हजरत मोहम्मद यांच्या कुटुंबात एक आळशी तरुण होता. ते रोज त्याला म्हणत, ‘सकाळ झाली तरी तू बिछान्यात लोळत पडलेला असतोस. कधीतरी माझ्यासोबत मशिदीत चल. सकाळचा नमाज होईल. शिवाय फिरणंही होईल! सकाळ कशी सुखद असते. थंड हवा, पक्ष्यांची किलबिल, रंग उधळत सूर्याचं उगवणं, लोळत पडण्यापेक्षा या सा-याचा अनुभव घे.'
असे बरेच दिवस गेले. अखेर एके सकाळी तो तरुण हजरतांबरोबर मशिदीत गेला. मोहम्मदांनी नमाज अदा केला. तो तरुण उभ्या उभ्या काहीतरी पुटपुटत राहिला. मात्र परत फिरताना तो मोठ्या अकडीत चालला होता. गरमीची नुकतीच सुरुवात होती. लोक आपल्या घरासमोर बिछाने टाकून झोपले होते. तो तरुण म्हणाला, “हजरत, जरा या पापी लोकांना बघा. अजून झोपले आहेत, ही काय झोपायची वेळ आहे? ही तर प्रार्थनेची वेळ. काय गति होईल या लोकांची मेल्यावर”
मोहम्मदना धक्काच बसला. हा तरुण आज पहिल्यांदाच सकाळी उठून बाहेर पडलाय. कालपर्यंत लोळत पडलेलं हे गाढव आज अचानक स्वतःला पुण्यात्मा समजू लागलं? मोहम्मद थांबले आणि म्हणाले, “मला माफ कर. तुला बरोबर आणून मोठी चूक झाली माझी. तुझी तर प्रार्थना झालीच नाही. माझा नमाजदेखील वाया गेला. तू जा बाबा. मी परत जाऊन पुन्हा नमाज करतो.”
“का काय झालं?” त्या तरुणाने विचारलं. मोहम्मद म्हणाले, “अरे, तू येत नव्हतास तेच बरं होतं, निदान इतरांना पापी तरी म्हणत नव्हतास. आपण पुण्यात्मा आहोत, असा दंभ तरी तुला झाला नव्हता. तू झोपलेलाच बरा. आता परत जाऊन अल्लाची माफी मागतो.”
मुकुंद कुलकर्णी | mukund59@gmail.com
मुकुंद कुलकर्णी हे प्रदीर्घ पत्रकारी अनुभव असलेले माजी संपादक आहेत. मध्य भारतातील आदिवासी समाजाचे आणि त्यांच्या प्रश्नांचे ते अभ्यासक आहेत. शिवाय ईशान्य भारतातील समाज, तसंच विविध धर्म आणि त्यांचं तत्त्वज्ञान हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहे.