आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

प्रेमाची गोष्ट...

  • निरंजन घाटे
  • 14.02.26
  • वाचनवेळ 19 मि.
premachi goshta

हा योग खरा हठयोग। लागला रोग। प्रीतीचा ज्याला॥

लागते मरावे त्याला हे असे॥

गोविंदाग्रजांच्या प्रेम आणि मरण या काव्यातील या ओळी वाचून महाविद्यालयात आम्ही काही मित्रांनी पोरींच्या नादी लागणं काही खरं नाही बरं, असा एकदा विचार केल्याचं आठवतं. पण तो निश्चय काही फार दिवस टिकला नव्हता. साधारणपणे दोन दिवस ते पाच आठवडे एवढ्या काळात ‘इश्कने गालीब निकम्मा कर दिया, वरना हम थे कामके,' अशी आमची अवस्था झालीच पण ज्याने पाच आठवडे प्रेमात पडण्यापासून दूर राहण्याचा, आमच्या दृष्टीने जागतिक विक्रम केला त्याचंच पुढे सर्वांत आधी लग्न झालं. तो प्रेमविवाह होता.

पुढं, इश्कपर जोर नही है ये वो आतिश, ‘गालिब‘।

कि लगाये न लगे और बुझाये न बने॥'

ह्याची प्रचीती आमच्या काळातल्या ‘कॉलेजक्वीन'नं एका (आमच्या दृष्टीनं) मद्दड आणि (पुन्हा आमच्या दृष्टीनंच) अतिसामान्य दिसणाऱ्या अशा आमच्याच एका रसायनशास्त्राच्या, जाडभिंगाचा चष्मा लावणाऱ्या व्याख्यात्याशी लग्न केलं तेव्हा आली. तर आमच्या दृष्टीनं हिरो असलेल्या शाम्यानं एका अतिसामान्य आणि जिच्याकडं आम्ही बघायलाही तयार नसू, किंबहुना जिचं टोपणनावच ‘शूर्पणखा' असं होतं, अशा मुलीशी लग्न केलं तेव्हा पुन्हा ‘इश्क हुआ है गधीसे, तो परी क्या चीज है।” या उर्दू कहावतीची आठवण झाली. पुढे आमच्या एका प्राध्यापकांनी सापेक्षतावाद शिकवताना एक संस्कृत सुभाषित ऐकवले. ते म्हणाले-

प्रेम सत्यं तयोरेव ययोर्योगवियोगयो:।

वत्सरा वासरीयन्ति वत्सरीयन्ति वासर:॥

म्हणजे जेव्हा प्रियकर-प्रेयसी एकत्र असतात तेव्हा वर्षे दिवसांसारखी वाटतात, तर जेव्हा प्रियकर- प्रेयसीची (त्याची समजा बदली दूरच्या गावी झाल्यामुळे) ताटातूट होते तेव्हा दिवस वर्षांसारखे वाटू लागतात; असं ते शिक्षक म्हणाले. यामुळे सापेक्षतावाद मात्र झटकन कळला हे मान्य करायला हवंच; पण तेव्हापासूनच आपल्या दृष्टीनं विजोड जोडप्यांचा प्रेमविवाह झाल्याचं कळतं, तेव्हा त्यांनी एकमेकांत काय पाहिलं असावं हा प्रश्न मला सतावत असेच. मध्यंतरी ‘केमिस्ट्री ऑफ लव्ह'नावाचं एक पुस्तक वाचलं आणि अशा प्रश्नांना मी उत्तर देऊ शकतो, असं मला वाटू लागलं. प्रेम या भावनेबद्दल वेगवेगळ्या शास्त्रशाखांनी विचार केलेला आढळतो. मानवशास्त्र (अँथ्रॉपॉलॉजी), जीवरसायनशास्त्र (बायोकेमिस्ट्री), सामाजिक जीवशास्त्र (सोशोबायॉलॉजी) उत्क्रांतिवादी मानसशास्त्र (इव्होल्युशनरी सायकॉलॉजी) आणि उत्क्रांतिवादी जीवशास्त्र (इव्होल्युशनरी बायॉलॉजी) याचबरोबर मेंदू आणि चेतासंस्थेचे अभ्यासक हेही या भावनेच्या अभ्यासात महत्त्वाची भूमिका बजावत असतात. न्यूरो केमिस्ट्‌‍स आणि न्यूरोबायॉलॉजिस्ट यांचा अभ्यास तसा सर्वच भावनांच्या मागे कुठली जैवी घडामोड आणि जीवरसायनं आहेत यांचा विचार करतो. या सर्व अभ्यासकांच्या अभ्यासाचे एकत्रित निष्कर्ष आपल्याला बघायचे आहेत. इथे प्रामुख्याने १९९० नंतर झालेल्या संशोधनाचा आढावा घ्यायचा आहे, मात्र आधीच्या काळातल्या संशोधनाचा थोडा मागोवा घेऊन मगच आपण पुढं जायला हवं, असं मला वाटतं. ‘प्रेमाचे रसायनशास्त्र' आणि ‘मेंदू, प्रणय आणि कामभावना' या माझ्या दोन लेखांमध्ये (स्वयंवेध, रविराज प्रकाशन, १९९१) आधीच्या काळातील संशोधनाबद्दल लिहिताना -‘प्रेमाच्या विविध छटा असतात. भावंडांचं एकमेकांवरचं प्रेम, आईचं मुलावरचं प्रेम, मित्रप्रेम अशा भावनांचा मानसशास्त्रीय अभ्यास झाला असला, तरी रासायनिक अभ्यास म्हणावा तेवढा झालेला नाही. प्रेम आणि शारीरिक आकर्षण यांच्यात आपण गल्लत करतो. मेंदूतील रसायनांच्या कमी-जास्त असण्यामुळं काही व्यक्ती फारच प्रेमळ, तर काही व्यक्ती प्रेमांधळ्या म्हणजे ज्यांच्याकडे प्रेमभावनेचा अभाव असतो, अशा असतात. मेंदूतील अध:स्थली (हायपोथॅलॅमस्‌‍) या भागाचा प्रेमाशी आणि प्रेमळपणाशी संबंध असतो. प्रेमात आणि प्रणयात गंधज्ञान महत्त्वाची भूमिका बजावतं', अशा बाबींचा ऊहापोह करण्यात आलेला होता. आता या बाबींसह इतर अनेक शारीरिक आणि मानसिक बाबींवर प्रकाश टाकणारं संशोधन झालेलं आहे.

