आम्ही कोण?
वीकेंड स्पेशल 

प्रेमाचं कुलूप...

  • यशोदा वाकणकर
  • 26.10.25
  • वाचनवेळ 10 मि.
lock of love

जर्मनीमध्ये राहत असताना साधारण दर पंधरा दिवसांनी मी आणि पराग कलोन शहरात जाऊन यायचो. आमच्या गावापासून ट्रेनने कलोनला जायला फक्त वीस मिनिटं लागायची. ट्रेन जेव्हा कलोन शहरात प्रवेश करते तेव्हा आपण एक ‘होहेनझोलर्न' नावाचा खूप मोठा पूल पार करतो. ऱ्हाईन नदीवर वसलेला हा ऐसपैस पूल. तिथे ट्रेन आली की खूप छान वाटायचं. एक तर मला नद्यांची आणि पाण्याची अतोनात ओढ आहे, आणि त्यातही ऱ्हाईन नदीचं छान, मोठं रुंद आणि स्वच्छ पात्र, तिची ऐट, कडेकडेला थांबलेल्या डौलदार क्रूझ, त्याला लागून वसलेलं अख्खं कलोन शहर, आणि सर्वांत उठून दिसणारं- महायुद्धात जाळलं गेलेलं- भव्य काळंभोर कॅथेड्रल. कुठलाही ऋतू असला तरी या सगळ्यालाच एक ‘जाग' असायची आणि एक चैतन्य भरलेलं असायचं. या परिसरामध्ये ते छान वाटायचं. कारण हे चैतन्य युरोपमधल्या सगळ्याच शहरांमधे बारा महिने असतंच असं नाही.

होहेनझोलर्न हा जरी रेल्वे ब्रिज असला तरी त्याला लागून दोन्हीकडे जाळीची मोठी कंपाऊंड्स आणि पादचारी मार्ग होते. तिथे सतत माणसांची वर्दळ दिसायची. पण या पुलावरून ट्रेनने जाताना अजून एका गोष्टीकडे माझं नेहमी लक्ष जायचं, ती म्हणजे या ब्रिजला लागून असलेल्या जाळीच्या कंपाऊंडला शेकडो कुलपं लटकलेली दिसायची. अगदी एकमेकांना चिकटून चिकटून असलेली कुलपं. मला अतोनात कुतूहल वाटायचं- इथे कुलपं का बरं लावली असतील? स्नो-फॉल थांबल्यावर तर ती कुलपं अजूनच उठून दिसायची. काही मध्यम आकाराची पितळेची कुलपं, तर काही कुलपं रंगीबेरंगी, असं सारं दृश्य. मग तर माझं कुतूहल खूपच चाळवलं गेलं.

त्या कुलपांची कथा मला माझी जर्मन मैत्रीण झिबिल हिच्याकडून समजली. झिबिलने सांगितलं, की ही कुलपं प्रेमाचं प्रतीक म्हणून लावली जातात. इथे लग्न झाल्यावर ते विवाहित जोडपं आणि त्यांचे निकटचे कुटुंबीय या ब्रिजवर येतात प्रेमाचं कुलूप लावायला. येताना अर्थातच त्या जोडप्याचं नाव घातलेलं कुलूप घेऊन येतात. उदा. ‘ॲना वेड्स डेव्हिड' आणि खाली लग्नाची तारीख. कुलपाच्या मागच्या बाजूला एखादं प्रेमाविषयीचं वाक्य. ते कुलूप त्या ब्रिजच्या जाळीला समारंभपूर्वक लावतात आणि मग त्याची किल्ली ऱ्हाईन नदीमधे फेकून देतात. बांधलेली गाठ कधी सुटू नये याचं प्रतीक. त्यामुळेच असतं हे प्रेमाचं कुलूप, प्रेमाची गाठ बांधणारं. छानच वाटलं मला हे ऐकून. आपल्याकडे लग्न झाल्यावर नवविवाहित जोडपं सहकुटुंब देवदर्शनाला जातं, त्याची मला आठवण झाली.

