
भारत ही कुष्ठरोगाची राजधानी आहे, असं पूर्वी म्हटलं जायचं. आता गेल्या काही वर्षांमध्ये कुष्ठरोगाबद्दलच्या बातम्या माध्यमांमधून जवळपास नाहीशा झाल्या आहेत. त्यामुळे कुष्ठरोग संपला असंच आपल्याला वाटतं. पण खरंच तसं आहे का?
‘राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम’ हा जगातला सर्वात मोठा कुष्ठरोग निवारणाचा कार्यक्रम भारतात १९५५ पासून राबवला जातोय. पण तरी कुष्ठरोग संपलेला नाही. २०२७ ही भारताने कुष्ठरोग निर्मूलनासाठी आखलेली नवी डेडलाइन आहे. पण परिस्थिती पाहता ते ध्येयही आपण गाठू शकू, असं दिसत नाही.
आज जगात सुमारे अडीच लाख कुष्ठरुग्ण आहेत. त्यापैकी ५८ टक्के रुग्ण भारतात आहेत. २०१९च्या आकडेवारीनुसार भारतात दरवर्षी सुमारे सव्वा लाख नवीन कुष्ठरुग्ण सापडत होते. कोव्हिडच्या साथीनंतर हा आकडा ६५ ते ७५ हजारावर आला आहे. पण त्याचं कारण कुष्ठरोग कमी झालाय असं नसून रुग्णशोधाची मोहीम थंडावलीय हे आहे, असं या क्षेत्रातले तज्ज्ञ सांगतात. शिवाय निदान होण्यासाठी रुग्ण आरोग्य यंत्रणेपर्यंत पोहोचले तर पाहिजेत! तसं न घडण्याला दारिद्र्यापासून अज्ञानापर्यंत अनेक कारणं आहेत. त्यामुळे निदान न झालेले रुग्ण आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर असणार हेही गृहीत आहे. थोडक्यात, दरवर्षी नव्याने लागण होणाऱ्या रुग्णांची संख्या प्रत्यक्षात बरीच जास्त असू शकते.
अर्थात गेल्या ४०-५० वर्षांत आपण केलेली प्रगतीही कमी नाही. १९९१पर्यंत जगातल्या एकूण कुष्ठरुग्णांपैकी ७५ टक्के रुग्ण भारतात होते. आता ते प्रमाण ५८ टक्क्यांवर आलं आहे. भारतातली कुष्ठरोगाशी लढाई बहुपेडी आहे. कुष्ठरोगाचं वेळीच निदान होणं, रुग्णाला रोग बरा होईपर्यंत अखंडित औषधोपचार मिळणं आणि त्याने ते न चुकता घेणं अशा सगळ्या पातळ्यांवर काम गरजेचं आहे. त्यापैकी औषधोपचारांच्या बाबतीत गेल्या ४० वर्षांत मोठी प्रगती झाली आहे. ऐंशीच्या दशकात आलेल्या मल्टिड्रग थेरपीमुळे कुष्ठरोगाचा इलाज आटोक्यात आला. रुग्णाने सहा महिने किंवा वर्षभर औषधं घेतली तर हा रोग पूर्ण बरा होतो. त्यामुळे निर्माण होणारी विकृतीही कमी होते. या औषधांमुळे १९८०च्या सुमारास ४० लाखांहून जास्त असणारी कुष्ठरुग्णांची संख्या तब्बल ९० टक्के कमी होऊन २००५ मध्ये दोन लाखांवर आली. त्या वर्षी कुष्ठरोग सार्वजनिक आरोग्यापुढचा गंभीर प्रश्न राहिला नसल्याचं जाहीर केलं गेलं. म्हणजे काय तर दर दहा हजार लोकसंख्येमागे आपल्याकडे केवळ एक कुष्ठरुग्ण होता. हे प्रमाण त्याहून जास्त असेल तर सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ती धोक्याची घंटा असते. कुष्ठरोगासोबतच्या लढाईतला तो मोठा टप्पा होता. त्यामुळेच पुढच्या २० वर्षांत कुष्ठरोगाचं निर्मूलन झालेलं असेल असं त्यावेळी मानलं गेलं. पण मग कुष्ठरोगाचं उच्चाटन करण्यात आपल्याला यश का येत नाहीये? याची अनेक कारणं आहेत.
२००५ मध्ये कुष्ठरोग हा तितका गंभीर धोका न राहिल्यामुळे कुष्ठरोग निर्मूलनावर असणारा जोर काहीसा कमी झाला आणि आपल्या आरोग्य यंत्रणेसमोर इतरही अनेक गंभीर समस्या असल्याने लक्ष्य आणि साधनसामुग्री तिकडे वळवण्यात आली, असं या क्षेत्रातले तज्ज्ञ मानतात. २००५ पूर्वी ज्या गांभीर्याने ‘राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम’ राबवला जात होता. ज्या राज्यांमध्ये कुष्ठरोगाचं प्रमाण अधिक आहे, तिथे नव्या रुग्णांचं लवकर निदान व्हावं यासाठी तपासणी केली जायची, त्याचं प्रमाण कमी झालं. कुष्ठरोग निर्मूलनाला दुसरा मोठा फटका बसला तो कोव्हिड लॉकडाऊनच्या काळात. त्या काळातच नवे रुग्ण शोधण्यासाठी तपासणी होणं तर ठप्पच झालं, पण निदान झालेल्या रुग्णांच्या औषधोपचारातही खंड पडला. एवढंच नव्हे तर कोव्हिडच्या दोन्ही लाटा ओसरून बाकी जनजीवन सुरळीत होऊन काळ लोटला तरीही कुष्ठरुग्णांच्या छाननीचं काम मात्र पूर्वपदावर आलं नाही. त्यामुळेच रुग्णांची संख्या सध्या घटलेली दिसत असली तरी प्रत्यक्षात मात्र ती कमी झालेली नसल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. रुग्णांचं निदान न होण्यामागे आणखी एक महत्त्वाचं कारण आहे. कुष्ठरोगाची लक्षणं ही किड्याचा चावा किंवा अलर्जीच्या प्रतिक्रियेसारखी वाटू शकतात. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष होण्याची शक्यता असते.
