आम्ही कोण?
ले 

आणि मी यशवंतरावांच्या ऋणानुबंधात गुंतून पडलो..

  • ना.धों. महानोर
  • 12.03.26
  • वाचनवेळ 13 मि.
yashwantrao chavan

माझ्या तरुणपणी मी यशवंतराव चव्हाणांबद्दल खूप ऐकलं होतं. त्यांच्या राजकारणासंबंधी, मुत्सद्दीपणासंबंधी आणि त्यांच्यातील जाणत्या, सुजाण, सुसंस्कृत नेत्याविषयी. साहित्य-कला-संस्कृती संबंधीच्या त्यांच्या असाधारण आस्थेबाबतही मला अनेकांनी सांगितलं होतं. साहित्य-कलेच्या क्षेत्रातलं त्यांचं जाणतेपण व अकृत्रिम रसिकता, नवीन ग्रंथांचं वाचन व त्यासंबंधी चर्चा करणं याबद्दल अनेकजण भरभरून सांगत. मी शाळेत असल्यापासून वृत्तपत्र व आकाशवाणीच्या माध्यमातून सतत त्यांच्याबद्दल वाचत-ऐकत असल्याने त्यांच्याबद्दलचं प्रेम व आकर्षण माझ्या मनात रुजत गेलं. त्यांना कधी समोरासमोर पाहता येईल का, असं खूप दिवस मनात घर करून होतं. माझं शिक्षण खूपच लहान खेड्यात, आडवळणाने झालं. मराठी बिगरी ते चौथीचं शिक्षण तीन वेगवेगळ्या दूरच्या खेड्यांमध्ये वणवण करत झालं. नंतर पाचवी ते अकरावीचं शिक्षण माझ्या पळसखेडपासून दहा किलोमीटर अंतरावरच्या जळगाव जिल्ह्यातल्या गावी झालं. नंतरची एक-दोन वर्षं जळगावच्या महाविद्यालयात काढली. पुढे शिक्षण अर्धवट सोडून मी अठराव्या वर्षी घरी पळसखेडला आलो तेव्हापासून त्या एक हजार लोकवस्तीच्या खेड्यातच मी मुक्काम ठोकून आहे. अशा दूरच्या खेड्यातल्या माणसाला यशवंतरावांना पाहावंसं वाटलं, तरी ते शक्य कसं होणार?

१९५७ची संयुक्त महाराष्ट्राची चळवळ महाराष्ट्राच्या राजकारणाला संपूर्ण कलाटणी देणारी होती. महाराष्ट्राच्या इतिहासात या चळवळीला खूपच महत्त्वपूर्ण स्थान आहे. या चळवळीने सगळ्यांनाच खूप नव्याने शिकवलं, नवा इतिहास घडवला. शेंदुर्णी हे जळगाव जिल्ह्यातलं मोठं गाव. शेंदुर्णीच्या परिसरातल्या पंचवीस खेड्यांतले विद्यार्थी त्या वेळी शेंदुर्णीला शिकायला राहायचे. शेंदुर्णीच्या विद्यालयाने, त्या वेळच्या तिथल्या शिक्षकांनी, तिथल्या वाचनालयांनी व त्या वेळच्या राजकीय-सामाजिक घडामोडींनी माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना खूप शिकवलं. तिथे येणाऱ्या-जाणाऱ्या थोरामोठ्यांचे आमच्यावर खोलवर संस्कार झाले. नाटकांतल्या भूमिका, वक्तृत्व, वाचन, काव्यप्रेम या गोष्टींमुळे मी तेव्हा लोकप्रिय विद्यार्थी होतो. त्याचा वापर त्या वेळचे शेंदुर्णीचे सगळे लोक करून घेत. मी ज्या शिक्षणसंस्थेत शिकत होतो त्या शिक्षणसंस्थेचे गजाननराव गरुड हे अभ्यासू व तडफदार असे राजकीय कार्यकर्ते होते. आमच्या भागात संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं वारं होतं. ते प्रामुख्याने समाजवादी पक्षाच्या वतीने वाहायचं. त्यामुळे आमच्यावर या पक्षाचा प्रभाव होता. परिणामी, मी समाजवादी पक्षाच्या उमेदवारांसाठी काम करत असे. मी शाळेत असतानाच्या त्या दोन-पाच वर्षांच्या काळात नानासाहेब गोरे, एस. एम. जोशी, बॅ. नाथ पै, आचार्य अत्रे, बापूसाहेब काळदाते, शाहीर अमर शेख अशा किती तरी थोर माणसांनी शेंदुर्णीला काबीज केलेलं होतं. मी या सगळ्या लोकांमध्ये वावरत होतो. त्यांच्या भेटीगाठी व विचारांचे माझ्यावर त्या वेळी खोल परिणाम झाले. चांगलं वाचन व साहित्य-कला मला जवळचं होतं. त्याच वेळी त्या लोकांच्या भेटीगाठींच्या परिणामांमुळे समाजकारण, राजकारण थोडंबहुत आपलं वाटायला लागलं.

