आम्ही होस्टेलवर असतानाचे दिवस. फार जुने नव्हेत, फक्त वीस वर्षांपूर्वीचे. कॉलेज आणि उंडारणं संपून होस्टेलवर आलं की गप्पा आणि गाण्यांना ऊत आलेला असायचा. कधी तरी कुठलं तरी गाणं ओठावर येता येता अडकायचं. गाणं समोर दिसत असायचं, पण शब्द काही केल्या आठवायचे नाहीत. ‘त्यात नाही का देव आनंद आणि माला सिन्हा आहे... रात्रीचं गाणं आहे.. बहुतेक शंकर जयकिशनचं म्युझिक..' असे नाना क्ल्यू दिले जायचे. मग या कॉम्बिनेशनमधली जेवढी आठवतील तेवढी गाणी सगळ्यांच्या तोंडून बाहेर यायला लागायची. पण तरीही जे आठवायचंय ते सोडून बाकी सगळं आठवायचं अन् जाम तडफड व्हायची. खोल्यांची दारं ठोठावून सगळ्यांच्या डोक्यात हाच एक भुंगा सोडत फिरण्याचा कार्यक्रम सुरू व्हायचा. दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्येही तोच दंगा. अगदी सर-मॅडमना विचारण्याचंही बाकी राहायचं नाही. अचानक कुणाला तरी गाणं आठवायचं- धीरे धीरे चल चांद गगन में! तेव्हा कुठे जीव शांत व्हायचा.
फक्त गाण्याचंच कशाला- सिनेमे, पुस्तकं, लेखक, घटना, गावं यांतलं कोणी ना कोणी स्मरणशक्तीला दगा द्यायचं अन् मग असं भंजाळल्यासारखं शोधत फिरायची वेळ यायची. दुसरी कामं करतानाही डोक्यात तेच एक चक्र चालू असायचं. डोळे घट्ट मिटून, कपाळावर जमतील तेवढ्या आठ्या पाडून, भुवया एकमेकींजवळ आणून स्मरणशक्तीला ताण देण्याचा अनुभव नेहमीच यायचा. मेंदूतल्या नाना फायली उघडून बघायच्या. कुठली तरी जोडणी कुठे तरी लागेल आणि अचानक आपल्याला ते नाव आठवेल असं वाटायचं. त्यासाठी सगळे प्राण आठवणी साठवणाऱ्या मेंदूतल्या त्या भागाशी गोळा झालेले असायचे. उत्तर सापडेपर्यंत तडफड तर व्हायचीच; पण त्यात एक झिंगही असायची. एकदाचं ते नाव-गाव आठवलं की जो आनंद व्हायचा त्याची तुलना घशाला शोष पडल्यानंतर पाण्याचा एखादा घोट मिळण्याशीच करता येऊ शकेल.
.. बरं, पण आज हे सगळं लिहिण्याचा उद्देश काय? तर गेल्या काही दिवसांत आपल्याला असा अनुभव किती वेळा आला आहे ते आठवून बघा. एखादं गाणं आठवेनासं झालं की आपण वेळ आणि मेंदूची शक्ती बिलकूल वाया न घालवता तडक गुगलकडे जातो, जे हवं ते टाइप करतो आणि टाइप करून पूर्ण होण्याच्या आतच आपल्याला सगळ्या संभाव्य शक्यता समोर दिसू लागतात. वेळ वाचतो आणि स्मरणशक्तीही. जरा गंमत म्हणून फोनला न विचारता आपलं आपण आठवून बघू या असं होतं का कधी? आपला मेंदूही हुश्शार! त्याला ही भन्नाट सोय आता कळून चुकली आहे. तो म्हणतो, आठवण्याचा कप्पा कोणी उघडणारच नसेल तर मग तो भारंभार भरा कशाला? आपल्याला काही आठवायचं झाली की तो हाताला आज्ञा देतो, घाल फोनवर झडप आणि कर भराभर टाइप!
साधं फोननंबर्सचं उदाहरण घ्या. मोबाइल येण्यापूर्वी आपल्या प्रत्येकाला कित्येक फोननंबर तोंडपाठ असायचे. नातेवाइकांचं तर सोडाच, पण मित्रमंडळींचे आणि अगदी इलेक्ट्रिशियन-प्लंबरचेही. आता? आपल्याला कितीजणांचे नंबर पाठ आहेत त्याची यादी करा. किती येतो आकडा? आपण जुने नंबर तर विसरलो आहोतच, पण नवे नंबर लक्षात ठेवण्याची आपली क्षमताही कमी झाली आहे, असं वाटत नाही?
किंवा दुसरं पूर्ण वेगळं उदाहरण घ्या. आपण एखादं पुस्तक वाचतोय आणि त्यात कुठल्याशा घटनेचा पुसटसा संदर्भ आहे. आपल्या मनातली उत्सुकता जागी होते. पण त्या घटनेची नोंद करून त्या संदर्भातलं पुस्तक मिळवून वाचण्याचा घाट आता कितीजण घालतात? त्यापेक्षा फोनवर टाइप केलं की मिळाली ना माहिती हवी तेवढी. आपल्याला कुठे त्या घटनेवर पीएचडी मिळवायचीय?
कोणी म्हणेल, यंत्राचं कामच मुळी माणसाचे कष्ट कमी करणं आहे. त्यामुळे मोबाइल किंवा इंटरनेटमुळे आपले श्रम कमी होताहेत. कमी वेळेत आपल्याला पाहिजे ती आणि नको तीही माहिती आपल्यासमोर हजर होतेय हे चांगलंच की. पूर्वी आदिमानव दगडावर दगड घासून आग तयार करत होता. पुढे त्याला आग तयार करण्याच्या सोप्या युक्त्या सापडल्या. दुसरे नवे शोध लावण्यात त्याचा वेळ अन् बुद्धी कामी येऊ लागली. तसंच इथेही आपला किती तरी वेळ अन् श्रम मोबाइल आणि इंटरनेटने वाचवले आहेत.
खरंच आहे ते. पण तो वेळ आपण नेमका कुठे सत्कारणी लावला आहे बरं? आठवतंय काही? आता फोनकडे धाव घेऊ नका. हे आठवण्यासाठी फोनचा काहीच उपयोग होणार नाही.
(अनुभव २०१७ मधील लेखमालिका. माणसं फोनच्या आहारी जाऊ लागल्याची पहिली वहिली चिन्हं दिसू लागली तेव्हा लिहिलेली.)
गौरी कानेटकर | gauri.uniqueportal@gmail.com
गौरी कानेटकर या युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाच्या संपादक आहेत. मितानिन फाउंडेशनच्या `सलाम पुणे` या उपक्रमाची जबाबदारी त्यांच्यावर आहे. उपेक्षितांचं जगणं, त्यांचे प्रश्न आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या व्यक्ती-संस्था समाजासमोर आणण्याची त्यांना कळकळ आहे.
