
घरबसल्या ॲप्सवरून झटपट किरकोळ खरेदी करण्याचं प्रमाण वाढलं आहे. मनात आलं की एका वस्तूसाठीही लोक ॲपवर जातात आणि ऑर्डर करतात. यातली अनेक ॲप्स किराणा-भाजीपाला काही मिनिटांत पोहोचवण्याचं आश्वासन देतात. पुण्या-मुंबईसारख्या शहरांत एवढ्या कमी वेळात डिलिव्हरी करणारे हिरोच म्हटले पाहिजेत. या डिलिव्हरी हिरोंना कामासाठी किती झटापट करावी लागते? या ॲप्सचा त्यांना फायदा किती झालाय आणि त्रास किती?
ठिकाण : पुण्यातला रहदारीचा रस्ता. वीसेक वर्षांचा मुलगा मिनरल पाण्याचे दहा-दहा लिटरचे दोन कॅन स्वतःच्या दुचाकीवर तोलून धरण्याची धडपड करत होता. दुचाकी गियरची असल्यामुळे त्याने कॅन्स दोन्ही बाजूच्या हॅण्डलला अडकवून पाहिले. पण उजव्या बाजूला कॅन अडकवल्यामुळे ॲक्सेलेटर देता येईना. मग कॅन पेट्रोलच्या टाकीवर आडवा ठेवून हळूहळू बॅलन्स करत तो मुलगा निघून गेला.
ग्रोसरी डिलिव्हरी करणाऱ्या डिलिव्हरी पार्टनर्सना काय काय कसरत करावी लागते याचं हे एक उदाहरण. ग्रोसरी पोचवणाऱ्या झेप्टो ॲपचा हा डिलिव्हरी बॉय होता. कोणीतरी या ॲपवरून पाण्याच्या बाटल्यांची ऑर्डर दिली होती. त्या मुलाला काही मिनिटांत ती ऑर्डर पोहोचवणं भाग होतं.
डन्झो, ब्लिंकिट, झेप्टो, बिगबास्केट, स्विगी इंस्टामार्ट यांसारख्या ॲप्ससाठी काम करणाऱ्या डिलिव्हरी पार्टनर्सना अशाच नाना प्रकारच्या वस्तू डिलिव्हर कराव्या लागतात. १०० ग्रॅम मिरच्या, अर्धा लिटर दूध, अंडी, चिकन, बिस्किटाचा पुडा, सिगारेट, काँडोम, सॅनिटरी नॅपकिन्सपासून ते महिन्याभराचा किराणा, मिनरल पाण्याचे दहा लिटरचे कॅन्स अशा कुठल्याही गोष्टी घरबसल्या मागवल्या जातात. बहुतेक सगळी ॲप्स काही मिनिटांत वस्तू पोहोचवण्याचं आश्वासन देतात. त्यामुळे तहान लागली की विहीर खणणारी माणसं आपसूक या ॲप्सकडे वळतात. पण एक खरंच की या ॲप्समुळे अनेकांना रोजगार मिळाला आहे. या लेखासाठी आपला फोकस तोच आहे. या डिलिव्हरी पार्टनर्सच्या कामाचं स्वरूप काय असतं, त्यांना पैसे किती मिळतात, रोज २५-२५ डिलिव्हरी पोहोचवण्याचा त्यांना काय त्रास होतो, या कामात ही मंडळी समाधानी आहेत का, हे समजून घेण्यासाठी त्यांना भेटलो.
