शाळेच्या वयात आपली एखादी जिवाभावाची मैत्रीण असते. तिच्याशी आपण रोज बोलतो, खेळतो. मोठेपणी नकळत या मैत्रिणीचा हात आपल्या हातातून निसटतो. आपला नोकरी-व्यवसाय, संसार यात आपण रमून जातो. अधूनमधून तिची आठवण येत असते. अवचितपणे ती पुन्हा एकदा आपल्या आयुष्यात येते; आणि मग मात्र तिची साथसंगत न सोडण्याची आपण मनोमन शपथ घेतो. कवितेच्या बाबतीत माझं नेमकं असंच झालं.
मला लहानपणापासूनच कवितांची खूप आवड होती. माझ्या आईने ती आवड निर्माण केली. पुढे कॉलेजमध्ये असताना मी कवितांचे कार्यक्रम करायचे, कविसंमेलनांमध्ये भाग घ्यायचे; पण नंतर नंतर ॲक्टिंगच्या करियरमध्ये मी व्यग्र होत गेले तशी कवितांपासून मी लांब जातेय याची जाणीव व्हायला लागली. माझी मुलगी स्वराली लहान होती तेव्हा एका कवितेच्या कार्यक्रमाचं मला निवेदन करायचं होतं. नुसतं निवेदन करण्याऐवजी त्या विषयाला अनुसरून कविता वाचल्या तर मजा येईल असं मला वाटलं. स्वरालीला घेऊन लायब्ररीमध्ये बसणं शक्य नव्हतं. म्हणून यूट्युब किंवा गुगल सर्च करून काही मिळतंय का ते बघायला लागले. पण तेव्हा जाणवलं, की तिथे आपल्या साहित्याबद्दलची, विशेषत: कवितांबद्दलची अत्यंत कमी माहिती आहे. इतकंच काय, पण दुकानांमध्ये जाऊन कवितांची पुस्तकं विकत घेणंही कमी झालं आहे. मित्र-मैत्रिणींचे कवितांचे फड जमणं पूर्वीइतकं उरलं नाही. बापट-पाडगावकर-करंदीकर त्रयींसारखे काव्यवाचनाचे कार्यक्रम आता होत नाहीत. रेडिओ-टीव्हीवरही पूर्वीसारखी कविसंमेलनं सादर होत नाहीत. कवितेविषयीचं हे रखरखीत वास्तव लक्षात आल्यावर माझ्या आत खोल कुठे तरी कळ उठली. कवितेचं आणि आपल्या सगळ्यांचं पूर्वापार असलेलं नातं मी माझ्या मनात आळवू लागले.
‘देवा तुझे किती सुंदर आकाश, सुंदर प्रकाश सूर्य देतो' या ओळींनी आपल्या बालवयात कवितेचा प्रवेश होतो. मग दर श्रावणात ‘त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती'सारखी कविता मन प्रसन्न करते. शाळेच्या पुस्तकातली ‘गर्जा जयजयकार क्रांतिचा गर्जा जयजयकार'सारखी कविता मनाला स्फुरण देते. तारुण्यात प्रवेश केला, की ‘दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित सोनेरी ऊन पडतं, तसंच काहीसं पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम येतं'सारखी कविता आवडू लागते. पुढे आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर आणि निरनिराळ्या भावनिक आंदोलनांच्या काठांवर कविता भेटत राहते, एखाद्या जिवलगासारखी...
तर अशी ही अर्थकाहूर आणि शब्दवेल्हाळ कविता अनेकांचं बोट सोडून दूर गेल्याचं माझ्या लक्षात आलं. आपणच काही तरी केलं पाहिजे ही भावना अनावर झाली, पण नेमकं काय केलं पाहिजे हे कळत नव्हतं. ‘टीआरपी'च्या वावटळीत अडकलेली टीव्ही चॅनेल्स कवितांचे कार्यक्रम किती स्वीकारतील याविषयी शंका होती. जाहीर कविसंमेलनं भरवण्याला मर्यादा होत्या. त्यातूनच यूट्युब हे माध्यम व्यवहार्य असल्याचं लक्षात आलं. त्या माध्यमाचं महत्त्व आणि मर्यादा लक्षात घेत कार्यक्रमाची आखणी केली. प्रत्येकाच्या मनातलं कवितेचं पान हलतं राहावं म्हणून कार्यक्रमाला नाव दिलं ‘कवितेचं पान'.
