आम्ही कोण?
लेखमालिका : शहर चालवणारी माणसं

कैफियत कॅबचालकांची

  • तुषार कलबुर्गी
  • 17.03.25
  • वाचनवेळ 16 मि.
  • Share on Tweeter
  • Share on Whatsapp
  • Share on Facebook
gig workers cab drivers

ॲपच्या एका क्लिकवर कॅब आपल्या दारात येऊ लागल्यामुळे टॅक्सी वाहतूक आणखी सोयीची झाली. पण ही सुधारणा कॅबचालकांच्या किती फायद्याची ठरली, ते या कामात समाधानी आहेत का, याचा लेखाजोखा.

ओला-उबर या कंपन्यांचं बस्तान बसण्यापूर्वी टॅक्सी, ट्रॅव्हल एजन्सी वगैरेंची चलती होती. काहीजण आपला स्वतंत्र टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करायचे, तर काही आपल्या चारचाकी आयटी कंपन्यांमध्ये, सरकारी विभागांमध्ये लावायचे. २०१४-१५च्या सुमारास भारतातल्या ओला आणि अमेरिकेतल्या उबर या दोन कंपन्यांनी आपापल्या ॲपच्या माध्यमांतून कॅब अग्रिगेटर म्हणून आपलं बस्तान बसवायला सुरुवात केली. त्यानंतर टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल्स आणि टॅक्सी यांचा धंदा आरपार बदलून गेला.

cab drivers inside one

शहरातल्या शहरात प्रवास करण्यासाठी लोकांना सार्वजनिक वाहतूक आणि रिक्षा वाहतूक असे दोन जलद पर्याय होते; पण ओला-उबर सुरू झाल्यानंतर शहरातल्या शहरात प्रवास करण्यासाठी तिसरा पर्याय उपलब्ध झाला. त्यामुळे रोजगाराची नवी संधी उपलब्ध झाली. हजारो-लाखोंच्या संख्येने चारचाकी खरेदी केल्या गेल्या, त्या गाड्या ओला-उबरला लावल्या गेल्या. (‘मोबिलिटी फोरसाइट्स' या संस्थेच्या आकडेवारीनुसार २०१९मध्ये ओलाचे १० लाखांहून अधिक, तर उबरचे जवळपास सहा लाख कॅबचालक होते.) सुरुवातीच्या काही वर्षांमध्ये या कॅबचालकांनी चांगली कमाई केली. इन्सेन्टिव्ह चांगले मिळत होते. शिवाय या कंपन्या कमीत कमी कमिशन आकारत होत्या. पण नंतर या कंपन्यांनी आपलं कमिशन वाढवत नेलं आणि कॅबचालकांची कमाई कमी कमी होत गेली. सध्या अनेक कॅबचालक कमाईच्या बाबतीत असमाधानी आहेत. कोणत्याही व्यवसायामध्ये कमाईत वाढ होणं अपेक्षित असतं. पण कॅब व्यवसायाच्या बाबतीत उलटं घडलं.

पुणे जिल्ह्यातल्या नारायणगावचे संतोष फुलसुंदर यांनी साधारण २०१५ पासून ओला-उबरला गाडी लावायला सुरू केलं. ते त्यांचा अनुभव सांगतात, “आधी मी माझी चारचाकी एका व्हेंडरकडे लावली होती. व्हेंडर प्रत्येक किलोमीटरमागे १४ ते १५ रुपये द्यायचा आणि स्वतःला तीन ते चार रुपये कमिशन ठेवायचा. सकाळी ११ वाजता व्हेंडरकडे जाऊन बसायचो. त्यानंतर दोन ते तीन तासाने भाडी मिळायची. कधी कधी ४ वाजायचे. त्यानंतर सात-आठ तास गाडी चालवल्यावर दिवसभराचे १०००-१५०० रुपये मिळायचे. ओला-उबर आल्यानंतर ते व्हेंडर्सपेक्षा दुप्पट, म्हणजे प्रत्येक किलोमीटरमागे २५ ते ३० रुपये देऊ लागले. साहजिकच मी ओला-उबरकडे वळालो.” ते पुढे सांगतात, “आपली चारचाकी लावा आणि महिन्याला ७० हजार ते एक लाख रुपये कमवा, अशी जाहिरात ओला-उबरवाले करायचे. तेवढे मी कधी कमावले नसले तरी महिन्याला ६० ते ६५ हजार रुपये नक्कीच कमवायचो.”

