
एशियाड, ऑलिंपिक्समधल्या सर्वात लोकप्रिय क्रीडाप्रकारांपैकी एक म्हणजे ‘ट्रॅक ॲन्ड फील्ड’ स्पर्धा. याचा शब्दशः अर्थ- धावण्याच्या, उड्या मारण्याच्या, वस्तू फेकण्याच्या स्पर्धा. उड्या मारण्याच्या स्पर्धांमधली एक स्पर्धा असते तिहेरी उडीची (ट्रिपल जंप). यातले इतर तीन प्रकार जास्त लोकप्रिय आहेत- उंच उडी, लांब उडी आणि पोल व्हॉल्ट. पोल व्हॉल्ट तर फारच वलयांकित. त्यामानाने तिहेरी उडी स्पर्धेला कमीच वलय असावं.
पण शेवटी ती सुद्धा एक स्पर्धा आहे, त्यातले खेळाडू जिवाची पराकाष्ठा करतातच. तिहेरी उडीतला असाच एक पराकाष्ठेने केलेला जागतिक विक्रम गेली ३० वर्षं अबाधित आहे. हा विक्रम आहे जोनाथन एडवर्ड्स या ब्रिटनच्या खेळाडूच्या नावावर.
जोनाथन एडवर्ड्स आजवरचा सर्वोत्कृष्ट triple jumper मानला जातो. त्याने ऑलिंपिक्स, जागतिक स्पर्धा, युरोपियन स्पर्धा, युरोपियन indoors स्पर्धा, कॉमनवेल्थ गेम्स, सगळीकडे तिहेरी उडीतली सुवर्णपदकं जिंकली आहेत.
त्याने तिहेरी उडीतला १८.२९ मीटरचा जागतिक विक्रम केला तो १९९५ साली, जागतिक स्पर्धांमध्ये (World Championships). त्यावर्षी जागतिक स्पर्धांच्या आधी युरोपियन स्पर्धा झाल्या. तिथे जोनाथनने तब्बल १८.४३ मीटर लांब तिहेरी उडी मारली. पण त्यावेळी त्याला वार्याची साथ लाभली होती. अशा वेळी रेकॉर्डबुक्समध्ये नोंदी केल्या जात नाहीत.
तिहेरी उडीच्या स्पर्धेत प्रत्येक खेळाडूला तीन संधी मिळतात. त्यापैकी सर्वोत्कृष्ट कामगिरी ग्राह्य मानली जाते. त्या जागतिक स्पर्धांमध्ये जोनाथनची पहिली उडी १८.१६ मीटरची होती. तिहेरी उडीत १८ मीटर अंतर पार करणारा तो इतिहासातला पहिला खेळाडू ठरला. हा विक्रम जेमतेम १५-२० मिनिटं टिकला. कारण दुसर्या प्रयत्नात जोनाथनने १८.२९ मी. अंतर पार केलं. आता तो तिहेरी उडीत ६० फूट अंतर पार करणारा पहिलावहिला खेळाडू ठरला होता.
तिहेरी उडी (किंवा लांब उडी) स्पर्धेत खेळाडू एका वाळूच्या खड्ड्यात उडी मारतात. या खड्ड्याच्या एका बाजूला अंतर दर्शवणारी मोजपट्टी लावलेली असते. जोनाथनच्या काळात त्या मोजपट्टीवर जास्तीत जास्त १८ मीटरपर्यंत खुणा केलेल्या असायच्या. थोडक्यात जोनाथनने त्या मोजपट्टीच्या पलीकडे जाणारी उडी मारली होती. हा विक्रम आजवर कुणी मोडू शकलेलं नाही.
जाताजाता: जोनाथनच्या नावावर आणखी एक आगळावेगळा विक्रम आहे. १९९६ सालच्या ॲटलांटा ऑलिंपिक्समध्ये जोनाथनच सुवर्णपदक जिंकणार असं मानलं जात होतं. त्याने १७.८८ मी. तिहेरी उडी मारली. मात्र त्याला रौप्यपदक मिळालं. ही ‘सुवर्णपदक जिंकू न शकलेली सर्वात लांब उडी’ ठरली.
प्रीति छत्रे | preeti.chhatre22@gmail.com
प्रीति छत्रे 'युनिक फीचर्स पोर्टल'च्या सहसंपादक आहेत. अनुभवपर ललितलेखन आणि अनुवाद यात त्यांना विशेष रस आहे.