‘माणूस' कुणाला म्हणायचं, असा प्रश्न जेव्हा निर्माण होतो, तेव्हा ‘हसतो' तो माणूस, असं बरेचदा म्हटलं जातं, काहीवेळा जो तर्कशुद्ध विचार करतो, तो माणूस असंही म्हटलं जातं; पण प्रेमात पडलेल्या माणसाला प्रेयसीच्या चिंतेनं आणि स्त्रीला प्रियकराच्या काळजीमुळं हसू येत नाही, शिवाय त्यांचं वागणंही तर्कशुद्ध असत नाही, असं काही मानसशास्त्रज्ञ म्हणतात. ती दोघं एकत्र असतात तेव्हा विनाकारण हसतात आणि तेव्हाही त्यांचं वागणं अतार्किकच असतं. त्यामुळं त्यांच्या ‘माणूस'पणाबद्दल शंका निर्माण होते.

प्राणिजगतात ९७% प्राणी हे फक्त प्रजननापुरते एकत्र येतात. एकदा कार्यभाग उरकला की नर आणि मादी वेगळे होतात, आपापल्या वाटेनं जातात. मादीचं पुढं काय होतं याच्याशी नराला अजिबात देणं घेणं नसतं. अगदी थोडे प्राणी कायमस्वरूपी जोड्या जमवतात. माणसाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या बऱ्याच जोड्या दीर्घकाळ टिकतात. हेलन फिशर या मानवशास्त्रज्ञ महिलेच्या अभ्यासानुसार, माणसाच्या मेंदूत तीन प्रणाली प्रामुख्यानं उत्क्रांत झाल्या आहेत. लैंगिक उत्तेजन देणारी चेताप्रणाली तसंच ज्या प्रणालींमुळं माणूस प्रेमात पडतो, प्रणयासक्त होतो आणि प्रेमात पडलेल्या व्यक्तींना एकमेकांविषयी ममत्व वाटू लागतं; अशा इतर दोन प्रणाली. सर्वसाधारणपणे जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीमध्ये या तीन चेताप्रणाली उपस्थित असतात; असं असलं तरीसुद्धा प्रत्येक व्यक्ती ही प्रेमात पडण्याच्याबाबतीत काही प्रमाणात वेगळी असतेच. आपण उगीचच कुणाच्याही प्रेमात पडत नाही. आपल्या मनात खोल कुठंतरी काही वैशिष्ट्यंपूर्ण आवड दडलेली असते, त्यानुसारच आपण आपल्या प्रिय व्यक्तीची निवड करत असतो. यामुळंच आपण एखाद्या वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तीच्या प्रेमात पडतो. आपली ही निवड इतरांना बुचकळ्यातही पाडू शकते.

हेलन फिशरनी जे सर्वेक्षण केलं त्यानुसार कुठल्या दोन व्यक्ती परस्परांच्या प्रेमात पडतात, याचे त्यांनी जे आडाखे बांधले त्यानुसार कुठल्या व्यक्ती परस्पर प्रेमात पडतात, ते बघण्यासारखं आहे. समान सामाजिक आणि आर्थिक पातळीवरच्या, एकाच वंशाच्या, एकच सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या, एकाच धर्म-पंथाच्या, साधारणपणे एकाच वयोगटाच्या, समान बौद्धिक पातळी आणि शैक्षणिक दर्जा गाठलेल्या, सारखंच आकर्षक व्यक्तिमत्त्व असलेल्या आणि विनोदबुद्धीची समान पातळी असलेल्या व्यक्ती परस्परांच्या प्रेमात पडण्याची शक्यता खूप जास्त असते. बरेचदा अशा प्रकारच्या आपल्याशी सर्व बाबतींत समान पातळी असणाऱ्या व्यक्तिसमूहातच आपण वावरत असतो. आपली नैसर्गिक ‘कळप करून वावरण्याची प्रवृत्ती' आपल्याला तसं करायला भाग पाडत असते. तरीही या समूहातील सर्वच विभिन्नलिंगी व्यक्तींच्या आपण प्रेमात पडत नाही. अखेरीस आपण एकच व्यक्ती निवडतो, असं दिसतं.

