आम्ही कोण?
ले 

कोरडवाहू मराठवाड्याला केसर आंब्याची संजीवनी?

  • सोमिनाथ घोळवे
  • 21.05.25
  • वाचनवेळ 6 मि.
  • Share on Tweeter
  • Share on Whatsapp
  • Share on Facebook
marathwada kesar mango

केसर आंब्याच्या उत्पादनात देशात अग्रेसर असणाऱ्या गुजरातला यंदा मराठवाड्याने आंब्यांची निर्यात केली आहे. कृषितज्ज्ञ भगवानराव कापसे यांच्या अनेक वर्षांच्या संशोधनामुळे यंदा मराठवाड्यात केसर आंबा लवकर हातात आल्यामुळे शेतकऱ्यांना गुजरातसह झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातलीही बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. एवढंच नव्हे, तर जपान, अमेरिका आणि युएईसारख्या परदेशी बाजारपेठांमध्ये केसर आंब्याने आपला जम बसवला आहे. हा केसर आंबा कोरडवाहू मराठवाड्यासाठी संजीवनी ठरेल, अशी आशा आहे.

केसर आंबा हा मूळचा गुजरातमधलाच. शिवाय हे राज्य केसर आंब्याच्या लागवडीत देशामध्ये अग्रेसर आहे. मात्र गेल्या १० वर्षांत महाराष्ट्रातलं, विशेषतः मराठवाड्यातलं केसरचं फळ हे बदलत्या हवामानात तग धरून राहणारं फळपीक म्हणून पुढे आलं आहे. विशेषतः दुष्काळी परिसरात या आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणावर वाढली आहे.

केसर आंब्याची साल आणि एकुणातच हे फळ हापूसपेक्षा दणकट असल्याने त्याची कोठेही सुरक्षित वाहतूक होऊ शकते. त्यामुळे या आंब्याची राज्यात आणि बाहेरही निर्यात करणं सोपं जातं. एप्रिल- मे महिन्यात उत्तर भारतातील राज्यांमधल्या बाजारपेठांमध्ये स्थानिक आंब्याच्या जाती आलेल्या नसल्याने आपल्या केसर आंब्याला मागणी वाढते.

मराठवाड्यातल्या केसर आंब्याला मागणी वाढण्यामागे आणखीही एक कारण आहे. २०१६मध्ये छत्रपती संभाजीनगर येथील आंबा उत्पादक संघटनेने ‘मराठवाडा केसर आंब्या’साठी भौगोलिक संकेत (GI टॅग) नोंदणी प्रस्तावित केला होता. २०१६मध्ये चेन्नई येथील भौगोलिक संकेत नोंदणीद्वारे या फळाला GI टॅग मिळाला. त्यामुळे आता या प्रदेशात पिकवल्या जाणाऱ्या आंब्यांना ‘मराठवाडा केसर आंबा’ हे नाव देण्यात आलं. हापूस आंब्याच्या आधी GI टॅग मिळवणारी केसर ही महाराष्ट्रातील पहिली आंब्याची जात ठरली.

marathwada kesar mango

केसर आंबा संघाच्या माहितीनुसार, २०१५ पासून दोन प्रमुख हस्तक्षेपांमुळे मराठवाड्यातील केसर आंबा फळबाग लागवड आणि उत्पादनास गतिशीलता मिळाली. एक म्हणजे, केसर आंब्यांची घनदाट (अल्ट्रा हाय डेन्सिटी) लागवड करण्यास सुरुवात झाली. यात १२ फूट अंतरावर आणि सलग दोन रोपांमध्ये तीन फूट अंतर राखून ही लागवड केली जाते. अशा पद्धतीच्या लागवडीमुळे झाडांची वाढ चांगली होते. तसंच बागांची आणि रोपांची छाटणी करणं सोपं जातं. दुसरं म्हणजे, वाढीस चालना देणारं पॅक्लोबुट्राझोल वापरलं जातं. ज्यामुळे झाडाला लवकर फुलं आणि आणि फळं येतात. सर्वसाधारणपणे केसर आंब्याला डिसेंबर-जानेवारी या महिन्यात मोहर येतो. अर्थात थंडीच्या लाटेवर मोहर येणं अवलंबून असतं. तर एप्रिल-मे या महिन्यापासून फळ बाजारात विक्रीसाठी येणं सुरू होतं.

