मी दिल्लीच्या चांदणी चौकात उभा होतो. समोर ऐतिहासिक लाल किल्ला दिसत होता. शहेनशाह शहाजहानने लाल दगडात बांधलेल्या या किल्ल्याचा दर्शनी भाग आजही शाबूत आहे. याच किल्ल्याच्या साक्षीने जवाहरलाल नेहरूंपासून नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत अनेक पंतप्रधानांनी पंधरा ऑगस्टला झेंडावंदन केलं आहे. हा परिसर ‘पुरानी दिल्ली' या नावाने ओळखला जातो. इथल्याच एका चिंचोळ्या गल्लीत गालिब राहत होता, हे मी एका पुस्तकात वाचलं होतं. पुस्तकात वाचलेला नेमका पत्ता सांगायचा, तर ‘कासीमजान गली, बल्लिमारन, पुरानी दिल्ली' असा आहे. त्यामुळे या परिसराविषयी मनात उत्सुकता होती. (अमिताभ बच्चनच्या गाजलेल्या ‘कजरारे' या गाण्यात ‘तुम्हें मिलना है पुरानी दिल्ली में' या ओळीसोबतच बल्लिमारनचाही उल्लेख आहे.)
डोक्यावर ऊन तळपत होतं. आता कोणत्या दिशेने जावं असा विचार करत मी उभा होतो. तेवढ्यात समोर उभा असलेला तरुण रिक्षावाला जवळ आला.
“कहाँ जाना है साब?” तरुण रिक्षावाल्याचा प्रश्न.
“गालिब की हवेली जाना है।” मी बिचकत म्हटलं.
“ये गालिब कहाँ रहता है मियाँ?” पलीकडच्या दाढी पिकलेल्या रिक्षावाल्याकडे पाहत या तरुणाने विचारलं.
“अरे, तुझे गालिब की हवेली मालूम नहीं?” दाढी पिकलेला आश्चर्य दाखवत म्हणाला.
“कौन है ये गालिब?” तरुणाचा लगेच पुढचा प्रश्न.
तो प्रश्न ऐकताच मात्र मी चमकलोच. कारण गालिबला त्याच्या हयातीतच या प्रश्नाशी सामना करावा लागला होता. त्यावर त्याने एक शेरही लिहिला होता-
‘पूछते हैं वो कि गालिब कौन है,
कोई बतलाओ कि हम बतलाएँ क्या?'
माझ्या आठवणीप्रमाणे जाणत्या वयात जेव्हा पहिल्यांदा दु:खाची ओळख झाली तेव्हा मला गालिब भेटला. नंतर जगण्याच्या प्रवासात वेळोवेळी भेटत राहिला. सुखात कमी आणि दु:खात जास्त वेळा भेटला गालिब. कधी भावना अनावर झाल्यावर केबिनचं दार आतून लावून अंधारात एकटा बसलो असताना डोळ्यांतून ओघळत राहिला गालिब. कधी एखाद्या मीटिंगमध्ये अनपेक्षित धक्का बसल्यावर सुस्कारा झाला गालिब, तर कधी वेदनेचे शब्द बनला गालिब. जमिनीत बीज रुजावं तसा रुजला आहे गालिब. अंगात ताप मुरावा तसा मुरला आहे गालिब... आणि रात्रभर वाचूनही उरावा तसा उरला आहे गालिब.
तेवढ्यात त्या दाढीवाल्याने लांब बोट करत गालिबच्या घराकडे जाण्याचा रस्ता दाखवला. मग गर्दीतून वाट काढत त्या दिशेने चालू लागलो. अवतीभवती अनेक माणसं, वाहनं, दुकानं आणि नाना प्रकारचे आवाज असं बरंच काही होतं, पण मला मात्र त्यातलं काहीच जाणवत नव्हतं. कारण मन भूतकाळात गेलं होतं. वाटत होतं, याच रस्त्यावरून गालिब अनेकदा चालत गेला असेल. इथूनच लाल किल्ल्यात जाऊन त्याने बहादूरशहा जफरच्या मैफिलीत स्वत:च्या गझला सादर केल्या असतील. तिथून परतताना याच रस्त्यावरच्या त्याच्या मित्राच्या दुकानात बसून त्याने गप्पा रंगवल्या असतील. फक्त चार-पाच मिनिटांचं चालण्याचं अंतर होतं ते, पण मन मात्र शतकांचा प्रवास करत होतं.
