आम्ही कोण?
लेखमालिका : ऑनलाईन फ्रॉड : रोज नवा अध्याय

डिजिटल (HSRP) नंबर प्लेट फसवणुकीपासून सावधान!

  • योगेश जगताप
  • 22.07.25
  • वाचनवेळ 4 मि.
online number plate fraud

(गप्पांच्या ओघात दर्पण आणि स्वप्निल या दोन मित्रांमध्ये विषय निघतो हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटचा..)

स्वप्निल- सरकारने काही तरी डिजिटल नंबर प्लेटचं नवं प्रकरण आणलंय, त्याचं काही केलंस का तू?

दर्पण- हो रे, ते करायचं आहे. सरकारने एक वेबसाइट दिलीय, तिथे जाऊन हाय सिक्युरिटी नंबर प्लेटची नोंदणी करता येते. असं ऐकतोय. दहा मिनिटांचं काम आहे म्हणतात.

स्वप्निल- माझ्या घरी तीन गाड्या आहेत अरे. दोन टू व्हीलर आणि एक फोर व्हीलर. त्यांचंही काम करायचं होतं मला. घरचे काही स्वतःहून करतील असं वाटत नाही. त्यामुळे ते मलाच बघावं लागणार आहे.

दर्पण- करुयात की भावा. तुला सांगतो ती माहिती पाठव फक्त मला... शून्य मिनिटांत करून टाकू काम.

स्वप्निल- काय काय लागणारे फॉर्म भरायला? आणि पैसे किती लागतात?

दर्पण- गाडीचं आरसी बुक, आधार कार्ड नंबर आणि मोबाइल नंबर. टू व्हीलर गाडीच्या नोंदणीला साडेपाचशे ते सहाशे रुपये खर्च येईल आणि फोर व्हीलर असेल तर साधारण नऊशे ते हजार रुपये.

स्वप्निल- एक काम करतो, धाकट्या भावाला फोन करतो आणि त्याला सांगतो तुला काय लागतंय ते पाठवायला.

दर्पण- चालेल, टेन्शन नॉट!

(स्वप्निल फोन लावतो, अक्षय फोन उचलतो.)

अक्षय- बोल की भैया..

स्वप्निल- अरे, ते गाड्यांच्या नंबर प्लेटचं रजिस्ट्रेशन करायचंय. आपल्या तिन्ही गाड्यांचे सांगतोय ते डिटेल्स पाठव मला.

अक्षय- अरे, पण ते काम मी केलं की..

स्वप्निल- केलंस का? कसं केलंस?

अक्षय- मला गेल्या आठवड्यात एक फोन आला होता. फोन आला त्याच दिवशी रजिस्ट्रेशन केलं तर दोन हजार रुपये डिस्काउंट मिळेल असं सांगितलं होतं.

स्वप्निल- मग, केलंस तू?

अक्षय- टू व्हीलरसाठी दोन हजार आणि फोर व्हीलरसाठी चार हजार रुपये सांगितले होते त्याने. डिस्काउंट देऊन ६ हजारnरुपये घेतले.

स्वप्निल- अरे अक्षय, काय मूर्खपणा केलायस तू!

अक्षय- अरे, पण काय झालं?

स्वप्निल- एवढे पैसे नाही लागत बाबा रजिस्ट्रेशनला. आणि कुणाचाही फोन आला की त्यांचं ऐकून लगेच पैसे भरायचे का? ते खरंय की खोटंय ते तपासायला नको का? काय काय माहिती दिली त्या माणसाला फोनवर?

अक्षय- गाडी नंबर आणि आधार नंबर. बाकी माहिती तो ऑनलाइन बघतो म्हणाला.

स्वप्निल - अवघड आहे. त्या माणसाला फोन लावून बघ बरं पुन्हा एकदा...

अक्षय- मागे १-२ दिवस लावत होतो काय झालं ते विचारायला, पण नंबर बंद लागला. आता करतो पुन्हा एकदा.

(अक्षय फोन लावतो, पण नंबर बंद लागतो. २-३ दिवसांनंतरही तीच परिस्थिती. मग अक्षय आणि स्वप्निलला समजतं की त्यांची फसवणूक झालीय. पुढील कार्यवाहीसाठी ते सायबर पोलिसांशी संपर्क करतात आणि ऑनलाइन तक्रार नोंदवतात.)

हाय सिक्युरिटी डिजिटल नंबर प्लेटच्या रजिस्ट्रेशनसाठी महाराष्ट्र सरकारच्या परिवहन विभागाकडून वेबसाइटवर एक लिंक देण्यात आलेली आहे. त्यात आपापल्या जिल्ह्यानुसार माहिती भरण्याची सोय आहे. तुम्ही घरबसल्यासुद्धा ही नोंदणी करू शकता. मात्र, याच संधीचा गैरफायदा काही सायबर गुन्हेगार घेताना दिसत आहेत. बनावट वेबसाइट बनवून त्यावरून लोकांना नावनोंदणी करण्यासाठी लिंक पाठवायची किंवा वेगवेगळ्या फोन नंबरवरून लोकांना फोन/मेसेज करून नोंदणी करण्याचं आमिष दाखवून फसवणूक करायची, असे प्रकार मागील दोन महिन्यांपासून सुरू आहेत. यामध्ये अगदी दोन हजारांपासून ते दहा हजार रुपयांपर्यंत लोकांची फसवणूक झालेली आहे.

तुम्हालाही नंबर प्लेट रजिस्ट्रेशनसाठी अशा प्रकारचा फोन आला तर सावधगिरी बाळगा. कोणताही आर्थिक व्यवहार करण्याआधी नीट पडताळणी करा. 

ज्यांना वैयक्तिक ऑनलाइन फॉर्म भरता येत नाही ते ९५०३९३२३१५ या नंबरवर संपर्क करून, whatsappद्वारे आवश्यक ती कागदपत्रं जमा करून रजिस्ट्रेशन करू शकतात.

सायबर गुन्हेगारीचे वेगवेगळे प्रकार मागील काही वर्षांत समोर आलेले आहेत. नंबर प्लेट किंवा इतर प्रकारच्या ऑनलाइन फसवणुकीच्या घटना तुमच्या आजूबाजूला घडत असतील तर जवळच्या पोलिस स्टेशनला जाऊन तुम्ही तक्रार देऊ शकता.

फसवणूक होऊ नये म्हणून काय कराल?

घाबरू नका, पोलिस तुमच्या सोबतीला आहेत.

पुणे शहरात सायबर गुन्ह्यांविषयी तक्रार नोंदवण्यासाठी संपर्क - ०२० २९७१००९७, ७०५८७१९३७१, ७०५८७१९३७५

ई-मेलद्वारे तक्रार नोंदवण्यासाठी – crimecyber.pune@nic.in

(ई-मेलद्वारे तक्रार दिल्यानंतर पाठपुरावा करण्यासाठी तक्रारदाराने आपला संपर्क क्रमांक द्यावा.)

योगेश जगताप | 9561190500 | yogeshjagtap8819@gmail.com







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results