हेही वाचा - भाई माझ्या सोयगावला आले तेव्हा..

त्या वेळी काँग्रेसची परिस्थिती सर्वदूर विदीर्ण झालेली होती. त्यामुळे सर्वत्र काँग्रेसचे उमेदवार पडणार असं वाटत होतं. मोठमोठ्या सभा घेऊन देशातल्या ज्येष्ठ नेत्यांना लहान लहान खेड्यांमध्ये भाषणांसाठी आणलं जात होतं. सर्वत्र रणधुमाळीचं वातावरण होतं. पळसखेड या माझ्या खेड्यापासून जेमतेम एक किलोमीटर अंतरावर वाकोद नावाचं खेडं आहे. तिथे चक्क तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची सभा आयोजित केली गेली होती. म्हणजे जवळपास माझ्याच खेड्यात पंतप्रधान नेहरू व मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण येणार होते. त्यामुळे लोकांना खूप आनंद झालेला होता. या दोन्ही नेत्यांचं खूप आकर्षण लोकांमध्ये होतं. त्या आकर्षणापायी लहान मुलं, म्हातारे, बायाबापड्या, राजकारणी, सामान्य शेतकरी असे सारेच उत्स्फूर्तपणाने पायी, बैलगाड्यांवर जसं जमेल तसे या सभेला जमले होते. थोडीथोडकी नव्हे, तब्बल दीड-दोन लाख लोकांची झुंबड वाकोदच्या सभेला झाली होती. आम्ही मुलं सकाळीच सभेच्या ठिकाणी जाऊन अगदी समोरची जागा घेऊन बसलो होतो. पंतप्रधान नेहरूंनी व्यासपीठावर चढण्यापूर्वी एका चिमुरड्या मुलीला गुलाबाचं फूल देऊन तिचा पापा घेतला. मग सभोवार बघून सर्वांना नमस्कार केला. मुख्यमंत्री यशवंतरावांसमवेत नेहरू व्यासपीठावर चढताच प्रचंड टाळ्यांचा व घोषणांचा निनाद झाला. त्याचा त्यांनी स्वीकार केला.

नेहरू छान सोप्या हिंदीत बोलले. यशवंतरावांनी मराठीत भाषण केलं. त्यांची भाषा बोलीभाषेचे, लोकसाहित्याचे संस्कार व सौंदर्य असलेली व कमावलेली होती. खेड्यातल्या जीवनातले सुख-दु:खाचे संदर्भ घेऊन त्यांच्या प्रश्नांना व शेतकऱ्यांच्या काळजाला हात घालणारं यशवंतराव बोलले. लहान लहान वाक्यं, सुंदर सोपी मराठी. कुठेही अलंकरण नाही. पण भावनाशील भाषणाने दीड-दोन लाख लोक अक्षरश: भारावून गेले. कुणावरही व्यक्तिगत टीका न करता, चिडचिड न करता शांतपणाने ते बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी ज्येष्ठ विरोधी नेत्यांच्या विचारांची अक्षरश: चिरफाड केली व सभा जिंकली.