कृषितज्ज्ञ भगवानराव कापसे सांगतात, “पूर्वी कोकण वगळता राज्यात आंब्याच्या बागा नव्हत्या. शेतकऱ्यांकडून केवळ देशी आंब्याची झाडं लावली जात होती. आताही बहुतांश शेतकरी तेच करत आहेत. १९८९ साली छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पिंप्रीराजा या गावातले शेतकरी सुरेंद्र भंडारी यांनी मराठवाड्यात केसर आंबा फळबाग लागवड सुरू केली. पुढे राज्य शासनाच्या ‘फळबाग लागवड योजने’अंतर्गत अनुदान मिळू लागल्याने शेकरी हळूहळू या आंब्याची लागवड करू लागले. या लागवडीसाठी रोजगार हमी योजनेचं सहाय्य देखील मिळत होतं.”

सुरुवातीला आंबा लागवड करताना १० बाय १० मीटरचे खड्डे घेऊन आंब्याची कोय पेरली जायची. या कोयी उगवण्याचं प्रमाण फक्त १५ ते २० टक्के होतं. बाकी कोयी कुजून जात. त्यामुळे १५ दिवसांच्या आतल्या ताज्या कोयी लावल्या जाऊ लागल्या. पुढे शासनाने कलम लागवड करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला शेतकरी केसरबरोबरच राजापुरी, लेब, वनराज अशा अनेक वाणाचे आंबे लावत. पण आंब्याला पाणी देणं, फवारणी करणं, खते देणं याबद्दल मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना फारशी माहिती नव्हती. त्यामुळे कलमाद्वारे लागवड केलेल्या फळबागेत तीन वर्षांपर्यंत अर्धीदेखील कलमं तग धरून राहत नव्हती. मात्र या उष्ण आणि कोरड्या वातावरणात केसर आंबा तगून राहिला. त्यामुळे या आंब्याच्या लागवडीस विद्यापीठ आणि कृषी केंद्राने प्रोत्साहन दिलं. “पूर्वी १० बाय १० मीटरची लागवड केली जात होती. त्यात बदल करून ५ बाय ५ मीटर आणि १० बाय २.५ मीटर अशा लागवडीची शिफारस आम्ही केली. त्याला २००३ साली शासनाकडून मान्यता मिळाली,” असं कापसे सांगतात

marathwada kesar mango

आता मराठवाडा केसर आंब्याची लागवड केवळ मराठवाड्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. तर सह्याद्रीच्या पर्जन्यछायेच्या सर्व भागांमध्ये, म्हणजे मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये या आंब्याची लागवड करण्यात येते. या परिसरात आढळणारी लाल आणि काळी माती (लॅटराइट माती आणि काळ्या मातीचे मिश्रण) या आंब्याच्या लागवडीसाठी योग्य व पोषक आहे.

धाराशिव जिल्ह्यातल्या वाशी गावचे शेतकरी सतीश पाटील सांगतात, “माझ्या कोरडवाहू शेतीत मी केसर आंबा लावला आहे. हे फळ कोरडवाहू आणि कोरड्या जमिनीत चांगलं येतं. ते केवळ भूजलावर वाढतं, जगतं. त्याला फारच कमी पाणी लागतं.”

