आम्ही कोण?
आडवा छेद 

भारतातील कोव्हिडबळींची संख्या पाच नव्हे, ४० लाख

  • गौरी कानेटकर
  • 28.07.25
  • वाचनवेळ 3 मि.
Covid 19 data reveals 4 million deaths in india header

चार वर्षांपूर्वी जगावर आदळलेल्या कोव्हिड-१९च्या साथीतून आता आपण सावरलो असलो तरी या आपत्तीने देशावर मोठाच आघात केला. २०२० आणि २०२१ या दोन वर्षांमध्ये आलेल्या कोव्हिड साथीच्या तीन लाटांमुळे मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाले. ही संख्या नेमकी किती यावर तेव्हापासून सुरू असलेल्या वादावर आता कदाचित पडदा पडू शकतो. भारतातील कोव्हिड बळींचा आकडा सरकारी आकडेवारीपेक्षा कित्येक पटींनी जास्त असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेपासून देशांतर्गत विविध संस्था-पत्रकारांचं म्हणणं होतं. पण केंद्र सरकार मात्र ही वस्तुस्थिती मान्य न करता कोव्हिड मृत्यूंची संख्या फक्त तीन ते पाच लाख असल्याचं सांगत होतं. एवढंच नव्हे, तर भारतानेच पन्डेमिकचं सर्वोत्तम व्यवस्थापन केल्याचं सांगत स्वतःची पाठ थोपटून घेण्यात मग्न होतं. पण नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या सरकारी आकडेवारीचं विश्लेषण केलं, तर दरवर्षी मृत्यू पावणाऱ्या व्यक्तींच्या सरासरी आकड्यांपेक्षा कोव्हिडच्या साथीमध्ये तब्बल ४० लाख जास्त मृत्यू झाल्याचं उघड झालं आहे. हा आकडा सरकारने पूर्वी केलेल्या दाव्यांपेक्षा किमान आठ ते नऊ पट जास्त असल्याचं अखेर सिद्ध होत आहे.

आजवरचे अंदाज

जागतिक आरोग्य संघटनेने १७ राज्यांमधील जानेवारी २०२० ते मे २०२१ या काळातील डेटा गोळा करून भारतात या काळात ४७ लाख अतिरिक्त मृत्यू झाल्याचा अंदाज मांडला होता. इतरही अनेक अभ्यासकांनी विविध अंदाज मांडले होते. न्यू इंडिया फोरम या न्यूजपोर्टलने ३८ लाख अतिरिक्त मृत्यूंचा अंदाज वर्तवला होता. वेेगवेेगळ्या अभ्यासकांनी वेेगवेेगळ्या सर्वेेक्षणांच्या आधारावर मांडलेल्या अंदाजांमधून कोव्हिड बळींचा आकडा २८ ते ५२ लाखांपर्यंत असू शकतो, असा दावा केला जात होता.

नवी सरकारी आकडेवारी कुठून आली?

आता सरकारने आपणहून कबुली दिली नसली तरी गेल्या दोन महिन्यांमध्ये सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम, सँपल रजिस्ट्रेशन सिस्टीम आणि नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे अशा तीन सरकारी सर्व्हेंमधून २०२० आणि २०२१ या दोन वर्षांमधील जन्म-मृत्यूच्या नोंदणीचे आकडे समोर आले आहेत.

त्यापैकी सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीममधील आकडेवारी विचारात घेतली तर २०१९मधील मृत्यूच्या नोंदणीपेक्षा २०२० आणि २०२१ मध्ये जवळपास ३० लाख अधिक मृत्यू नोंदवले गेले. हे मृत्यू कोव्हिडचेच निदर्शक असले तरी हा आकडाही तसा फसवाच आहे. कारण मुळात भारतामध्ये मृत्यूची नोंदणी होण्याचं प्रमाण कमी आहे. पहिली गोष्ट, २०१९ची आकडेवारी पाहिली तर ८ टक्के मृत्यूंची नोंदणी झालेली नाही, हे सरकारी यंत्रणेनेच मान्य केलेलं आहे. पण प्रत्यक्षात नोंदणी न होणाऱ्या मृत्यूंचा आकडा त्याहून बराच जास्त असल्याचं वेेळोवेेळी समोर आलं आहे. दुसरीकडे राष्ट्रीय फॅमिली हेल्थ सर्व्हेची आकडेवारीही आता उपलब्ध झाली आहे. ती सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीमपेक्षा जास्त विश्वासार्ह मानली जाते. या सर्व्हेच्या अंदाजानुसार २०१९मध्ये ७१.६ टक्के मृत्यू नोंदवले गेले होते. ही टक्केवारी ग्राह्य धरली तर २०२०-२१ या दोन वर्षांत मिळून ४७ लाख जास्तीचे मृत्यू झाले असल्याचा निष्कर्ष निघतो. हा आकडा आणि जागतिक आरोग्य संघटनेचा अंदाज यात फारशी तफावत नाही.