‘प्यार की गलियाँ'नसतात तर एकच अरुंद गल्ली असते आणि त्यावरून तो आणि ती, अशी दोघंच आयुष्यभरासाठी एकत्र चालायचा निर्णय घेतात; असं बहुतांशवेळा दिसतं. याला अपवाद असतात आणि असणारच. मानवी स्वभावच तसा आहे. त्याबाबत नियम करता येत नाहीत. आपण हा जोडीदार कसा निवडतो? का निवडतो? आपल्या वंशसातत्याच्या दृष्टीनं हा महत्त्वाचा निर्णय आपण कसा घेतो? शेवटी जोडीदार हा कशासाठी निवडायचा तर अपत्यप्राप्तीसाठीच. हे शास्त्रीय सत्य नाकारायचा कितीही प्रयत्न केला तरी उत्क्रांतीतून जे गुणधर्म सजीवांना मिळाले त्यांचं अंतिम ध्येय हे वंशसातत्यच असतं.

जोडीदार मिळवण्यासाठी आवश्यक गुणधर्म जसे आनुवंशिकतेनं आपल्याला मिळत असतात त्याचबरोबर त्यांची जोपासना करताना परिस्थितीही आपल्याला मदत करत असते. आपल्या मातेची वागायची पद्धत, तिरकस बोलणं, वडिलांचं वागणं, क्रीडापटुत्व किंवा चर्चेतला आवेश, शांत स्वभाव (किंवा संतापी स्वभाव) आपल्या भावंडांची आवडनिवड, आपण थोरले आहोत की धाकटे, आपला मित्रपरिवार, शिक्षक यांचा आपल्या वागण्यावर नाही म्हटलं तरी परिणाम होत असतो. आनुवंशिक गुणधर्म आपल्या स्वभावात किती प्रमाणात आणि कोणते गुणधर्म प्रकट होणार हा जुगार असतो. निसर्गाचे फासे कसे पडतील हे आपल्या हाती नसतं, पण अनुभवसिद्ध ज्ञान आपल्याला जे गुण मिळालेले आहेत, त्यांना कल्हई करणं, धार आणणं आणि त्यातून आपलं व्यक्तिमत्त्व घडत असतं. या सर्वांचा परिणाम आपल्या जोडीदार निवडीवर निश्चितच होत असतो.

हेही वाचा - प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम नसतं

साधारणपणे जेव्हा आपण वयात येतो, तोपर्यंत आपलं व्यक्तिमत्त्व पूर्णत्वास पोहोचलेलं असतं. आपल्या मेंदूत जे अनुभव गोळा झालेले असतात, त्यावरून आपला स्वभाव घडलेला असतो, आपल्या आवडीनिवडी पक्क्या झालेल्या असतात, वागण्याची पद्धत ठरलेली असते; आपले आदर्शही तोपर्यंत पक्के झालेले असतात; आपण त्यांच्या प्रतिमा डोळ्यांसमोर ठेवून आपलं वागणं, बोलणं, चालणं, हावभाव, कपडे, चालण्याची शैली, केसांचं वळण ठरवलेलं असतं. हे सर्व आपल्या नकळत घडत असतं. साधारण पंचविशीपर्यंत यातले कंगोरे घालवून, घासून पुसून आपण आपल्या आदर्शांच्या जितक्या जवळ जाता येईल तितके पोहोचलेले असतो. काहीजण थोडे उशिरा का होईना पण हा टप्पा गाठतातच. अशावेळी आपल्याला एखादी व्यक्ती अशी भेटते की, आपली खात्रीच पटते की हीच आपली जोडीदार. ‘तुझे जमी पे उतारा गया है मेरे लिये।' ही ओळ आपण आपल्या नकळतच गुणगुणू लागतो.

एखाद्या मुलीला एखादा मुलगा किंवा मुलाला मुलगी आवडते ती फक्त त्यांचं दिसणं, त्यांचे हावभाव, त्यांचे कपडे, श्रीमंती इत्यादी उपरोल्लेखित गुणांचाच परिणाम असतो का, या प्रश्नाचं उत्तर मात्र ‘नाही' असंच आहे. वर सांगितलेल्या गुणधर्मांचा इतकाच पण वरपांगी लक्षात न येणारा घटक ‘दो हंसो का जोडा'एकत्र आणायला जबाबदार असतो. तुमचे जैवी गुणधर्म हा तो महत्त्वाचा घटक. बाकीच्या बाह्यगुणधर्मांवर ह्या जैवी गुणधर्मांचा जसा पगडा असतो त्याचप्रमाणे ‘हा किंवा हीच आपली' हे ठसण्यामागे आपल्या इतर बाबींपेक्षाही जैवी गुणधर्म जास्त जबाबदार असतात; असं हेलन फिशर म्हणतात. त्यांचं असं मत व्हायचं कारण एका प्रयोगात दडलेलं आहे. हा प्रयोग म्हणजे ‘घामेजलेले टी शर्ट' या नावानं प्रसिद्धी पावलेला प्रयोग. इंग्रजीत तो ‘स्वेटी टी-शर्ट एक्स्पेरिमेंट' म्हणून ओळखला जातो.

