आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

निदान ऐका आजच्या हाका

  • राजीव काळे
  • 22.02.25
  • वाचनवेळ 10 मि.
  • Share on Tweeter
  • Share on Whatsapp
  • Share on Facebook
zadazadati-diwali-ank

आपली वाचनसंस्कृती दिवसेंदिवस आक्रसत चालली असल्याची तक्रार सतत होत असते. वाचनसंस्कृती जोपासण्याची-वाढवण्याची जबाबदारी नेमकी कुणावर आहे आणि ते घटक ही जबाबदारी पार पाडताहेत की नाही, याची झाडाझडती घेण्याचा प्रयत्न ‘अनुभव’ मासिकाने १२ वर्षांपूर्वी एका लेखमालिकेतून केला होता. त्यासाठी या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींना लिहितं केलं होतं. दिल्लीतील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर त्यातले निवडक लेख पुनर्प्रकाशित करत आहोत. आज एका तपानंतर वाचनसंस्कृतीच्या परिस्थितीत काही बदल झाला आहे का हे वाचकांनी ताडून बघावं. या मालिकेतील पहिला लेख आहे मराठी वाचन संस्कृतीतील शिरपेच मानल्या जाणाऱ्या दिवाळी अंकांबद्दलचा.

'सावध ऐका पुढल्या हाका....’ असं केशवसुतांनी म्हणून ठेवलं त्याला फार फार वर्षं झाली. हा सल्ला त्यांनी दिला तो समस्तजनांना, पण काहीसा वेगळ्या संदर्भात. इथे आपण त्याचा संदर्भ आपल्या सोयीने घेतला थोडा, तर केशवसुत त्याविरोधात तुतारी फुंकणार नाहीत हे नक्की! आता समस्तजन म्हणजे त्यात मराठी लेखक, कवी, संपादक, विचारवंत, बुद्धिजीवी वगैरे आलेच. मराठीतील पहिला दिवाळी अंक ‘मनोरंजन’ काढणारे का. र. मित्र हे संपादक, म्हणून तेही त्यात आले. मित्र यांची वृत्ती अशा पुढल्या हाका ऐकण्याची होती?

रूढार्थाने मराठी दिवाळी अंकाची परंपरा ‘मनोरंजन’ पासून सुरू झाली असं मानलं जातं, आणि त्यास तशी मान्यता असणं अगदी साहजिक आहे. बाळकृष्ण विष्णू भागवत हे गृहस्थ ‘मित्रोदय’ मासिक चालवायचे. ‘मनोरंजन’चा दिवाळी अंक आला सन १९०९ मध्ये. त्याच्या चार दिवाळ्यांमागे १९०५ साली भागवतांनी ‘मित्रोदय’चा जो अंक काढला होता त्यावर ‘नोव्हेंबर दिवाळीप्रीत्यर्थ’ असं नमूद केलं होतं. आता, महिना दिवाळीचा आहेच, तर मासिकावर ‘दिवाळीप्रीत्यर्थ’ असा उल्लेख करून टाकू या, असा सोपा विचार त्यामागे होता, की खरोखरच ‘दिवाळी अंक' म्हणून आपण हा अंक काढू या, अशी संकल्पना भागवत यांच्या डोक्यात होती ते कळायला मार्ग नाही. भागवतांचा हा नोव्हेंबर दिवाळीप्रीत्यर्थ अंक अंगकाठीने अगदीच बेताचा होता. फक्त २४ पानी. त्यात १६ पानं मराठी मजकूर आणि ८ पानं इंग्रजी मजकूर असा घाट होता, ही गमतीची बाब.

मित्र यांचा ‘मनोरंजन’चा पहिलाच दिवाळी अंक पानसंख्येच्या अंगाने, विषयांच्या अंगाने आणि साहित्यिकांच्या उपस्थितीच्या अंगाने चांगला भरभक्कमच होता. या पहिल्या दिवाळी अंकात काय काय होतं? तर प्राधान्य ललित लेखनाला. त्यास सोबत सामाजिक, राजकीय, शास्त्रीय विषयांवरील लेखांची, परिसंवादांची. आणि कविता तर होत्याच. बालकवी, लक्ष्मीबाई टिळक अशा मंडळींची उपस्थिती होती कविता विभागात.