प्रश्‍न असा आहे की सरकार आता तरी कोविड मृत्यूंचा खरा आकडा जाहीरपणे मान्य करणार का, की सरकारी यंत्रणेतून पुढे आलेली माहिती नाकारून शहामृगासारखी वाळूत मान खुपसून बसणार?


Key Highlights: India's COVID-19 Deaths 

New government data suggests India's COVID-19 death toll could be 4 million, far exceeding the official 3-5 lakh figures. This analysis of official surveys for 2020-21 reveals a massive increase in deaths, aligning with WHO estimates. The article questions if the government will now acknowledge the true scale of the pandemic's impact, contradicting its earlier claims of excellent management.


गौरी कानेटकर | gauri.uniqueportal@gmail.com

गौरी कानेटकर या युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाच्या संपादक आहेत. मितानिन फाउंडेशनच्या `सलाम पुणे` या उपक्रमाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. उपेक्षितांचं जगणं, त्यांचे प्रश्न आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती-संस्था समाजासमोर आणण्याची त्यांना कळकळ आहे.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 4

जयंत29.07.25
अत्यंत हास्यास्पद अनुमान आपणच म्हणता की भारतात मृत्युंची नोंद पध्दतशीरपणे होत नाही, ते ही सर्वसामान्य परिस्थिती मधे, मग कुठल्या डेटाबेसवर आपण म्हणु शकतो की कोव्हीडमधे ५० लाख लोक गेले? जागतिक संस्थेने म्हणल म्हणुन ? मुळात जिथे डेटाच चुकीचा असेल तक १ कोटी सुध्दा गेले तरी ते रिपोर्ट होणच अवघड आहे . हे सर्व माहित असतांना शिळ्या कढीला उत आणायचा हा प्रकार आहे

बंडू मोरे29.07.25
आपल्याच वाईटावर आपल्याच लोक असतात. एवढ्या मोठ्या जागतिक साथी नंतर अर्ध्या टक्यापेक्षाही कमी दगावले असताना, उगीचच काहीतरी विरोध करायचा म्हणून विरोध करणाऱ्यांना पहिल्यांदा पाकिस्तानात हाकलून द्यायला पाहिजे

पोलीस पाटील29.07.25
जगाची अपेक्षा होती की भारतात करोडो लोक मरतील, आता अपेक्षाभंगाच्या दुःखाने जगातील काही आणि भारतातील काही शक्तींना आश्चर्य आणि दुःख हे व्हायलाच पाहिजे होते. एक गोष्ट नक्की, की लोकशाही असलेल्या या देशात सुमारे दीड बिलियन लोकसंख्या असताना, पेंडेमिक सारख्या साथी मधून अर्ध्या टक्क्यापेक्षाही कमी लोक दगावले. त्याचे कौतुक करायचे सोडून आता हा शंख का? यांच्या आवडत्या पार्टीने एक सुद्धा गमावला नसता असेच हे लोक ओरडत आहेत.

Manoj Jagtap 28.07.25
या कारणामुळेच नियमितपणे पार पडत असलेली जनगणना 2021 सालापासून करण्यास चालढकल होत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे का? 2027 मध्ये होणार्‍या जनगणनेचि आकडेवारी 2029 च्या निवडणुका पार पडेपर्यंत जाहीरच केली जाणार नाही. त्यामुळे हे मृत्यू आकडे एक गूढकथाच राहतील.

See More

Select search criteria first for better results