२७ वर्षांचा गणेश गेल्या काही महिन्यांपासून झेप्टो ॲपसाठी डिलिव्हरीचं काम करतो. तो या ॲपची यंत्रणा समजावून सांगतो “एका ठराविक भागासाठी प्रत्येक ॲपचं एक स्टोअर असतं. आम्हाला साधारण पाच-सहा किलोमीटरचा परिसर दिलेला असतो. त्याच्या आतलीच ऑर्डर आम्हाला पडते. ३.५ किलोमीटरच्या आतली ऑर्डर असेल तर त्याचे ३५ रुपये मिळतात. त्यानंतरच्या प्रत्येक एक किलोमीटरमागे १० रुपये जास्त मिळतात. दिवसभरात मी साधारण २५ ते ३० डिलिव्हरी करतो. रोजचं १२० ते १५० किलोमीटर फिरणं होतं. त्याचे आठवड्याला पाचेक हजार रुपये मिळतात.”
झेप्टो ‘ग्रोसरी इन टेन मिनिट्स' अशी जाहिरात करतं. तुम्ही खरंच दहा मिनिटांत पोहोचता का? नाही पोचलात तर कंपनी दंड लावते? असं विचारल्यावर गणेश सांगतो, “कंपनी ३.५ किलोमीटरच्या आतलीच ऑर्डर दहा मिनिटांत पोचवली जाईल, असं स्पष्ट करते. तसंच ही दहा मिनिटं ऑर्डर पिक अप केल्यानंतर सुरू होतात. एकाच भागात काम करत असल्यामुळे शक्यतो दहा मिनिटांत पोचतोच. पण अंतर ४-५ किलोमीटर असेल तर १५-२० मिनिटं लागतील, असं कंपनीने कस्टमरला सांगितलेलं असतं. त्यातही ट्रॅफिक असेल तर आणखी उशीर होईल, याची कल्पनाही दिली जाते. अनेकदा लोकेशनला वेळेत पोचूनही घर न सापडल्याने उशीर लागतो. अनेकदा स्टोअरमधून फोन येतो; का उशीर झाला म्हणून. पण दंड वगैरे लागत नाही. जास्त उशीर झाला तरच कस्टमरचा फोन येतो. पण तसं क्वचितच घडतं. दिवसभरातल्या २५-३० ऑर्डरपैकी एखाददुसरी ऑर्डर द्यायला उशीर होतो.”
ग्रोसरी देणारे सगळेच ॲप्स झटपट डिलिव्हरीचं आश्वासन देत असले तरी उशीर झाल्याचा भुर्दंड आम्हाला भरावा लागत नाही, असं सगळ्याच ॲप्सचे डिलिव्हरी पार्टनर सांगतात.
पण ऑर्डर १०-१५ मिनिटांत पोहोचवायची म्हटल्यावर थोडीतरी घाई करावी लागत असेलच, असा प्रश्न मी पुन्हा विचारला. त्यावर गणेशशेजारी बसलेल्या अजयचं म्हणणं होतं, “आम्ही घाई करतो, पण त्याचं कारण वेगळं आहे. ऑर्डर देऊन परत स्टोअरजवळ आल्याशिवाय पुढची ऑर्डर पडत नाही. जो आधी येईल त्याला आधी ऑर्डर मिळते. त्यामुळे आम्ही घाई करतो. दिवसभरात जास्तीत जास्त ऑर्डर करण्याचा आमचा प्रयत्न असतो. आठवड्याभरात २०० ऑर्डर्स केल्यानंतर २५०० रुपये इन्सेन्टिव्ह मिळतो. ते टार्गेट डोक्यात असतं.”
पूर्वी स्विगी-झोमॅटो किंवा ॲमेझॉन-फ्लिपकार्टमध्ये काम करणारे अनेक तरुण इथे भेटले. ते काम सोडून इकडे का आलात, असं विचारल्यावर आकाश सांगतो, “इकडे पैसे तेवढेच मिळतात. पण स्विगीसाठी काम करताना पुण्याच्या कोणत्याही कोपऱ्यात ऑर्डर पडायची. वेड्यासारखं आडवं-तिडवं फिरायला लागायचं. इथे पाच-सहा किलोमीटरचाच एरिया आहे.”