तर मुद्दा असा, की ‘मनोरंजन’कार का. र. मित्र यांना ‘पुढल्या हाका’ ऐकू आल्या होत्या का? आजच्या दिवाळी अंकांत जे काही असतं त्यातलं बहुतांश ‘मनोरंजन’मध्ये होतचं की. म्हणजे मग भविष्याचा वेध घेऊन वर्तमानातच त्यानुसार बांधणी केली मित्र यांनी, असं म्हणता येईल का? त्याचं ‘हो’ असं सोपं उत्तर देणं खूपच सुलभ. पण या सोप्या उत्तराचं माप जरा उलटं करायला धजलो तर वेगळाच प्रश्न दिसतो त्याच्या बुडाला चिकटलेला.

मित्र यांना १०० वर्षांमागे पुढल्या काळाचा अंदाज आला होता, वगैरे म्हणणं ठीकच. पण वरकरणी तर्कहीन वाटणारा एक प्रश्न स्वत:शीच करून बघू या. समजा, मित्र आज हयात असते तर त्यांनी दिवाळी अंक कसा काढला असता? ‘मनोरंजन’ची जी धाटणी होती त्याच धाटणीचा, की काही वेगळ्या स्वरूपाचा? असल्या ‘जर...तरी’ आणि गैरलागू प्रश्नाचं सुबुद्ध उत्तर कसं देणार? आणि त्याचं उत्तर ‘त्याच धाटणीचा’ असं आलं म्हणजे पंचाईतच. आता ही पंचाईत कसली? तर हे उत्तर म्हणजे नवसर्जनाची ऊर्मी संपल्याचं लक्षण. हे लक्षण दिसणं म्हणजे दिवाळी अंकांच्या सांस्कृतिक चळवळीसाठी धक्काच की! पण वास्तव असं आहे, की आज दिवाळी अंकाच्या साहित्यिक व्यवहारांच्या नाडीवर हात ठेवला तर हे लक्षण लागतं हाताला.

याचा अर्थ वरकरणी तर्कहीन वाटणाऱ्या प्रश्नाचं उत्तर तर्ककर्कश आहे. मित्र होऊन गेले १०० वर्षांमागे. त्यामुळे या तर्ककर्कश उत्तराचे धनी ते नव्हेत, आजचीच मंडळी. ही आजची मंडळी म्हणजे कोण? तुम्ही- आम्ही- आपण सगळेच. दिवाळी अंकात लिहिणारे गद्यलेखक, पद्यलेखक, संपादक, प्रसारक, वाचक, कौतुकदार... सगळेच. बिचाऱ्या जाहिरातदारांना यातून वगळू या. ‘सांस्कृतिक पाप’ त्यांच्या माथ्यावर कशाला उगाच मारायचं? आता पाप शब्द फारच कडक वाटत असेल तर ‘सांस्कृतिक गफलत’ शब्द वापरू या. तेवढंच जरा कमी ओझं मनावर! असं ओझं कमी असेल तर मग शंभरी पार केलेल्या दिवाळी अंक नामक अवताराने वाचनसंस्कृती नामक गोष्टीचं काही भलं केलं आहे का, याचं गणित थोड्या सहिष्णुतेनं मांडता येतं का ते पाहू.

मराठीत दरसाल प्रसिद्ध होणाऱ्या दिवाळी अंकांची संख्या किती? काही शे तर नक्कीच. ही संख्या बऱ्यापैकी वेळेवर, म्हणजे दिवाळीच्या आसपास बाजारात, वाचनालयात, वाचकांच्या हातात येणाऱ्या अंकांची. त्याशिवाय ‘उरलो जाहिरातींपुरता आणि जाहिरातदारांपुरता’ अशी उदात्त भावना मनी बाळगून जी मंडळी अंक काढतात त्यांची व त्यांच्या अंकांची संख्याही कमी नाही. पण वाचनसंस्कृतीशी त्यांचं काहीच देणंघेणं नसल्याने ते अंकगणतीतून वगळणंच श्रेयस्कर. मग अंकगणतीत समाविष्ट करण्याचे अंक कुठले? तर ज्या अंकांच्या जाहिराती येतात, जे अंक किमान गांभीर्याने व वेळेवर प्रसिद्ध होतात, जे अंक स्टॉलवर विकत घेता येतात, ज्या अंकांची स्कीम लागते व गाजते, जे अंक वाचनालयांत मिळतात, ज्या अंकांची वृत्तपत्रीय परीक्षणं छापून येतात, जे अंक स्पर्धेत भाग घेतात, जे अंक भाऊबीजेला ओवाळणीदाखल दिले जातात असे. आता हाती घेतलं भिंग आणि केलं या अंकांचं बारीक निरीक्षण, तर काय दिसतं? तर जे काही दिसतं ते पाहून ‘अरेच्चा, हे दिसण्यासाठी भिंगाची काहीच गरज नाही’, असं वाटण्याजोगी स्थिती. ही स्थिती दिवाळी अंकांविषयी जाज्ज्वल्य अभिमान बाळगावा अशी खचितच नाही.

