यावर्षी भारतात पाच ठिकाणी विधानसभा निवडणुका होणार आहेत. यात बंगाल आणि आसाम ही पूर्वेकडची राज्यं, केरळ-तामिळनाडू ही राज्यं आणि पुदुच्चेरी हा केंद्रशासित प्रदेश आहे. निवडणुकीच्या तारखा अजून जाहीर व्हायच्या आहेत, पण सगळीकडे निवडणुकीचं वातावरण तयार होत आहे. सत्ताधारी आणि विरोधीपक्ष तयारीला लागले आहेत. युत्या-आघाड्यांच्या चर्चा सुरू झाल्या आहेत, प्रचाराचे मुद्दे शोधणं सुरू झालं आहे. सर्वाधिक हालचाल चालू आहे ती आसाम, बंगाल आणि तामिळनाडूत. त्यातही नरेंद्र मोदी या महिन्यात तामिळनाडूत जाऊन अनेक कार्यक्रम करणार असल्याने या राज्यात वेगाने घडामोडी घडत आहेत.
२०२१च्या गेल्या विधानसभा निवडणुकीत द्रमुकला (द्रविड मुनेत्र कळघम) दणदणीत विजय मिळाला होता. २३४ पैकी १५९ जागा त्यांच्या आघाडीला मिळाल्या होत्या. या आघाडीत काँग्रेसशिवाय इतर स्थानिक पक्षही होते. विरोधात जयललितांचा अण्णाद्रमुक होता. त्यांच्यासोबत भाजप आणि अन्य स्थानिक पक्ष होते. त्यानंतर गेल्या पाच वर्षांत राज्याच्या राजकारणात बरंच काही घडून गेलं आहे आणि त्यामुळे द्रमुक आणि अण्णाद्रमुक हे दोन्ही पक्ष नव्याने बांधाबांध करत आहेत. भाजपला केरळपाठोपाठ तामिळनाडूतही हात-पाय पसरायचे असल्याने ते अधिक सक्रिय झाले आहेत.
तामिळनाडूत भाजपची अजिबातच ताकद नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाला जेमतेम अडीच टक्के मतं मिळाली होती. लोकसभा निवडणुकीत मात्र ती वाढून ११ टक्क्यांवर गेली. वाजपेयी-अडवाणी काळापासून तामिळनाडूत चंचुप्रवेश मिळवण्याचा भाजपचा प्रयत्न चालला होता, पण त्याला अपेक्षित यश मिळत नव्हतं. पण मोदी-शहांच्या काळात भाजपने या राज्यात अधिक लक्ष घातलं असून जयललिता आणि करुणानिधी या दिग्गज नेत्यांच्या निधनानंतर निर्माण झालेल्या पोकळीचा फायदा घेऊन तिथे प्रवेश मिळवण्याचे जोरदार प्रयत्न चालवले आहेत.
आत्ताही अमित शहा यांच्याकडे निवडणुकीची सूत्रं असून वाणिज्य मंत्री पियुष गोयल या राज्याच्या प्रभाऱ्यामार्फत ते यंदाच्या निवडणुकीचा पट मांडत आहेत. जयललितांच्या निधनानंतर अण्णाद्रमुक या पक्षात फाटाफुटीचं सत्र चाललं. जयललितांच्या विश्वासू सहकारी शशिकला, अल्पकाळचे मुख्यमंत्री पनीरसेल्वम, टीटीव्ही दिनकरन अशा महत्त्वाच्या नेत्यांची पक्षातून गच्छंती झाली. इतरही छोटे-मोठे नेते इतर पक्षांमध्ये गेले. त्यामुळे अण्णाद्रमुक पक्षाची ताकदही कमी झाली. त्यातच अभिनेता विजय याने तमिळगा वेत्री कळघम (टीव्हीके) हा पक्ष काढला. विजयबद्दल वाटणाऱ्या आकर्षणामुळे या पक्षाची लोकप्रियता बरीच वाढली आहे. या पक्षाने भाजप आणि द्रमुक या दोघांना विरोध चालवल्याने द्रमुकविरोधी मतांचं विभाजन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अण्णाद्रमुकची आणखीनच पंचाईत झाली आहे. अण्णाद्रमुकची पंचाईत म्हणजे भाजपचा तोटा असं थेट समीकरण असल्याने शहा आणि मोदींनी त्यात लक्ष घातलं आहे.