पुण्याच्या हडपसरमध्ये राहणाऱ्या अशोक चिलवंते यांनीही २०१५पासून ओला-उबरसाठी चारचाकी चालवायला सुरुवात केली. ते सांगतात, “सुरुवातीला या कंपन्यांचे इन्सेन्टिव्ह आकर्षक होते. उदाहरणार्थ, दिवसाला दोन हजार रुपयांचा धंदा केल्यावर ५०० रुपये इन्सेन्टिव्ह, महिन्याला ४० ट्रिप केल्यावर १२ हजार रुपये इन्सेन्टिव्ह. शिवाय सीएनजीचा दरही ४५ ते ५० रुपये होता. आणि ओला-उबर सुरुवातीला कमिशन पाच ते दहा टक्केच घ्यायचे. त्यामुळे महिन्याला ५० ते ६० हजार रुपये धंदा आरामात व्हायचा.”

cab drivers inside two

ओला-उबर या कंपन्या नव्या होत्या तेव्हाची ही परिस्थिती. आता परिस्थिती काय आहे?

संतोष फुलसुंदर सांगतात, “२०१७-१८मध्ये या कंपन्यांनी इन्सेन्टिव्ह देणं जवळपास बंद केलं. ट्रिप मिळण्याचं प्रमाणही कमी झालं. म्हणजे सुरुवातीला १४ ते १५ ट्रिप्स मिळायच्या, त्या ११ ते १२ मिळू लागल्या. कदाचित ओला-उबरच्या गाड्या वाढल्या असाव्यात. पण ६० ते ६५ हजारांची कमाई कमी होत होत २०१९पर्यंत निम्म्यावर आली. म्हणून मी ओला-उबरकडे गाडी चालवणं बंद करून टाकलं.” तर अशोक चिलवंते सांगतात, “सुरुवातीला या कंपन्या प्रत्येक किलोमीटरमागे २० ते २५ रुपये देत होत्या. आता १०, १२, १५ असे दर मिळतात. पूर्वी ५० ते ६० हजारांचा धंदा होता, आता दर महिन्याला मुश्किलीने २५ हजार रुपये कमावतो.”

पाच-सहा वर्षांपूर्वी ओला-उबरच्या माध्यमातून धंदा चांगला होता, गेल्या काही वर्षांत तो कमी झाला, असं सांगणारे अनेक कॅबचालक भेटले. महिन्याला ४० ते ५० हजार कमावतो आणि सध्या व्यवस्थित चाललंय, असं सांगणारे फारच थोडे होते. पुण्यात वारजे इथे राहणारे परमेश्वर ढोले सांगतात, “सध्या मी महिन्याला ४० ते ५० हजार रुपये कमावतो, पण त्यासाठी दिवसभरात १४ ते १५ तास गाडी चालवावी लागते. सकाळी ८ वाजता घरातून डबा घेऊनच निघतो. रात्री १० ते ११ वाजता घरी येतो. समजा तीन-चार तास कमी गाडी चालवली तर ४०० ते ५०० रुपयांचा फटका बसतो.”

ओला-उबर या कंपन्यांच्या उदयानंतर अनेकजण नव्याने कॅब चालवण्याच्या धंद्यात आले. अनेकांनी फक्त ओला-उबरच्या जोरावर व्यवसाय करण्यासाठीच चारचाकी विकत घेतली. बहुतेकांनी त्यासाठी कर्ज काढलं. ३६ वर्षांच्या सुशांत ठुबे यांचं उदाहरण पाहा. ते सांगतात, “मी २०२१मध्ये हप्त्यावर वॅगन-आर गाडी घेतली आणि उबरला लावली. महिन्याला किमान ४५ ते ५० हजार कमाई होईल अशी आशा होती. सुरुवातीचे काही महिने तेवढी कमाई झालीही. पण काही महिन्यांनी कमाई ३० हजारांवर आली. सध्या महिन्याला २८ ते ३२ हजार रुपये निव्वळ नफा मिळतोय. त्यातले १६ हजार रुपये हप्त्यावारीच जातायत. महिन्याला १४ ते १५ हजार रुपयेच माझ्याकडे शिल्लक राहतात. ही तर हमाली झाली. कर्जावर गाडी घेतली त्यांना ईएमआय जाऊन व्यवस्थित पैसे राहतील एवढा तरी धंदा व्हायला हवा. पण तसं होत नाही.”

