आम्ही कोण?
ले 

...त्या ‘महिलांचं क्रिकेट’ नव्हे, तर फक्त ‘क्रिकेट’ खेळताहेत!

  • आ. श्री. केतकर
  • 21.11.25
  • वाचनवेळ 7 मि.
cricket

‘मुली क्रिकेट खेळत नाहीत’ हा पक्का समज होता तेव्हाच्या काळात इंग्लंडमधील वोलव्हरहॅम्पटनमध्ये एक मुलगी क्रिकेट बॅट घेऊन मुलांबरोबर खेळत होती. एका पोलिसाने त्यांना हटकलं. तिच्याबरोबर खेळणाऱ्या मुलांना तंबी दिली. तिला तो काही बोलला नाही. ‘माझ्यावर का नाही रागावलात?’ असा प्रश्न तिने केला. त्याने तुसडेपणाने धारदार आवाजात उत्तर दिलं, ‘मुली क्रिकेट खेळत नाहीत.’ त्या मुलीचं नाव रॅशेल हेहो फ्लिंट (Rachael Heyhoe Flint). आम्ही क्रिकेट खेळणारच. जगाला दाखवून देणार की आम्ही काही कमी नाही, हा तिचा निश्चय होता आणि खरंच तिने ते करून दाखवलं. पुढे १९७३ मध्ये तिने महिला क्रिकेटमधली जागतिक करंडक स्पर्धा आयोजित केली. क्रिकेटमधील ती पहिली जागतिक स्पर्धा होती. त्या स्पर्धेचा खर्च उद्योजक जॅक हेवर्डने केला होता. महत्त्वाचं म्हणजे पुरुषांच्या जागतिक करंडक स्पर्धेआधी दोन वर्षं ही स्पर्धा झाली होती. तिने जी सुरुवात केली ती नंतरच्या पिढ्यांतील महिला सुरू ठेवणार होत्या, वाढवणार होत्या.

cricket

भारतात महिला क्रिकेट सुरू झालं, त्याला कारण झाले महेंद्र कुमार शर्मा. त्यांना भारतीय महिला क्रिकेटचे जनक म्हटलं जातं. हे तसं अपघातानेच झालं म्हणायचं. कारण खरं तर ते लखनौमधील हँडबॉल आणि सॉफ्टबॉल स्पर्धांचे आयोजक. एकदा रेल्वे फलाटावर त्यांनी काही मुलींना सॉफ्टबॉलच्या बॅटने क्रिकेट खेळताना पाहिलं आणि त्यांच्या डोक्यात वीज चमकली. १९७३ मध्ये त्यांनी महिलांची भारतीय क्रिकेट असोसिएशन (विमेन्स क्रिकेट असोसिएशन ऑफ इंडिया) स्थापन केली. त्यासाठी स्वतःचाच पैसा वापरला. पुरस्कर्ते मिळावे म्हणून प्रयत्न केले आणि प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी विनोद खन्नासारख्या बॉलीवूड चित्रपट कलाकारांनाही सामावून घेतलं. शिवाय नंतर ज्या ज्या वेळी पुरेसा निधी जमला नाही, तेव्हा त्यांनी स्वतःच तो भार उचलला. त्याचं चीज झालं. कारण भारतीय महिला संघाने वेस्ट इंडीज संघावर पाटणा येथील सामन्यात विजय मिळवला. आंतरराष्ट्रीय स्तरावरचा हा महिला क्रिकेटपटूंचा पहिला विजय. त्यावेळी भारतीय मुली टीम म्हणून प्रथमच खेळल्या होत्या.

