आम्ही कोण?
काय सांगता?  

वंशभेदाचा असाही परिणाम

  • प्रीति छत्रे
  • 16.05.25
  • वाचनवेळ 2 मि.
  • Share on Tweeter
  • Share on Whatsapp
  • Share on Facebook
peter norman

१९६८ सालचं मेक्सिको सिटी ऑलिंपिक्स. ‘ट्रॅक ॲन्ड फील्ड’ प्रकारात पुरूषांची २०० मी.ची अंतिम फेरी पार पडली. विजेते होते टॉमी स्मिथ (अमेरिका, सुवर्ण), पीटर नॉर्मन (ऑस्ट्रेलिया, रौप्य), जॉन कार्लोस (अमेरिका, कास्य).

यांतले टॉमी स्मिथ आणि जॉन कार्लोस अॅफ्रो-अमेरिकी होते. तर पीटर नॉर्मन श्वेतवर्णी होता. टॉमी आणि जॉन दोघांनीही ठरवलं होतं, की पदक स्वीकारताना वंशभेदाच्या विरोधात आवाज उठवायचा; कृष्णवर्णीय खेळाडूंची हलाखीची आर्थिक परिस्थिती जगासमोर आणायची. (त्या काळात अमेरिकेत वंशभेदाच्या विरोधातली नागरी हक्क चळवळ जोरात सुरू होती.) दोघांनी पीटरचं याबद्दलचं मत विचारलं. त्यांना ते आवश्यक वाटत होतं. पीटरने त्यांना लगेच सहमती दर्शवली. त्याच्या स्वतःच्या देशातल्या White Australia Policy च्या विरोधात त्यालाही आवाज उठवण्याची इच्छा होती.

टॉमी आणि जॉनने आपापल्या गणवेषावर ‘ऑलिंपिक प्रोजेक्ट फॉर ह्युमन राईट्स’चा एक-एक बिल्ला लावला होता, तसाच एक पीटरनेही स्वतःसाठी मागून घेतला. पदकसोहळा पार पडला. पदकाच्या मंचावरच टॉमी आणि जॉन दोघांनी एक एक हात उंचावून आपला प्रतिकात्मक निषेध नोंदवला.

झालं, तिथे खळबळ माजली. टॉमी आणि जॉनची ऑलिंपिक्स-व्हिलेजमधून तात्काळ हकालपट्टी झाली. अमेरिकेत परतल्यावरही त्यांना जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या. काही काळानंतर त्यांच्या या लढ्याला मान्यताही मिळाली.

मात्र या घटनेनंतर पीटर नॉर्मनला जी वागणूक मिळाली ती फारच धक्कादायक होती. ऑस्ट्रेलियाच्या एकंदर ऑलिंपिक्स-चित्रातून पीटरला जणू खोडून टाकण्यात आलं. १९७२ सालच्या म्युनिक ऑलिंपिक्ससाठी तो पात्र ठरला होता. पण तरीही त्याला ऑस्ट्रेलियाच्या चमूतून वगळलं गेलं. इतकंच नव्हे, तर त्याला उदरनिर्वाहासाठी नोकरी मिळवणंही मुश्किल होऊन बसलं. त्याने केवळ एकदा आपल्या ‘त्या’ कृत्याची माफी मागितली असती तर हे चित्र बदललं असतं; त्याला २००० सालच्या सिडनी ऑलिंपिक कमिटीत सन्माननीय सदस्यत्त्व मिळालं असतं. पण त्याने तसं केलं नाही.

दरम्यान तो निराशा आणि दारूच्या व्यसनात पूर्णपणे गुरफटला गेला आणि २००६ साली हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा तडकाफडकी मृत्यू झाला. वंशभेदाच्या अंतःप्रवाहांनी एका उमद्या खेळाडूचा जीव घेतला. ही घटनाही कुणाच्या गावी नव्हती. पण टॉमी आणि जॉन मात्र त्याच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले.

२००८ मध्ये पीटरच्या पुतण्याने SALUTE या माहितीपटातून पीटरची कथा जगासमोर आणली.

पीटरच्या मृत्यूनंतर सहा वर्षांनी ऑस्ट्रेलिया सरकारला आपली चूक उमगली. २०१२ साली ऑस्ट्रेलियाच्या संसदेने एका निवेदनामार्फत पीटरची जाहीर माफी मागितली. 

प्रीति छत्रे | preeti.chhatre22@gmail.com

प्रीति छत्रे 'युनिक फीचर्स पोर्टल'च्या सहसंपादक आहेत. अनुभवपर ललितलेखन आणि अनुवाद यात त्यांना विशेष रस आहे.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 2

अस्मिता फडके17.05.25
कठीण आहे
उमेश वाघेला 16.05.25
फारच धक्कादायक! सत्याची वाट फारच कठीण असते. स्वाभिमानी लोकांना फार सहन करावं लागतं. ऑस्ट्रेलिया सरकारने उशिरा माफी मागून तरी काय उपयोग? पीटर सारखा मानवतावादी ते पहायला, आपलं आयुष्य जगायला राहिला नाही. असे पुन्हा घडू नये हीच अपेक्षा...
See More

Select search criteria first for better results