दिवाळी अंक निघतायत की गठ्ठ्यानं आणि जाडे जाडे, खपतायत की चांगले, पेपरांत अगदी अर्धा-अर्धा पान परीक्षणं येतायत की त्यांची; मग त्याबाबत तोंड वेंगाडायला काय झालं, असा सवाल करतीलच अनेकजण. पण वाचनसंस्कृतीचा विकास आणि उपरोल्लेखित बाबी यांचा कार्यकारणभाव-संबंध लावणं म्हणजे स्वत:ची फसवणूक करून घेण्याचा हमरस्ता. वाचनसंस्कृतीची संख्यात्मक आणि गुणात्मकही वाढ होण्याची नितांत आवश्यकता ज्यांना वाटते; आत्मवंचना न करता सभोवतालचं घटित वास्तवाग्रही, मूलगामी दृष्टीने बघण्याची, जाणण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांनी तरी या हमरस्त्यावरून जाऊ नये. आता वाचनसंस्कृतीचा विकास म्हणजे नेमकं काय, या प्रश्नाचं उत्तर जो तो आपापल्या परीने देईलच. या विकासात संख्यात्मक वाढीचा मुद्दा आलाच. तो महत्त्वाचाच. ही वाढ कुणाची? अर्थातच वाचकांच्या संख्येची.

आपल्या विषयाचा परीघ साहित्यसंस्कृतीचा असल्याने येथील वाचक म्हणजे कथा, कविता, कादंबरी, अभ्यासपूर्ण वैचारिक लेख, व्यक्तिचित्रं आदी घाटांतील साहित्य वाचणारा, असं गृहीत धरण्यास हरकत नाही. तर या दृष्टीने पाहायला गेल्यास या प्रकारचं साहित्य वाचणाऱ्यांची एकूण संख्या वाढते आहे हे निश्चित. (परदेशांतील...इतकंच कशाला, आपल्याच शेजारपाजारच्या राज्यांतील पुस्तकांचा खप आणि आपल्याकडील मराठी पुस्तकांचा खप यांची तुलना करणं इथे अप्रस्तुत. तो एक वेगळाच विषय.) या वाढत्या वाचकाला साहित्याचे उपरोल्लेखित घाट दिवाळी अंकांत वर्षानुवर्षं अनुभवण्यास मिळत आहेत. प्रश्न आहे तो हे घाट व त्यातील काही वळणं जुनी झाली असतील तर त्यांची डागडुजी करण्याचं, वेळप्रसंगी आज गैरलागू झालेला जुना घाट मोडून काढत नवा घाट बांधण्याचं काम कुणी करीत आहे की नाही, हा. ही जबाबदारी अर्थातच प्रामुख्याने लेखक-कवी-संपादक-प्रकाशक यांच्यावर. आणि या जबाबदारीतून वाचकांची सुटका कशी होणार? ती तर आहेच त्यांच्या डोक्यावर. आणि आजचं दिवाळी अंकांचं एकंदर चित्र पाहता फार मोजकी मंडळी वगळता ही जबाबदारी उचलताना कुणी दिसत नाही, हे दुर्दैव.