तिथे या प्रेमाच्या कुलपांना ‘लव्ह पॅडलॉक्स' असं म्हणतात आणि या ब्रिजला ‘लव्ह-ब्रिज' म्हटलं जातं असंही समजलं. मग एकदा खास मी ती कुलपं जवळून बघण्यासाठी कलोनच्या आधीच्या स्टेशनला उतरून त्या होहेनझोलर्न ब्रिजला लागून असलेल्या पादचारी मार्गावरून चालत गेले. ऑगस्ट महिना असल्यामुळे हवा छान होती आणि टूरिस्ट्ससुद्धा खूप जमलेले होते. ट्रेनमधून बघताना मला असं वाटलं होतं, की हजाराच्या आसपास असतील ती कुलपं, पण जवळून पाहिल्यावर दिसलं की ती लाखाच्याही वर असणार- नक्कीच! दाटीवाटीनं लावलेली, रंगीबेरंगी, पितळेची, स्टीलची आणि लोखंडाचीसुद्धा. काही काही तर सायकल लॉक्ससुद्धा होती! बहुतांश कुलपं मध्यम आकाराची म्हणजे साधारण एक-दीड इंच लांबी-रुंदीची. पण जुनी कुलपं थोडी मोठी. आणि सर्वांत जुनी कुलपं म्हणजे ज्यावर १९६० मधली तारीख होती. ती तर भली मोठी लोखंडाची आणि थोडी गंजलेली. हे सगळं दृश्य मी बराच वेळ न्याहाळत उभी होते.

त्या त्या कुलपांवरची नावं, तारखा, मेसेजेस आणि त्या कुलपांची स्थिती बघून मी मजेने त्या त्या जोडप्याला समजून घ्यायचा प्रयत्न करत होते. म्हणजे एका जोडप्याने त्यांच्या नावाची १५-२० कुलपं बदामाच्या आकारात लावली होती. ते युगुल खूपच प्रेमात असणार एकमेकांच्या! एका कुलपावर २०११मधली तारीख होती, पण कुलूप मात्र जुन्या पद्धतीचं मोठं आणि लोखंडी होतं. त्यांचं प्रेम घट्ट असणार आणि त्यांना व्यवस्थित संसार करायचा असणार! एका जोडप्याने गुलाबी रंगाचं कुलूप लावलं होतं, त्यांचं छान हलकं-फुलकं गुलाबी प्रेम असणार. पण सगळ्यात कहर म्हणजे काही काही नंबर लॉक्स होती. म्हणजे किल्ली फेकून देण्याचा प्रश्नच नाही! पण त्याचं मला खूप हसू आलं. या जोडप्याला आपलं जमलेलं मोडणार की काय अशी पहिल्यापासून शंका असावी का? मनात असे गंमतशीर तर्क लावत मी या प्रेमाच्या कुलपांना समजून घेत होते.

तिथून पुढे चालत जात असताना अचानक लक्ष गेलं, की एक नुकतंच लग्न झालेलं कोरियन जोडपं आलं आहे कुलूप लावायला. लग्नाचा पांढरा ड्रेस घातलेली वधू आणि काळ्या सुटातला वर. त्यांच्याबरोबर त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवारसुद्धा दिसत होता. मी मध्येच थांबून त्यांचं अभिनंदन केलं. येणारे-जाणारे टूरिस्टसुद्धा त्यांना शुभेच्छा देत होते. ते जोडपं खूप लाजत होतं. त्यांनी पुलाच्या जाळीला त्यांच्या प्रेमाचं प्रतीक असलेलं कुलूप लावलं आणि किल्ली ऱ्हाईन नदीत दूरवर फेकून दिली. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. खूपच छान वाटलं हे दृश्य पाहून.

नंतर मला त्या कुलपांच्या पुलाची अजून एक मजेशीर प्रथा समजली, समजा मी त्या ब्रिजवरच्या लाखो कुलपांमधलं एक ओळखीच्या नावाचं कुलूप शोधून काढलं, तर ते जोडपं मला मोठ्ठी पार्टी देणं लागतं! हे समजल्यावर मी कुलपं जरा बारकाईने पाहिली, ओळखीच्या कुणाचं नाव दिसतंय का म्हणून. पण लाखो कुलपांमधे असं आपल्या ओळखीच्या जोडप्याचं नाव असलेलं कुलूप शोधणं केवळ अशक्यच होतं.

