच्या विनातारण कर्जासाठी आवश्यक असणारी लवचिकता त्या योजनेत नव्हती. आईच्या अन्नपूर्णा महिला मंडळाच्या बाबतीत जरा वेगळी समस्या होती. स्थापनेच्या वेळी ठरवलेल्या ‘आर्थिक पिळवणुकीपासून महिलांची मुक्तता' या उद्दिष्टापासून ही संस्था आता बरीच दूर आली होती. बाबांच्या मृत्युमुळे त्यांना कुणी खंबीर मार्गदर्शक राहिला नव्हता. आईचं शिक्षण कमी आणि मूळ स्वयंपाकाची आवड, त्यामुळे ती स्वत: खाद्यपदार्थ व्यवसायात जास्त रमली होती. १९८२-९२ या दशकात ‘खाद्यपदार्थ प्रशिक्षण व विक्री' यासाठी भरपूर डोनेशन मिळाल्यामुळे त्यातच त्यांचं लक्ष केंद्रित झालं होतं. कर्जपुरवठा करणाऱ्या संस्थेकडे जी एक आर्थिक शिस्त असावी लागते त्याचा तिथे अभाव होता.

अखेर मी ठरवलं, आपणच पैसे घालायचे, फक्त कर्ज देऊन न थांबता शेवंताबाईंसारख्या बायकांसाठीच काम करायचं. हा अगदीच निराळा मार्ग होता. १९७४-७५मध्ये मी बाबांच्या तोंडून ऐकलं होतं- ‘गरीब महिलांना विनातारण कर्जपुरवठा करून सावकारी पाशातून मुक्त करणं, हे आपलं एक ध्येय असायला हवं.' मी करू घातलेला पुण्यातील हा प्रयोग म्हणजे एकापरीने त्या ध्येयाकडे जाण्याचा प्रयत्न होता. मला या प्रयोगात लवचिकता, स्वातंत्र्य हवं होतं. प्रयोग फसला तरी चालेल, पण तो ‘गरजा तशी मागणी' यावर आधारित असायला हवा, असा माझा आग्रह होता. कुठल्याही बँकेची एकच एक स्कीम गरीब महिलांवर थोपवण्याची माझी इच्छा नव्हती, किंवा आईच्या ‘अन्नपूर्णा'प्रमाणे पूर्णपणे ग्रँटवर आधारित कार्यक्रमही मला करायचा नव्हता.

महिलांना सावकाराच्या पाशातून मुक्त करायचं, त्यांना त्यांच्या पायावर उभं करायचं, त्यांना आर्थिक स्वातंत्र्य आणि स्थैर्य द्यायचं हे आपलं ध्येय असायला हवं असं मला वाटत होतं. ते प्रत्यक्षात आणणं हे मोठं अवघड व दीर्घकालीन काम होतं. या प्रयोगात आयुष्य झोकून द्यावं लागणार होतं. साहजिकच ते मला बँकेतली नोकरी करता करता जमणं शक्य नव्हतं. तसंही बँकेत काम करताना समाधान मिळत नसल्याची जाणीव मला कुरतडत होतीच. मग मी जयंतशी सविस्तर चर्चा केली. त्याचा धंद्यात कितपत जम बसलाय, त्याच्या एकट्याच्या कमाईवर घर चालेल का, हे बघणंही गरजेचं होतं. माझ्या या प्रयोगात तो एकच वैचारिक सोबती होता. जयंतने माझ्या या प्रयोगाला अगदी मनापासून पाठिंबा दिला. त्याच्या साथीने माझा निर्णय झाला.

आपल्या या उपक्रमाला सुरुवातीपासून काही तरी नाव द्यावं, असा माझा विचार होता. माझ्या डोक्यात एकच नाव आलं- ‘अन्नपूर्णा परिवार'. एक तर ‘अन्नपूर्णा महिला मंडळा'साठी बाबांनी योजलेलं, परंतु तेव्हा वाढू न शकलेलं कार्य आता जमल्यास पुढे न्यावं, हा उद्देश माझ्या मनात होता. दुसरं म्हणजे पुढे जाऊन या बायकांपैकी कुणीही ‘मेधाताईकडून वैयक्तिक कर्ज घेतलं आहे, म्हणून पाहिजे तेव्हा, पाहिजे तसं फेडू' अशी वृत्ती बाळगू नये, हेही डोक्यात होतं. त्यामुळे प्रयोगाच्या सुरुवातीलाच मला त्यांना संदेश द्यायचा होता, की ‘हे संस्थात्मक कर्ज आहे. आपण एक परिवार म्हणून काम करणार आहोत. तुमच्या गरजेनुसार, मागणीप्रमाणे देत आहोत. ही लवचिकता आम्ही ठेवली आहे, पण परतफेड करताना तुम्ही शिस्त पाळली पाहिजे. ठरलेल्या नियमांनुसारच परतफेड केली पाहिजे, तर पुन्हा वाढीव रकमेचं कर्ज मिळू शकेल.' शिवाय ‘परिवार' म्हणण्याचा आणखी एक उद्देश म्हणजे हे काम केवळ महिलांसाठी न राहता त्यांच्या कुटुंबांपर्यंत पोचावं हेदेखील माझं ध्येय होतं.

