आम्ही कोण?
माणसं आणि कामं 

नौकानयनाची जलपरीः मृण्मयी साळगावकर

  • शिल्पा दातार
  • 02.01.26
  • वाचनवेळ 6 मि.
mrunmayee salgaonkar

आपण काहीही ठरवलेलं नसतं, सहज म्हणून आपला एका वेगळ्या क्षेत्राशी परिचय होतो आणि तेच आपलं नाव उंचावणारं करिअरक्षेत्र ठरतं. नाशिकच्या मृण्मयी साळगावकरच्या बाबतीत तसंच घडलं. नौकानयन (रोईंग) हा तसा वेगळाच क्रीडाप्रकार. मृण्मयीने हा क्रीडाप्रकार आपल्या करिअरसाठी निवडला. आज तिने राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर नौकानयनात अनेक सुवर्ण, रजत पदकांची लयलूट केलीय.

मृण्मयी आनंद निकेतन या मराठी माध्यमाच्या प्रयोगशील शाळेत शिकत होती. तेव्हा तिला कोणत्याही खेळाची आवड नव्हती. पण कोणता तरी खेळ खेळायला हवा, म्हणून तिला आई-बाबांनी बॅडमिंटन, बास्केटबॉल खेळण्यास पाठवलं. या खेळांत तिचं मन रमलं नाही.

मृण्मयीचे बाबा नौकानयन करायला जात. नौकायनयन म्हणजे नौका वल्हवणं. ती सातवीत असताना एकदा तिच्या बाबांनी सहज तिला नाशिकमधील वॉटर्स एज बोट क्लबमध्ये नौकानयन कसं करतात ते पाहायला नेलं. नंतर रोज सकाळी ती त्यांच्याबरोबर तिथे जायला लागली. तिच्या भविष्यातल्या सुवर्णपदकांची बीजं इथेच रोवली गेली.

नौकानयन हा क्रीडाप्रकार आव्हानात्मक असतो. हा खेळ फक्त हातांचा किंवा पायांचा नसतो, तर त्यात संपूर्ण शरीराचा वापर होतो. त्यासाठी फिटनेस, चांगला आहार आवश्यक असतो.

मृण्मयीने दहावीपर्यंत स्पर्धांच्या दृष्टीने त्याच बोट क्लबमध्ये सराव केला. लवकरच प्रगती करत करत तिने काही राज्यस्तरीय स्पर्धा जिंकल्या. ती दहावीत असताना हैदराबादमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पूर्वतयारी म्हणून असलेल्या नौकानयन प्रशिक्षण शिबिरासाठी तिची निवड झाली. त्यामुळे तिला दहावीच्या पूर्वपरीक्षेचे दोन पेपर देता आले नाहीत.

हैदराबादच्या शिबिराला महाराष्ट्रातून तिची एकटीचीच निवड झाली होती. तिथे वेगवेगळ्या राज्यांतून आलेल्यांचे कंपू होते. ते सर्व आपापल्या भाषेत बोलत. तसंच त्यांची संस्कृती, भाषा वेगळी असल्याने तिला एकटं पडल्यासारखं वाटायचं. पण हताश न होता तिने त्यांच्याशी ओळखी करून घेतल्या. त्याचा पुढे चांगला उपयोग झाला. देशभरातल्या खेळाडू तिच्या चांगल्या मैत्रिणी झाल्या.

mrunmayee salgaonkar

मृण्मयीची उंची आणि बॉडी स्ट्रक्चर चांगलं असल्यानेच प्रशिक्षकांनी तिची आशियाई स्पर्धेसाठी निवड केली. (दोन हात समांतर रेषेत ठेवल्यावर शरीराशी व उंचीशी त्याचं माप जुळणं, म्हणजे बॉडी स्ट्रक्चर.) नौकानयनात हात-पाय-मान-पाठ या सगळ्याचाच वापर होतो. आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी तर पूर्णपणे तंदुरुस्त असावं लागतं. शिबिरात ती नौकानयनातले बरेच बारकावे शिकली. वेट लिफ्टिंग न केल्याने किंवा जिममध्येही कधी न गेल्यामुळे स्नायूंच्या बळकटीसाठी उपयुक्त असलेल्या अर्गोमीटरबद्दल तिला माहीत नव्हतं. ते तिला इथे करायला मिळालं. नाशिकला चार किलोमीटर रोईंग केलं तरी खूप वाटायचं. पण शिबिरात मात्र पंधरा किलोमीटर हे लक्ष्य असायचं. शिवाय सकाळी, दुपारी ११ वाजता आणि नंतर ४ वाजता रोईंगसाठीचा सराव व्हायचा.