स्त्रियांना कुठले पुरुष आवडतात? या प्रश्नाला अनेक स्त्री-पुरुष वेगवेगळी उत्तरे देतील, पण खरं उत्तर वेगळंच आहे. ज्या पुरुषांची प्रतिक्षमन प्रणाली म्हणजे इम्युन सिस्टिम ही स्वत:च्या प्रतिक्षमन प्रणालीपेक्षाही वेगळी आहे, अशाच पुरुषांकडे स्त्रिया नैसर्गिकरीत्या पण अजाणताच आकृष्ट होत असतात. या आकर्षणाला मदत करणारं आपलं महत्त्वाचं इंद्रिय म्हणजे आपलं घ्राणेंद्रिय अर्थात नाक. आता प्रश्न असा उद्भवतो तो म्हणजे जर आपल्यापेक्षा वेगळी किंवा विरुद्ध गुणधर्म असलेली प्रतिक्षमन प्रणाली असलेल्या व्यक्तीकडे आपण आकृष्ट होणार असू, तर मग इतर जननिक गुणधर्म आपल्या विरोधी असलेल्या व्यक्तीकडे आपण आकर्षित का होत नाही? तसं झालं तर ते उत्क्रांतीच्या दृष्टीनं आणखी महत्त्वाचं पाऊल ठरेल. अखेरीस जननिक गुणधर्मांची सरमिसळ, हेच तर पुढच्या पिढीची चांगली निपज व्हावी यासाठी आवश्यक ठरतं, तर निसर्गाने प्रतिक्षमन प्रणालीवर एवढा भर का द्यावा, हा प्रश्न कुणालाही पडणं साहजिकच आहे.

हा प्रश्न सोडवण्याचं काम हेलन फिशरनी करायचं ठरवलं. ह्या हेलन फिशरना अमेरिकेत फेब्रुवारी महिन्यात एकदम प्रचंड मागणी असते. वृत्तपत्रे, दृश्यमाध्यमं आणि श्राव्य माध्यमांवर त्या सतत त्यांच्या आवडत्या संशोधन विषयावर बोलत असतात. कारण प्रणयी जोडप्यांचा म्हणून ओळखला जाणारा सेंट व्हॅलेंटाइनचा दिवस फेब्रुवारी महिन्यात असतो. हेलन फिशर या रुटगर विद्यापीठात मानवशास्त्र या विषयात संशोधक म्हणून काम करतात. त्यांचा अभ्यासविषय ‘मानवी प्रेमभावनेची उत्क्रांती' असा आहे. एखादी व्यक्ती इतरांच्या दृष्टीनं ‘प्रेमात पडायला आदर्श' अशी व्यक्ती सोडून तिसऱ्याच व्यक्तीच्या प्रेमात का पडते, ह्या प्रश्नावर त्यांनी बरंच संशोधन केलेलं आहे. केमिस्ट्री डॉट कॉम (chemistry.com) या वेबसाईटवर त्या सल्लागार म्हणून काम करीत असत. जोडीदार निवडीमागचं रहस्य सोडवण्याचा त्यांचा प्रयत्न, त्यांच्या मते मानवी जीवनासंबंधीचा एक फार महत्त्वाचा प्रकल्प आहे. त्यामुळेच हेलन फिशर यांचं संशोधन नक्की काय आहे हे जाणून घेणं आवश्यक ठरतं.

मानसशास्त्रज्ञांनी स्त्री-पुरुषांच्या परस्पर भावनिक आकर्षणाबद्दल बराच विचार केला आहे. वासना ही क्षणिक असते, पण प्रेम म्हणजे भावनिक बंध निर्माण करणारं हे चिरकाल ठरणारं आकर्षण असतं. परस्परविरोधी स्वभावाचे स्त्री-पुरुष एकमेकांकडे आकर्षित होतात? एखादा बडबड्या तरुण एखाद्या घुम्या तरुणीच्या प्रेमात पडेल का किंवा तो बडबड्या तरुणीच्याच प्रेमात पडेल? अशा विषयांचा पाठपुरावा करणाऱ्या मानसशास्त्रज्ञांना याबाबत कुठलाही नियम शोधून काढता आलेला नाही हे विशेष. काही गुणधर्म असे आहेत की, त्याबाबत विरोधी गुणधर्मी व्यक्ती जवळची वाटते तर इतर काही गुणधर्म असे आहेत की, ‘समानशीलेव्यसनेषु'च नव्हे तर आयुष्यभरासाठीही सख्य निर्माण होत असतं. यामुळेच मानसशास्त्रीय संशोधकांनी अखेरीस अशाप्रकारच्या संशोधनातून काही निष्पन्न होणं शक्य नाही, हे मान्य करायला सुरुवात केलेली होती.

हेही वाचा - प्रेमाचं कुलूप...

हेलन फिशर यांना जोडीदार निवडीमागं बाह्य वर्तणूक, लहानपणापासून घडवलेले संस्कार यांचा फारसा संबंध असेल असं वाटत नव्हतं. याचं साधं कारण जोडीदाराची निवड ही जननिक भविष्यकाळाच्या दृष्टीनं एक महत्त्वाची घटना आहे, असं त्या मानतात. याशिवाय अलीकडच्या संशोधनात मानवी व्यक्तिमत्त्वाचा पन्नास टक्क्यांहून अधिक भाग हा जननिक वारसा असतो. असं आढळून आलं आहे. आपल्या स्वभावातील बऱ्याच लकबी आणि सवयी ह्या आनुवंशिक असतात. हसण्याची ढब, चालण्याची पद्धत, आवाज एवढंच काय, पण अक्षरलेखन यावरही आनुवांशिक छाप असते. याशिवाय धाडस, नवे प्रयोग करून पाहण्याची इच्छा, कर्तव्य पार पाडण्याची तत्परता, स्वभावातला मोकळेपणा, भांडखोरवृत्ती, सर्वांना सांभाळून घेत काम उरकण्याची पद्धती, सतत चिंता करण्याचा स्वभाव अशा अनेक स्वाभाविक खाचाखोचा या आनुवांशिक असतात. त्या कधीच बदलत नसतात, तर आयुष्यभराच्या साथीदार बनून तुमच्या राशीला आलेल्या असतात. जुळ्या भावंडांच्या अभ्यासातून तसंच इतरही बऱ्याच अभ्यासातून या स्वभाववैशिष्ट्यांची आनुवांशिकता सिद्ध झालेली आहे.