मग परागने आणि मी पण असं ठरवलं की आपल्या प्रेमाचं पण इथे कुलूप लावायचं! मग आमच्या पुतणीने आम्हाला एक खास तशा प्रकारचं कुलूप भेट दिलं आणि त्यावर आमची नावं आणि लग्नाची तारीख घालून घेतली. जेव्हा ते कुलूप लावून आम्ही किल्ली ऱ्हाईन नदीत टाकली तेव्हा खूप छान व हलकं हलकं वाटलं.

झिबिलने सांगितलं, की जर्मनीत लग्नाचा दहावा वाढदिवस, पंचविसावा वाढदिवस असेल तरी ही जोडपी या पुलावर येऊन नवं कुलूप लावून वाढदिवस साजरा करतात आणि प्रेमाची नाती अजून दृढ करतात. किंवा काहीजण पूर्ण कुटुंबाचं मिळून ‘फॅमिली लॉक'सुद्धा लावतात.

एकदा तर चक्क एक जर्मन आजी-आजोबा त्यांचा लग्नाचा पन्नासावा वाढदिवस साजरा करायला या होहेनझोलर्न ब्रिजवर आले होते. त्यांची गुलाबी, गोरी आणि छान सुरकुतलेली त्वचा, रुपेरी केस आणि चेहऱ्यावर एक समाधान बघताना खूपच छान वाटलं. त्यांना बसायला दोन छोट्याशा खुर्च्या आणल्या होत्या. मधे छोटासा टीपॉय (टेबल-क्लॉथसहित!), त्यावर दोन वाइनचे ग्लास आणि मधे केक! किती सुंदर! असं छान मुरलेल्या लोणच्यासारखं (किंवा मुरलेल्या वाइनसारखं) मुरलेलं नातं पाहिलं की किती छान वाटतं!

मग मी होहेनझोलर्न पुलाचा इतिहास समजून घेतला तेव्हा कळलं, की हा पूल अठराव्या शतकापासून आहे, पण पूर्वी त्याचं नाव ‘कॅथेड्रल ब्रिज' असं होतं. नंतर १९०७ मध्ये त्याचं नूतनीकरण केलं, तिथे रेल्वे आणि पादचारी मार्ग सुरू करण्यात आले आणि त्याला ‘होहेनझोलर्न ब्रिज' असं नाव देण्यात आलं. कलोन शहरात प्रवेश करण्याचा हा राजमार्गच आहे पूर्वीपासून. ट्रेनसुद्धा हा पूल पार करते आणि कलोनच्या सेंट्रल स्टेशनमध्ये प्रवेश करते. दररोज या पुलावरून १२०० पेक्षा जास्त ट्रेन्स जातात. दुसरं महायुद्ध सुरू असताना ॲण्टी-जर्मन्सनी या पुलावरून कलोनमधे प्रवेश करायचा प्रयत्न केला; पण खुद्द जर्मनांनीच हा पूल उध्वस्त केला. महायुद्धानंतर १९४८ मधे हा पूल परत बांधला गेला, पण त्या ‘होहेनझोलर्न ब्रिज'चं ‘लव्ह-ब्रिज'मध्ये कधी रूपांतर झालं हे नक्की कुणालाच सांगता येत नाही. ते आता आता १९९० नंतर सुरू झालं असावं असं तेथील काहीजणांचं म्हणणं आहे.

पण युरोपच्या इतिहासात असे ‘लव्ह पॅडलॉक्स' अथवा ‘प्रेमाची कुलपं' असणारे पूल अनेक आहेत. स्पेन, रोम, ग्रीस, पॅरिस, मॉस्को, हंगेरी इत्यादी ठिकाणी. रोममधल्या ‘मिलव्हियन ब्रिज'वर अशी प्रेमाची कुलपं खूप पूर्वीपासून लावली जातात. त्यावर फेडेरिको मोक्सिया या इटालियन लेखकाने कादंबरी लिहिली आणि त्यावर नंतर चित्रपटही निघाला. त्यामुळे त्या पुलाला खूप प्रसिद्धी मिळाली. सेरबियामधील लव्ह-ब्रिजचा इतिहास पहिल्या महायुद्धाच्या आधीपासून आहे आणि ग्रीसमधील लव्ह-ब्रिज पहिल्या महायुद्धापासून आहे. पण एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्वी अशा लव्ह-ब्रिजवर नुसती कुलपं नेऊन लावली जायची. त्यावर नाव घालण्याची पद्धत ग्रीसपासून सुरू झाली.