पुण्याच्या निगडीमध्ये राहणारे सादिक पठाण सांगतात, “माझ्या अनेक मित्रांनी फोर व्हीलर घे आणि ओला-उबरला लाव, असं सांगितलं. ते महिन्याला ४० ते ५० हजार कमवत होते. मी भुलून तयार झालो. पण मी गाडी रोख घेऊ शकत नव्हतो. कर्जावर घ्यावी तर सिबिल स्कोअरही नव्हता. म्हणून गावातल्या शेतावर पाच लाख रुपयांचं कर्ज काढून डॅटसन-गो गाडी घेतली. १४ हजारांचा हप्ता अजूनही चालू आहे. गाडी घेतली तेव्हा दिवसाला १४०० ते १५०० रुपये कमवत होतो. आता फक्त ७०० ते ८०० रुपयांची कमाई होतेय. हप्ता सोडला तर महिन्याला फक्त चार-पाच हजार रुपये शिल्लक राहतात.”

नवीन असताना सुरुवातीचे काही महिने या कंपन्या चांगली कमाई देतात, पण तीन ते सहा महिन्यांनंतर ट्रिप देण्याचा ओघ कमी होत जातो आणि ते पैसेही कमी देतात, अशी तक्रार जवळपास सगळ्याच कॅबचालकांनी बोलून दाखवली.

दोन्ही कंपन्यांचे आपल्या तथाकथित पार्टनर्ससाठीचे, म्हणजे कॅबचालकांसाठीचे दर ठरलेले नाहीत. जो दर मिळतो त्यावरही बहुतांश कॅबचालक नाखूष आहेत.

कॅबचालकांच्या म्हणण्यानुसार : ओलामध्ये चारचाकीचे तीन प्रकार आहेत- मिनी (डिकी नसलेली ५ आसनी, उदाहरणार्थ वॅगनआर), प्राइम (डिकी असलेली आणि प्रशस्त, उदाहरणार्थ स्विफ्ट डिझायर) आणि एसयूव्ही (सात आसनी, उदाहरणार्थ एर्टिगा). उबरमध्ये गो, सेडन आणि एक्सएल असे प्रकार आहेत. या कंपन्यांकडून मिनी गाड्यांना १० ते १६ रुपये, प्राइम गाड्यांना १६ ते १८ रुपये, तर एसयूव्ही गाड्यांना १८ ते २५ रुपयांपर्यंत दर मिळतो. तसंच, वाहतुकीमध्ये शहरांतर्गत आणि शहराबाहेर असे दोन प्रकार असतात. त्याला ‘ओला आऊटस्टेशन' आणि ‘उबर इंटरसिटी' म्हणतात. काही कॅबचालक फक्त शहरांतर्गत चालवतात, तर काही शहरांतर्गत आणि शहराबाहेर दोन्ही चालवतात. तसंच कार रेंटलचाही प्रकार असतो. म्हणजे तासानुसार किंवा दिवसानुसार दर ठरवले जातात, पण त्याचं प्रमाण फार कमी आहे.

cab drivers inside five

सुरुवातीला शहरांतर्गत वाहतुकीबद्दल.

३४ वर्षांचे अन्वर शेख सांगतात, “मी ओला-उबर दोन्ही ॲप वापरतो. दोन्हींचे दर ठरलेले नाहीत. उबर अंदाजे एका किलोमीटरमागे १२ ते १३ रुपये देतं, तर ओला दोन रुपये जास्त देतं. उबर ओलापेक्षा किलोमीटरमागे कमी पैसे देत असली तरी उबरचं ट्रिप देण्याचं प्रमाण ओलापेक्षा जास्त आहे.” हे दर इतके कमी का असावेत? यावर ते उत्तरले. “दोन्ही कंपन्या एकमेकांच्या स्पर्धक आहेत. मार्केट कॅप्चर करण्यासाठी आणि ग्राहकांना खूष करण्यासाठी त्यांच्याकडून कमीत कमी पैसे घेतात. साहजिकच त्यामुळे आम्हालाही पैसे कमी देतात.”