आजवर या ‘कवितेच्या पाना'चे ४८ भाग प्रकाशित झाले आहेत. हे पान मी इतक्या आवेगाने कशी साकारत गेले याचा विचार करताना लक्षात येतं, की कविता चांगल्या पद्धतीने वाचली गेली तर ती आपल्यापर्यंत पोहोचते, असा माझा ठाम विश्वास होता. कारण, कॉलेजमध्ये मी कविसंमेलनं बघितली होती. काही कविसंमेलनांमध्ये मी भागही घेतला होता. वेगवेगळ्या विषयांच्या कविता एकत्र करून त्यांचं वाचन करणं हा माझ्या आवडीचा भाग होता. अभिनयाच्या क्षेत्रात काम करताना कवितांविषयी जिव्हाळा असणारे खूपजण आहेत हे मला लक्षात आलं होतं. त्यामुळे अशा कवितांच्या कार्यक्रमांच्या मैफिली रंगवून, त्याचं चित्रीकरण करून यूट्युबवर ठेवलं तर कदाचित कवितेचा हात सुटून गेलेल्यांसाठी ही पर्वणी ठरेल असा विश्वास होता. माझ्याप्रमाणेच अनेकांसाठी ‘कविता' हा सुकून देणारा कोपरा आहे हे मला माहीत होतं. अशा मैफिलींच्या निमित्ताने कविता संग्रहित होतील आणि कविता वाचून मिळणारा आनंद इतरांमध्ये वाटला जाईल असं माझ्या मनात पक्कं होतं.
असा काही कार्यक्रम करायचा असेल तर बरीच माहिती लागणार होती. मी २०१५ साली त्या दृष्टीने संशोधन करायला सुरुवात केली. पुण्यामध्ये शक्य तिथून कवितासंग्रह विकत आणले, ते वाचायला सुरुवात केली. विषयांनुसार कवितांचं वर्गीकरण केलं. जुन्या-नव्या शक्य त्या सर्व कवींची माहिती गोळा केली. प्रत्येक कवितेची काव्यमूल्यं, त्यातलं सौंदर्य काय आहे याचा अभ्यास केला. नंतर माझ्या क्षेत्रातल्या वेगवेगळ्या व्यक्तींना फोन करून, त्यांचे दिवस ठरवून चित्रीकरण करायला सुरुवात केली.
कवी कुसुमाग्रजांची बाबा आमटे यांच्यावरची ‘संत' ही कविता डॉ. श्रीराम लागू फार अर्थवाही पद्धतीने सादर करत. अनेकांप्रमाणे कुसुमाग्रज माझेही आवडते कवी आहेत. त्यामुळे डॉ. लागूंपासून ‘कवितेचं पान'ची सुरुवात करावी असं वाटलं. डॉक्टरांना ही कल्पना खूपच आवडली. मग दीपाताई आणि ‘पॉप्युलर प्रकाशना'चे रामदास भटकळ यांच्या उपस्थितीत मानाचं पहिलं पान मांडलं. तो दिवस होता १० मार्च २०१७.
या कार्यक्रमांमधून पैसे मिळतील का, किती मिळतील असं काही माझ्या डोक्यात आलंही नाही. कवितेच्या आकंठ प्रेमात असल्यामुळे मी पदरचे बरेच पैसे खर्च केले. रिसर्च, लेखन, दिग्दर्शन अशी बरीचशी कामं मी स्वत:च करत होते. एक कॅमेरामन मला असा मिळाला, जो स्वत: कविताप्रेमी होता. त्याचं नाव धनेश पोतदार. तो म्हणाला, मी या कामाचे पैसे घेणार नाही. विशेष म्हणजे आम्ही ज्या ज्या लोकांबरोबर एपिसोड शूट केले त्यांनी कोणीच आमच्याकडून एका पैशाचंही मानधन घेतलं नाही. त्यामुळे शूटिंगसाठी आणलेल्या उपकरणांचं भाडं आणि एडिटरला द्यावे लागणारे थोडेफार पैसे, इतकाच आमचा मुख्य खर्च व्हायचा. शूटसाठी दुसऱ्या गावी गेलो तर मात्र सगळा क्रू आम्हाला न्यावा लागायचा. अशा वेळी बऱ्यापैकी खर्च व्हायचा. एकदा असं ना. धों. महानोरांच्या गावी गेलो होतो. पैशांचं क्षणभर बाजूला ठेवा. महानोरांचा तो एपिसोड आजही मला शहारून सोडतो.