तर अशा प्रकारे ‘अन्नपूर्णा परिवाराचा' पहिला प्रकल्प ठरला- लघुवित्त पुरवठा! अर्थात तेव्हा हा पहिला प्रकल्प असणार आहे, पुढे आम्ही इतरही काही प्रकल्प करू, असं काही डोक्यात नव्हतं. पहिल्या कर्जवाटपाची तारीख ठरली- ११ जुलै १९९३. पहिल्या गटाचे नऊ सभासद ठरलेले होतेच. त्यांनी स्वतःचं रेशनकार्ड आणि दोन फोटो घेऊन यायचं हे ठरलं. पण यायचं कुठे? कर्जवाटप कुठे होणार? अन्नपूर्णा परिवाराचं ऑफिस कुठलं? जयंतने त्याच्या ऑफिससाठी उपयोगी पडेल म्हणून गोपीनाथ नगरमध्ये आठ बाय आठची एक खोली घेऊन ठेवली होती. ती रिकामीच होती. मग ठरलं, जिन्याखालची ती खोली हेच आमचं ऑफिस. ही खोली वापरण्याजोगी करून घ्यावी लागणार होती. कारण दोन-तीन वर्षं ती तशीच पडून होती. शून्य पैशांत, अत्यंत कमी वेळात ती सजवायची होती. मग जरा अवतीभोवती शोध घेतला. गोपीनाथ नगर या कॉलनीचं संपूर्ण बांधकाम झालेलं नव्हतं. त्यामुळे आसपास खूप सिमेंटच्या विटा पडलेल्या होत्या. मग घरकामाच्या बाईच्या मदतीने मी त्या विटा गोळा केल्या. खोलीत एका भिंतीपाशी एकावर एक विटा रचल्या. घरातल्या दोन चादरी त्यावर घालून एक बैठक तयार केली. दोन जुनी टेबल्स ठेवून त्यावरसुद्धा टेबलक्लॉथ अंथरला. टेबलच्या मागे प्लॅस्टिकच्या दोन खुर्च्या ठेवल्या. लाल ऑइलपेंटचा डबा आणि एक ब्रश घेऊन आले आणि टेबलमागे भिंतीवर मोठ्या अक्षरात रंगवलं- ‘अन्नपूर्णा परिवार'. झालं आमचं ऑफिस तयार!

११ जुलैला शेवंताबाई आणि त्यांचा गट आणि प्रत्येकीच्या घरातून एकेक नातेवाईक- नवरा/मुलगा/मुलगी, जामीनदार म्हणून- असे सगळे आले. सगळेच अंगठाबहाद्दर. कोणाकडेच पगाराची स्लिप नाही. कारण दर दिवशी मजुरी करून कमावणार तेव्हाच जेवणार अशी परिस्थिती. पण गंमत म्हणजे आमच्या त्या ऑफिसमध्ये पाय ठेवल्यावर सर्वांची प्रतिक्रिया अशी- ‘ही बँक? आमाला वाटलं, मोठ्या बँकंत जाऊन पैसं घ्यायचं!' मी हसत हसत म्हटलं, “ही आपली गोरगरीबाची बँक!”

त्या दिवशी आई मुंबईहून आली होती. तिच्यासोबत अरविंद गोडबोले एका जर्मन पाहुणीला घेऊन आले होते. गोडबोलेंच्या ‘असोसिएशन ऑफ फ्रेंड्स ऑफ जर्मनी' संस्थेतर्फे अन्नपूर्णा महिला मंडळाला खाद्यपदार्थ प्रशिक्षणासाठी बरीच आर्थिक मदत मिळत होती. आईने त्यांना सांगितलं होतं, की ‘माझी मुलगी पुण्यात काम सुरू करते आहे.' त्यामुळे गोडबोले कौतुकाने बघायला आले होते.