दोनदा काटकोनात वळल्यावर अगदीच अरुंद बोळ लागला. एका वेळी एकच वाहन जाऊ शकेल इतका तो लहान रस्ता होता. उजवीकडची दोन-चार दुकानं सोडल्यावर एक उंच लाकडी दरवाजा दिसला. बाहेर गालिबच्या नावाची पाटी होती. हिंदी, इंग्रजी आणि उर्दू अशा तीनही भाषांमधला मजकूर त्यावर लिहिलेला होता. ‘हवेली मिर्ज़ा गालिब' ही अक्षरं उठून दिसत होती. पुढेे लिहिलं होतं, ‘इस हवेली में वर्ष १८६० से १८६९ तक मिर्ज़ा गालिब ने अपने जीवन का अंतिम समय व्यतीत किया।'
आत प्रवेश केल्यावर मात्र ‘गालिबियत'चा अनुभव यायला सुरुवात झाली. ‘गालिबियत' या शब्दाचा अर्थ ‘गालिबपण'असा होतो. गुलजारांच्या मते ‘गालिबियत' ही एक स्वतंत्र सोलर सिस्टीम आहे. त्यात गालिबला तळपत्या सूर्याचं स्थान आहे. त्याच्याभोवती इतर ग्रह आहेत. दिल्ली सरकारने सांस्कृतिक वारसा म्हणून गालिबच्या या राहत्या घराचं जतन केलेलं आहे. त्या घरात आता एक छोटं वस्तुसंग्रहालय साकारलेलं आहे.
आत प्रवेश केल्यावर उजव्या बाजूच्या पहिल्याच खोलीमध्ये संगमरवरात केलेला गालिबचा पुतळा लक्ष वेधून घेतो. ‘मिर्ज़ा असदुल्लाह खान गालिब' असं त्या अर्धपुतळ्याच्या खाली लिहिलेलं आहे. ज्येष्ठ शिल्पकार भगवान रामपुरे यांनी तो साकारला आहे. ‘प्रेझेंटेड बाय गुलजार' असंही तिथे लिहिलं आहे. याचा अर्थ गुलजारांनी गालिबच्या हवेलीला दिलेली ती मानवंदना आहे. गुलजार आणि गालिब यांचं नातं अर्भाट आहे. गुलजार स्वत:ला गालिबचा सेवक मानतात. त्यांनी गालिबवर सुंदर मालिका बनवली आहे, पुस्तक लिहिलं आहे. गालिबचा विषय निघाल्यावर ते बोलतातही भरपूर.
गालिबचा तो पांढऱ्या रंगाचा पुतळा शांत डोळ्यांनी समोर पाहत असतो. नेमका कोणता पांढरा रंग हे सांगणं मात्र कठीण आहे. कारण ज्याला जेवणातल्या चवीपुरत्या मिठासारखा गालिब वाटतो त्याच्यासाठी तो मिठासारखा पांढरा आहे. ज्याला उधाणलेल्या समुद्रासारखा वाटतो त्याच्यासाठी तो फेसाळलेल्या लाटेसारखा पांढरा आहे. ज्याला गायीच्या दुधासारखा सात्त्विक वाटतो त्याच्यासाठी तो दुधासारखा पांढरा आहे. शिवाय गालिबच्या आयुष्यात सुखाचा वर्षाव कधीच न झाल्याने एखाद्यासाठी तो उन्हाळ्यातल्या बिनपाण्याच्या ढगासारखा पांढरा आहे. अखेर पुतळ्यात असला म्हणून काय झालं, गालिब आहे तो! एकाच एका पांढऱ्या रंगात त्याचं वर्णन कसं करता येईल?