आकाशकडूनच ग्रोसरी डिलिव्हरीतला आणखी एक फायदा कळला. “फूड डिलिव्हरी करताना आम्हाला ना दोन मिनिटं बसण्यासाठी ठिकाण असायचं, ना डबा खाण्यासाठी. इथे स्टोअरला बसायला जागा आहे. बाथरूमची सोय आहे. शिवाय स्टोअरला रोज तीच माणसं येत असल्यामुळे ओळखी होतात. मैत्री होते. हसतखेळत काम चालतं.”
पूर्वी ॲमेझॉनसाठी काम केलेला राहुल म्हणतो, “माझ्या पायाची सर्जरी झाली. डॉक्टरांनी वजनदार वस्तू उचलायला मनाई केली. तिथे काम करताना सतत ४०-५० किलोचं ओझं उचलावं लागायचं. म्हणून ते काम सोडून झेप्टोमध्ये आलो.”
अर्थात ग्रोसरी डिलिव्हरीमध्येही कधीकधी वजन उचलण्याची वेळ येतेच. काही कस्टमर किरकोळ एक-दोन वस्तू मागवतात, तर काहीजण गहू, तांदूळ, पीठ, पाचपाच किलो कांदे-बटाटे असं आठवड्या-महिन्याचं सामान भरून घेतात. डन्झोसाठी डिलिव्हरी करणारा अतुल सांगतो, “माझ्याकडे गियरची गाडी आहे. कधीकधी १५-२० किलोची ऑर्डर पडते. आम्हाला कंपनीने बॅग दिलेली असते, पण त्यात सगळं सामान बसतंच असं नाही. दहा लिटरचे पाण्याचे कॅन बॅगेत कसे बसणार? अशी ऑर्डर पडली तर मित्रांपैकी कोणाची तरी नॉनगियरची गाडी ॲड्जस्ट करावी लागते.”
पण पेट्रोलच्या दृष्टीने किफायतशीर असल्यामुळे बहुतेक जण गियरच्या दुचाकीच वापरतात. एकाने अनुभव सांगितला, “एकदा १० लिटरच्या पाण्याच्या तीन कॅनची ऑर्डर पडली. गियरची गाडी असल्यामुळे एकट्याला नेणं शक्य नव्हतं. म्हणून मी स्टोअरमध्ये पॅकिंग करणाऱ्या माणसाला सोबत नेलं. अशी वेळ येते तेव्हा मॅनेजर आमच्यासोबत पॅकिंग करणारा माणूस पाठवून मदत करतात.” पण प्रत्येक ठिकाणी असं होतंच असं नाही. एका डिलिव्हरी पार्टनरचा अनुभव वेगळा आहे. “माझ्याकडे गियरची गाडी आहे. कधी कधी त्यावरून घेऊन जाणं शक्य नसलेली ऑर्डर येते. ती बॅगेतही बसत नाही. स्टोअरला लोड असल्यामुळे पॅकरसोबत येत नाहीत. मग मी स्टोअरमध्ये सांगून ऑर्डर बदलून घेतो. ती ऑर्डर दुसऱ्याला दिली जाते. पण मला पुढची ऑर्डर मिळण्यासाठी वाट बघत बसून राहावं लागतं.”
अनेकांनी पेट्रोलचा खर्च वाचवण्यासाठी एक युक्ती शोधून काढली आहे. एका स्टोअरबाहेरचा हा प्रसंग बघा. एक डिलिव्हरी पार्टनर म्हणतो, “ए भाऊ, कुठली ऑर्डर पडली?” दुसरा म्हणतो, “कर्वे नगरची”. पहिला म्हणतो, “मलापण तिथलीच पडलीय. चल एकत्र जाऊ.” असं म्हणत दोघे एकत्र निघून जातात. एक पार्टनर सांगतो, “अनेक महिने काम करून ओळखीपाळखी झालेल्या आहेत. मित्र झालेले आहेत. अनेकदा जवळपासच्या ऑर्डर पडतात. डिस्टन्स दोनपाचशे मीटर असलं तर कशाला दोन गाड्या घेऊन पैसे वाया घालवायचे? त्यामुळे दोघे मित्र एकाच गाडीवर ऑर्डर देऊन येतो. एकदा माझी गाडी, एकदा मित्राची. त्यामुळे एका ट्रिपच्या पेट्रोलचा खर्च वाचतो. रोज दोन-चारदा तरी असं करतोच.”