हे झालं युरोपमधलं, पण चीनमधे तर ही पद्धत खूपच पूर्वीपासून आहे. चीनमधल्या माऊंट हुआंग येथील एका पुलावरसुद्धा कुलूप लावून किल्ली दरीत फेकायची प्रथा आहे. त्याची एक प्रसिद्ध ऐतिहासिक कथासुद्धा आहे आणि यथावकाश त्याचं टूरिस्टीकरणसुद्धा व्यवस्थित झालं आहे.

होहेनझोलर्न ब्रिज, तिथली प्रेमाची कुलपं, माझं निरीक्षण, अनुभव, हे सगळं मी नेहमीप्रमाणे माझ्या भारतीय आणि जर्मन मित्र-मैत्रिणींना उत्साहाने सांगत होते. फोनवर, प्रत्यक्ष किंवा ई-मेलद्वारे. पण माझ्या निरीक्षणापेक्षाही या मित्र-मैत्रिणींच्या येणाऱ्या प्रतिक्रिया मला जास्त अंतर्मुख करणाऱ्या वाटल्या. काहीजण या सगळ्याची खूप वाहव्वा करायचे. हळुवार प्रेम, वैश्विक प्रेम, घट्ट जोडली जाणारी नाती याविषयी छान मतं व्यक्त करायचे. त्यातले काही मजेने म्हणायचेसुद्धा, की तू तिकडे आहेस तर आमच्या नावाचं पण एक कुलूप लावून टाक. (जसं आपल्याकडे कोणी एखाद्या गणपतीला गेलं की दुसरा त्याला म्हणतो, की माझ्या वाटणीचाही नारळ फोड.)

काही प्रतिक्रिया मात्र त्यापेक्षा अगदी उलट असायच्या. “हे कसलं आलं आहे नवं फॅड? याने काय साध्य होणार आहे? कशाला लावायचं उगाच कुलूप? प्रेम कशाशी खातात हे या जर्मनांना काही कळतं का?”

काहीजण म्हणायचे, “बाप रे! किती कुलपं वाया गेली! किती मेटल गेलं त्यात! त्या कुलपांवर नावं घालण्यात केवढी एनर्जी वाया गेली! त्यातही तेवढ्या लाखो चाव्या नदीत फेकल्या, त्या पाण्यातच रुतून राहणार. त्यांचं दुसरं काही तरी करता आलं असतं.”

कुणी म्हणायचं, “पण हे प्रेम एवढं दाखवायला कशाला पाहिजे? मनात आहे तेवढं पुरे आहे!”

काही मित्रमैत्रिणी म्हणायचे, की आपल्याकडे भारतात प्रेम जमलं की सिंहगडावर एखाद्या दगडावर नावं कोरतात, सगळं विद्रूप करून टाकतात- त्यापेक्षा असं काही तरी सुरू करावं. पण ‘भारतात असं झालं तर...' असं विधान केलं तर सगळ्यांच्या कल्पनाशक्तीला ऊतच येईल.

विनोदाचा भाग सोडा, पण ही मतं अंतर्मुख करायला लावणारी अशामुळे होती, की माझ्या मनातला विषय होता ‘प्रेम' आणि त्यावरच्या या विविध छटा मला दिसत होत्या. माणसाचं मन ही किती गहिरी गोष्ट आहे! प्रत्येक गोष्टीकडे बघायचा प्रत्येकाचा दृष्टिकोन निराळा. एखादी व्यक्ती या गोष्टीकडे भावुकपणे बघते तर एखादी व्यावहारिक नजरेतून. याचा अर्थ कुणी प्रेम कमी-जास्त करतं असा नाही, पण दृष्टिकोनांचे तरंग मात्र उमटतात. पण प्रेमासाठी वेडे असणारे मात्र व्यवहार वगैरे बाजूला ठेवताना दिसतात.

