आम्ही कोण?
ले 

पोल व्हॉल्टचा बादशहा - डुप्लांटिस

  • आ. श्री. केतकर
  • 02.07.25
  • वाचनवेळ 4 मि.
duplantis

एक काळ असा होता, की पोल व्हॉल्ट स्पर्धा म्हटलं, की सोविएत संघाच्या (आणि सोविएत संघाचं विघटन झाल्यानंतर युक्रेनच्या) सर्गेई बुबका याचं नाव आठवायचं. त्याला कारण तसंच होतं. ऑलिंपिकमध्ये त्याने एकच सुवर्णपदक मिळवलं असलं तरी वेळोवेळी त्याने एकूण ३५ जागतिक विक्रमांची (खुल्या स्टेडियममध्ये १७, तर आछादित स्टेडियममध्ये १८) नोंद केली होती. तसा तो युक्रेनचा, पण त्या काळी युक्रेन सोविएत युनियनमध्ये होता.

सहा मीटर उंची पार करणारा सर्गेई बुबका हा पहिलाच पोल व्हॉल्टपटू होता. नंतर काही वर्षांत ६.१० मीटर म्हणजे तब्बल २० फूट उंची पार करणारा त्या काळातील तो पहिलाच खेळाडू होता. त्याचा जागतिक विक्रम ६.१४ मीटर उंची पार करण्याचा होता. त्याने तो ३१ जुलै १९९४ रोजी इटलीमधील सेस्टिअर इथे नोंदवला होता. असं असलं तरी आच्छादित स्टेडियममधील त्याचा जागतिक विक्रम १ से.मी.ने जास्त, म्हणजे ६.१५ मीटर एवढा आहे. तो त्याने आधीच्या वर्षी २१ फेब्रुवारी १९९३ या दिवशी युक्रेनमधील डोनेत्स्क इथे नोंदवला होता.

सर्गेई म्हणायचा, की ‘‘पोल व्हॉल्टवर माझं प्रेम आहे. कारण तो प्राध्यापकांचा खेळ आहे. त्यात तुम्ही फक्त धावत नाही, फक्त पोलच्या (बांबू) साहाय्याने उडी मारत नाही. ही उडी मारण्यासाठी, आधी तुम्हाला विचार करणं भाग असतं. परिस्थितीनुसार कोणता पोल (पूर्वी बांबू आणि नंतरच्या काळात फायबर ग्लासचा) वापरायचा, कोणत्या उंचीवर उडी मारायची, त्यासाठी कोणतं धोरण ठरवायचं हे निश्चित करावं लागतं.’’

प्रत्येक स्पर्धेत तो त्याआधीच्या स्वतःच्याच जागतिक विक्रमापेक्षा केवळ एक सेमी.ने बारची उंची वाढवायला सांगायचा आणि विक्रम नोंदवायचा. असं बोललं जात असे, की त्यावेळी सोविएत युनियनची क्रीडायंत्रणा दर जागतिक विक्रमाला त्याला बोनस म्हणून रोख बक्षिस देत असे.

१९८८ च्या सेओल ऑलिंपिक्समध्ये त्याने त्याचं एकमेव सुवर्णपदक मिळवलं. पण त्यानंतरच्या १९९२च्या बार्सिलोना ऑलिंपिकमध्ये तीनवेळा फाऊल झाल्याने तो पदकाच्या शर्यतीतून बाहेर पडला.

पण केवळ एकच ऑलिंपिक सुवर्णपदक मिळवलं असलं, तरी त्याची महती कमी होत नाही. 'स्पोर्टस् इलस्ट्रेटेड'चे गॅरी स्मिथ यांनी म्हटलं होतं, की 'बुबका हा असा माणूस आहे, की ज्याने स्वतःच्या खेळाची धाटणीच बदलून टाकली. ज्या प्रकारे स्पर्धक तयारी करतात आणि ती प्रत्यक्षात उतरवतात, ती पद्धतच त्याने बदलून टाकली. इतकंच काय पण प्रेक्षकांची पोल व्हॉल्टकडे पाहण्याची दृष्टीही त्याने बदलून टाकली आहे.'