दुसरीकडे कुष्ठरोगाचं स्वरूपही तो आवाक्यात न येण्यास कारणीभूत ठरतं आहे. कुष्ठरोग ‘मायक्रोबॅक्टेरियम लेप्री’ या बॅक्टेरियामुळे होतो. इतर रोगांच्या तुलनेत या बॅक्टेरियाच्या संसर्गाबाबत आजही शास्त्रज्ञांना खूपच कमी माहिती आहे. अधिक शास्त्रीय माहिती उपलब्ध झाली तर संसर्ग टाळण्यात मदत होऊ शकते. दुसरं म्हणजे कुष्ठरोगाचा बॅक्टेरिया मानवी शरीरात तीस-तीस वर्षंही सुप्तावस्थेत राहू शकतो. त्यामुळे कुष्ठमुक्त झालेल्या रुग्णांना पुन्हा या रोगाचा प्रादूर्भाव होण्याचं प्रमाणही बरंच आहे. त्याशिवाय सध्याच्या औषधोपचारांना कुष्ठरोगाचा बॅक्टेरियाला दाद देईनासा झाल्याची प्रकरणंही समोर येताहेत. विशेषतः रुग्णाने औषधं घेण्यात कुचराई केली, तर त्याच्यात त्या औषधांना प्रतिरोध तयार होऊ शकतो, असं दिसून आलंय.
एरवी कोणत्याही रोगाच्या प्रतिबंधात्मक उपायांसाठी लशीचा वापर सर्वात जास्त प्रभावी ठरतो. पण कुष्ठरोगाच्या बाबतीत गोष्ट निराळी आहे. मल्टिड्रग थेरपी येण्यापूर्वी, म्हणजे सत्तरीच्याच दशकात दिल्लीतल्या एम्समध्ये कुष्ठरोगाची लस तयार करण्यात यश आलं होतं, असं काही अहवालांवरून समजतं. ही लस सरसकट सर्वांसाठी नव्हे, तर कुष्ठरुग्णांच्या रोज निकटच्या संपर्कात असणाऱ्या व्यक्तींसाठी होती. २००५ मध्ये या लशीच्या फिल्ड ट्रायल सुरू झाल्या. उत्तर प्रदेशात अशा २४ हजार व्यक्तींना ही लस देण्यात आली. त्यापैकी ६८ टक्के लोकांना पुढची चार वर्षं, तर ५८ टक्के लोकांना आठ वर्षं कुष्ठरोगाचा संसर्ग झाला नाही. कुष्ठरोगाविरुद्धच्या लढाईतला हा मैलाचा दगड होता. २०१९ मध्ये ही लस कुष्ठरुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींना मोठ्या प्रमाणावर दिली जाणार, अशा चर्चाही वैद्यकीय वर्तुळात होत्या. पण त्यानंतर बहुतेक कोव्हिड लॉकडाऊनमुळे किंवा अन्य कोणत्या तही कारणामुळे हे नियोजन बारगळलं. केवळ जवळच्या व्यक्तींना ही लस द्यायची असल्यामुळे त्याचं मास प्रॉडक्शन होण्याच्या शक्यता नाही. कदाचित त्यामुळेही औषध कंपन्या या लशीबाबतीत पुढाकार घ्यायला तयार नसाव्यात, असं बोललं जातं.
कुष्ठरोगाचं पूर्ण उच्चाटन न होण्यामागे अशी गुंतागुंतीची अनेक कारणं आहेत. आणि या सर्व कारणांना व्यापून असलेला मुद्दा म्हणजे या रोगाला चिकटलेला अज्ञानाचा, घृणेचा आणि अंधश्रद्धेचा कलंक. तो अजूनही पूर्णतः पुसला गेला नसल्याने कुष्ठरोगाचं वेळेत निदान होण्यापासून ते रुग्णाचं समाजात पुनर्वसन होण्यापर्यंत प्रत्येक टप्प्यावर अडथळे तयार होत आहेत. बाबा आमटे यांनी सुरू केलेल्या महारोगी सेवा समितीच्या आनंदवन प्रकल्पात दर दिवसाआड समाजाने नाकारलेला किंवा योग्य वागणूक न मिळालेला एक कुष्ठरुग्ण दाखल होत असतो. त्यात केवळ आर्थिक-सामाजिक मागास गटातलेच नव्हे, तर तथाकथित उच्चभ्रू रुग्णही असतात, यावरून परिस्थितीचा अंदाज यावा.
थोडक्यात भारतातल्या कुष्ठरोगाचं निर्मूलन तर लांबच, त्याचं भयही अद्याप संपलेलं नाही. तो आपल्या विचारविश्वात उरलेला नाही, एवढंच.
गौरी कानेटकर | gauri.uniqueportal@gmail.com
गौरी कानेटकर या युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाच्या संपादक आहेत. मितानिन फाउंडेशनच्या `सलाम पुणे` या उपक्रमाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. उपेक्षितांचं जगणं, त्यांचे प्रश्न आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती-संस्था समाजासमोर आणण्याची त्यांना कळकळ आहे.