पुरातन काळापासून वेगवेगळ्या प्रकारे स्वभाव वैशिष्ट्यानुसार माणसांचे प्रकार ठरवण्याचे प्रयत्न झालेले आहेत आपल्या सात्त्विक, संसारी, तामसी इत्यादी विशेषणांनी मानवी स्वभाववैशिष्ट्ये नमूद केली जातात. प्लेटोनं कलाकार (आर्टिस्ट्स) संरक्षक (द गार्डियन्स)आदर्शवादी (आयडिॲलिस्ट) आणि तर्कशुद्ध वागणारे (रॅशनॅलिस्ट) अशा गटात माणसांची विभागणी केली होती. आधुनिक काळात आपण गंभीर, विनोदी, घासू, स्कॉलर अशा आपल्या सोयीच्या वर्गीकरणाचाही वापर करतो. याचाच अर्थ मानवी स्वभाव कुठल्यातरी चौकटीत बसवायचा आपला प्रयत्न असतो आणि मग यातल्या कुठल्या स्वभावाच्या व्यक्तीची कुठल्या दुसऱ्या स्वभावाच्या व्यक्तीशी जोडी जमेल याचा सामान्य माणसंही विचार करतात. मानवी स्वभावाचे अभ्यासक, मानसशास्त्रज्ञ आणि वर्तणूक शास्त्रज्ञही नक्कीच करत असतात. आपल्याकडेही असे प्रयत्न झाले, मात्र त्याला फलज्योतिषाचा आधार घेण्यात आला आणि त्याचे ठोकताळे बरेचदा चुकू लागले.

डॉ. हेलन फिशरनी मात्र ह्या मानवी गुणधर्मांचा वेगळ्याप्रकारे विचार केला. त्यांच्यामते मानवी स्वभावरचना, विचार करण्याची पद्धत आणि वर्तणूक हे सर्व आपल्या जनुकांशी संबंधित असतात. आपल्या जनुकांचे चमू, आपली चेता संप्रेरके आणि मेंदूतील चेतापेशींचे मार्ग यांचा आपल्या विचारांशी, वर्तणुकीशी आणि पर्यायाने स्वभावाशी थेट संबंध असतो. यामुळे हेलन फिशर आपल्या व्यक्तिमत्त्वाला कारणीभूत ठरणाऱ्या आणि व्यक्तिमत्त्वाच्या प्रकट गुणधर्मांना आपल्या ‘जननिक लक्षणांचा समुच्चय' (जेनेटिक प्रोफाईल) असं म्हणतात. त्यांच्यामते आपण जेव्हा जोडीदार म्हणून स्वीकार करतो. म्हणजे डॉ. हेलन फिशरचं म्हणणं मान्य करायचं तर आपल्यामध्ये अशी लक्षणं ओळखण्याचं सुप्त ज्ञान असायलाच हवं. यामुळे प्रत्येक पुढच्या पिढीत नवे गुणधर्म उतरतात.

कुठलेही जीन (जनुकं) दुसऱ्या जीनबरोबर कशातऱ्हेनं संपर्कात येतात; या जनुकांमुळं शरीरावश्यक प्रथिनं रेणू कसे निर्माण केले जातात; या प्रथिनांपासून मेंदू आणि चेतासंस्थेची निर्मिती कशाप्रकारे होते, या चेताप्रणालीच्या घटकांचा परस्परसंबंध कसा प्रस्थापित होतो, याबाबत सध्या आपण अनभिज्ञ आहोत; कारण या सर्व प्रक्रिया अत्यंत जटिल असून, त्यांचा उलगडा करण्याचं काम बाल्यावस्थेत आहे, असंच म्हणावं लागतं. असं असलं तरी याविषयी जे थोडंफार संशोधन झालेलं आहे; त्यावरून आपल्या शरीरातील चार रासायनिक संप्रेरक प्रणालींचा आपल्या स्वभावनिर्मितीशी आणि पर्यायाने व्यक्तिमत्त्वाच्या बांधणीशी संबंध असतो, असं सिद्ध झालं आहे. या चार मूलभूत रासायनिक प्रणाली म्हणजे डोपामाईन, सेरोटोनिन, इस्ट्रोजन आणि टेस्ट्रोस्टीरॉन या आहेत. या चौघांचा प्लेटोच्या चार स्वभाववैशिष्ट्यांशी जवळचा संबंध आहे, असं फिशर म्हणतात.