ही मोजकी मंडळी वगळता इतर बहुसंख्य मंडळी काय करीत आहेत? दिवाळी अंकात लिहीत आहेत...अंकाचं संपादन करीत आहेत... अंक प्रकाशित करीत आहेत... अंक विकत आहेत... अंक वाचत आहेत. या बहुसंख्य मंडळींची कामाची रीत ठरलेली. अगदी पिढ्यान्‌‍ पिढ्या ठरलेली. काही अपवाद वगळता कुठल्याही अनुभवी, प्रख्यात, दर्जेदार दिवाळी अंकाच्या अनुक्रमणिकेवर नजर टाका. त्याच अंकाची आधीच्या वर्षांची अनुक्रमणिका बघा. तेच ते आणि तेच ते. तेच लेखक, तेच कवी. बाराखडीतील अक्षरं इकडची तिकडे करून वेगळ्या शीर्षकांचे त्याच त्या आशयांचे विषय. जो लेखक तीस वर्षांमागे मनाचा तळ शोधणारी कोमट कथा लिहायचा तो आजही सत्तराव्या वर्षी तशीच, म्हणजे त्याच खोलीची कथा लिहिणार. लेखकाची वाढ होत नाही? जो कवी तीस वर्षांमागे रानातल्या झऱ्यांवर झुळूमुळू कविता लिहायचा तो आज सत्तरीत तसलीच झुळूमुळू कविता लिहिणार. कवीची वाढ होत नाही? या मंडळींच्या लिखाणात आजच्या जगाचं प्रतिबिंब का उमटत नाही? इथे तथाकथित सामाजिक बांधिलकीच्या नावाचा पुरता बेल-भंडारा उधळणारं साहित्य अपेक्षित नाही. सामाजिक बांधिलकीचं साहित्य लिहिलंच पाहिजे, असला कचकड्याचा आग्रहही त्यामागे नाही. आमच्या मनात उमटणाऱ्या तरंगांविषयीच आम्ही लिहिणार, हे म्हणणं असू शकतंच की या मंडळींचं. आणि तसं म्हणणं राखण्याचा अधिकार आहेच त्यांना. पण या निमित्ताने एक साधीसुधी, बालबुद्धी शंका उभी राहते ती अशी, की भोवतालच्या वास्तवाचे, घटिताचे तरंग यांच्या मनात उमटतच नाहीत की काय? आता बालबुद्धी शंकाच ती! थोर थोर व्यक्तींनी त्याकडे लक्ष द्यायचं कारण नाही म्हणा. हे झालं लेखक-कवींचं. संपादकांचं काय? ही मंडळी देतातही नव्या लेखकांना-कवींना संधी. मनाचा मोठेपणाच तो! पण या मोठेपणाचं वर्तुळ त्यांच्याच धाटणीतून चालणाऱ्यांपुरतं मर्यादित. म्हणजे मग या नव्यांचं साहित्यही जुन्यांच्या साहित्यासारखंच. आदल्यांची पाटी गिरवल्यासारखं. म्हणून मग संपादकांची वाढ होत नाही, असा प्रश्नही विचारावा लागेल? अन्यथा, टीव्हीच्या चॅनेल्सच्या भडिमारातून जग वेगाने घरात घुसलं असताना मी अमक्या देशात कसा गेलो, तिकडे कशी थंडी असते, तिकडची माणसं कशी आहेत, असल्या विषयांवरचे लेख अंकात येणं कठीण. तितकंच कठीण कुठल्या तरी विदुषीने तिचे मामेसासरे, आजेसासरे कसे होते ते पाल्हाळाने सांगणं, आणि तो लेख संपादकाने आपल्या अंकात छापणं. या साहित्यिक, संपादक मंडळींतील अनेकांची पूर्वपुण्याई खरोखरच मोठी. भूतकाळात त्या काळाच्या हिशोबात तेव्हा त्यांनी केलेलं काम खरोखरच दखलपात्र, निश्चितच कौतुकास्पद. पण काळाच्या ओघात त्या दखलपात्रतेचाच बिल्ला आणि पाठीवरील कौतुकाची थाप त्यांनी प्राणपणाने जपून ठेवलेली. आजच्या काळात हा बिल्ला आणि कौतुकाची थाप तोऱ्यात मिरवणं म्हणजे निव्वळ उसासे टाकणं आहे, याची जाणीवच त्यांना नसावी? की जाणीव असूनही कुठलाही धोका नको म्हणून नवं काही करणंच टाळत आहेत हे लोक? की मग मेंदूतील विचारांचं चलनवलन आपणहून थांबवलं आहे त्यांनी? यातील कुठलीही शक्यता घातकच. त्याहीपेक्षा घातक म्हणजे ही बिल्लाधारी मंडळी करतील तीच पूर्वदिशा, तोच दर्जाचा मापदंड, असा समज दृढमूल होणं.