सर्गेई बुबकाची आठवण झाली, कारण नुकताच जूनमध्ये स्वीडनच्या अर्मांड (माँडो) डुप्लांटिस याने स्टॉकहोम इथे मायदेशातील प्रेक्षकांच्या साक्षीने पोल व्हॉल्टचा स्वतःचाच जागतिक विक्रम एक सेंटीमीटरने उंचावला आणि पोल व्हॉल्टमध्ये ६.२८ मीटरची उंची पार केली. ही डायमंड लीगमधील स्पर्धा होती. तिथे ऑस्ट्रेलियाच्या कर्टिस मार्शल याला प्रयत्नांची शिकस्त करूनही डुप्लांटिसशी स्पर्धा करणं शक्य झालं नाही.

डुप्लांटिसने आजवर १२ वेळा जागतिक विक्रम नोंदवण्याची कामगिरी केली आहे. त्यामुळे तो बुबकाचा खराखुरा वारसदार आहे असं म्हणायला हरकत नाही.

याआधी याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात डुप्लांटिसने ६.२७ मीटरची उंची पार करून जागतिक विक्रम केला होता. स्टॉकहोममधील डायमंड लीग स्पर्धा सुरू होण्याच्या आधीच त्याने ‘आपण जागतिक विक्रम नोंदण्याचा प्रयत्न नक्की करू,’ असं चाहत्यांना आश्वासन दिलं होतं. त्यामुळे त्यादिवशी स्टॉकहोमचं स्टेडियम गच्च भरलं होतं. प्रेक्षक आतुरतेने पोल व्हॉल्टची स्पर्धा कधी सुरू होते, याचीच वाट बघत होते.

...आणि स्पर्धा सुरू झाली. सुरुवातीला कर्टिस मार्शलने केवळ ५.१० मीटर उंची पार केली होती. त्यानंतर डुप्लांटिसचा क्रमांक आला. त्याचं नाव जाहीर झाल्यापासूनच प्रेक्षकांचा आवाज वाढला होता. डुप्लांटिससाठी बार ६.२८ मीटरवर ठेवला गेला. पहिल्याच प्रयत्नात त्याने ती उंची पार केली!

आपल्याच मायभूमीमध्ये जागतिक विक्रम नोंदल्याचा डुप्लांटिसचा आनंद काही वेगळाच होता. बार पार करून मॅटवर पडल्यानंतर त्याने लगेच प्रेक्षकांत बसलेल्या त्याच्या कुटुंबियांकडे धाव घेतली.

ही स्पर्धा सुरू होण्याआधी तो जमेकाच्या युसेन बोल्टला भेटला होता. युसेन बोल्टने १०० मीटर आणि २०० मीटर धावण्याच्या शर्यतीत दोन जागतिक विक्रम केले आहेत. ‘त्याच्याशी बोलल्यानंतर मला खूपच स्फुरण आल्यासारखं झालं,’ असं त्याने विक्रम नोंदवल्यानंतर सांगितलं.

डुप्लांटिस २५ वर्षांचा आहे. त्याने दोन वेळा ऑलिंपिक सुवर्णपदक मिळवलं आहे. ‘स्टॉकहोमचं स्टेडियम मला ऑलिंपिक्ससारखंच वाटतं आणि डायमंड लीग स्पर्धादेखील त्याच दर्जाची वाटते,’ असं त्याने सांगितलं. ‘घरच्या मैदानावरचा हा विक्रम मी प्रथम जागतिक विक्रम नोंदवला होता तेव्हासारखाच वाटला,’ असंही तो म्हणाला.

यापुढे त्याची वाटचाल कशी होते याकडे जगभरच्या सर्व क्रीडाप्रेमींचं लक्ष असेल.

आ. श्री. केतकर | aashriketkar@gmail.com

आ. श्री. केतकर हे ज्येष्ठ पत्रकार असून ते प्रामुख्याने क्रीडा आणि सामाजिक विषयांवर लिखाण करतात.







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results