झेप्टो, बिगबास्केट, ब्लिंकिट या कंपन्या फक्त ग्रोसरी पोचवण्याचं काम करतात. तर डन्झो ही कंपनी पिक अप ॲण्ड ड्रॉप सर्व्हिसही देते. पिक अप ॲण्ड ड्रॉप म्हणजे एका ठिकाणाहून वस्तू घेऊन दुसऱ्या ठिकाणी पोहोचवणे. त्याबद्दल एक रायडर सांगतो, “आम्हाला १२ ते १३ किलोमीटरचा एरिया असतो. ग्रोसरीच्या ऑर्डर असतात. पिक अप ॲण्ड ड्रॉपच्याही ऑर्डर असतात. दोन्ही प्रकारच्या ऑर्डरला पहिल्या तीन किलोमीटरसाठी २२ रुपये मिळतात. पण पिक अप ॲण्ड ड्रॉपची ऑर्डर असेल तर पिकपचे पैसे मिळत नाहीत. समजा, तीन किलोमीटरवरच्या एका घरातून सामान घेऊन ते पुढे चार किलोमीटवर असलेल्या दुसऱ्या घरी पोचवायचं आहे. तर ते सामान पिक अप करायला जाण्याचे पैसे मिळत नाहीत. सामान घेतल्यानंतर ते पोचवण्यासाठीचे पैसे मिळतात. म्हणून आम्हाला ग्रोसरीचीच ऑर्डर परवडते. पण फक्त ग्रोसरीच्या ऑर्डर्स स्वीकारण्याची सोय नाही. पिक अप ॲण्ड ड्रॉपची ऑर्डर ॲक्सेप्ट केली नाही तर ५० रुपये फाईन लावतात. दिवसभरात पिक अप ॲण्ड ड्रॉपच्या तीन-चार ऑर्डर कराव्या लागतात.”
पिक ॲण्ड ड्रॉपची ऑर्डर का परवडत नाही याचं एक उदाहरण पहा. ३४ वर्षांचे सुभाष सांगतात, “मला साडेचार किलोमीटर अंतरावर पिक अप ॲण्ड ड्रॉपची ऑर्डर पडली. ड्रॉप तिथून पुढे पाच किलोमीटर अंतरावर होता. म्हणजे एकूण साडेनऊ किलोमीटरचा प्रवास. ड्रॉप केल्याच्या ठिकाणाहून पुन्हा पिक अप ॲण्ड ड्रॉपची ऑर्डर पडेल की नाही सांगता येत नाही. म्हणून आम्ही पुन्हा स्टोअरला येतो. तसं त्यादिवशीही आलो. म्हणजे एकूण १८ ते १९ किलोमीटरचा प्रवास झाला. त्याचे मिळाले फक्त ६२ रुपये. काय परवडणार ही ऑर्डर? पण दंड असल्यामुळे कॅन्सलही करता येत नाही.”
स्विगीची पद्धत थोडी वेगळी आहे. स्विगीसाठी काम करणारा डिलिव्हरी बॉय सांगतो, “फूड डिलिव्हरी करणाऱ्यांचे आयडी वेगळे असतात. ग्रोसरीची डिलिव्हरी करणाऱ्यांचे आयडी वेगळे असतात; पण मोजकेच असतात. फूड डिलिव्हरीवाल्यांना अधूनमधून ग्रोसरीच्या ऑर्डर पडतात. पण ग्रोसरीवाल्यांना फूड ऑर्डर पडत नाहीत.”