भगवानराव कापसे यांच्या अंदाजानुसार राज्यात (कोकण वगळता) एकूण ६० हजार हेक्टरवर केसर आंब्याच्या बागा आहेत, त्यातील १५ हजार हेक्टरपेक्षा जास्त मराठवाडयातील असतील, असा त्यांचा अंदाज आहे. अलीकडे शेताच्या बांधावर, घराच्या अंगणात, नदी-ओढ्याच्या कडेला, खडकाळ व तांबड्या शेतातही केसर आंब्याची लागवड होऊ लागली आहे. आंबा उत्पादक संघटनांचा प्रयत्न आणि शेतकऱ्यांमध्ये विक्री व निर्यातीबाबतीत आलेली जागृती यामुळे गटशेतीच्या माध्यमातून केसर आंब्याची लागवड होते.

आंब्याच्या इतर जाती बाजारात येण्याआधी केसर तयार होतो. त्यामुळे केसरला भाव चांगला मिळतो असं शेतकरी सांगतात. केसरचं उत्पादनही प्रती हेक्टर सरासरी २.५ ते ३ टन मिळतं. साधारणपणे एका आंब्याचं वजन २०० ते २५० ग्रामपर्यंत मिळतं. केसर आंबा काढणीस लवकर आला तर चांगला भाव मिळतो. जसं जसं उशिरा काढणी होते, तसं भाव ढासळतो. उदा. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला २०० ते २५० रुपये प्रती किलोपर्यंत शेतात येऊन व्यापारी आंबा खरेदी करतात. तर मे महिन्याच्या शेवटी ५० ते ८० रुपये किलोपर्यंत खाली भाव येतो,” असं सोलापूरच्या सांगोला तालुक्यातल्या महूद गावात केसरची लागवड करणारे शेतकरी दिलीप नागणे सांगतात.

कोरडवाहू परिसरात पूर्वी डाळिंब मोठ्या प्रमाणावर घेतलं जात होतं. पण त्यावर पडणाऱ्या तेल्या, लाल्यासारख्या किडींमुळे अनेक शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागा काढून केसर आंबा लागवड करण्यावर भर दिला आहे.

marathwada kesar mango

केसर आंब्याची वैशिष्टं

केसर आंबा दिसायला हापूससारखाच देखणा आणि चवीला अतिशय गोड असतोच, पण त्यात विविध जीवनसत्त्वं आणि खनिजांताही भरणा असतो. या आंब्यामध्ये ए. सी. ई आणि बी-६ अशी जीवनसत्त्वं असतात. केसरपासून बनवलेली आंबालस्सी दक्षिण आशियामध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. तसंच अलीकडे ज्यूस, स्मूदी, आईस्क्रीम, फ्रूट पाई, एनर्जी बार, एवढंच नव्हे तर करीमध्येही केसर आंबा वापरला जाऊ लागल्याने त्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे केसर आंब्यावर आधारित प्रक्रिया उद्योगही वाढताहेत.

एकूणच केसर आंब्याची कोरडवाहू परिसरात तग धरून राहण्याची क्षमता, संशोधनामुळे लवकर हाती येऊ लागलेलं पीक, प्रक्रिया उद्योगाकडून वाढलेली मागणी आणि राज्याबाहेरच्या बाजारपेठा उपलब्ध होणं यामुळे केसर आंबा कोरडवाहू परिसरातील शेतकऱ्यांना संजीवनी देणारं पीक ठरतो आहे. 

सोमिनाथ घोळवे | 9881988362 | sominath.gholwe@gmail.com

सोमिनाथ घोळवे हे ग्रामीण समाज व्यवस्थेचे अभ्यासक आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 3

सुनिल 21.05.25
अतिशय कमीत कमी शब्दात मार्मिक माहिती
Ashok Najan21.05.25
मराठवाड्यात केसरचे उत्पादन चांगल्या प्रमाणात वाढत आहे.गोड असल्याने बाजारात मागणी चांगली आहे माहिती मिळाली
गोरख शंकर शहाणे22.05.25
अतिशय उपयुक्त अशी माहिती आहे केसरी आंबा लागवड करण्याच्या दृष्टीने बहुमोल असे मार्गदर्शन यामधून मिळालेले आहे.
See More

Select search criteria first for better results