न्यू यॉर्कच्या मेयरपदी झोहरान ममदानी निवडून आले आहेत. न्यू यॅार्कचे ते सर्वात तरुण आणि पहिले मुसलमान मेयर आहेत. त्यांचे आई-वडील महमुद ममदानी आणि मीरा नायर या दोघांचाही जन्म भारतातला आहे.
निवडणूक गाजत होती कारण डोनल्ड ट्रंप यांनी केलेला विरोध. ट्रंप स्टाईल विरोध आणि धमक्या पहिलं म्हणजे काश पटेल या एफबीआय प्रमुखाला ममदानीच्या मागे लावू, ममदानीचं नागरिकत्व तपासू, फट सापडली तर नागरिकत्व रद्द करू, ममदानीला देशाबाहेर घालवू अशा धमक्या दिल्या जात होत्या. एवढंच नव्हे, तर नागरिकांनी ममदानीला निवडून दिलं तर केंद्र न्यू यॅार्कला पैसे देणार नाही इथपर्यंत ट्रम्प यांची मजल गेली होती. पण तरीही न्यू यॅार्कच्या मतदारांनी ममदानींना निवडून देऊन देश ही ट्रंपची प्रॅापर्टी नाहीये, हे सिद्ध केलंय.
ट्रंप यांनी आणखी एक गंमत केली. ममदानींचे प्रतिस्पर्धी कुमो यांना पाठिंबा दिला. गंमत पहा. निवडणुकीत ट्रंप यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवार उभ्या होत्या, त्यांना पाठिंबा दिला नाही. कुमो हे डेमॅाक्रॅट पक्षाचे बंडखोर उमेदवार होते. डेमॅाक्रॅटिक पक्षात फूट पाडायचा उद्योग ट्रंप यांनी इथे केला.
ममदानी का निवडून आले असावेत?
ममदानी न्यू यॅार्क विधानसभेचे सदस्य आहेत. न्यू यॅार्कचे रहिवासी आहेत. न्यू यॅार्क त्यांना समजतं, न्यू यॅार्कच्या बहुसंख्य नागरिकांच्या समस्या त्यांना समजतात. त्या समस्यांवर त्यांनी उपाय सुचवलेत.
बस प्रवास मोफत. लहान मुलांची काळजी घेण्याचा खर्च सरकार करेल. शहरातल्या घरांची भाडी गोठवणार, वाढणार नाहीत. जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकानं सरकार चालवेल.
न्यू यॅार्कमधल्या बहुसंख्य नागरिकांना या कार्यक्रमातून लाभ मिळणार आहे. श्रीमंत आणि उच्च मध्यवर्गीय स्वत:च्या फ्लॅट वा बंगल्यात रहातात. त्यांची संख्या कमी आहे. निम्न मध्यमवर्गीय आणि गरीब भाड्याच्या घरात रहातात, महागाईच्या जमान्यात घरभाडी वाढत चाललीयत. ही माणसं बहुसंख्य आहेत. त्यांना रस्त्यावर रहावं लागेल किंवा शहर सोडून जावं लागेल.
खूप माणसं म्हातारी आहेत. पेन्शनवर किंवा बचत केलेल्या पैशावर जगतात. चलनाची किंमत कमी होत चालल्याने, महागाईच्या प्रमाणात बचत कमी पडत असते. घरमालक भाडं वाढवून मागतात, नाही दिलं तर घराबाहेर काढतात. पॅरिस, बर्लीन, लंडन इत्यादी ठिकाणी म्हातारी माणसं रस्त्यावर आलीत.
ममदानींच्या उपायांमुळे अनेकांना लाभ मिळेल हे खरं, पण त्यात गुंतेही आहेत. घरं ठीकठाक ठेवण्यासाठी आणि योग्य उत्पन्न मिळवण्यासाठी घरमालकांना भाडी वाढवून मिळायला हवीत. हा पेच सुटला नाही तर घरं निर्माण होणार नाहीत, घरांची समस्या अधिक बिकट होईल. तेव्हा यातून काही तरी वाट सरकारला काढावी लागेल. भाडे नियंत्रण कायदा करणं, महागाई आटोक्यात ठेवणं हे उपाय आहेत. हे उपाय सामान्यपणे समाजवादी-डावे-लिबरल उपाय मानले जातात. टोकाच्या बाजारवादी विचारांच्या ट्रंप यांना ते उपाय मंजूर नाहीयेत.