अनेकजण स्विगी-झोमॅटो, ॲमेझॉन-फ्लिपकार्टपेक्षा ग्रोसरी पोचवण्याच्या कामाला पसंती देत असले तरी या कामातही काही त्रुटी आहेत. झेप्टोचा डिलिव्हरी बॉय सांगतो. “कंपनीची पॉलिसी कस्टमर-फ्रेंडली आहे. त्यामुळे एखादी वस्तू कमी आली की कंपनी कस्टमरला रिफंड करते. नेमका याच गोष्टीचा फायदा अनेकजण घेतात. जास्त करून विद्यार्थी असतात. उदाहरणार्थ, मी एक सिगारेटचं पाकीट दिलं. कस्टमरने कम्प्लेंट टाकली पाकिटाचं सील फुटलेलं आहे म्हणून. त्यानंतर त्याला रिफंड मिळाला असेल. पण सिगारेटचं पाकीट व्यवस्थित दिलं तरी मला डॅमेज प्रॉडक्ट दिल्याची वॉर्निंग मिळाली. अशाच आणखी दोनदा वॉर्निंग मिळाल्या आणि माझा आयडी कायमचा बंद झाला. आता माझ्या मित्राच्या नावावर आयडी काढून काम करतोय” तो पुढे सांगतो, “पण कंपनीने आता एक अपडेट दिलंय. कस्टमरला ऑर्डर देतानाचा फोटो ॲपमध्ये अपलोड करता येतो. त्याशिवाय ऑर्डर डिलिव्हर होत नाही. या अपडेटमुळे फेक रिफंड मागण्याचं प्रमाण कमी झालंय.”
पण स्विगी इंस्टामार्टसाठी काम करणाऱ्यांची परिस्थिती वेगळी आहे. एक डिलिव्हरी बॉय सांगतो, “कस्टमर अनेकदा बऱ्याच वस्तू मागवतं. पण डिलिव्हरी करताना प्रत्येकवेळी आम्ही चेक करत बसत नाही. कारण त्यात वेळ जातो. स्टोअरजवळ जायला वेळ लागतो पुढची ऑर्डर पडायला वेळ लागतो, त्यामुळे इन्सेटिव्हच्या टार्गेटजवळ पोचता येत नाही.” त्याच्या शेजारी बसलेला डिलिव्हरी बॉय म्हणतो, “एकतर सगळे प्रॉडक्ट आतमधूनच कागदाच्या पिशवीत पॅक करून देतात. त्यामुळे पॅकिंगमध्ये काय आणि किती आहे हे आम्हाला कळायला मार्ग नसतो. त्यामुळे आम्ही चेक करण्याचा प्रश्न येत नाही. एकदा कस्टमरने एक प्रॉडक्ट कमी मिळाल्याची कम्प्लेंट केली आणि त्याने रिफंड मागितला. कंपनीने कस्टमरचं खरं मानून माझी चौकशी न करताच ३५० रुपये कापून घेतले.”
