पहिली औद्योगिक क्रांती झाली तेव्हा माणसाच्या श्रमांऐवजी आपण वाफेची शक्ती वापरून उत्पादनाचा वेग वाढवला. दुसऱ्या क्रांतीत विद्युतशक्तीने उद्योग काबीज केले. तिसरी क्रांती अर्थात १९७० पासून इलेक्ट्रॉनिक्स आणि कॉम्प्युटरने केलेली. अतिशय लहान आकाराची, कमी ऊर्जा वापरणारी आणि नियंत्रणाला सोपी अशी यंत्रं जागोजागी दिसायला लागली. कॉम्प्युटरची क्षमता वाढली आणि माहितीचं युग अवतरलं. उद्योगधंद्यामध्ये ऑटोमेशन आलं. स्पर्धा वाढली, नावीन्यपूर्ण उत्पादनं बाजारात यायला लागली. शारीरिक श्रमांऐवजी माणसाच्या डोकेबाजपणावर उद्योग चालायला लागले.
त्यानंतर या शतकाच्या सुरुवातीला आलेल्या चौथ्या (डिजिटल) क्रांतीने तर आपलं आयुष्य आमूलाग्र बदललं असं म्हणावं लागेल. डेटा आणि इंटरनेट हा डिजिटल क्रांतीचा पाया. त्या पायावर काय वाट्टेल ते उद्योग उभे राहिले. कल्पनाही करता येणार नाही असे ऑनलाइन खरेदी, ऑनलाइन मनोरंजन आणि सोशल मीडियापर्यंत. उत्पादनक्षेत्रात रोबॉटिक्स आणि ए.आय.ने जोरदार मजल मारली. कथा-कादंबऱ्यांमध्ये भेटणारे रोबॉट्स उद्योगात छानपैकी स्थिरावले. इतरत्रही दिसायला लागले. जोडीने ए.आय. प्रणाली हजार गोष्टींवर देखरेख करायला लागल्या.
त्यात भर पडली ‘क्लाऊड कॉम्प्युटिंग' आणि ‘आयओटी'ची (इंटरनेट ऑफ थिंग्ज). अगदी कमी खर्चात क्लाऊडमध्ये भरपूर डेटा साठवून ठेवता येतो. तिथेच उपलब्ध असलेल्या कॉम्प्युटिंग सेवाही महिन्याची फी भरून वापरता येतात. त्यामुळे उद्योगांना मोठी गुंतवणूक करायची गरज भासत नाही. याचा फायदा घेत आपला किराणावालादेखील ऑनलाइन व्यवसाय करायला लागला. दुसरीकडे ‘आयओटी'चा वापर वाढला. म्हणजे काय, तर यंत्रणांनी आणि साधनांनी इंटरनेटचा वापर करून डेटाची देवाणघेवाण करणं.
अशा आयओटी साधनांमुळे डेटाचा संचार आणखी वाढला. पदोपदी आपण डेटा निर्माण करत राहतो आणि वापरतो. उद्योग आपला डेटा गोळा करतात आणि त्यावरून नवी उत्पादनं बाजारात आणतात. खरं तर आपण स्वतःला आपल्या डेटापासून आणि त्यावर आधारित उद्योगांपासून वेगळं करू शकणार नाही, अशी आज परिस्थिती आहे.
या चौथ्या क्रांतीला आपण जेमतेम सरावतो आहोत तोवर आता लगेच पाचवी क्रांती येऊन ठेपली आहे. इतक्या लवकर बदलाची वेळ आलीसुद्धा? आणि ही पाचवी क्रांती कसली असणार आहे?
तज्ज्ञ मंडळींच्या भाकितानुसार पाचव्या क्रांतीत तीन महत्त्वाच्या गोष्टी दिसतील. एक म्हणजे ‘कॉग्निटिव्ह कॉम्प्युटिंग'. यात यंत्रणा फक्त डेटावरून निर्णय घेणार नाहीत, तर त्यात आकलनशक्ती (कॉग्निशन) वापरतील. माणूस आपल्या ज्ञानेंद्रियांचा वापर करतो, तिथून मिळालेल्या माहितीचा अर्थ लावतो, आपल्या अनुभवाचा आणि समजुतीचा आधार घेतो, तर्कशुद्ध विचार करतो आणि निर्णय घेतो. त्याचप्रकारे एआय यंत्रणा संवेदक आणि संबंधित तंत्रज्ञान वापरून अनेक अंगांनी परिस्थितीचं आकलन करून निर्णय घेतील. दुसरी गोष्ट- पर्यावरणस्नेही तंत्रज्ञान. हवामानबदलाने आपली झोप उडवली असताना अशा तंत्रज्ञानाशिवाय आता पुढे जाता येणार नाही. तिसरी खास गोष्ट आहे माणूस आणि यंत्रं यांच्यातली दरी कमी होण्याची. रोबॉट्स माणसाची जागा घेणार नाहीत तर माणसासोबत काम करतील. या आपल्या सहकाऱ्यांसाठी ‘कोबॉट्स' (कोलॅबोरेटिव्ह रोबॉट्स) हे नाव हळूहळू प्रचलित होतं आहे. कोबॉट्स आपण बोललेली भाषा समजू शकतील. विशिष्ट व्यक्तीच्या बोलण्याच्या शैलीशी जुळवून घेतील. आपल्या परिसरात सहज रुळतील. त्यामुळे पाचव्या क्रांतीत तंत्रज्ञान माणसांपासून वेगळं करता येणारच नाही. त्या दृष्टीने पाहिलं तर ही क्रांती फक्त औद्योगिक नव्हे तर जीवनशैलीतली क्रांती असेल. पण आपण यासाठी तयार आहोत का?
उद्याचं जग पाचव्या क्रांतीने पूर्ण तंत्रज्ञानमय होईल तेव्हा आपण त्यात कुठे असू हे पाहणं मोठं रोचक असेल. आपल्याकडे अजून सर्व क्षेत्रांमध्ये चौथी क्रांती नीटशी पोचलेली नाही. अशा वेळी पाचवी क्रांती कितपत स्वीकारली जाईल? की उलट होईल? आपल्याकडच्या बऱ्याचजणांनी डेस्कटॉप-लॅपटॉपचा टप्पा गाळून थेट मोबाइलवर उडी घेतली. तशी काही बाबतींत आपण थेट पाचव्या क्रांतीची झेप घेऊ शकू?
मेघश्री दळवी
मेघश्री दळवी विज्ञानकथा आणि विज्ञानलेख लिहितात. त्या आयटी क्षेत्रात कार्यरत आहेत.