कधी कधी ओला-उबर रिक्षाचालकांना जेवढे पैसे देते त्यापेक्षाही कमी दर कॅबचालकांना मिळतात, अशीही तक्रार कॅबचालकांनी बोलून दाखवली. अजय सुरवसे हे कॅबचालक सांगतात, “एकदा सुस रोडपासून मुंढव्याची ट्रिप पडली होती. उबरने त्या ट्रिपचे कस्टमरला ४२० रुपये दाखवले होते. कस्टमर म्हणाला, मी रिक्षा बघत होतो. पण रिक्षाचे दर ४५० दिसत होते. रिक्षापेक्षाही कमी दरात कस्टमरला कॅब आणि वर एसीची हवा मिळते. कधी कधी वाटतं, उगाच सहा लाखांची गाडी घेतली.”

हा अनुभव अपवादात्मक नाही. या कंपन्यांकडून मिनी कॅबचालकांना मिळणारे दर कधी कधी रिक्षापेक्षाही कमी असतात, असं अनेकांनी सांगितलं. या गोष्टीची मी स्वतः तपासणी केली. त्यासाठी ओला आणि उबर या दोन्ही कंपन्यांसाठी रिक्षा आणि चारचाकी चालवणाऱ्यांच्या ट्रिप हिस्टरीचे स्क्रीनशॉट्स घेतले. (शेजारचे फोटो पहा.) त्यात उबर रिक्षाचालकाला १९.९ किलोमीटरचे ३३९ रुपये मिळाले, तर उबरच्या मिनी कॅबचालकाला २४.९ किलोमीटरचे फक्त ३२२ रुपये मिळाले आहेत. म्हणजे रिक्षापेक्षा पाच किलोमीटर जास्त पळूनही १७ रुपये कमी! (आणखी एका उबर रिक्षाचालकाला १५.४ किलोमीटरचे २७० रुपये मिळाले, तर उबर मिनी कॅबचालकाला १५.२ किलोमीटरचे २२५ रुपये मिळाले. एका ओला रिक्षाचालकाला २०.८ किलोमीटरचे ३५३ रुपये मिळाले, तर ओलाच्या मिनी कॅबचालकाला २०.८ किलोमीटरचे फक्त २९९ रुपये मिळाले.)

आपल्याला कधी कधी रिक्षाचालकांपेक्षा कमी पैसे का मिळतात याबद्दल मिनी कॅबचालकांना सतत कोडं पडलेलं असतं. मिनी कॅबचालक नवनाथ झुरंगे सांगतात, “रिक्षाची किंमत वॅगन-आर चारचाकीपेक्षा निम्म्याहून कमी आहे. एक किलो सीएनजीमध्ये रिक्षा ३० ते ३५ किलोमीटर ॲव्हरेज देते, तर वॅगन-आर २५ ते ३० ॲव्हरेज देते. एसी लावला की ॲव्हरेज आणखी कमी होतो. शिवाय फोरव्हीलरच्या मेंटेनन्सचा खर्च रिक्षापेक्षा जास्त असतो. तरीही या कंपन्या आम्हाला कधी कधी रिक्षावाल्यांपेक्षा कमी पैसे देतात.”

कॅबचालकांना मिळणारे दर समाधानकारक नाहीत, ही त्यांची मुख्य तक्रार आहे. त्यासोबतच या कंपन्यांनी स्वतःचं कमिशन ५-१० टक्क्यांपासून ३५ ते ४० टक्क्यांपर्यंत वाढवत नेलं, अशी तक्रारही हे कॅबचालक करतात. अहमदनगरचे लक्ष्मण जगताप यांचा याबद्दल बोलताना संताप झाला होता- “नगरवरून पुण्याला यायला उबरवाले कस्टमरकडून तीन हजार रुपये घेतात आणि मला १६०० ते १७०० रुपये देतात. असं दोनतीनदा घडलं. हे कमिशन जवळजवळ अर्धं आहे. म्हणून मी हे ॲपच डिलीट मारलं. माझे स्वतःचे संपर्क वाढवून पूर्वीसारखाच ट्रॅव्हल्सचा धंदा सुरू केला.”

cab drivers inside six

ओला-उबर कंपन्यांनी लीजवरच्या चारचाकी बाजारात आणल्या.

