आम्ही कोण?
लेखमालिका : पुढच्या हाका

गूगल मॅप्समध्ये पुढे काय काय येईल?

  • मेघश्री दळवी
  • 26.09.25
  • वाचनवेळ 3 मि.
google maps

शहरी भागांमध्ये आजकाल बरेच जण प्रवासात गूगल मॅप्स वापरतात. वेगवेगळे मार्ग, त्यांना लागणारा वेळ, ट्रॅफिक अपडेट्स, जवळची रेस्टोरंट्स, पेट्रोल पंप, प्रेक्षणीय स्थळं, दुकानं सगळी माहिती हे मॅप्स आपल्यापुढे चुटकीसरशी हजर करतात.

गूगल मॅप्स २००५ मध्ये सुरू झाले तेव्हा त्याबाबत बऱ्याच शंका होत्या. या माहितीचा गैरवापर होईल अशी भीती होती. मात्र हळूहळू या शंका निवळत गेल्या. जगभरातले प्रदेश हवे तसे पाहण्याची संधी मिळाली. प्रवासाची आखणी सोपी झाली. ट्रॅफिकमधले अडथळे आधीच पाहून पर्यायी रस्त्याचा नीट विचार करणं शक्य झालं. आज महिन्याला एक अब्ज लोक गूगल मॅप्स वापरतात. आपणहून त्याच्यात भर घालतात. गूगल मॅप गाइड म्हणून हौसेने काम करतात. आपल्या परिसराची माहिती योग्य प्रकारे येते का पाहून ती नियमितपणे अपडेट करतात.

गूगल मॅप्सकडे प्रचंड प्रमाणात डेटा येत असतो. त्यापैकी जुन्या इमारतींच्या जागी नव्या इमारती आल्या, रस्त्यांची नावं बदलली, की तेवढा डेटा बदलतो. ट्रॅफिकसारखा डेटा मात्र सतत अपडेट होतो. कुठे पूल तुटला आहे का, मार्ग बदलला आहे का, अशी माहिती तात्काळ पुरवणं गरजेचं असल्याने त्या डेटावर लगेच प्रक्रिया होते. बाकीच्या डेटावर आवश्यकतेप्रमाणे प्रक्रिया होते. यासाठी गूगल अद्ययावत यंत्रणा वापरतं.

गेली कित्येक वर्षं आपली सोबत करणारे गूगल मॅप्स पुढे आणखी काय काय करणार आहेत हे पाहणं रंजक आहे. मॅपवर कार, बस, ट्रेन्स, मेट्रो यांच्या जोडीने उपलब्ध असतील तिथे सायकलींसाठीचे मार्ग दिसायला लागले आहेत. पूर, भूकंप, वणवे अशांसारख्या नैसर्गिक आपत्तीत मॅप्स कामी येतात हे लक्षात घेऊन तुरळक प्रमाणात या सोयी पुरवायला सुरुवात झालेली आहे. मार्च २०२३ मध्ये पाकिस्तान-अफगाणिस्तान-उत्तर भारत इथे झालेल्या भूकंपाचा इशारा मोजक्या लोकांना मिळालेला होता. काही ठिकाणी हवेची गुणवत्ता कशी आहे, कोणता मार्ग जास्त पर्यावरणस्नेही आहे, ही माहितीदेखील आता मिळते.

आजच्या घडीला ऑग्मेंटेड रिॲलिटी तंत्रज्ञानात प्रचंड वेगाने विकास होतो आहे. वास्तवात जे दिसतं, त्यात भर घालून हे तंत्रज्ञान अनोखा अनुभव देतं. हे तंत्रज्ञान मॅपमध्ये आल्यावर एखाद्या ठिकाणचं थ्रीडी रूप आणि आत जाऊन प्रत्यक्ष पाहिल्यासारखा अनुभव मिळेल. म्युझियमसारख्या स्थळांसाठी अशी थोडीफार सोय आहे. उद्या ती ट्रेन स्टेशन, एअरपोर्ट, यासाठीही मिळू लागेल.

प्रवास सुरू असताना स्क्रीनकडे पहावं लागू नये म्हणून अमुक मीटर्सनंतर उजवीकडे वळायचं अशा श्राव्य सूचना मॅपवर आपल्याला मिळतात. याजागी समोरच्या दृश्यावरच सूचना उमटल्या तर? तसाही बदल ऑग्मेंटेड रिॲलिटीमुळे लवकरच येऊ घातला आहे. त्यामुळे रस्त्यावरून नजर न हटवता नक्की कुठे वळायचं, कुठे थांबायचं, हे सहज लक्षात येईल. प्रवास करत असताना आपण एखाद्या रेस्टोरंटजवळ आलो तर तिथली सर्व माहिती डोळ्यासमोर उलगडेल. वाटेत एखादं मल्टीप्लेक्स लागलं तर त्यात कोणते चित्रपट लागले आहेत हे त्यांच्या रेटिंगसह दिसेल. फक्त त्यासाठीचे खास गॉगल्स घालावे लागतील.

मॅपमध्ये येणारं दुसरं असंच वैशिष्ट्‌‍यपूर्ण तंत्रज्ञान म्हणजे जागोजागी लावलेल्या संवेदकांकडून (सेन्सर्सकडून) आलेला विविध प्रकारचा डेटा. त्या डेटावरून हवेची गुणवत्ता, प्रदूषण, तिथली पार्किंगची क्षमता, त्यातल्या किती जागा उपलब्ध आहेत, प्रेक्षणीय स्थळी गर्दी किती आहे, अशी माहिती मॅप्सवर येईल. सेल्फ-ड्रायव्हिंग गाड्यांची संख्या हळूहळू वाढत जाणार आहे. या गाड्यांमध्येही अनेक प्रकारचे संवेदक असतात. त्यांच्याकडूनही गूगल मॅप्सला डेटा मिळत राहील. एवढ्या प्रमाणातल्या डेटाचं वेगाने विश्लेषण करायचं म्हणून कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाची मदत घेतली जाईल.

येत्या काही वर्षांमध्ये गूगल मॅप्सशिवाय पर्यायच राहणार नाही, इतकी त्याची सवय झालेली असेल.

मेघश्री दळवी

मेघश्री दळवी विज्ञानकथा आणि विज्ञानलेख लिहितात. त्या आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results