पुतळ्याच्या शेजारी काचेच्या पेटीमध्ये गालिबची गझलांची वही ठेवलेली आहे. गालिबच्या आयुष्यासारखीच त्याची वहीही उघडी आहे. तीवरचं गालिबचं उर्दू अक्षर स्पष्ट दिसतं. उर्दू वाचता येणाऱ्या व्यक्तीला दोन्ही पानांवरचा मजकूर सहज वाचता येईल इतकं ते स्पष्ट आहे. वहीची पानं मळकट दिसतात, कारण त्या पानांवर धूळ साठलेली आहे. ती साठलेली धूळ जशी मोगलाईतली, तशीच ब्रिटिश काळातली आणि स्वतंत्र भारतातलीही आहे. पण तीनही राजवटींतल्या धुळीतूनही ही अक्षरं उठून दिसतात, कारण त्या अक्षरांच्या वळणात गालिबची प्रतिभा दडलेली आहे.
वहीच्या शेजारी गालिबच्या वेगवेगळ्या काळांतल्या घरांचे फोटो लावलेले आहेत. त्यामध्ये आग्रा इथलं त्याचं जन्मस्थान आहे. तो राहत असलेलं मुरादाबादचं आणि रामपूरचं घर आहे. शिवाय १८१० साली त्याचं ज्या वास्तूत लग्न झालं त्या वास्तूचाही फोटो आहे. गालिब काही काळ अँग्लो-अरेबिक कॉलेजमध्ये शिकवायला जात होता, तिथलाही एक फोटो आहे.
‘यदि गालिब अंग्रेजी भाषा में लिखते तो विश्व एवं इतिहास के महानतम कवि होते' हे राल्फ रसल यांचं प्रसिद्ध विधान फ्रेम करून एका भिंतीवर लावलेलं आहे. त्या फ्रेमच्या जवळ गालिबच्या रोजच्या वापरातला सदरा जतन करून ठेवलेला आहे. खोलीमध्ये ठिकठिकाणी गालिबचे शेर मोठ्या अक्षरात लिहून ठेवलेले आहेत.
कोई वीरानी सी वीरानी है।
दश्त को देख के घर याद आया।
एकदा उदासीन मन:स्थितीत असताना गालिब शहरभर भटकत राहिला. नैराश्यामुळे दिशाहीन चालत असताना तो सगळ्यांत भकास जागा शोधत होता. भटकता भटकता तो पुन्हा घरी पोचला. अचानक त्याच्या लक्षात आलं, की ‘सगळ्यात भकास जागा म्हणजे त्याचं घरच होतं.' तर काळीज चिरणारे असे काही शेर..
शेजारच्या खोलीत गालिबच्या पत्नीच्या म्हणजे उमराव बेगमच्या काही आठवणी जतन केल्या आहेत. सोबत एक बुद्धिबळाचा पट आणि एक सारीपाटही आहे. त्या सगळ्या वस्तू पाहता पाहता मला रोमांचित व्हायला झालं. असं वाटलं, की आपल्या आसपासच आहे गालिब. पायातली झिजलेली मोजडी सावरत तो वावरतो आहे. कोपऱ्यात मेणबत्ती जळते आहे. वितळलेल्या मेणाचे काही थेंब ओघळत आहेत. खुंटीला अडकवलेल्या पिंजऱ्यातला पोपट मध्येच ओरडतो आहे. दारात तहानलेली शेळी बॅऽऽ असा आवाज करत पाणी मागते आहे. दूरवरून ‘अल्ला हो अकबर'ची बांग ऐकू येते आहे. स्वत:च्याच तंद्रीत गालिब बसलेला आहे. त्याचे डोळे रडून रडून सुजलेले आहेत. शेजारच्या बाटलीत थोडी दारू उरलेली आहे. आडवा पडलेला ग्लास वाऱ्याच्या झोताने हिंदकळतो आहे. अचानक काही तरी सुचल्यामुळे गालिब उठून बसतो. हात उंच करून खणातले कागद काढतो, समोरच्या मेजावर ठेवतो. हातातला बोरू दौतीतल्या शाईमध्ये बुडवून लिहायला सुरुवात करतो-
हजारो ख्वाहिशें ऐसी कि हर ख्वाहिश पे दम निकले।
बहुत निकले मेरे अरमा बहुत फिर भी कम निकले।
या घरात गालिब राहायला आला तेव्हा १८५७चं बंड संपत आलं होतं. देशभर ब्रिटिशांनी ते बंड मोडून काढलं होतं. ब्रिटिश आधीपेक्षा अधिक आक्रमक झाले होते. दिल्ली हे तर मोगल सत्तेचं केंद्र असल्यामुळे तिथल्या नाड्या त्यांनी करकचून आवळल्या होत्या. त्या काळात दिल्लीत काही दंगली उसळल्या होत्या. जाळपोळ-फोडाफोडी झाली होती. बंदुकांच्या फैरी झडल्या होत्या. घोड्यांच्या टापांचे आवाज वाढले की या जुन्या दिल्लीत घबराट पसरत होती. जीवन आणि मृत्यूमधली रेषा स्पष्ट दिसत होती. अशा रेषेवर गालिब उभा होता आणि मनातली खळबळ कागदावर उतरवत होता.