चारचाकी रोख आणि कर्जावरही घेणं शक्य नव्हतं अशांनी लीजवरच्या गाड्या काढल्या. लीजवर चारचाकी देणाऱ्या कंपन्या ओला-उबरशीच संलग्न होत्या. ४२ वर्षांचे लक्ष्मण पखाले सांगतात, “२०१७ साली मला कर्जावर गाडी मिळत नव्हती. माझ्याकडे डाऊनपेमेंट कारण्याइतकेही पैसे नव्हते. म्हणून मी ओलाची गाडी लीजवर घेतली. त्या वेळी ऑफर अशी होती, ‘२० हजार डिपॉझिट आणि ४ वर्षं दर दिवसाला ८०० रुपये भरायचे, त्यानंतर ती गाडी तुमच्या नावावर.' पण ही ऑफर परवडणारी नव्हती. कारण दीडच वर्षात गाडीचं ८० हजार किलोमीटर रनिंग झालं होतं. एवढी रनिंग झालेली गाडी घेण्यात काही अर्थ नव्हता. म्हणून मी पैसे जमवून डाऊनपेमेंटवर स्वतःचीच वॅगन-आर घेतली.”

पण या लीजच्या ऑफरमुळे अनेकजण नाडले गेले. मुंबईच्या निहाल करीम यांचं उदाहरण पहा. ते सांगतात, “मी २०१६मध्ये उबरकडून ३५ हजार डिपॉझिट भरून मारुती रिट्झ लीजवर घेतली. प्रत्येक आठवड्याला ५५०० भरायचे आणि तीन वर्षांनंतर गाडी तुमच्या नावावर, अशी ऑफर होती. पण प्रत्यक्ष तीन वर्षं झाली तेव्हा त्यांनी माझ्या अनेक सुट्ट्या काढल्या आणि आणखी काही महिने लीजचा काळ वाढवला. त्यानंतर मला वाटलं, आता तरी माझ्या नावावर गाडी होईल. पण त्यांनी व्हॅल्युएशन करावं लागेल म्हणून आणखी ८५ हजार रुपये भरायला लावले. करार करताना त्यांनी तीन वर्षं पैसे भरल्यावर गाडी तुमच्या नावावर, एवढंच संगितलं होतं. मी डोळे झाकून त्यावर विश्वास ठेवला. पण कागदपत्रांमध्ये व्हॅल्युएशनचा उल्लेखही होता. नाइलाजाने ते पैसे भरावे लागले. कारण ८५ हजारांसाठी स्वतःची गाडी कोण सोडणार? ती गाडी मला साधारण ९ लाखाला गेली.” दीड वर्षांनंतर काही घरगुती कारणांमुळे निहाल यांना ती गाडी विकावी लागली. तेव्हा त्याचे त्यांना फक्त एक लाख रुपये आले. ते आज ५०० रुपये रोज याप्रमाणे एका मित्राची गाडी भाड्याने चालवताहेत.

ट्रिप स्वीकारण्याचं प्रमाण (ॲक्सेप्टन्स रेट) जितका जास्त आणि कॅन्सलेशन रेट जितका कमी, तेवढं कॅबचालकांना ट्रिप मिळण्याचं प्रमाण जास्त असतं.