आम्ही पक्की समाजवादी प्रचारक मुलं; पण त्यांच्या प्रभावी भाषणाने पुरते गडबडून गेलो, अर्धेअधिक ढिले झालो. त्या भाषणामुळे त्यांची एक जबरदस्त छाप माझ्यावर पडली. त्या दिवसापासून मी यशवंतरावांच्या विचारांच्या ऋणानुबंधात गुंतून पडलो.

yashwantrao chavan

त्या सभेनंतर तीनच वर्षांनी पुन्हा एकदा यशवंतरावांचं दर्शन झालं. १९६० साली जळगाव जिल्ह्यातल्या पाचोरा या गावी कृषी खात्याने फार मोठं राज्यव्यापी प्रदर्शन भरवलेलं होतं. फार मेहनत घेतली होती त्यांनी. त्या प्रदर्शनाला जोडून शेतकरी मेळावा होणार होता. त्याला मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण येणार असल्याने व शेतकरी मेळावा असल्याने खूप शेतकरी तिथे पोहोचले. त्यात मीही होतो. शेतीचं नवीन तंत्रज्ञान, शास्त्रीय ज्ञानाची प्रत्यक्ष शेतीतल्या प्रयोगांमधली गरज व परिवर्तनामुळे येणारी शेतीमधली आर्थिक सुबत्ता हे मुद्दे अधोरेखित करत परंपरागत शेतीच्या कल्पना दूर सारण्याचं आवाहन यशवंतरावांनी केलं. ते एका जातिवंत शेतकऱ्याचं भाषण आहे असं मला वाटलं. परंपरागत शेतीतला चांगला भाग घेऊन जगभरच्या नवनवीन प्रयोगांची जोड दिली तर खेड्यांचा व शेतकऱ्यांचा चेहरा बदलेल, ही गोष्ट त्यांनी साऱ्यांना कळकळीने सांगितली. कृषी विद्यापीठांची स्थापना करून तेथील नव्या प्रयोगाचं ज्ञान शेतकऱ्यांच्या मुलांपर्यंत जावं म्हणून धडपड चाललेली आहे, त्यात नव्या विचारांनी सहभागी व्हावं व शासनालाही मार्गदर्शन करावं, असं आवाहन त्यांनी प्रगत शेतकऱ्यांना व शास्त्रज्ञांना केल्याचं मला आठवतंय. सत्तर टक्के शेतकरी समाजाची आर्थिक स्थिती वाईट आहे; त्यात सुधारणा घडवून आणली तरच नवं राज्य करण्यात अर्थ आहे, असं सांगून चार कृषी विद्यापीठांच्या मांडणीची पुढे विभागश: सुरुवात करण्याचं सूतोवाच त्यांनी केलं होतं.

परभणी कृषी विद्यापीठाच्या स्थापना समारंभप्रसंगी त्यांनी जे भाषण केलं होतं ते या भाषणाच्या अनुषंगाने इथे नमूद करतो.

ते म्हणाले होते, “शेतीच्या शास्त्रीय शिक्षणाचा दृष्टिकोन लोकांमध्ये वाढवला पाहिजे. यासाठी इथे शिकणारे शेतीचे सगळे स्नातक निव्वळ शेतकी खात्याकडे अधिकारी होऊन जाणार असले आणि जावयाच्या शर्यतीमध्ये त्या निमित्ताने पुढे जाणार असले तर मी असं म्हणेन की ती दुसरी शोकपर्यवसायी गोष्ट होईल. इथे शिकलेला मनुष्य शेतकरीही होऊ शकला पाहिजे. तसे त्याने झाले पाहिजे. तुमची शेती हा निव्वळ तुमचा विचार राहिलेला नाही. तुमची शेती हा देशाचा विषय झालेला आहे. तुमची शेती तुमची आहे तशी ती देशाचीही आहे. तुमची शेती पिकली नाही तर तुमचं नशीब पिकणार नाही, एवढाच त्याचा अर्थ नाही, तर त्याचबरोबर देशाचंही नशीब पिकणार नाही.”