राष्ट्रीय रोईंग स्पर्धाच्या निमित्ताने ती केरळ, तामीळनाडू, कर्नाटक, ओडिसा, मध्य प्रदेश, तेलंगणा अशा राज्यांमध्ये फिरली.

२०१८ मध्ये आशियाई नौकानयनाच्या डबल्सच्या स्पर्धेसाठी ती पहिल्यांदा परदेशी, दक्षिण कोरियाला गेली. तिला मांसाहाराची आधीपासूनच सवय असल्याने तिथे जेवणाखाण्याचा काही प्रश्न आला नाही. स्पर्धा असलेल्या दुमजू गावात राहायची उत्तम व्यवस्था होती; सफरचंदाच्या बागा, निसर्गसौंदर्य होतंच; पण तिथे पहिल्यांदा दोनशे-तीनशे बोटी असलेला मोठा रेसकोर्स तिने पाहिला. तिथे सगळे तिला 'टीम इंडिया' म्हणून ओळखत होते, तेव्हा तिला जबाबदारीची जाणीव झाली. ‘आपल्या देशाचं ओळखपत्र माझ्याकडं होतं, छान वाटत होतं’, असं ती सांगते.

नौकानयन करिअर म्हणून निवडल्यावर अल्पावधीतच मृण्मयीला खूप बक्षिसं मिळाली. तिला वयाच्या १५ व्या वर्षी राज्यस्तरीय स्पर्धेत पहिलं रजतपदक मिळालं. हैदराबादमधल्या राष्ट्रीय शिबिरासाठी वाईल्ड कार्ड मिळाल्यानंतर तिथे ती दहा महिने राहिली. त्यानंतर तिला ज्युनिअर आशियाई रोईंग स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व करायला मिळालं. २०१८ मध्ये राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत तिला पदक मिळालं. जानेवारी २०१९ मध्ये तिला इंदूरला झालेल्या राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेत ३ सुवर्णपदकं, मिश्रमध्ये ४ पदके मिळाली. एप्रिल २०१९ मध्ये श्रीलंका, बांगलादेश आणि भारतात झालेल्या खासगी बोट क्लबच्या स्पर्धेत २ सुवर्णपदकं, तर मे २०१९ मध्ये बँकॉकमधल्या इनडोअर आशियाई स्पर्धेत दोन सुवर्ण, एक रजत पदक मिळालं. ऑगस्ट २०१९ मध्ये ज्यूनिअर वर्ल्ड चँपियनशिपसाठी थायलंडमधील पटायात झालेल्या आशियाई स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवलं.

mrunmayee salgaonkar

२०२० मध्ये जपानमधील तोक्यो इथे होणाऱ्या ऑलिंपिकमध्ये भाग घेण्यासाठी तिला भारत सरकारकडून 'खेलो इंडिया'ची शिष्यवृत्ती मिळाली. ओरिसामध्ये सराव चालू होता; पण कोविड १९ च्या प्रसारामुळे सगळंच थांबलं, तेव्हा नैराश्यातून ‘आता थांबूया’ असा निर्णय तिने घेतला. त्यानंतर ती लॉन टेनिसबरोबर कथ्थकही शिकायला लागली. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करतानाच वडिलांच्या व्यवसायात मदत करायला लागली. कोविड १९ ची दुसरी लाट, लॉकडाऊन संपल्यानंतरही तिची रोईंग स्पर्धेसाठी जाण्याची मानसिक तयारी नव्हती. २०२१ साल उजाडलं आणि ओरिसामधून कोच इंद्रपालसरांचा ‘डिसेंबरमधील आशियाई चँपियनशिपसाठी एक मुलगी कमी पडत असल्याने तू ये’ असा फोन आला. तेव्हा तिला परत ओरिसाला सहा महिन्यांच्या शिबिरासाठी जावंच लागलं. राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धेत सीनिअर वर्गात तिने कास्यपदक मिळवलं.

त्यानंतर तिने ओरिसा सोडलं. २०२२च्या फेब्रुवारी महिन्यात पुण्याला सीएमईमध्ये (कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग) सराव सुरू केला. इथे बॉईज्‌ टीम असून त्यात महाराष्ट्रातली, त्यातही ती एकटीच मुलगी आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये गुजरातला झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तिने कास्यपदक जिंकलं, मात्र ती स्वतःवरच चिडली आणि नंतर २०२३ मधील सीनिअर कॅटेगरीतील स्पर्धांमध्ये तिने दोन सुवर्णपदकं मिळवली.