मुलींच्या क्रिकेटकडे सर्वांचं लक्ष जायला हवं असेल तर त्यांना आंतरराष्ट्रीय सामन्यांत खेळण्याची संधी मिळायला हवी, असं शर्मांना वाटत होतं. त्यांच्यामुळे भारतीय महिला क्रिकेट असोसिएशनने स्पर्धा आयोजित केल्या. देशात स्थानिक व्यवस्थेची उभारणी केली. भारताचा महिला संघ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सहभागी होईल याची खातरी केली. व्यवस्थेत त्रुटी असल्या, तरी तेव्हा भारताच्या महिला संघाला त्या स्पर्धेत सहभागी होता आलं. त्यामुळे महिला क्रिकेटला आवश्यक असा पाया मिळाला.

cricket

भारतीय महिलांनी जागतिक महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत प्रथम भाग घेतला १९७७-७८ मध्ये. भारतानेच ती स्पर्धा आयोजित केली होती. त्या स्पर्धेत भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि न्यूझीलंड असे चार संघ सहभागी झाले होते. त्यात ऑस्ट्रेलियाचा संघ विजयी झाला. (ही स्पर्धा भारताने पुरुषांची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्याआधी दहा वर्षं झाली होती.) त्या विश्वचषक स्पर्धेत भारताची कर्णधार होती डायना एदलजी. सध्या बीसीसीआयमध्ये मोठ्या पदावर असलेली डायना तेव्हा रेल्वेमध्ये क्लार्क म्हणून काम करत होती, तर संघातील अन्य मुली वेगवेगळ्या परीक्षा देत होत्या. त्याबरोबरच आंतरराष्ट्रीय सामनेही खेळत होत्या. प्रशिक्षणासाठी त्यांना काहीही मोबदला दिला जात नव्हता. स्वतःचं क्रिकेटचं किट त्या स्वतःच नेत होत्या. त्यांच्यासाठी स्टेडियम्स उपलब्ध नव्हती आणि सामना असेल त्या शहरात जाताना त्यांना दूर पल्ल्याच्या रेल्वेमधून राखीव जागांविना प्रवास करावा लागत होता. त्यांच्या जेवणाची व्यवस्था केलेली नसे. प्रत्येक खेळाडू आपलं सामान स्वतःच नेत असे. सामानाची व्यवस्था पाहायला कुणी अधिकारी त्यांच्याबरोबर नसे. अशा अनेक अडचणींना तोंड देत त्या खेळतच राहिल्या.

cricket

डायना एदलजीआधी भारताच्या महिला संघाची कर्णधार शांता रंगास्वामी होती. तिच्या गावच्या स्टेशनवर रेल्वे केवळ दोन मिनिटं थांबायची. त्यात ती गडबडीने सामान चढवत असे. तिकिट तपासणाऱ्यांशी वाटाघाटी करत असे आणि गर्दीचा मुकाबला करत असे. टॉयलेटजवळच्या अपुऱ्या जागेत संघातील मुली आलटून पालटून झोप घेत. बर्थ मिळाला तर त्यांना धन्य वाटे. अखेरच्या स्टेशनवर गाडी आली की त्या आपलं सामान घेऊन, स्वस्तातल्या हॉटेलात जात. पुढच्या आठवड्यात हेच चक्र असायचं. भारताकडून सामना खेळण्यासाठीही त्यांना पैसे मिळत नसत. तरीही त्यांना खेळायची संधी हवी होती. पण तीही दुर्मिळच होती. १९७७ ते १९८४ आणि १९८६ ते १९९१ या काळात त्यांना भारताबाहेर आंतरराष्ट्रीय मालिका खेळण्याची संधी अगदी क्वचितच मिळाली. १९८८ मध्ये ऑस्ट्रेलियात होणाऱ्या महिला विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची संधीही त्यांना मिळाली नाही. खरं तर त्या स्पर्धेसाठी त्यांनी शिबीरही घेतलं होतं. त्यांची तयारी पूर्ण झाली होती. पण ऐनवेळी क्रीडा मंत्र्यालयाकडून, संघाला कळविल्याशिवायच, त्यांची प्रवेशिका मागे घेतली गेली. त्यावेळी शांता रंगास्वामीने पंतप्रधान राजीव गांधी यांनाही विनवलं. पण तोवर उशीर झाला होता. या १९८६ नंतर शांता एक दिवसीय सामन्यात कधीच खेळली नाही.