पण या पद्धतीवरही काही कॅबचालक नाराज होते. एखादी ट्रिप न स्वीकारण्याची किंवा कॅन्सल करण्याची कॅबचालकांची आपापली काही कारणं असू शकतात. परमेश्वर ढोले सांगतात, “एखाद्या ट्रिपचा ड्रॉप तीन ते चार किलोमीटर असेल तर त्याचे ७० ते ८० रुपये मिळतात. पण अशा ट्रिपचा पिकअप पॉइंट जवळ असेल तरच ती ट्रिप स्वीकारतो. पण अनेकदा पिकअप एक ते दोन किलोमीटर असतो. अशा ट्रिप्स परवडत नाहीत. कारण या कंपन्या पिकअपचे पैसे देत नाहीत.” मुंबईत ओला-उबर चालवणारे रिझवान शेख सांगतात, “मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये शॉर्ट राइड, म्हणजे ५ ते ६ किलोमीटरची ट्रिप असली तरी त्याला ४० ते ४५ मिनिटं लागतात. अशा ट्रिपचे साधारण ८० ते १०० रुपये मिळतात. समजा, दिवसभरात अशा १० ते १२ ट्रीप्स केल्या तर दिवसभरात फक्त १००० ते १२०० रुपयेच धंदा होतो. मुंबईसारख्या शहरात शॉर्ट राइड घेणं म्हणजे नुकसानीचा धंदा. म्हणून त्या आम्ही स्वीकारत नाही. पण त्यामुळे आमचा ॲक्सेप्टन्स रेट कमी होतो आणि आम्हाला भरपूर राइड्स मिळण्यापासून वंचित ठेवलं जातं. कोणताही व्यावसायिक नफा असेल तरच धंदा करतो. या कंपन्या पण स्वतःचा नफा बघूनच धंदा करतात. मग आम्ही जर का पार्टनर आहोत, तर आम्ही आमचा नफा बघायला नको?”

काही कॅबचालकांच्या म्हणण्यानुसार ट्रिप स्वीकारून कॅन्सल करण्यामागेही रास्त कारणं असू शकतात. सादिक पठाण याबद्दलचा अनुभव सांगतात- “मी एकदा पिकअपसाठी लोकेशनप्रमाणे आकुर्डीला गेलो. तिथे पोहोचल्यावर कस्टमरने कासारवाडीला बोलवलं. मी म्हटलं, ॲपमधून पिकअप लोकेशन बदला, येतो लगेच. कारण त्याने लोकेशन बदललं असतं तर मला जास्तीचे पैसे मिळाले असते. पण त्याने लोकेशन बदललं नाही. आठ ते नऊ किलोमीटर रिकामी कॅब नेण्यात पॉइंट नाही म्हणून ती राइड मी कॅन्सल केली.” राइड न स्वीकारण्याची आणि कॅन्सल करण्याची रास्त कारणं असली तरी त्याचा त्यांना मिळणाऱ्या ट्रिप्सवर, पर्यायाने धंद्यावर परिणाम होतो, असं अनेक कॅबचालकांनी सांगितलं.

cab drivers inside four

ट्रॅफिक हा कॅबचालकांच्या कमाईमधला मोठा अडथळा ठरतो.

पुण्याचे कॅबचालक सुदाम कांबळे सांगतात, “एकदा कर्वे रस्त्यावरून पिकअप आणि दिघीला ड्रॉप होता. साधारण १८ किलोमीटरचं हे अंतर आहे. त्याला साधारण पाऊण तास लागतो. पण त्या वेळी ट्रॅफिक इतकं होतं की या प्रवासाला पावणेदोन तास लागले. तरी मला फक्त २२५ रुपयेच मिळाले. ट्रॅफिक नसतानाही तेवढेच मिळतात.”

मुंबईच्या ओला-उबर कॅबचालकांची परिस्थिती याहूनही वाईट आहे. निहाल करीम सांगतात, “समजा, मला लोअर परेलवरून खारघरची ट्रिप पडली, तर त्याचे साधारण ६०० रुपये मिळतात. या प्रवासाला साधारण दीड तास लागतो. पण अनेकदा ट्रॅफिक असतं, त्यामुळे जास्तीचा पाऊण तास लागतो. पण तरी पैसे मात्र तेवढेच मिळतात. ट्रॅफिक असताना हाच प्रवास जर मीटरटॅक्सीने केला तर टॅक्सीचालकाला मीटरनुसार ट्रॅफिकचे शंभर रुपये तरी जास्त मिळतात.” तर हसन मुंतासिर सांगतात, “मी राहायला कांदिवलीला आहे. सकाळी आठच्या सुमारास ॲप सुरू करतो तेव्हा कांदिवलीवरून अनेकदा दादरचं भाडं पडतं. ट्रॅफिक नाही लागलं तर ४० ते ४५ मिनिटं लागतात. ट्रॅफिक लागलं तर तास-दीड तास लागतो. कांदिवली ते दादर १८ किलोमीटरचं अंतर आहे. ट्रॅफिक नसलं तरीही २७० ते ३०० रुपये मिळतात, आणि असलं तरी तेवढेच मिळतात. कांदिवली ते दादर दीड तासाचा प्रवास मीटरटॅक्सीने केला तर टॅक्सीचालकाला चार-पाचशे रुपये तरी मिळतात.”