असा अनुभव आलेला तो एकटाच नव्हता. असाच अनुभव आलेले आणखी दोघेजण भेटले. “एके दिवशी अचानक मला ५०० रुपयांचा फाईन बसला आणि थोड्या वेळाने आयडी बंद झाला. कॉल सेंटरला फोन करून विचारल्यावर कळलं की कोणत्यातरी कस्टमरने ऑर्डर मिसिंगची कम्प्लेंट टाकलेली. ५०० रुपयांची वस्तू होती. माझ्याशी न बोलताच कंपनीने दोन दिवसांसाठी माझा आयडी बंद केला. ज्यादिवशी काम केलं, त्यादिवशी इन्सेन्टिव्ह मिळणार होता तोही नाही मिळाला. शिवाय दोन दिवस घरी बसून होतो.” त्याच्या शेजारी बसलेल्या डिलिव्हरी पार्टनरचा अनुभवही तसाच होता. त्याचाही दोन दिवस आयडी बंद करून २०० रुपये कापले होते. तो सांगतो, “कस्टमरने स्वतःचा पत्ता चुकीचा टाकला होता. घर नंबर ३०४ टाकण्याऐवजी २०४ टाकलं होतं. मी २०४ मध्ये ऑर्डर देऊन निघून आलो. नंतर मूळ कस्टमरचा फोन आला. मला कळलं की आपण त्यांच्या खालच्या घरी ऑर्डर पोचवली आहे. पण माझीही चूक नव्हती. मी त्यांना म्हटलं की घेऊन या तिथून. नाही म्हणाले. शेवटी मीच गेलो पुन्हा. २०४ मधून ऑर्डर घेतली आणि ३०४ मध्ये ऑर्डर देऊन आलो. पण तरी कस्टमरने तक्रार केलीच. माझा आयडी बंद झाला. असं काही झालं की काम करायला जीवावर येतं.” अचानक आयडी बंद झाल्याच्या घटना इतरही कंपन्यांच्या डिलिव्हरी पार्टनरनी बोलून दाखवल्या.
डन्झोवाल्यांची वेगळी तक्रार आहे. तीन-चार महिन्यांपूर्वी दिवसाला आठशे ते हजार रुपये कमवायचो. आता अगदी अर्ध्यावर ऑर्डर आल्या आहेत, असं अनेक डिलिव्हरीवाल्यांचं म्हणणं होतं. कारण विचारल्यावर डिलिव्हरी करणारे लोक वाढलेत, असं अनेकांनी सांगितलं. “डन्झोला जॉईन होऊन वर्ष झालं. काम सुरू केलं तेव्हा दिवसाला हजार रुपये मिळत होते. म्हणून सहा महिन्यांपूर्वी हप्त्याने टू-व्हीलर घेतली. पण मागच्या तीन महिन्यांपासून ऑर्डर पडण्याचं प्रमाण अर्ध्यावर आलंय.”
डन्झोच्या ऑर्डरचं प्रमाण कमी झालंय का याचा अंदाज घ्यायला आणखी काही तरुणांशी बोललो. दुपारचा एक वाजला होता. डन्झोचा एक डिलिव्हरी पार्टनर सकाळी सात वाजता स्टोअरला आला होता. सहा तासात त्याला फक्त तीन ऑर्डर मिळाल्या होत्या आणि १३३ रुपये खात्यावर जमा झाले होते. ही परिस्थिती तो तोंड बारीक करून सांगत होता. आणखी एकाजवळ चौकशी केली. तो सकाळी साडेसहापासून डिलिव्हरी करायला आला होता. आतापर्यंत फक्त चार ऑर्डर्स पडल्या होत्या आणि खात्यावर २४० रुपये जमा झाले होते. आणखी दिवसभरात इतकेच मिळतील, असं त्याचं म्हणणं होतं.
याशिवाय स्विगी-झोमॅटोसारख्या काही तक्रारी इथेही आहेत. “ॲपमध्ये ३.४ किलोमीटर दाखवत असेल तर, प्रत्यक्षात गुगल मॅपमध्ये ते अंतर ३.७ वगैरे किलोमीटर दिसतं. साडेतीन किलोमीटरच्या पुढे दहा रुपये एक्स्ट्रा मिळणारे असतात. फक्त त्यांच्या सिस्टीमध्ये ३.४ किलोमीटर दिसत असल्यामुळे वरचे दहा रुपये मिळत नाहीत. कॉल सेंटरला तक्रार केली की ‘देतो' म्हणतात. पण पुढे काही घडत नाही. असं रोज दोन-तीन वेळा होतं.” असं झेप्टोचा डिलिव्हरी पार्टनर सांगत होता. तर डन्झो डिलिव्हरी पार्टनरने सांगितलं, “आमचा १३ किलोमीटरचा एरिया आहे. त्यानुसार खडकवासल्याच्या अलीकडची किरकिटवाडी आमच्या एरियाची बाउंड्री आहे. एकदा किरकिटवाडीची डिलिव्हरी पडली. लोकेशनला पोचलो आणि कस्टमरला फोन लावला. तर त्याने एक किलोमीटर पुढे कोल्हेवाडीला बोलवून घेतलं. मी आमच्या कॉल सेंटरला कम्प्लेंट केली. तर कस्टमर केअरमधून बोलणारा म्हणाला, ‘असूदे. त्यांना ऑर्डर देऊन या. एक्स्ट्रा पैसे देतो.' गेलो नाही तर फाईन पडेल म्हणून गेलो खरा, पण ते वाढीव पैसे काही मिळाले नाहीतच.”