फिशरनी या चार प्रकारांचं त्यांच्या पद्धतीनं एक नवं वर्गीकरण केलेलं आहे. ज्यांच्या वर्तणुकीवर डोपामाईनचा प्रभाव असतो त्यांना फिशर ‘शोधकवृत्ती'च्या (एक्स्प्लोअरर)व्यक्ती म्हणतात. धोका पत्करण्यात पुढं मागं न बघणारी, मनात एखादा विचार येताच तो कृतीत आणणारी, नावीन्याची आवड असलेली, सर्जनशील वृत्तीची आणि कुतुहलपूर्ण स्वभावाच्या व्यक्ती या डोपामाईनचा प्रभाव असणाऱ्या म्हणजे शोधकवृत्तीच्या व्यक्ती असतात. ज्यांच्यावर सेरोटॉनिनचा प्रभाव असतो त्यांना फिशर ‘निर्माते' (बिल्डर) असं म्हणतात. हे स्त्री-पुरुष समाजात मिळून मिसळून वावरणारे, लोकप्रिय, सावध (पण घाबरट नव्हेत.) नियम पाळणारे, पारंपरिक विचारांचे, आध्यात्मिक आणि धार्मिक प्रवृत्तीचे असतात.

तिसऱ्या प्रकारचे स्त्री-पुरुष ‘मध्यस्थ' (निगोशिएटर) वृत्तीचे असतात. यांच्यावर इस्ट्रोजन संप्रेरकाचा प्रभाव असतो. हे बोलण्यात पटाईत, लोकांच्या भावना त्यांचे चेहरे पाहून ओळखणारे, प्रत्येक बाबतीत मागचे- पुढचे संदर्भ पाहून विचार करणारे, दयाळू, कल्पक आणि सर्वांशी जुळवून घेणारे असतात. याउलट टेस्टोस्टीरोनचा प्रभाव असलेल्या व्यक्ती असतात. हे धडाकेबाज, फटकळ, एककल्ली,हाती घेतलेल्या कामावर लक्ष केंद्रित करणारे, बाह्यत: स्पर्धात्मक वृत्तीचे, प्रत्येक परिस्थितीचे पृथ्थकरण करणारे, तर्कशुद्ध वागणारे आणि यंत्रं व नियमानुसार चालणाऱ्या बाबींचे भोक्ते असतात. यांना फिशर ‘निर्देशक'असं (डायरेक्टर्स) म्हणतात,

फिशर यांनी माणसांचे असे चार भाग पाडले असले तरी त्यांच्यामते बहुतेक व्यक्तींमध्ये एकप्रकारचं व्यक्तिमत्त्व हे इतर तीन प्रकारच्या व्यक्तिमत्वांपेक्षा जास्त प्रभावी ठरतं.

फिशर यांच्या या विचारांचा जोडीदार मिळवण्यासाठी कसा उपयोग होऊ शकेल, हे बघणंही महत्त्वाचं ठरतं. त्यासाठी फिशर यांनी एक प्रश्नपत्रिका तयार केली. प्रत्येक प्रश्नाला चारपैकी एक उत्तर अपेक्षित होतं. (ही प्रश्नपत्रिका वेगळी दिली आहे.) या प्रश्नपत्रिकेचं केमिस्ट्री डॉट कॉमच्या वाचकांना त्याचबरोबर वेबसाईटवरून वाटप होत होतं. १६ लाख अमेरिकन स्त्री-पुरुषांनी ह्या प्रश्नपत्रिकेची उत्तरं पाठवली. त्यावरून त्यांनी काही निष्कर्ष काढले. हे निष्कर्ष अर्थातच प्रामुख्याने अमेरिकन नागरिकांनी पाठवलेल्या उत्तरांवर अवलंबून आहेत. २००७च्या सुरुवातीपासून २००७च्या मध्यापर्यंत आलेल्या १६ लक्ष उत्तरांपैकी फिशरनी ५ लक्ष २३ हजार ६२२ उत्तरं तपासली त्याचे निष्कर्ष त्यांनी २००७च्या उत्तरार्धात जाहीर केले.

त्यानुसार एखादी व्यक्ती ‘शोधक/निर्देशक', ‘शोधक/मध्यस्थ', ‘मध्यस्थ/निर्माती' अशी एक प्रबल आणि दुसरा दुय्यम वर्ग अशी असू शकते, असं त्यांच्या लक्षात आलं. अमेरिकेतल्या तरुण-तरुणींपैकी ४२ टक्के ‘निर्माते' या प्रकारचे आहेत. फिशर यांच्यामते हा उत्क्रांतीचा परिणाम असावा. आपल्या पूर्वजांच्या काळात समाजाला स्थैर्य लाभावं म्हणून जास्तीत जास्त ‘निर्मात्यांची' गरज होती. जेव्हा जेव्हा नैसर्गिक परिस्थितीत पर्यावरणीय बदल घडत किंवा नैसर्गिक आपत्तीमुळं नव्या वसतिस्थानांची गरज असे तेव्हाच ‘शोधकांना' महत्त्व प्राप्त होत होतं. मुक्काम हलवून दुसऱ्या वसतिस्थानी जायचं तर त्यासाठी साहसी स्त्री-पुरुषांनी पुढाकार घेणं साहजिकच होतं. त्यातूनच बहुधा ‘साहसे श्री प्रतिवसती' ही म्हण जन्माला आली असावी; पण अति साहसानं संपूर्ण टोळी किंवा जमात संकटात सापडण्याची शक्यताच अधिक असे.