यशवंतरावांच्या अशा नवविचाराने आमच्या सगळ्या शेतकरी समाजाच्या मनावर खोलवर परिणाम होत होते. हे भाषण किती दूरदर्शी व शेतीचा खोलवर विचार करणार होतं, हे जाणवत राहिलं. पुढे राज्य शासनाचे नवे निर्णय होत गेले. पाणी व दुष्काळी, मागासलेल्या प्रदेशातल्या शेतीच्या प्रश्नांची व दुष्काळी कोरडवाहू शेतीला निदान दोन-तीन पाण्याच्या व्यवस्थेची रचना नव्या योजना आखून केली गेली.

उजनी धरणाच्या भूमिपूजनाच्या वेळी त्यांनी एक भाषण केलं होतं, त्यात त्यांनी दुष्काळी सोलापूर जिल्ह्याच्या अनुषंगाने पाणीप्रश्न मांडला होता. ते म्हणाले होते, “पंढरीच्या विठ्ठलाच्या या परिसरात, त्याच्या या पंचक्रोशीत आज मोठ्या आनंदाने मी आलो आहे. येताना मनात मी विठ्ठलाला म्हणालो, ‘चंद्रभागा तुझ्या अंगणात पोहोचण्यापूर्वीच आज आम्ही तिला अडवली आहे. तिला आज आम्ही साकडं घातलं आहे. तुझ्या धरणांजवळ ही चंद्रभागा अठ्ठावीस युगं वाहत आली. या चंद्रभागेला उजनीजवळ आज आम्ही थांबवतो आहोत. महाराष्ट्रातील शेतकरी दरसाल आषाढी-कार्तिकी एकादशीला खांद्यावर पडशी टाकून ‘ग्यानबा-तुकाराम' म्हणत म्हणत तुझ्या दाराशी येत असतो. त्या ग्यानबा-तुकारामाच्या शेतीत आणि झोपडीत विठ्ठला, आता तू जा. तिथे तुझ्या चंद्रभागेला भेट. जनाबाईच्या मदतीलाही तू धावून गेलास. तशीच तुझी भक्ती करणाऱ्या महाराष्ट्राच्या झोपडीत गरीब शेतकऱ्यांनी आज तुझी चंद्रभागा अडवली आहे. त्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या मदतीसाठी विठ्ठला, तू त्यांच्या शेतीत जा. तू आता पंढरपूरच्या मंदिरात राहू नकोस.' मी ही मनोमन प्रार्थना केली आहे. तुकारामाची, ज्ञानेश्वराची, एकनाथाची आठवण करून मी ही प्रार्थना केलेली आहे. पण कृपा करून आपण हे मात्र लक्षात ठेवा, की निव्वळ प्रार्थनेने हे सगळं घडणार नाही. त्यासाठी तुमच्या कष्टाची गंगा उपसावी लागणार आहे. त्यासाठी जिद्दीने काम करण्याचा आपण निश्चय करू या.” असं सारं सांगणारे यशवंतराव हृदयाच्या फार जवळचे होऊन गेले होते.

सांगण्यासारखी आणखी एक गोष्ट म्हणजे पाचोऱ्याच्या शेतकरी मेळाव्याच्या ठिकाणी राधाबाई बुधगावकर आणि त्यांच्या कुटुंबीयांचा लोकनाट्याचा प्रयोग झाला होता. त्यातील अस्सल मराठमोळं लोकनाट्य व खड्या आवाजातल्या लोकसंगीतातल्या रचना यशवंतरावांना प्रभावित करून गेल्या होत्या. यशवंतरावांमधील रसिक साहित्यिक तिथे जागा झाला.

त्यांनी या कलावंतांची मनात नोंद करून घेतली. संरक्षणमंत्री या नात्याने त्यांनी नेफा-लडाखच्या युद्धाच्या कठीण परिस्थितीत राधाबाई बुधगावकर व त्यांच्या कुटुंबीयांचं घरंदाज मराठमोळं वगनाट्य जवानांच्या रंजनासाठी आठवणीने पाठवलं. त्यांचा नंतर योग्य गौरवही केला. या सगळ्या घटनांनी मी मनाने त्यांच्या जवळ जात राहिलो.