या दर्जाबाबत काही प्रश्न, शंका उपस्थित करणं म्हणजे औद्धत्यच. पण ज्याला औद्धत्य म्हणतात ते करणं म्हणजे या दर्जाच्या मापदंडाबाबत शंका विचारणं, प्रश्न करणं नितांत गरजेचं. हे काम काही जाणती, सुजाण मंडळी आपापल्या परीनं मोठ्या निष्ठेने करीत आहेत, आणि तेही कृतीतून. यशाचा हमखास साचा नाकारून, जुन्या- शिळ्या मूर्ती बाजूला सारून नवं काही, आजचं ताजं घडवण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. त्यात काहीसा भाबडा उत्साह असेल, भाबडा विद्रोहही असेल. पण त्याच त्या सुरक्षित, मात्र जुन्या, कोमट वातावरणात श्वास घेत जगण्यापेक्षा नव्या-अनोळखी प्रदेशात आजचा ताजा श्वास घेणं नवसर्जनासाठी गरजेचंच. कालच्या हाकांची बूज राखणं आवश्यक हे खरं, पण त्याचबरोबर आजच्या हाकांना प्रतिसाद देणंही तितकंच तातडीचं. आता दिवाळी अंकांची कामगिरी आणि एकूण वाचनसंस्कृती यांचं समीकरण कसं मांडणार? तर, वाचनसंस्कृती अनेकांगांनी विस्तारण्यात जे घटक महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, किंबहुना बजावत आहेत, त्यातील एक घटक दिवाळी अंक हा आहेच. प्रस्थापितांबरोबरच नव्या लेखक-कवींसाठी वर्षाने एकदा का होईना पण हक्काने उपलब्ध होणारं ते व्यासपीठ. प्रयोग करण्यासाठी बऱ्यापैकी वाव ठेवणारं. आर्थिक हिशोब जुळले तर खिशातही बरी भर घालणारं. अशा व्यासपीठावर नव्या दमाचे, आजचे, आताचे वारे वाहिले तर वाचनसंस्कृतीसाठी ते पोषकच ठरणार. वाचनाचा एक प्रधान हेतू वाचकाच्या मनाच्या कक्षा रुंदावणं, त्याच्या जाणिवा विस्तारणं, हा मानला तर हे असे नव्या दमाचे, आजचे वारे वाहिलेच पाहिजेत. आणि मुख्य म्हणजे वाचकांनी त्यास प्रतिसाद द्यायला हवा. हा प्रतिसाद हवा किमान दोन पातळ्यांवरचा. जे जे नवं काही घडतंय त्यांचं स्वागतच करायला हवं, असा आग्रह धरणं पूर्णत: चुकीचं. यात एक बाब अगदी सरळ...जुनं ते सर्वच टाकाऊ, असला विघ्नसंतोषीपणाही त्याला चिकटून येतो. तो नाकारण्याजोगाच. पण निदान नव्याकडे नव्या दृष्टीने पाहायला तरी काय हरकत आहे? जुनेच चष्मे लावून नव्याकडे पाहिलं तर रंगांचा अंदाज नाही येणार. कानांमध्ये जुनेच सूर गच्च साठवून ठेवले असतील तर नवं काही कानांत शिरणार कसं?

तर, स्वागताची भूमिका घ्यायची की नाही हे नंतर ठरवता येईल. आधी निदान पाहण्याची, निरखण्याची भूमिका तरी घ्यायला हवी ना? आणि हे निरखणं निव्वळ कौतुकाच्या थापेपुरतं मर्यादित ठेवून नाही चालणार. त्यासाठी स्वत:चं पाकीट थोडं हलकं करण्याचीही तयारी हवी. केशवसुतांनी पुढच्या हाका ऐकण्यास समस्तांना सांगितलं होतं. ते नाही जमत तर राहू देत. निदान आजच्या हाकांना तरी प्रतिसाद देऊ या!

(अनुभव मासिकाच्या जानेवारी २०१२च्या अंकातून साभार)

राजीव काळे | kale.rajiv@gmail.com







प्रतिक्रिया लिहा...

Select search criteria first for better results