बाहेर हे थैमान चालू असताना त्याच्या घरातली परिस्थिती फारशी वेगळी नव्हती. त्याच्या डोक्यावर कर्ज असल्याने तो दिवसभर दारू पीत बसायचा किंवा मित्रांबरोबर जुगार खेळायचा. कधी नवीन शेर लिहून झाले की मित्रांना वाचून दाखवायचा. त्यांनी वाहवा केली की त्याचा वेळ जरा आनंदात जायचा; पण तेवढ्यात दरवाज्यात देणेकरी येऊन उभा राहायचा. बायकोसमोरच तो गालिबचा पाणउतारा करायचा. नवऱ्याचा असा अपमान होताना पाहून उमराव बेगम गप्पच व्हायची. तिची ती शांतता गालिबला असह्य व्हायची. त्यातच पुन्हा तो होश उडेपर्यंत दारू पीत राहायचा. शुद्धीवर आला की सुन्न अवस्थेत बराच काळ बसून राहायचा. त्यातूनच पुन्हा काही तरी सुचायचं. हात कागदावर चालू लागायचा. गालिबच्या हातून जे महान काव्य लिहिलं गेलं त्यामागे या जीवघेण्या वेदनेचा अखंड ठणका होता.
एकदा गालिबला कोणी तरी सांगितलं की त्याची अनेक वर्र्षं रखडलेली पेन्शन पुन्हा सुरू होणार आहे, त्यासाठी कलकत्त्याला जाऊन गोऱ्या साहेबाला भेटावं लागेल. पुन्हा त्याच्या आशा पल्लवित झाल्या. पुन्हा तो उमराव बेगमशी गप्पा मारत स्वप्नं रंगवू लागला. एकदा का पेन्शन सुरू झाली, की देणेकऱ्यांचे तगादे संपतील आणि आपला नवरा आनंदाने संसार करेल, या कल्पनेने उमरावही सुखावली. प्रवासाची पूर्ण तयारी झाली. मजल-दरमजल करत गालिब कलकत्त्याला पोहोचला. गोऱ्या साहेबाच्या हापिसात दाखल झाला. आपली हक्काची पेन्शन सुरू व्हावी एवढीच माफक अपेक्षा होती गालिबची..
पण तो ब्रिटिश अधिकारी म्हणाला, “आता पेन्शन विसरा! तुम्ही ज्या बहादूरशहा जफरच्या जिवावर उड्या मारता आहात तो आता ब्रिटिश सरकारचं बाहुलं बनला आहे. ब्रिटिश नाचवतील तसं नाचण्याशिवाय त्याच्यापुढे आता दुसरा पर्याय उरलेला नाही. आत्ता, या क्षणी तुम्ही ज्या जमिनीवर उभे आहात ती जमीनही आता आमच्या मालकीची आहे. अधिक अपमान करून घ्यायचा नसेल तर आता तुम्ही इथून निघालेलं बरं.” त्या शब्दांना तलवारीसारखी धार होती. तलवारीच्या एकाच वाराने कोथळा बाहेर काढावा तसा गालिबचा आत्मसन्मान त्याने बाहेर काढला. तिथून खालमानेने बाहेर जाताना गालिब पुटपुटला,
बहुत बेआबरू हो कर तेरे कूचे से हम निकले!
गालिबच्या घरात उभं असताना हे एकेक प्रसंग मला आठवत होते. याच घरात किती सोसलं असेल गालिबने! त्याच्या घराचा वरचा मजला पाहावा म्हणून शेजारच्या जिन्यापर्यंत गेलो, तर तिथे उभा असलेला माणूस म्हणाला, “ऊपर मत जाओ। ऊपर एक लॉज है, बाकी कुछ नहीं।” तिथेच थांबलो.
