सगळीकडे एआयची धूम दिसत असली तरी आणखी एका क्षेत्रात तितक्याच वेगाने विस्तार होतो आहे, आणि ते क्षेत्र आहे ह्युमनॉइड रोबॉट्सचं. ह्युमनॉइड म्हणजे माणसासारखा दिसणारा आणि बहुतांश माणसासारखी हालचाल करणारा रोबॉट. त्याला एआयची साथ असेल तर त्याचा प्रतिसाद साधारणपणे माणसासारखा असतो.
रोबॉटचा वापर आपल्याला नवा नसला तरी ह्युमनॉइड रोबॉटचा विकास गेल्या काही वर्षांमधला आहे. ‘बॉस्टन डायनामिक्स' ही कंपनी रोबॉट्सना माणसाच्या किती जवळ नेता येईल यावर सतत प्रयोग करत असते. त्या कंपनीचे ह्युमनॉइड्स माणसांसारख्या काही कृती करू शकतात- दरवाज्याचं हँडल उघडून बाहेर जाणं, कोलांट्या उड्या मारणं, गोडाऊनमधले बॉक्सेस सराईतपणे हलवणं, वगैरे. ते मजेदार डान्सदेखील करू शकतात. यूट्युब, ट्विटरवरचे त्यांचे व्हिडिओ व्हायरल झाले तेव्हा ह्युमनॉइड्सची ओळख सगळीकडे वेगाने पसरली. त्यात भर पडली ती ‘सोफिया'ची. सोफिया हीसुद्धा एक ह्युमनॉइडच आहे. हॅन्सन रोबोटिक्स या कंपनीने २०१६ मध्ये गाजावाजा करत या ह्युमनॉइडला सर्वांसमोर पेश केलं. विचारलेल्या प्रश्नांना नीट, चहुबाजूंनी समजून घेऊन उत्तर देणारी ही पहिली ह्युमनॉइड. त्यातून सौदी अरेबियाने तिला आपल्या देशाचं नागरिकत्व देऊन आणखी धमाका केला.
उद्या ह्युमनॉइड्सच्या सोबतीत आपलं आयुष्य कसं असणार आहे?
न कंटाळता, न थकता, बिनचूक आणि वेगाने काम करणं हे रोबॉट्सचे मुख्य गुण. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रात रोबॉट्स कित्येक वर्षं आहेत. जोखमीच्या किंवा धोकादायक कामात त्यांना वापरता येतं, हा आणखी एक फायदा. ह्युमनॉइड्सच्या बाबतीतही हे गुण महत्त्वाचे ठरतात. त्याच्या जोडीने ते माणसांसारखे दिसत असल्याने आपल्याला त्यांच्याशी संवाद साधताना एक प्रकारचा मोकळेपणा वाटतो. त्यामुळे जिथे जिथे माणसांना मदत करायची असेल तिथे तिथे, म्हणजे हॉटेल्स, बँकिंग आणि इतर सेवा क्षेत्रांत ह्युमनॉइड्सचा शिरकाव लगेच झाला.
वैद्यकीय क्षेत्रात ह्युमनॉइड्स सोयीचे ठरतील हे दिसत होतंच. करोना महासाथीने त्याला पुष्टी दिली. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत होती, तर दुसरीकडे वैद्यकीय स्टाफला संसर्गाचा धोका होता. त्यामुळे ह्युमनॉइड्सकडे लगोलग कामं सोपवायला सुरुवात झाली. सुरुवातीच्या चाचण्या करणं, विलग केलेल्या रुग्णाची देखभाल करणं, औषधोपचार, खोली निर्जंतुक करणं अशा अनेक प्रकारच्या जबाबदाऱ्या या ह्युमनॉइड्सनी उत्तमरीत्या पार पाडल्या. येत्या काळात वैद्यकीय क्षेत्रामध्ये ह्युमनॉइड्सची खूप मोठी मदत होणार आहे. ठराविक कामांच्या पलीकडे जाऊन ते रुग्णांना आधार देतील, गप्पा मारतील, त्यांच्याकडून व्यायाम करून घेतील. एका हरहुन्नरी मदतनिसाची भूमिका निभावतील. असेच मदतनीस घरातील वृद्ध किंवा आजारी व्यक्तींना सोबत करतील. पालक कामासाठी बाहेर गेलेले असताना मुलांची देखभाल करतील, त्यांचा अभ्यास घेतील, त्यांच्याबरोबर खेळतील. ह्युमनॉइड दाई चीन, जपान आणि अनेक पाश्चात्त्य देशांमध्ये दिसायला लागल्या आहेत; उद्या आपल्याकडेही येऊ शकतात.
माणसांसाठी धोकादायक असणाऱ्या कामांत ह्युमनॉइड्सना खूप संधी आहे. पूर, भूकंप, दरड कोसळणं अशा नैसर्गिक आपत्ती असोत की आग किंवा अपघात, कोणत्याही परिस्थितीला ते तोंड देऊ शकतील. अमेरिकन नेव्हीने जहाजावर अग्निशामक ह्युमनॉइड वापरायचं ठरवलं आहे. ते दरवाजे उघडून किंवा तोडून माणसांना बाहेर काढतील, पाण्याचे फवारे मारून आग विझवतील. आणि हे सर्व भर समुद्रात हेलकावे खाणाऱ्या जहाजावर आपला तोल सांभाळत करतील. एकूणच, संरक्षण दलात ह्युमनॉइड्सना खूप मोठं स्थान असेल. त्यांच्या अफाट शारीरिक क्षमतेला एआय, ऑग्मेंटेड रिॲलिटी अशा तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यावर ते शत्रूला सहजी नामोहरम करू शकतील.
चॅटजीपीटीची निर्माती ‘ओपन एआय' ही कंपनी ह्युमनॉइडनिर्मितीत उतरली आहे. त्यांचे ह्युमनॉइड्स उत्तम संवाद साधणारे असतील. त्यामुळे येत्या काळात माणसासारखे चालणारे-बोलणारे रोबॉट्स पदोपदी आपल्याला साथ देत असतील- घरात, ऑफिसमध्ये, शाळेत, खेळात, हॉस्पिटलमध्ये, शेतकामात, संशोधनात; इतकंच काय, तर अवकाशातही!
सोफियाला मिळाले तसे नागरिकत्व इत्यादी अधिकार ह्युमनॉइड्सना मिळतील का, कामाच्या जागी त्यांना कशा सुविधा असतील, उद्या त्यांच्या हातून एखादा गुन्हा घडला तर तिथे न्यायव्यवस्थेची भूमिका काय असेल, त्यांना राजकरणात भाग घेता येईल का, त्यांना भावनांचा अर्थ समजू शकेल का, असे शेकडो प्रश्न येत्या काळात आपली परीक्षा घेणार आहेत.
मेघश्री दळवी
मेघश्री दळवी विज्ञानकथा आणि विज्ञानलेख लिहितात. त्या आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत.