पण ही झाली भारतीयांची मतं. जर्मन मित्रमैत्रिणींमधे अनेकांना हे खूप आवडायचं. पण काहीजण म्हणायचेसुद्धा, की प्रेम व्यक्त करण्यासाठी या कुलपांची काही गरज नाही. आश्चर्य म्हणजे जर्मन मित्रमैत्रिणींमधे काहीजणांना या ब्रिजबद्दल माहितीसुद्धा नसायची. माझ्या दोन मैत्रिणी, ज्या वयाने पासष्टीच्या पुढच्या आहेत, आणि गेली चाळीस वर्षं या गावात राहतात. त्या फिरत असतात जगभर. त्यांना ही गोष्ट माहीतसुद्धा नव्हती! त्या म्हणाल्यासुद्धा, की ही कल्पना मूळची जर्मनीमधली नाही, पण टूरिस्ट्सना आकर्षित करण्यासाठी आहे.

याची अजून एक बाजू म्हणजे जसजशी ही कुलपं वाढत जात आहेत तसतशी काही शहरांतल्या सरकारांची चिंता वाढते आहे. उदा. या कुलपांमुळे पॅरिसची शोभा कमी होत आहे, जुन्या गंज चढलेल्या कुलपांमुळे जाळी खराब होत आहे, कुलपांच्या ओझ्यामुळे जाळी थोडी वाकली आहे, असे अनेक प्रश्न तिथल्या प्रशासनासमोर आहेत. २०१०मधे त्यांनी काही कुलपं काढायलासुद्धा सुरुवात केली होती, पण ही प्रेमाची कुलपं हा नागरिकांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय असल्याने ते तसे पूर्णपणे काढूसुद्धा शकत नाहीत. आणि पॅरिस तर रोमँटिक शहर! त्यामुळे पॅरिसमधे, इतर काही देशांमध्ये, विशेषत: रशियात मुद्दाम बनवली आहेत तशी मेटलची झाडं प्रेमाची कुलपं लावण्यासाठी बागांमधे बसवण्याचा विचार तेथील शासन करत आहे.

कलोनमधल्या होहेनझोलर्न ब्रिजवर मात्र ही अडचण नाही. कारण मुळात पूर्ण पूलच अतिशय भक्कम रेल्वे पूल आहे आणि बाजूला भरपूर रुंद पादचारी मार्गसुद्धा आहे.

आज विचार करताना वाटतं, की माणूस या कुटुंबवत्सल प्राण्याला प्रेमाची किती ओढ असते! आणि ते प्रेम दृढ करण्यासाठीसुद्धा माणूस काय काय करत असतो.... हा पूल बघताना असाही विचार नेहमी येतो, की प्रेम हे किती वैश्विक आहे! त्याला कुठली भाषा, कुठला देश, कुठला प्रदेश- काहीच आड येत नाही. माणसं नाती जोडतात, किती अल्लादपणे. निश्चय करतात. पुढे त्या त्या संस्कृतीमधल्या वातावरणाप्रमाणे ती नाती टिकोत वा ना टिकोत. नाती हे निसर्गाचं शुद्ध रूप. ते मानवी आहे आणि जैविकही आहे. म्हणून ते सुंदर आहे. त्या प्रेमाच्या वेगवेगळ्या छटा असल्या, तरीही प्रेमात पडलेला एक माणूस दुसऱ्याला नक्कीच समजू शकतो, किंवा एक प्रेमभंग झालेला दुसऱ्याची व्यथा समजू शकतो.

आजकाल वैवाहिक समस्या वाढल्या आहेत, वेगळं होण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. ही वस्तुस्थिती असली, तरी अशा विचारांनी उदास होणाऱ्या व्यक्तीनं इथे होहेनझोलर्न पुलावर येऊन थांबावं. एकीकडे पसरलेलं कलोन शहर असेल, त्यात उठून दिसणारा जळलेला कॅथेड्रल असेल, समोर छान ऱ्हाईन नदी वाहत असेल, कडेकडेला मोठ्या बोटी असतील; मालार्ड डक, इजिप्शियन गूज, स्वान असे पक्षी असतील... आणि तेवढ्यात एखादं कपल हातात हात घालून येईल आणि लाजत लाजत कुलूप लावून प्रेमाची वीण घट्ट करण्यासाठी किल्ली ऱ्हाईन नदीत भिरकावेल...

(अनुभव, फेब्रुवारी २०१२च्या अंकातून साभार)

यशोदा वाकणकर | yashoda.wakankar@gmail.com







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results