मी गटातल्या बायकांना आणि सोबत आलेल्या जामीनदारांना हिशोब समजावून सांगितला. १००० रुपये कर्ज, त्यातले ९५० रुपये हातात देणार. पुढे रोज २५ रुपये असे ५० दिवस तुम्ही पैसे भरायचे. असे प्रत्येकी १,२५० रुपये जमा होतील. पण त्यापैकी व्याज फक्त ५० रुपयेच असेल आणि बचत २०० रुपये होईल, हे त्यांना समजावून सांगितलं. त्याला सर्वांची मंजुरी घेतली आणि मग प्रत्येकीला आधीच भरून ठेवलेलं ९५० रुपयांचं एक-एक पाकीट दिलं. पाकिटातले पैसे मोजून घ्यायला सांगितले.

तेव्हा अगदी क्षुल्लक-साधं वाटणारं हे काम मला पुढे आयुष्यभर काय काय देऊन जाणार आहे याची तेव्हा काहीच कल्पना नव्हती.

पहिलंवहिलं कर्जवाटप झालं. त्यानंतर सुरू झाला रोज प्रत्येकीकडून २५ रुपये जमा करण्याचा सिलसिला. बँक सुटल्यावर मी दररोज भाजी मार्केटमध्ये जायचे. मी प्रत्येकीला त्यांची नावं लिहिलेल्या छोट्या छोट्या डायऱ्या दिल्या होत्या. पासबुकप्रमाणे मी त्यात ‘पैसे मिळाले' अशी नोंद करून द्यायचे. मी नुसते पैसे गोळा करायचे नाही, त्यांच्याशी इतर गप्पाही मारायचे. मग रात्री घरी जाऊन मी रोजचा सर्व हिशोब लिहून ठेवायचे. ५० दिवस हा सिलसिला चालला. या ५० दिवसांत मला त्या नऊ भाजीवाल्यांबद्दल किती तरी जास्त आपुलकी वाटू लागली होती. त्यांच्या जीवनात किती प्रकारच्या चिंता, समस्या आहेत हे मला कळू लागलं होतं.

त्या सगळ्या बायकांनी पहिल्या कर्जाचे संपूर्ण पैसे चोख फेडले तेव्हा मलाच एखादी लढाई जिंकल्यासारखा आनंद झाला. ५० दिवसांनी पुन्हा आमची गोणपाट-बैठक झाली. तेव्हा मी त्या नऊजणींना २०० रुपयांची बचत झाल्याचं पुन्हा एकदा सांगितलं. त्यावर त्या सगळ्याच खूप आनंदल्या. शेवंताबाई तर उत्स्फूर्तपणे उद्गारल्या, “ताईच्या पैशाला जादू आहे. अण्णाकडे कधीच बचत झाली नाही, पण ताईकडे झाली.” त्यावर मी म्हणाले, “एक तर यात कोणतीही जादू नाही. अण्णा खूप व्याज घेत होता म्हणून बचत झाली नाही. आणि दुसरं म्हणजे हे पैसे आता माझे नाहीत, आता हे आपले आहेत. आपण सर्वांनी मिळून हे भरले पाहिजेत. आपला विकास करून घेतला पाहिजे. एकीने पैसे बुडवले तर सगळ्यांचं नुकसान होणार आहे.”

या पहिल्या गटाने पहिलं कर्ज फेडलं नसतं तर हा प्रयोग पुढे यशस्वी झालाच नसता. त्यांनी पहिलं कर्ज फेडलं, त्या क्षणीच त्या नऊजणी आणि मी एक, असा आमचा १० जणींचा घट्ट गट झाला. त्यांनी नुसतं स्वतःचं कर्ज फेडलं नाही, तर एकमेकींना आर्थिक शिस्त लावण्याचं कामही केलं. एकमेकींवर नैतिक दबाव आणला. मी बँक सोडून या लघुवित्त कार्यक्रमात स्वतःला झोकून देण्याचा निर्णय घेतला तो या पहिल्या प्रयोगाच्या यशाच्या भरवशावरच. बँकेचा राजीनामा देतानाही माझ्या मनात त्याबाबत पूर्ण स्पष्टता होती.

मी लिहिलेला राजीनामा असा होता :

७ जुलै १९९३

प्रति, मा. झोनल मॅनेजर,

बँक ऑफ इंडिया, पुणे झोन.

विषय : बँकेच्या नोकरीचा राजीनामा देणेबाबत.