दिवाळीमध्ये फराळ, मिठाई, पणत्या, रांगोळ्या, मोतीसाबण, कॅडबरीचे गिफ्ट्स पॅकेट्स अशा वस्तू खरेदी करण्याचं प्रमाण जास्त असतं. तसंच ग्रोसरी ॲप्समध्ये खरेदी करण्याचं प्रमाणही जास्त असतं. पण त्यासाठी ऐन दिवाळीत डिलिव्हरी पार्टनर लागतात. त्यासाठी डिलिव्हरी करणाऱ्यांना वेगवेगळ्या ऑफर्स, बोनस देऊन काम करण्यासाठी आकर्षून घेतलं जातं. ब्लिंकिटसाठी काम करणाऱ्या एका तरुणाने अनुभव सांगितला, “दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये २१०० रुपयांचा बोनस होता. तो मिळण्यासाठी दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये प्रत्येक दिवशी नऊ तास लॉगिन राहणं बंधनकारक होतं. मागच्या दिवाळीमध्ये मनपामध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर फवारणीच्या कामाला होतो. तेव्हा सुट्टी मिळाली होती. यावेळी मात्र २१०० रुपयांसाठी सुट्टी खराब झाली. लक्ष्मीपूजनालाही काम करावं लागलं.”
झटपट डिलिव्हरी ॲप्सचं आणखी एक वेगळेपण म्हणजे इथे बहुतेक तरुण तिशीच्या आतले असतात. त्यापुढच्या वयोगटातल्या लोकांना हे धावपळीचं काम झेपेल का याची शंकाच वाटते. हे पार्टनर दहावी-बारावी किंवा क्वचित ग्रॅज्युएट झालेलेही असतात. बऱ्यापकी पैसे मिळत असल्याने त्यातले बरेच जण सध्या तरी समाधानी असल्याचं सांगतात, तर काही जण मात्र दुसरं काम मिळेपर्यंत हे करायचं अशी खूणगाठ मनाशी बांधून आली डिलिव्हरी पोचवत असतात. या ॲप्समुळे कित्येकांना रोजगार मिळालाय ही गोष्ट नाकारता येणार नाही. पण त्या कामाची धावपळ आणि त्रास पाहता हा रोजगार त्यांना कितपत परवडतो हा प्रश्न अनुत्तरितच राहतो.