जीवनावश्यक वस्तूंचं वितरण सरकारने करणं हाही डावा उपाय आहे. भारतात दीर्घ काळ सरकारने स्वस्त धान्य दुकानं चालवली. निव्वळ भ्रष्टाचार आणि काळाबाजार या दोन घटकांमुळे ती योजना फसत गेली. ममदानी यांना भारतातला अनुभव उपयोगी पडू शकतो.
बस फुकट, बालकांची काळजी फुकट या योजना वादात सापडतील. भारतात केजरीवाल यांनी दिल्लीकरांना अनेक गोष्टी मोफत दिल्या. त्यावेळी भाजप या विरोधी पक्षानं या योजनांची रेवडी वाटप या शब्दात रेवडी उडवली. नंतर भाजपने रेवड्यांचे कारखानेच काढून रेवड्या उधळल्या, तो भाग वेगळा.
यातला थट्टेचा, राजकीय विनोदाचा भाग जाऊ द्या. यात खूप महत्वाच्या गोष्टी गुंतलेल्या आहेत. जगभर विकृत बाजार व्यवस्था विकसित होत चालल्या आहेत. कोणत्या वस्तू उत्पादायच्या आणि त्यांच्या किंमती काय ठेवायच्या याचे निर्णय सामान्य माणसाच्या हातात राहिलेले नाहीत. मार्केटिंगने सारं जग ताब्यात घेतलंय. माणूस या मार्केटिंगच्या प्रभावाखाली अनंत अनावश्यक गोष्टी वापरू लागला आहे. त्यातून अनंत अनावश्यक खर्च वाढत चालले आहेत. परिणामी पैसे पुरत नाहीत, उत्पन्न अपुरं पडतं. पैसे कमी पडणं, जास्त पैसे मिळवण्याची खटपट, यातून अनंत समस्या आणि व्याधी निर्माण होऊ लागल्या आहेत.
माणसांना काही बेसिक गोष्टी जन्मजात मिळाव्यात असा विचार पुढे येतोय. शुद्ध हवा, शुद्ध पाणी, पोटभर अन्न प्रत्येक माणसाला मिळेल, त्यासाठी श्रम करावे लागणार नाहीत, अशी व्यवस्था का असू नये? लेनिन हाच विचार मांडत होते. लोच्या असा की स्टॅलिन, माओ यांनी तो विचार क्रूर अमानवी अव्यवहारी पद्धतीने अमलात आणायचा प्रयत्न केला. आता तोच विचार सध्याच्या बाजारव्यवस्थेशी जुळवून अमलात आणायचा प्रयत्न चाललाय. बेसिक युनिव्हर्सल इन्कम अशी मांडणी काही विचारवंत करत आहेत.
ट्रंप काय किंवा भारतातले राज्यकर्ते काय, विचारांशी वैर असल्याने त्यांनी एकूणच राजकारणाची थट्टा चालवलीय. म्हणूनच विचारपूर्वक वागण्याऐवजी ही माणसं रेवड्या उडवत असतात. ममदानी कम्युनिस्ट आहेत, ते समाजवादी नाहीत असं म्हणून ट्रंप ममदानींना धुडकावत आहेत. समाजवाद, कम्युनिझम हे विचार, त्यांच्या मर्यादा, त्यांची बलस्थानं इत्यादींचा विचार ट्रंप करू शकत नसल्याने ट्रंप यांच्याकडे दुर्लक्ष करता येईल. पण ममदानी जे मांडत आहेत ते गंभीर आहे. त्यांनी, त्यांच्या पक्षाने त्यांचे विचार व्यवहार्य आहेत हे सिद्ध करायला हवं.
न्यू यॅार्कच्या मेयरबरोबरच न्यू जर्सी आणि व्हर्जिनिया या राज्याच्या गव्हर्नरपदांवर डेमॅाक्रॅटिक पक्ष निवडून आला आहे. ट्रंप यांना जनता नाकारत आहे असा निष्कर्ष यातून काढायला हरकत नाही.
निळू दामले | 9820971567 | damlenilkanth@gmail.com
निळू दामले हे जगभरातील विविध विषयांवर अभ्यासपूर्ण आणि सहज शैलीत लिखाण करणारे ज्येष्ठ पत्रकार आहेत.