दर चार वर्षांनी होणाऱ्या आशियाई गेम्समध्ये नौकानयनही असतं. यामध्ये चार, आठ खेळाडूंचे संघ भाग घेतात. त्याचबरोबर सिंगल परमफॉर्मन्सही असतो. चार-आठमध्ये खेळल्यावर सिंगल परफॉर्मन्स देताना अक्षरशः कस लागतो.

सप्टेंबर २०२४ मध्ये मृण्मयी प्रशिक्षणासाठी ऑस्ट्रेलियातील मेलबर्नला गेली, आई-बाबांच्या प्रोत्साहनामुळेच! जानेवारी २०२५ पर्यंत तिथेच राहायचं होतं. ती सांगते, ‘‘मी पूर्णपणे एकटी होते. तिथं आहार, व्यायाम आणि सराव या बाबी काटकोर पाळाव्या लागायच्या. स्वयंपाकापासून ते वेळापत्रक तयार करण्यापर्यंत सगळं एकटीनंच करायचं होतं. प्रशिक्षणादरम्यान पूर्ण मोकळीक होती. पहाटे साडेपाचला रोईंगसाठी जाऊन दुपारी साडेतीनपर्यंत घरी यायचे. त्यादरम्यान लागणारे डबे तयार करून न्यायचे. शेवटचे १५ दिवस तिथं मी ऑस्ट्रेलिया, आयर्लंड, इंग्लंडच्या मुलींबरोबर राहिले. तेव्हा त्यांचं जगणं-वागणं, सराव, संस्कृती सगळं जवळून पाहता आलं.’’

आता ती २०२६च्या एशियन गेम्सची तयारी करते आहे. कितीही निराश वाटलं, तरी खचून न जाता पुन्हा उठून उभं राहायचं असतं, वाऱ्याची दिशा आपल्याला अनुकूल नसली तरी ताकदीने तिला तोंड द्यायचं, हे ती तिच्या कृतीतून दाखवते.

ती म्हणते, "आधी घरची गाडी किंवा रेल्वेच्या एसी कोचशिवाय प्रवास करत नव्हते, पण या क्षेत्रात आल्यावर प्रसंगी रेल्वेच्या स्वच्छतागृहापाशी बसूनही प्रवास केला. एस्टीच्या गर्दीतून प्रवास केला. कसं वागायचं, बोलायचं, निर्णय घ्यायचा, हे शिकले. माझ्याच शाळेतल्या मुलांनी माझी मुलाखत घेतली तेव्हा खूप मजा आली. मी तिथेही सांगितलं, मुलींनी स्वतःच्या तंदुरुस्तीकडे लक्ष दिलं पाहिजे. चार गुंड आले, तर त्यांना प्रतिकार करायला सेल्फ डिफेन्स शिकला पाहिजे.

नैराश्यातून स्वतःला बाहेर काढत नव्या उर्मीने खेळून मेडल्स जिंकणं हा सोपा प्रवास नव्हता. या प्रवासातच निळ्याशार नितळ जलायशातल्या पाण्याचा शांतपणा अनुभवला. नौका वल्हवताना माझ्यातली मी मला सापडले. शाळा, आई-बाबांमुळं मी घडले.’’ 

शिल्पा दातार | 7020659314 | mrs.shilpapankaj@gmail.com

शिल्पा दातार या मुक्त पत्रकार आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 4

Archana Patil03.01.26
Congratulations Mrunmayee on your endless Rowing Medals! Your determination, dedication and strength that you have put into your sport is incredible and a testament of your success. May 2026 bring you more medals and glory to our nation!

Umesh Rege 03.01.26
Very nice biography. It will be inspiring for many young boys/girls.

पुर्णिमा सुभाष मंत्री 02.01.26
थोडक्यात, पण सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मृणमइच खूप कौतुक व अभिनंदन.

अनुपमा नेरूरकर 02.01.26
मी तिची आत्या असल्याने हा तिचा खडतर प्रवास जवळून अनुभवला. तिच्या अफाट जिद्दीला सलाम. तिच्याबरोबरच तिच्या आईबाबांचा आम्हाला खूपच अभिमान आहे. छान लिहिलय.

See More
gangotree homes advertisement

Select search criteria first for better results