काळा दमा आणि पाठीचे त्रास
डिलिव्हरी करणारे बहुतांश तरुण असतात. त्यांचं दिवसाला साधारण १०० ते १५० किलोमीटर फिरणं होतं. त्याचा काही त्रास होतो का, या प्रश्नावर पाठ दुखते हे एक उत्तर प्रत्येकाकडून मिळतं. पण कदाचित तरुण रक्त असल्यामुळे बाकी त्रास त्यांना जाणवत नाहीत. त्याबद्दल चेस्ट फिजिशियन डॉ. महावीर मोदी सांगतात, “डिलिव्हरी पार्टनर दिवसाला १०० ते १५० किलोमीटर प्रवास करत असतील तर त्यांना प्रदूषणामुळे कोरडा खोकला, ॲलर्जी होण्याची शक्यता असतेच. शिवाय काही वर्षांनी फुप्फुसाचे आजार होण्याचीही दाट शक्यता असते. त्यातला एक महत्त्वाचा धोका म्हणजे क्रॉनिक इनफ्लमेटरी लंग डिसीज म्हणजेच काळा दमा! हवेतील कार्बनडायऑक्साड, कार्बनमोनॉक्साइड, सल्फरडायऑक्साइड अशा गॅसेसमुळे फुप्फुसाची क्षमता, फुप्फुसाची रोग प्रतिकारशक्ती हळहळू कमी होण्याची शक्यता असते. जगभरातल्या मृत्यूंमध्ये काळा दमा हे दुसऱ्या क्रमांकाचं कारण आहे. काळा दमा हा केवळ धूम्रपानामुळेच नव्हे, तर प्रदुषणामुळेही होतो. ऑर्थोपेडिक डॉ. नीलेश जगताप सांगतात, “डिलिव्हरी पार्टनर्सना पाठीचे आजार होण्याची शक्यता जास्त आहे. त्यांच्या मणक्याची झीज होऊ शकते. पायांमध्ये पाठीच्या नसांमधून ताकद येते, त्या नसांवर ताण येण्याची शक्यता जास्त असते. तो ताण आल्यामुळे पायातली ताकद कमी होते. पायात जडपणा येतो. पायाला सतत मुंग्या येतात.”
अक्षिता रखेजा या नेटकरीने ‘स्विगी, डन्झो, झेप्टो, ब्लिंकिट : १० ते २० मिनिटांत डिलिव्हरी पोहोचवण्याचं आश्वासन मागे घ्या' अशी मागणी करणारी ऑनलाईन पिटिशन सुरू केली आहे. या पिटिशनला आतापर्यंत २६ हजार नेटकऱ्यांनी पाठिंबा दिलाय. या पिटिशनमध्ये अक्षिता सांगतात, “माझ्या दरवाज्यावर डिलिव्हरी बॉय आला होता. भिजलेला आणि त्याचं रेनकोट चिखलाने माखलेलं होतं. माझं पार्सल दिलं आणि लंगडत निघाला. मी त्याला विचारलं का लंगडतोय. तर तो म्हणाला ‘छोटासा ॲक्सिडेंट झाला.' कारण काय तर त्याला १० मिनिटांत माझं पार्सल द्यायचं होतं.” त्या पुढे म्हणतात, “१० ते २० मिनिटांत किराणा किंवा खाद्य पोचवा, अशी ग्राहकांची मागणी कधीच नव्हती. ती आमच्यावर या कंपन्यांच्या स्पर्धेतून थोपवली जाते आहे. आम्हाला दोन-तीन दिवसांनी किराणा मिळाला तरी चालणार आहे.” त्या पुढे म्हणतात, “आपल्याकडे माणसांबद्दलच्या सहानुभूतीचा अभाव आहे. डिलिव्हरी करणाऱ्यांच्या सुरक्षेपेक्षा मला १० मिनिटांत कोक आणि सिगरेट मिळणं अधिक महत्त्वाचं ठरतंय.”
‘इंडियन फेडरेशन ऑफ ॲप-बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्स' या संघटनेचे राष्ट्रीय सरचिटणीस सलाउद्दीन शेख म्हणतात, “१० मिनिटांच्या डिलिव्हरीमध्ये अपघात सर्रास होत राहतात. चांगलं रेटिंग आणि जास्तीत जास्त ऑर्डर मिळवण्याच्या दबावाखाली डिलिव्हरी पार्टनर वेगाने गाडी चालवतात. ट्रॅफिकचे नियम मोडतात. त्यामुळे त्यांचा अपघात होण्याची शक्यता जास्त असते.” (स्रोत : बिझनेस इन्सायडर, change.org)
(डिसेंबर २०२२च्या ‘अनुभव’ मासिकातून साभार)