अलीकडच्या काळात हे ‘शोधक' मोठ्या शहरांचा रस्ता पकडतात. याचं कारण आता जमाना बदलला आहे. मोठ्या शहरात नवनव्या संधी उपलब्ध असतात, तिथं वेगळ्या प्रकारच्या साहसाला वाव असतो, हे साहस आता शारीरिक साहस राहिलेलं नाही, तर ते बौद्धिक आणि व्यावहारिक चलाखी या स्वरूपातलं बनलं आहे. ‘निर्माते' घरी बसतात आणि आजपर्यंत जे मिळवलंय ते सांभाळून ठेवतात; असं फिशर म्हणतात.

हे वेगवेगळ्या वर्गाचे स्त्री-पुरुष जोडीदार कसे निवडतात, हे फिशरनी २७६६ जोडप्यांचा अभ्यास करून ठरवलं. ही सर्व जोडपी केमिस्ट्री डॉट कॉम मुळे परिचय होऊन नंतर एकत्र आलेली होती. पहिल्या भेटीनंतर लगेचच त्यांच्या जोडीदाराबद्दलच्या प्रतिक्रिया काय होत्या हे हेलन फिशरनी नोंदवायला सुरुवात केली. पहिल्या भेटी फार महत्त्वाच्या असतात. पुढं ह्या जोडीचे परस्परसंबंध कसे असतील, हे पहिल्या भेटीवर फार मोठ्या प्रमाणात अवलंबून असतं. आतापर्यंत म्हणजे २००७च्या मध्यापर्यंत मिळालेल्या माहितीचं हेलन फिशरनी जे पृथ्थकरण केलंय त्यानुसार ‘मध्यस्थ'व्यक्ती सर्वांनाच आवडतात असं दिसतं. पुरुष निर्माते सोडले तर बहुतेक सर्व व्यक्ती ‘मध्यस्थांशी' संबंध प्रस्थापित करायला उत्सुक असतात. याचं कारण या व्यक्ती कल्पक, सहज जमवून घेणाऱ्या, सहसा कुणाला न दुखावणाऱ्या आणि बोलक्या असतात. मुख्य म्हणजे हेलन फिशरच्या दृष्टीनं यातून आणखी एक महत्त्वाची बाब उघड झाली. साधारणपणे ‘मध्यस्थ' वगळता इतर सर्व प्रकारच्या व्यक्तींना आपल्यापेक्षा वेगळ्या स्वभावगटाच्या व्यक्तींबद्दल प्रथमदर्शनी आकर्षण वाटतं.

सेरॉटॉनिनच्या प्रभावाखाली असलेल्या व्यक्ती म्हणजे ‘निर्मात्या' व्यक्तींना डोपामाईन प्रभावी ‘शोधक' व्यक्तींबद्दल अधिक आकर्षण वाटतं. तसंच डोपामाईन प्रभावी व्यक्तींना म्हणजे ‘शोधक' व्यक्तींना ‘निर्मात्यां'बद्दल अधिक आकर्षण वाटतं. हे का घडत असावं? ‘निर्माती' नेहमी शिस्तबद्ध, नियमानं वागणारी अशी व्यक्ती असते. तिला बाल संगोपनाच्या काळात उत्स्फूर्त आणि नावीन्याची आवड असलेल्या ‘शोधक' व्यक्तीची गरज पडते. या उलट शोधक व्यक्तीला ‘निर्मात्या' व्यक्तीच्या आखीवरेखीव नियमबद्ध आयुष्यामुळं अपत्यांना आधार मिळेल, विश्वसनीय शास्ता/बाप किंवा शासक आई मिळेल असं कुठंतरी सुप्तमन जाणीव करून देत असतं.

‘निर्देशकांना', ‘मध्यस्थ' हवेसे वाटतात याचं कारण ‘मध्यस्था'च्या सामाजिक अभिसरणाच्या कौशल्याची आणि समोरच्या व्यक्तीला बोलण्यात गुंगविण्याच्या कौशल्याची गरज भासत असते. वेगवेगळ्या संदर्भातून परिस्थितीचा अंदाज घेणं, स्वभावातील लवचिकता आणि जोपासना करण्याची वृत्ती मग ते इतर व्यक्तींशी मित्रत्वाचं नातं असो नाहीतर हाताखाली काम करणाऱ्या व्यक्ती असोत त्यांना टिकवून ठेवणं हा ‘मध्यस्था'चा गुणधर्म ‘निर्देशकाला' महत्त्वाचा वाटत असतो. सर्वसाधारणपणे ‘मध्यस्थ' हे दुसऱ्या मध्यस्थांकडे आकृष्ट होत असतात; त्यानंतरची त्यांची निवड मात्र ‘निर्देशकां'ची असते. ‘निर्देशकां'चा प्रश्नाला थेट भिडण्याचा स्वभाव, त्यांच्यातील स्पर्धक, ध्येयकेंद्रित वृत्ती, तर्कशुद्ध पृथ्थकरणानंतर कुठल्याही बाबीबाबत निर्णय घेण्याची पद्धत काम करण्यातील एक प्रकारची यांत्रिकता ही ‘मध्यस्थां'च्या विचारातील लवचिकतेमुळं निर्माण होणाऱ्या पेचप्रसंगात उपयुक्त ठरेल ही सुप्त खात्री ‘मध्यस्थां'ना आश्वस्त करीत असावी, असं फिशरना वाटतं. अशा तऱ्हेच्या जोड्यांचे फायदेही असतात आणि काहीवेळा तोटेही असू शकतात, पण बहुतेकवेळा फायद्याचं प्रमाण तोट्यापेक्षा जास्त ठरतं.