cricket

अखेर २००६ मध्ये बीसीसीआयने महिला खेळाडूंना सामावून घेतलं. खरं तर त्यांना तसं करणं भाग पडलं. हे काही त्यांच्या इच्छेने झालं नव्हतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाने त्याच्या सर्वच सदस्यांना तसा आदेश दिला होता. तो पाळला नाही तर त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यात येईल, असं बजावलं होतं म्हणून ते झालं. तरीही महिला खेळाडूंना व्यावसायिक खेळाडू म्हणून कंत्राट देण्यास बीसीसीआयने विलंब केलाच आणि अखेर २०१३मध्ये कंत्राटं देण्यात आली. पाकिस्ताननंतर दोन वर्षांनी!

cricket

या सुरुवातीच्या काळात मुली खेळत होत्या आणि विस्मरणात जात होत्या. पण मिताली राज आणि झूलन गोस्वामी, अंजुम चोप्रा (आता ती समालोचकही बनली आहे), शुभांगी कुलकर्णी अशांच्या प्रभावी खेळामुळे त्यांचं नाव घरोघरी झालं. दीर्घकाळ त्यांनी संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. तरीही पुरस्कर्ते आणि प्रेक्षकही दूरच राहिले होते. २०१३ मध्ये भारताने पुन्हा विश्वचषक स्पर्धा आयोजित केली, तेव्हा सामन्यांसाठी बसमधून आणलेल्या, गणवेशातील मुलांनी प्रेक्षागार भरलेलं दिसायचं. केवळ वातावरण निर्मितीसाठी हे केलं जात होतं. त्यातही सामन्यांची स्थळं आयत्यावेळी बदलली जात होती. कारण पुरुषांच्या स्थानिक स्पर्धांसाठी प्राधान्याने मैदानं दिली जात होती. महिला खेळाडूंना साधारण परवडणाऱ्या हॉटेलमध्ये राहावं लागत होतं. पण परदेशी संघांसाठी मात्र पंचतारांकित हॉटेलची सुविधा देण्यात येत होती. याबाबत डायना एलजीने जाहीरपणे आवाज उठवला तेव्हा कुठे भारतीय संघालाही परदेशी संघ उतरलेल्याच हॉटेलमध्ये जागा देण्यात आली होती. या स्पर्धेचं विजेतेपदही ऑस्ट्रेलियाच्या संघानेच मिळवलं. आजवरच्या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने सातवेळा, इंग्लंडने चारवेळा तर न्यूझीलंड आणि भारताने एकदा विजेतेपद मिळवलं आहे.

cricket

२०१७ साल उजाडलं आणि सारं चित्र एकदम पालटलं. हरमनप्रीत कौरने डर्बी इथं ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७१ धावा केल्या आणि महिला संघाचा आत्मविश्वास बळावला. इंग्लंडमध्ये झालेल्या त्या स्पर्धेत भारताने अंतिम सामन्यात प्रवेश केला आणि भारतीय महिला संघाची चर्चा सर्वत्र होऊ लागली. रातोरात स्मृती मंधानाचा कव्हर ड्राइव्ह जाहिरातींत वारंवार दाखवला जाऊ लागला. मिताली राजचा शांतपणा हा सांस्कृतिक प्रतीक बनला आणि हरमनप्रीतच्या बेधडक षटकारांत तिचा बेडरपणा दिसला, तो सर्वांना आवडला. भारतीय महिला क्रिकेटमध्ये नवचैतन्य आलं. ती केवळ सुरुवात होती.