महोदय,

ऑगस्ट १९८१ पासून गेली बारा वर्षं मी आपल्या बँकेमध्ये अतिशय प्रामाणिकपणे काम करत आहे. हे काम करत असताना मला खूप शिकायला मिळालं आहे. बँकेसोबतच्या या प्रवासाविषयी मी अत्यंत समाधानी आहे. पण यापुढच्या काळात व्यापक समाजासाठी पूर्णवेळ काम करण्याचा निर्णय मी घेतला आहे. नेमकेपणाने सांगायचं तर समाजातल्या गरिबीरेषेखालच्या भगिनींसाठी मला यापुढे काम करायचं आहे. केवळ एवढ्या एकाच कारणासाठी मी बँकेच्या नोकरीचा राजीनामा देत आहे. त्याचा स्वीकार व्हावा, या विनंतीसह...

आपली विश्वासू,

मेधा सामंत.

बँकेच्या १२ वर्षांच्या नोकरीत मला बँकांच्या कामकाजाची माहिती झाली होती. त्याचा पुढे या लघुवित्त कार्यात खूप उपयोग झाला. बँकेत युनियनमध्ये स्त्री-प्रतिनिधी म्हणून केलेल्या कामामुळे स्त्रियांचे प्रश्न समजून घेणं, त्यावर लढा उभारणं, संघर्ष करणं याची सवय होतीच. परंतु आता गरिबीशी लढा द्यायचा होता. बँक कर्मचारी स्त्रियांच्या मध्यमवर्गीय समस्यांपेक्षा अगदी वेगळ्या समस्यांना तोंड द्यायचं होतं. तरीही मन उत्साहाने भरलेलं होतं. बँकेची नोकरी सोडण्याच्या माझ्या निर्णयाला काही लोक अतिध्येयवादी मानत होते, तर काहीजण हसत होते; पण माझा निर्णय ठाम होता. मला जयंतचा भक्कम पाठिंबा होता. एवढ्या पुंजीवर मी ‘अन्नपूर्णा परिवारा'च्या लघुवित्त कार्यक्रमाचा शुभारंभ केला होता.

डॉ. मेधा पुरव सामंत







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 10

अनुराधा प्रधान 26.08.25
सुंदर लेख. डॉक्टर मेधा पुरव सामंत यांचे अतिशय कौतुक वाटले. सर्वांनाच भाजीवाली बाई ही माहिती असते पण त्यांच्या साठी काहीतरी करणाऱ्या मेधाताई फारच वेगळ्या आहेत. त्यांच्या आई वडिलांचे संस्कार जाणवतात. मेधाताईंचे मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा!!

प्रशांत कोठडिया25.08.25
प्रिय मेधा, कालचा कार्यक्रम फारच चांगला झाला आणि त्यामुळेच तो खूप भावला. प्रारंभापासूनच या कार्यक्रमात ‘आपलेपणा’ची भावना जाणवत होती. सर्वांची भाषणे उत्तमच झाली. गौरी कानेटकर यांनी, युनिक फीचर्सची वैचारिक भूमिका सांगताना, समकालीन प्रकाशन संस्थेच्या कामामागील चिकित्सक कार्यपद्धती आणि शिस्तीतून निर्माण झालेली अचूकता नेमकेपणाने विशद केली. चिन्मयीने केलेले प्रभावी वाचन, भावभावनांनी ओथंबलेले असल्याने, बहुतेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या. डॉ. अजित रानडे यांनी सोप्या शब्दात “अन्नपूर्णा” परिवाराचे अर्थशास्त्र मांडताना, या मॉडेलचे महत्त्व आणि त्याविषयी समाजात चर्चा होण्याची गरजही प्रतिपादित केली. तर कुमार केतकर यांनी नेहमीप्रमाणेच एक व्यापट सामाजिक व आर्थिक पट मांडताना, मागील ५० वर्षात फुलून आलेल्या मध्यमवर्गीयांच्या मानसिकतेचाही अचूक वेध घेतला. तुझ्या भाषणाने तर कार्यक्रमाने वेगळीच उंची गाठली. सद्यपरिस्थितीत शासन व्यवस्थेने स्वयंसेवी क्षेत्रासाठी जे अडथळे निर्माण केले आहेत, पावलोपावली खोडे घालून ठेवले आहेत, त्याचा वाईट अनुभव सार्वत्रिक असला तरी त्याबाबत फारसे कोणी बोलताना दिसत नाही. काल तू त्याविषयी केलेले सुतोवाच फार गरजेचे होते. एकूणच कालच्या कार्यक्रमामुळे आणि त्यातही विशेषतः तुझ्या भाषणामुळे, “अन्नपूर्णा” परिवाराच्या कामाची उंची, खोली आणि व्याप्ती लक्षात येणे सुकर झाले. आता पुस्तक वाचल्यावर तुझ्या कार्यप्रवासातील असंख्य तपशीलही समजू शकतील. तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि उदंड शुभेच्छा देखील. विनीत, प्रशांत कोठडिया २५ ऑगस्ट २०२५

दया साळगावकर 25.08.25
केवळ 'सामाजिक भान' एवढाच विचार न करता, त्या अनुषंगाने 'कृतीतून धाडसाने पुढे जाणे' यांचा संगम म्हणजे स्वयंसिद्धा डॉ. मेधा पुरव-सामंत..