ग्राहक कॅबचालकाला बहुतांश वेळेला एसी लावायला सांगतात. कंपन्यांनी एसी आणि नॉन-एसी असे दोन प्रकार केले पाहिजेत, असं अनेक कॅबचालकांचं म्हणणं आहे. त्याचं कारण अशोक बच्छाव सांगतात, “१० किलो सीएनजीमध्ये चारचाकी एसी न लावता २०० किलोमीटर पळत असेल, तर एसी लावून १३० ते १४० किलोमीटर पळते. ट्रॅफिकमुळे एखाद्या ठिकाणी जायला उशीर झाला, तर तेवढंच एसी जास्त वेळ चालतं आणि त्यामुळेही सीएनजी जास्त जळतं. म्हणून या कंपन्यांनी एसी आणि नॉन-एसी असे दोन प्रकार केले पाहिजेत.”

cab drivers inside three

शहराबाहेर राइड्सबद्दलही अनेक कॅबचालकांच्या तक्रारी आहेत.

राजेश यादव सांगतात, “एकदा मी एका कस्टमरला पुण्याहून बोरिवलीला ड्रॉप केलं. तो कस्टमर ओला-उबरचा नव्हता, माझा स्वतःचा होता. त्याला सोडलं आणि पुण्याला परतण्यासाठी ओला सुरू केलं; पण चार तास झाले, मला पुण्याची ट्रिपच मिळाली नाही. शेवटी वैतागून कस्टमर केअरला फोन लावला, तर तेव्हा मला उत्तर मिळालं, तुम्ही मुंबईला येताना ओलाने आलात तरच तुम्हाला परतीचं भाडं मिळतं. मग काय, पुण्याला रिकामी कॅब घेऊन यावं लागलं.” ॲपवरून इंटरसिटीची राइड केली तरच परतताना ॲपमधून इंटरसिटी राइड मिळते, ही तक्रार अनेकांनी बोलून दाखवली.

मुंबईच्या रिझवान शेख यांचा अनुभव पाहा. “शेवटची इंटरसिटीची राइड मुंबई ते इगतपुरीजवळचं एक गाव, अशी केली. जवळपास १६५ किलोमीटर अंतर होतं आणि त्याचे फक्त १८७५ रुपये मिळाले होते. जिथे डिमांड आहे, (उदाहरणार्थ, पुणे किंवा नाशिक) अशा ठिकाणी परतीचं भाडं मिळण्याची शक्यता असते. पण इतर ठिकाणची इंटरसिटी राइड पडली की रिटर्न ट्रिप मिळण्याची शक्यता खूप कमी असते. या कंपन्यांनी अशा ठिकाणी जाण्याचे अधिकचे पैसे द्यायला पाहिजे ना? ते तर नाहीच. शिवाय त्या वेळी मला रिटर्न ट्रिपही मिळाली नाही. शेवटी एक खासगी कस्टमर घेऊन आलो.”

पुण्याचे दत्ता पवार सांगतात, “पुण्याहून मुंबईला ओला-उबरची राइड केली तर साधारण १८०० ते २२०० रुपये मिळतात, पण परत येताना हमखास त्याच्यापेक्षा २००-३०० रुपये कमी मिळतात. त्यांना बहुतेक माहीत असतं कितीही कमी रुपयांची ट्रिप मिळाली तरी ड्रायव्हर ॲक्सेप्ट करणारच. कारण आम्हाला काहीही झालं तरी त्याच दिवशी परत यायचं असतं.” लक्ष्मीपुत्र कहीरट यांच्याकडे दहा लाख किमतीची एर्टिगा आहे. ते सांगतात, “आठ महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. मी एकदा मुंबईला इंटरसिटीची राइड केली, त्याचे मला ३६०० रुपये मिळाले. परत येताना किमान तीन हजारची तरी राइड मिळायला पाहिजे होती. पण फक्त १२४० रुपयांची राइड मिळाली. मला काही समजलंच नाही. कस्टमरला पण ती राइड सोळा-सतराशे रुपयांतच पडली होती. इतकी स्वस्त राइड मिळाली म्हणून तोही चक्रावला होता.”