गालिब अस्वस्थ असला की याच जिन्यावरून वरच्या गच्चीत जात असे. एकदा त्याच्या नवीन गझलांचा संग्रह तयार झाला होता. लवकरच तो प्रकाशनासाठी त्याच्या प्रकाशक मित्राकडे पाठवायचा होता. गच्चीत बसून गालिब त्या गझलांवर शेवटचा हात फिरवत होता. खाली घरात उमराव बेगमला कळा सुरू झाल्या होत्या. तोवर ती सहा वेळा गर्भार राहिली होती, आणि प्रत्येक वेळेला तिच्या पोटी मृत बाळ जन्माला आलं होतं. गालिबच्या वेदनेला पारावार नव्हता. या सातव्या वेळी मात्र दोघांनाही खात्री होती, छान गोंडस बाळ जन्माला येणार. संसाराला अर्थ प्राप्त होणार. एका बाजूला गालिब आपलेच शेर वाचत होता आणि मनात मात्र हुरहूर दाटली होती. कारण बाळाच्या रडण्याचा आवाज ऐकण्यासाठी तो अधीर झाला होता. नकळत संपूर्ण गच्चीभर येरझारा घालत होता. तेवढ्यात उमरावच्या ओरडण्याचा मोठ्यांदा आवाज आला. घरातली दासी धावत वर आली आणि म्हणाली, “उमराव बेगम सुखरूप आहे, पण पुन्हा एकदा बाळ मेलेल्या अवस्थेतच जन्मलं आहे.”
तो धक्का गालिबसाठी भयानक होता. तो मटकन खाली बसला. हातातला कवितांचा गठ्ठा सुटला. वाऱ्याच्या झोताने ते कागद वाट फुटेल तिकडे उडत गेले. पुन्हा निराशा. पुन्हा वैफल्य. पुन्हा दारू. पुन्हा झोप उडणं. प्रत्येक वेळी आपल्याशीच असा दुष्टावा का मांडला जात होता, या प्रश्नाचं उत्तर गालिब जन्मभर कवितेतूनच शोधत राहिला. जन्मजात अर्भकाचा अंत्यविधी करण्याची वेळ त्याच्यावर सात वेळा आली. त्या कलेवरांवर माती पसरताना प्रत्येक वेळी तो स्वत:ची स्वप्नंच दफन करत होता.
पुढे काही दिवसांनी बाजारातून चालत असताना त्याला ओळखीचे शब्द ऐकू आले. नकळत जिने चढत तो त्या कोठीमध्ये गेला. समोर गाणं चालू होतं. ती गालिबचीच गझल होती. त्या गाणारणीने पाच-सहा शेरांतच गाणं संपवलं. गालिबने पुढचे शेर म्हणायला सांगितलं. त्यावर ती म्हणाली, “परवा माझ्या नोकराला मी चूर्ण आणायला सांगितलं. ते ज्या कागदात त्याने बांधून आणलं त्या कागदावर एवढेच शेर लिहिलेले होते. त्यामुळे पुढचे मला माहिती नाहीत.” याचा अर्थ गच्चीवरून उडालेले गझलांचे कागद दुकानांमध्ये पुड्या बांधण्यासाठी वापरले गेले होते तर!
पुढचे शेर म्हणत गालिब कोठीच्या बाहेर पडला. ‘हे शेर तुम्हाला कसे माहिती?' हा गाणारणीचा प्रश्न त्याच्या कानाच्या आत पोचलाच नाही. तो तसाच जिना उतरू लागला. वरून तिने ओरडून विचारलं, “अरे, तू आहेस तरी कोण?”
गालिबच्या हयातीत आणि तो जाऊन दीडशे वर्षं उलटल्यानंतरही एक प्रश्न विचारला जातोच आहे-
‘ये कंब्ख़त गालिब कौन है?'
आनंद अवधानी
आनंद अवधानी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आहेत. उद्योग आणि उद्योजकता विकास, प्रशासकीय अधिकारी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील कर्तबगार व्यक्ती, तसंच स्वयंसेवी संस्था आणि स्वयंप्रेरित व्यक्ती यांच्या कामाबद्दल त्यांना विशेष आस्था आहे.