संध्या नितीन पडते24.08.25
एका सहृदय व्यक्तीने घेतलेला सेवेचा ध्यास किती मोठा पल्ला गाठू शकतो याच मूर्तिमंत उदाहरण. इतरांनी धडा घ्यावा असं आदरणीय व्यक्तिमत्त्व.

Praveena Sabnis24.08.25
मला तुझ्या प्रवासाची माहिती होती, पण ह्या लेखा मुळे आज ह्या कार्या मध्ये झालेला संघर्ष , त्यामागची मेहनत आणि कामाचं खरं मोल मनापासून समजल. बँके सारखी एक सुरक्षित नोकरीला राजीनामा देऊन एवढा मोठा निर्णय घेण्यासाठी लागणारी हिंमत, धैर्य आणि एकनिष्ठता, हे सगळं खरंच कल्पनेपलीकडचं आहे. हे कार्य खूप वेगळं आणि विशेष आहे. तुझं सातत्य, आणि स्वतःच्या उद्दिष्टावर असलेला ठाम विश्वास, त्याला माझा खरंच सलाम आहे. त्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे, शेवंता ताईसारख्या लोकांसाठी मदत करण्याची इच्छाशक्ती. त्यांना केवळ मदत देणं नाही, तर बचत करण्याची सवय लावणं आणि घेतलेलं कर्ज परत करण्याची शिस्त लावणं. हे सगळं खरोखर कौतुकास्पद आहे. तु एक अद्भुत व्यक्ती आहेस. खरंच प्रेरणादायी!

Vidyalankar Gharpure24.08.25
अतिशय प्रांजळ कथन. मला .का नाही हे सुचलं, अशी हुरहूर लावणारं कथन. कारण मी ही एक निवृत बँक कर्मचारी आहे. पुरोगामी चळवळीत काम केलेलं आहे.

डॉक्टर सुषमा दाते धुळे24.08.25
आपण समाजाचं देणं लागतो यावर ठाम विश्वास असलेल्या मेधा सामंत यांनी गरीब महिलांसाठी अन्नपूर्णा परिवार सुरू केला. बँकेची नोकरी सोडून आपलं ध्येय साकार करण्यासाठी अनेक गरीब महिलांच्या बरोबर बैठकी घेऊन त्याला सांगून समजावून पैसे कसे वाचवता येतील, हे स्पष्ट करून त्या सगळ्या महिलांना स्वयंपूर्ण करण्यासाठी मेधाताई अथक प्रयत्न केले आहेत. आज अन्नपूर्णा परिवार खूप मोठा झाला आहे हे सगळं श्रेय मेधाताईंकडे जातं. मेधाताईंच्या कार्याला सलाम.💐🙏💐 पण अन्नपूर्णा परिवाराची अशी च प्रगती होत राहो ही परमेश्वराकडे प्रार्थना🙏

विनय23.08.25
अप्रतिम! धाडस म्हणजे हेच. यश धाडसाला माळ घालते.

सुदेश माळाळे 23.08.25
ताई, आम्ही स्वयंपूर्णा च्या पुस्तक प्रकाशन समारंभास तर येणारच आहे. तत्पूर्वी पुस्तकातील उतारा आणि संक्षिप्त वाचला. समाजातील दुर्लक्षित घटकांचा विकास व्हावा या साठी बँकेची चांगली नोकरी सोडण्याचं धाडस तीच व्यक्ती करू शकते जी खऱ्या अर्थाने मानवतेशी जोडलेली आहे. हजारो स्त्रियांची ताई होणे पंतप्रधान होण्या पेक्षा मोठा मान आहे असेच मी समजतो. प्रेमा ताई नी लावलेल्या रोपट्याचा तुम्ही वटवृक्ष केला यात शंका नाही. तुमच्या कार्याला मानाचा मुजरा..

भालचंद्र गोखले23.08.25
अतिशय प्रेरणादायक लेख आहे..

See More
gangotree homes advertisement

Select search criteria first for better results