फिशर यांच्यामते या वेगवेगळ्या स्वभाववैशिष्ट्यांच्या निवडी कशा होतात, तर ती एक चाळणीसारखी किंवा गाळण्यासारखी प्रक्रिया असते. प्रथम आपल्याला एखादी व्यक्ती भावी जोडीदार म्हणून योग्य ठरेल, असं वाटू लागतं. त्यामुळं आपण त्या व्यक्तीशी परिचय वाढवतो. यातून आपण त्या व्यक्तीच्या वैशिष्ट्यांचा अंदाज घ्यायचा प्रयत्न करू लागतो. आधी शारीरिक वैशिष्ट्यं बघितली जातात; मग बोलण्यावागण्यातून ती व्यक्ती शिस्तबद्ध आहे की अजागळ आहे, तिला कुठल्या प्रकारच्या कलेच्या आवडीनिवडी आहेत, गंभीर आहे की, उथळ आहे; वयातलं अंतर, अशा गेोष्टींचा काहीवेळा उघड तर काहीवेळा सुप्तपणे अंदाज घेतला जातो.

साधारणपणे दोन्ही व्यक्ती एकाच सामाजिक आणि आर्थिक स्तरातील असतील, वयात फारसं अंतर नसेल, दोघांचीही बुद्धिमत्ता साधारणपणे समान पातळीवर असेल, शिक्षणही एकमेकांना पूरक असं असेल, विनोदबुद्धी आणि सामाजिक वर्तणूक सर्वसामान्य असेल, तर त्या व्यक्तीची या गाळणीतून पुढील शक्यता विचारात घेण्यासाठी निवड होते. या सर्व अंदाज घेण्याच्या प्रक्रियेला बऱ्यापैकी वेळ लागतोच. त्यामुळंच ‘मॅरी इन हेस्ट, रिपेंट इन लेझर' (लग्नाची घाई आणि पस्तावा होई) अशा म्हणी निर्माण झाल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सर्व संस्कृतीत या अर्थाच्या म्हणी आहेत. साधारणपणे अशा दोन-चार शक्यतांची चाचपणी झाली की मग महत्त्वाचे मुद्दे विचारात घेतले जातात. हे महत्त्वाचे मुद्दे म्हणजे मानसिक जडणघडण आणि शारीरिक क्षमता. एखाद्यावेळी अभावितपणे मारलेला शेरा, नको तिथं खुपसलेलं नाक, सातत्यानं येणारं आजारपण, थोड्या परिश्रमाने येणारा थकवा, आळशी किंवा कामचुकार वृत्ती या जोडीदार गमावण्याला कारणीभूत ठरू शकतात. त्याचबरोबर राजकीय आणि सामाजिक प्रश्नांबद्दलची मतंही जोडी पक्की होण्याच्या आड येऊ शकतात.

वरील सर्व गोष्टींची खात्री झाली की, साधारणपणे या जोडीदारांची जन्मगाठ जुळते. प्रत्येक जोडीत वरील सर्व गुणमेलन पूर्णपणे जुळेलच असे नाही, पण मानवी आयुष्य ही एक महान तडजोड आहे, हेच जोडीदार मिळवतानाही दिसतं. दोन्ही बाजू थोडी थोडी तडजोड करतात. त्यामागं सहवासोत्तर आपण जोडीदारात (आपल्या दृष्टीनं योग्य अशी) सुधारणा घडवून आणू याची खात्रीही वाटत असते.

ह्याप्रकारचं हे पहिलंच संशोधन आहे. (याला आपल्याकडची मुलगी बघून लग्न जमवण्याची पद्धत अर्थातच अपवाद आहे.) फिशरना यातून मानवी जोडीदार निवडीबद्दल बरीच नवी माहिती हाती आली आहे, तरी सध्याचे त्यांचे सर्व निष्कर्ष प्राथमिक आहेत. त्यांच्यामते आपण दोन कारणांसाठी जोडीदार निवडतो, एक म्हणजे अपत्यप्राप्ती आणि अपत्य संगोपन आणि दुसरं कारण म्हणजे मानसिक सुख-शांती. प्रत्येकवेळी या दोन गरजा पूर्ण होतातच असं नाही. त्यामुळं मग सांसारिक ताणतणाव सुरू होतात, असं फिशरना वाटतं.

काही मानसशास्त्रज्ञांच्यामते पुरुष आपल्या आईसारखी आणि स्त्रिया आपल्या वडिलांसारखा - असे पत्नी व पती निवडत असतात. फिशरना असं वाटतं की, लहानपणी मुलांचा स्वभाव आईशी जुळत नसेल, तर त्यामुळे मुलाचं आणि आईचं पटत नसतं तेच मुलीच्या आणि वडिलांच्या बाबतीत घडतं. पण मोठेपणी जैवी घटकांमुळं अशाच व्यक्ती जोडीदार म्हणून योग्य ठरत असाव्यात. फिशर यांच्या या प्राथमिक संशोधनाची माहिती मांडतानाच त्या सांगतात की, प्रेम ही एक जादू आहे. त्याचं पृथ्थकरण करून त्याचं समीकरण मांडायचा प्रयत्न यशस्वी होईल याची त्यामुळंच खात्री नाही.

(अनुभव, फेब्रुवारी २००८च्या अंकातून साभार.)

निरंजन घाटे







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results