हेही वाचा - मराठा वादळाचं दुखणं काय; उपाय काय?

१९६३ साली मराठवाडा साहित्य परिषदेच्या इमारतीचं भूमिपूजन त्यांच्या हातून झालं. रा. गो. साळवी यांच्या ‘स्वाधीन की दैवाधीन' पुस्तकाचं प्रकाशन झालं. आजवर निजामी राजवटीमध्ये असलेल्या मराठवाड्यात मराठी भाषेची जी गळचेपी झाली होती तीतून सुटका होण्यासाठी साहित्य परिषदेसारख्या संस्थेसाठी त्यांनी आर्थिक तरतूद केली. साहित्य व संशोधन यात खूप व्यासंगीपणाने काम केलेल्यांचा त्यांनी मुद्दाम गौरव केला. ‘माझी मायबोली आज आली माहेराला' याचा खूप खूप आनंद त्यांच्या भाषणात ओतप्रोत होता. त्यांचं साहित्यावरचं भाषण हे एका जातिवंत जाणत्या साहित्यिकाचंच भाषण होतं. हे भाषण मी लांबवर बसून ऐकलं होतं. त्यांच्या संपन्न, विचारशील आणि साहित्यिक व्यक्तिमत्वामुळे मी व माझे कित्येक स्नेही त्यांचे चाहते झालो. खेड्यातला माझा संकोच मला दूर घेऊन बसायचा. मात्र, दूरवर बसूनही मी त्यांचा झालो.

रानातल्या कविता (१९६८), वही (१९७०), गांधारी (१९७३) ही माझी पहिली तीन पुस्तकं खूप गाजली. या पुस्तकांनी मला महाराष्ट्राचं केलं. त्याच वेळी जवळपास सगळ्याच विद्यापीठांत ही पुस्तकं अभ्यासक्रमात लागली. त्यांची भाषांतरं अनेक भाषांमध्ये झाली. त्यांवर चर्चा, परिसंवाद झाले. चांगलं काव्यवाचन करून मी माझी कविता सर्वत्र पोचवली. या माझ्या तीनही पुस्तकांना महाराष्ट्र राज्याची उत्तम साहित्यनिर्मितीची पारितोषिकं व सन्मान मिळाले. नव्या लेखकांच्या बाबतीत यशवंतराव जागरूक व स्वागतशील असायचे, त्यांच्या जवळ जायचे. मलाही हे माहीत होतं. परंतु मला पुष्कळ लोकप्रियता व राज्यमान्यता मिळूनही, का कोण जाणे, डिसेंबर १९७४ पर्यंत त्यांची-माझी ओळखही झाली नव्हती. मी त्यांच्या वाचनातून कसा सुटलो हे आजवर मला कळलेलं नाही. यशवंतरावांच्या जवळ जाऊन ओळखदेख करून घेण्याची इच्छा अगोदरच्या अनेक कारणांमुळे व घटनांमुळे होतीच. बोलायचीही इच्छा होती. एक-दोनदा जिल्हा बँक, जिल्हा परिषदा व इतर विकासकामांच्या मोठ्या समारंभांत यशवंतराव औरंगाबादला आलेले असताना त्यांना भेटण्याचे थोडे प्रयत्नही मी राजकीय नेत्यांकडून करून पाहिले होते. पण आमच्याकडले राजकारणी फार भारी. माझ्यासारख्या खेडवळ पोराला व तेही कविता वगैरे लिहिणाऱ्याला ते थेट यशवंतरावांना कसे भेटू देणार?