cricket

नंतर २०२३ मध्ये महिलांची प्रीमियर लीग सुरू झाली. मुंबई आणि बेंगळुरू येथील सामन्यांची सर्व तिकिटं विकली गेली आणि दूरचित्रवाणीवर या सामन्यांना लाखो प्रेक्षक मिळाले. आता फ्रेंचॅइसी करोडो रुपये देऊन त्यांच्यासोबत कंत्राटं करू लागले. एकेकाळी ज्या महिला खेळाडूंना रेल्वेच्या तिकिटासाठी पैसे गोळा करावे लागत असत, कुणाकडून तरी बॅट मागून घ्यावी लागत असे, त्यांना आता करोडो रुपयांची कंत्राटं मिळू लागली. माध्यम हक्कांसाठी ७० कोटी डॉलर मिळाले. त्यांचे सामने पाहण्यासाठी प्रेक्षक स्टेडियममध्ये गर्दी करू लागले. हे सारं त्यांनी त्यांच्या कर्तृत्व आणि खेळातील कौशल्यावर मिळवलं.

तरि अजूनही पुरुषांच्या बरोबरीने महिलांना पैसे देण्याला हे पुरुषी मनोवृत्तीचे लोक नाकं मुरडतात. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेसाठी बक्षीस रक्कम एक कोटी ८८ लाख ८० हजार डॉलर (१३.८ मिलियन डॉलर) एवढी होती. पुरुषांच्या स्पर्धेपेक्षा ती जास्त होती. त्यावरूनही बरीच चर्चा झाली. महिलांचं क्रिकेट आता क्रिकेटपुरतं राहिलेलं नाहीय. त्यांनी जे काही मिळवलंय, त्यांना जे मिळतंय, ते मिळवून देण्यासाठी रॅचेल होहे फ्लिंट, शांता रंगास्वामी, डायना एदलजी यांनी जे केलं आणि हरमनप्रीत, स्मृती मंधाना, जेमिमा, दीप्ती, शफाली, रिया करत आहेत, त्यामुळे आहे.

cricket

नीतू डेव्हिड या भारताच्या एकेकाळच्या फिरकी गोलंदाज. इंग्लंडमधील विश्वचषक स्पर्धेत न्यूझीलंडविरुद्ध त्यांनी ५३ धावा देऊन आठ गडी बाद केले होते. हा एक जागतिक विक्रम आहे. नीतू सध्या भारताच्या निवड समितीच्या अध्यक्ष आहेत. त्या खेळत होत्या त्यावेळी मुली क्रिकेटकडे करियर म्हणून बघत नव्हत्या. पण आता यात मोठाच बदल झाला आहे. महिला खेळाडू करोडोंची कमाई करत आहेत आणि त्यामुळेच अधिकाधिक मुली या खेळाकडे आकृष्ट होऊन गंभीरपणे त्यातच करियर करण्याचा विचार करत आहेत. खेळण्याला समाजाच्या स्तराचं बंधन नसतं, हेही आता त्यांना उमगलं आहे. त्यामुळेच खेळाडूंमध्ये भेदभाव नाही. त्या एकजुटीनेच भारतासाठी खेळतात. यंदाच्या संघातील क्रांती गौड ही निम्न मध्यमवर्गातील आहे, तर राधा यादवचे घरचे भाजी विक्रेते आहेत, हे पुरेसं बोलकं आहे.

cricket

म्हणूनच यंदाचा महिला विश्वचषक हे क्रांतीचं पुढचं पाऊल म्हणता येईल. आता जगाला उमगेल की त्या ‘महिलांचं क्रिकेट’ खेळत नाहीयेत. त्या फक्त ‘क्रिकेट’ खेळताहेत!

(या लेखासाठी फायनान्शिअल टाइम्समधील लेख आणि विकिपीडियाचा आधार घेतला आहे.)

आ. श्री. केतकर | aashriketkar@gmail.com

आ. श्री. केतकर हे ज्येष्ठ पत्रकार असून ते प्रामुख्याने क्रीडा आणि सामाजिक विषयांवर लिखाण करतात.







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results