अण्णाद्रमुकमधून बाहेर पडावं लागलेल्या तीनही नेत्यांना पक्षाने पुन्हा सामावून घ्यावं किंवा किमान त्यांच्या पक्षांशी युती करून आघाडीत घ्यावं, असा आग्रह भाजपतर्फे केला जात आहे. त्याला अजून अण्णाद्रमुक तयार नसलं तरी निवडणुकीपर्यंत किमान दिनकरन यांच्याबाबतीत काहीतरी तडजोड होईल असं मानलं जातं आहे. दिनकरन आणि पनीरसेल्वम यांचा तामिळनाडूतील दक्षिणी भागातील थेवर या ओबीसी समाजावर प्रभाव असल्यामुळे त्यांच्याशी जुळवून घेतलं तर अण्णाद्रमुक-भाजप आघाडीला फायदा होईल, असं त्यात गृहीत आहे.
असंही म्हटलं जातं की अभिनेता विजयने भाजपविरोधी भूमिका घेतलेली असली तरी त्याच्यासोबत वाटाघाटी करून त्याचा पक्ष आघाडीत येतो का याची चाचपणी करावी, असं भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचं म्हणणं आहे. विजयचा भाजपला असलेला विरोध मावळत नसेल तर भाजप आघाडीतून बाहेर पडेल आणि अन्य छोट्या पक्षांना सोबत घेऊन निवडणूक तटवेल, असाही विचार भाजप करत असल्याच्या बातम्या आहेत. अण्णाद्रमुक आणि विजय यांचा टीव्हीके पक्ष एकत्र आले तर द्रमुक विरोधी मतं एकवटतील आणि त्यातून द्रमुकचा पराभव करता येईल, अशी त्यामागची व्यूहरचना असल्याचं सांगितलं जातं. असं प्रत्यक्षात घडेल असं नाही, पण तामिळनाडूचं राजकीय कुलूप उघडावं यासाठी भाजप कायकाय स्ट्रॅटेजी आखू पाहत आहे, हे यावरून कळावे.
या पार्श्वभूमीवर आपली आघाडी भक्कम बनून द्रमुकला मात देता यावी यासाठी अण्णाद्रमुकही अन्य पक्षांशी बोलत आहे. पट्टली मक्कल काची या पक्षाच्या अंबुमणी रामदास यांच्या गटाशी अण्णाद्रमुकने युती जाहीर केली आहे. हा पक्ष वण्णीयार समाजावर प्रभुत्व राखून असल्यामुळे मतांची बेरीज होऊ शकते. याशिवायही छोट्या छोट्या समाजांच्या पक्षांशी सूत जुळवण्याचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. या सर्व हालचाली अण्णाद्रमुकचे माजी मुख्यमंत्री इडापल्ली पलनीस्वामी यांच्या नेतृत्वाखाली चालू आहेत.
२०२१च्या निवडणुकीत द्रमुक आघाडीला ४७ टक्के मतं मिळाली होती, तर अण्णाद्रमुक आघाडीला ४१ टक्के. त्यामुळे सारी लढाई सहा टक्के मतांची आहे. तेवढी मतं भरून निघावीत यासाठी भाजपचा सारा आटापिटा चालू आहे. मात्र विजय स्वतंत्रपणे लढला तर सगळी गणितं फिसकटणार आहेत आणि निवडणूक अनिर्णित अवस्थेत जाऊन पोहोचणार आहे. काही सर्वेक्षणांमध्ये विजयला भरघोस पाठिंबा दिसत असून तो राज्याच्या राजकारणातली तिसरी मोठी शक्ती म्हणून उदयास येईल, असं सांगितलं जात आहे. त्यामुळेच पुरेशी राजकीय संधी न देणाऱ्या द्रमुकला सोडून विजयसोबत युती करावी, असा प्रयत्न काँग्रेसमधील एक गट करत आहे. त्याला अर्थातच काँग्रेसच्या ज्येष्ठांचा आणि दिल्लीतील नेत्यांचा विरोध आहे. द्रमुकने काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्याशी दोस्ती निभावलेली असल्याने तसं काही घडण्याची शक्यता नाही. पण या सर्व घडामोडींतून विजय हा येत्या निवडणुकीतील महत्त्वाचा खेळाडू असेल, एवढं नक्कीच अधोरेखित होतं.
या साऱ्या पार्श्वभूमीवर मोदींचा तामिळनाडू दौरा आखण्यात येत आहे. ते येतील तोपर्यंत अण्णाद्रमुकच्या आघाडीत जास्तीत जास्त पक्ष सामील झालेले असतील, अशी आखणी आहे. मोदींची लोकप्रियता, अण्णाद्रमुकचा राज्यभरातील वावर, विस्तारीत आघाडीची एकत्रित ताकद आणि द्रमुक सरकारबद्दलची नाराजी या सर्वांच्या बळावर ही निवडणूक जिंकायची असं भाजपचं नियोजन असल्याचं सांगितलं जातं.
घोडा-मैदान दूर नाही!
सुहास कुलकर्णी | uniquefeatures.portal@gmail.com
सुहास कुलकर्णी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. गेली तीन दशकं ते राजकीय प्रक्रियांचं विश्लेषण करत आले आहेत.