पण तो क्षण लवकरच आला. निमित्त झालं १९७४ चं इचलकरंजीचं साहित्य संमेलन. या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते पु. ल. देशपांडे. त्यांच्या लोकप्रियतेमुळे हजारो चाहते रसिक संमेलनस्थळी आलेले होते. चित्रपट, नाट्य, नृत्य, संगीत या क्षेत्रांतही पुलंचे संबंध व कर्तृत्व असल्याने त्या क्षेत्रांतील मंडळी फार मोठ्या प्रमाणावर संमेलनास आली होती. राजकारण, समाजकारण अशा अनेकविध क्षेत्रांतले लोकही होते. राजकारण्यांनी व्यासपीठावर येऊ नये, असा वाद व चर्चा त्या साहित्य संमेलनापूर्वी महिनाभर गाजत होत्या.

पन्नास हजार रसिकांच्या उपस्थितीत संमेलन वाजत-गाजत सुरू झालं. यशवंतराव एक श्रोता म्हणून व्यासपीठाच्या समोर लोकांमध्ये बसले होते. अनेक उत्साही राजकारणी व साहित्यिक यशवंतरावांनी व्यासपीठावर जाऊन बसावं म्हणून आग्रह करत होते; पण कोणाचंही न ऐकता यशवंतराव शांतपणाने लोकांमध्ये बसून राहिले. त्यामुळे वादातला पारा व अकारण चर्चा दोन तासांत संपून गेली होती. साहित्याशिवाय तिथे काहीएक शिल्लक राहिलं नाही. तीन पिढ्यांमधले साहित्यिक आलेले होते. त्या सगळ्या साहित्यिकांत यशवंतराव पूर्णपणाने एकरूप झाले. त्यांच्याकडून नवीन लेखन, नवीन साहित्यप्रवाह समजावून घेत राहिले. नवीन लेखकांशी व अपरिचित लेखकांशी स्वत:हून विचारपूस करून त्यांनी जवळीक साधली. राजकारणाचा आडपडदा दूर सारून यशवंतराव एक रसिक म्हणून साहित्य संमेलनात वावरत होते.

साहित्य संमेलनात दोन कविसंमेलनं होती. दोन्ही कविसंमेलनांत श्रेष्ठ कवी व नवोदित कवी अशी सारखी विभागणी करून कविसंमेलनांची चांगली आखणी केलेली होती. श्रेष्ठ कवींचं कविसंमेलन वेगळं व नवोदित कवींचं वेगळं असा प्रकार केलेला नव्हता. तिथे मी पहिल्यांदाच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर कविता वाचल्या. कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी कवी वि. द. घाटे होते. विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, इंदिरा संत अशा नावाजलेल्या कवींनी प्रत्येकी दोन कविता वाचल्या. कविता गाजलेल्या होत्या व कवी चांगलं कवितावाचन करणारे होते. समोर पन्नास हजार लोकांचा रसिक जाणता समुदाय होता. स्वत: पु. ल. प्रत्येक कवीच्या अगोदर प्रास्ताविक करून कवितेवर परिचयात्मक बोलत होते.

माझी वेळ आली. ‘डोळे थकून थकून गेले, पाखरासारखा येऊन जा' ही चार ओळींची कविता मी वाचली. सगळं सभागृह टाळ्यांच्या कडकडाटाने भरून गेलं. माझ्या कवितेचं उत्स्फूर्त स्वागत झालं. माझ्या कविता वाचून मी बसायला लागलो तेव्हा सभागृहातले लोक बिलकूल ऐकायला तयार नव्हते. मी आणखी कविता वाचाव्यात असा आग्रह ते धरून होते. मग मी आणखी पाच-सहा कविता सादर केल्या. तरीही आग्रह चालूच. शेवटी ‘दुसऱ्या दिवशी होणाऱ्या कविसंमेलनातही महानोर कविता वाचणार आहे,' असं पुलंनी सांगितल्यावरच लोक थांबले. माझा पहिल्याच संमेलनातला पहिला दिवस असा महत्त्वपूर्ण व कवितेला भक्कम करणारा ठरला होता. माझ्या आयुष्यातला हा सगळ्यात आनंदाचा दिवस!