भेटलेल्या कॅबचालकांपैकी जवळपास सगळेच त्यांच्या कमाईवर नाखूष आहेत. लक्ष्मीपुत्र कहीरट यांनी महिन्याला ७० ते ८० हजार कमावू या आशेवर १० लाख किमतीची एर्टिगा घेतली, ते या व्यवसायाला खूप वैतागले आहेत. “या गाडीचे हप्ते फिटले की मी ही गाडी विकून टाकणार आणि किराणा मालाचं दुकान टाकणार आहे. ओला-उबरच्या भरवशावर कोणीच गाडी घेऊ नये. घेतली तरी स्वतःचा संपर्क वाढवून धंदा करावा,” असं त्यांनी तळमळीने सांगितलं.

बहुतांश कॅबचालकांच्या कमाईचा आलेख उतरता आहे.

त्यातही काहीजण ओला-उबरपेक्षा वेगळी वाट चोखाळतात. ओला-उबरच्या ट्रिप करता करता काहीजण स्वतःच्या ट्रिप्स करतात. त्यासाठी स्वतःचे संपर्क वाढवतात. राजेश यादव सांगतात, “मला अनेकदा एअरपोर्टच्या ट्रिप्स पडतात. कस्टमर बघून मी स्वतःचं मार्केटिंग करतो. त्यांना सांगतो, ‘तुम्हाला विमानतळ किंवा कुठेही जायचं असेल, तेव्हा थेट मलाच फोन करा. ओला-उबरपेक्षा कमी पैसे घेतो.' असं त्यांना पटवून देतो. असं करत मी बरेच कस्टमर जोडले आहेत. आता जवळपास अर्ध्या ट्रिप ओला-उबरच्या मारतो आणि अर्ध्या स्वतःच्या.”

बहुतांश कॅबचालकांची स्वतःची चारचाकी असते. पण असेही कॅबचालक आहेत जे भाड्याने कॅब चालवतात. एखाद्या मालकाने आपली चारचाकी ओला-उबरला लावलेली असते, पण त्यासाठी चालकही ठेवलेला असतो. चालकाला दिवसाची काही ठराविक रक्कम ठरलेली असते, किंवा मालक स्वतःसाठी ठराविक रक्कम ठेवून चालकाला वरची कमाई घेतो. मालकासाठी एक तर हा जोडधंदा असतो, नाही तर त्याच्या अनेक चारचाकी असतात. मात्र, चालक म्हणून कामाला असलेल्यांची अवस्था मालकापेक्षा वाईट असते हे वेगळं सांगायची गरज नाही.

ओला-उबर सुरू झाल्यानंतर अनेक कॅबचालक चांगले पैसे कमावण्याचं स्वप्न बघून या धंद्यात आले. सुरुवातीला अनेकांनी त्याप्रमाणे धंदा केलाही. पण सध्या या कॅबचालकांची परिस्थिती चांगली आहे असं दिसत नाही. अनेकजण आपल्या कमाईला वैतागलेत, तर अनेकजण हा धंदाच सोडायच्या विचारात आहेत. या कॅबचालकांचं, त्यांच्या या व्यवसायाचं भविष्य कसं असेल? सध्या तरी याचं कोणतंही ठाम उत्तर देता येत नाही.

(काही कॅबचालकांची नावं बदलली आहेत.)

तुषार कलबुर्गी | 7448149036 | tusharkalburgi31@gmail.com







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 2

संजय धस 17.03.25
जर तुम्ही गिऱ्हाईकांचा सर्व्हे घेतला तर तुमच्या लक्षात येईल की ह्याला ड्राइव्हरच जबाबदार आहेत. ह्यामधलं बरंचसं खरं असलं तरी एक गोष्ट सुनिश्चित आहे की ओला उबर चे ७५% ड्राइव्हर हरामखोर आहेत. पुण्यामुंबई दोन्हीकडचे. लिहिण्यासारखे बरेच आहे. कधी वेळ मिळाला तर फोनवर गप्पा मारू.
NATU VIKAS S.18.03.25
खासगीकरणाचा दुष्परिणाम? लेख आवडला
See More

Select search criteria first for better results