त्याच दिवशी सायंकाळी आठ वाजता रात्रीच्या कार्यक्रमात कुमार गंधर्वांचं गाणं होतं. मी तिथेच साहित्यिकांच्या गर्दीत कुठे तरी भटकत होतो. रणजित देसाई व नरहर कुरुंदकर मला शोधत त्या ठिकाणी आले.

“या, मोटारगाडीत बसा.” रणजित देसाई म्हणाले.

“कुठे जायचं?”

“तुम्ही गाडीत तर बसा, मग सांगतो.”

“तरी पण..”

“परराष्ट्रमंत्री यशवंतराव चव्हाणांकडे.”

मी एकही शब्द न बोलता नुसता पाहत राहिलो.

“साहेबांनी कोल्हापूरचे सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. व्यंकटेश रंगतंतू मिल्समध्ये ते थांबलेले आहेत. तू त्यांना तुझ्या कविता ऐकवाव्यात अशी त्यांची इच्छा आहे. तुझ्या कवितांनी ते अक्षरश: वेडे झालेले आम्हाला दिसले. आमचा भाव आता थोडा कमी झालाय!” असं सांगून रणजित देसाई मला घेऊन गेले. तिथे रात्रीचं जेवण व कवितांची मैफल असा कार्यक्रम बांधलेला होता. कवी अनिल, बा. भ. बोरकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट, विंदा करंदीकर, इंदिरा संत अशा ज्येष्ठ आठ-दहा कवींमध्ये त्या रात्री मीही मैफिलीत सामील झालो. संमेलनाध्यक्ष पु. ल. देशपांडे, सुनीताबाई देशपांडे व पन्नास-साठ नामवंत साहित्यिक, शंभरेक राजकारणी व समाज-कार्यकर्तेही होते. मैफल छान झाली. पहाटे तीन वाजेपर्यंत काव्यवाचन व गप्पा. अविस्मरणीय अशी ती कवितेची रात्र होती.

रात्रीची मैफल संपल्यावर यशवंतरावांनी मला थांबवलं. त्यांच्याशी बोलताना माझ्या लक्षात आलं, की आज दिवसभरात त्यांनी पुस्तकांच्या दुकानातून माझे काव्यसंग्रह विकत घेतलेले होते. त्यांनी मला ते दाखवले. याशिवाय आणखी काही लिहिलं आहे का, असं आस्थेने विचारलं. माझी दोन पुस्तकं मी त्यांना सही करून दिली.

माझ्याबद्दल त्यांच्या मनात अनेक प्रश्‍न होते.

‘हजार लोकवस्तीच्या एवढ्याशा खेड्यात कसे राहता?'

‘घरी सगळे अशिक्षित आहेत, तर कवितेचा छंद कसा जडला?'

‘छंद जडला हे ठीक, पण तो इतका चांगला कसा वाढवला?'

‘घरी थोडीशीच बरड शेती आहे म्हणता, परिस्थिती एकुणात प्रतिकूल आहे, मग शेतीत काय पिकवता? किती माणसांचं कुटुंब?' असं काय काय त्यांनी मला विचारलं. मग त्यांनी माझा पत्ता लिहून घेतला. मी फारच कमी बोलतोय व घाबरतोय हे त्यांच्या लक्षात आलं होतं. त्यांनी मला मुलासारखं मायेने जवळ घेतलं, विश्वास दिला. म्हणाले, “आता आपण कायम भेटत राहणार. काहीही अडचण असो, संकोच न करता मला भेटा. फक्त तुमच्या कवितेकडे दुर्लक्ष करू नका.” त्यांच्या प्रेमात त्यांनी मला कायम बांधून ठेवलं.

एकुणात, इचलकरंजीच्या साहित्य संमेलनाने मला चांगली लोकप्रियता दिली, माझ्या कवितेला शक्ती दिली. रसिक, साहित्यिक जवळ केले. यशवंतरावांसारखा माणूस माझ्या वाट्याला आला. त्यांची-माझी भेट व्हावी, चांगली ओळख व्हावी अशी इच्छा इचलकरंजीत पूर्ण झाली.

ना.धों. महानोर







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results