‘कोणती पुण्ये अशी येती फळाला, जोंधळ्याला चांदणे लगडून यावे' या महानोरांच्या ओळींची मोहिनी आजही मनावर तितकीच आहे. कवितांच्या काही ओळी अशा असतात, की त्या एकदा ऐकल्या की जन्मभर पाठराखण करत राहतात. मला नेहमीच वाटतं, की माझ्या सावलीमध्ये अशा अनेक कवींच्या अनेक ओळी आपसूकपणे विरघळल्या आहेत... तर सांगायची गोष्ट, म्हणजे पळसखेडच्या त्या निसर्गरम्य शांततेत मी खरंच जोंधळा झाले होते आणि महानोरांच्या कवितेच्या चांदण्यामध्ये चिंब होत होते. महानोरांसोबतचं ते ‘कवितेचं पान' खूपच रंगलं. अनेकांनी ते पुन्हा पुन्हा पाहिलं आणि ऐकलं. निसर्गाचा एक भाग बनलेला हा महाकवी माणूस म्हणून कसा आहे हे अनुभवण्याची दुर्मिळ संधी या निमित्ताने कवितावेड्यांना मिळाली. पण किशोर कदम उर्फ सौमित्र याच्या शब्दांत सांगायचं, तर कोणत्याही सुखाची चाहूल घेणारं दु:ख मागे मागे येतंच असतं. महानोरांशी बोलत असताना माझीही अवस्था वेगळी नव्हती. महानोरांना भेटण्याच्या आनंदाप्रमाणेच आपण कुसुमाग्रज, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर आणि इंदिरा संतांना भेटू शकलो नाही आणि त्यांचं ‘कवितेचं पान' करू शकणार नाही याचा सल मनात होता; पण याला काही इलाज नाही, अशी मनाची समजूत घालत ती खंत एका कप्प्यात बंद केली होती.
आणि मग कोणाच्याही ध्यानीमनी नसताना आपल्या डोळ्यांना न दिसणारा कोरोना नामक शत्रू आला. या बेट्याने पहिलं काम काय केलं तर आपल्याला सगळ्यांना घरात डांबून ठेवलं. माझ्या टी.व्ही. मालिकांचं चित्रीकरण बंद पडलं. ‘कवितेचं पान' शूट करायला घराबाहेर पडणं तर शक्यच नव्हतं. अशा हतबल क्षणी माझ्या मनाने उचल खाल्ली. अशा निराश वातावरणात कविताच आपल्या सगळ्यांची सोबत करेल याची खात्री पटू लागली. मग ‘कवितेचं पान'च्याच अंतर्गत ‘काव्यश्राव्य' हा उपविभाग सुरू केला. हे ऑडिओ एपिसोड असणार होते. त्यात मी पाडगावकर, विंदा, कुसुमाग्रज आणि इंदिरा संतांवर स्वतंत्र एपिसोड केले. त्यांचे एकेक कवितासंग्रह निवेदनासह पेश केले. ते ऐकून अनेकांनी ‘जरा विसावू या वळणावर'चा अनुभव घेतला.
‘गेले ते दिन गेले' ही भावना कवितेच्या क्षेत्रात नेहमीच दिसून येते. कवी अनिल, सुरेश भट, नारायण सुर्वे, ग्रेस, आरती प्रभूंपासून बा. भ. बोरकर, दिलीप चित्रे किंवा कुसुमाग्रजांची वैभवशाली परंपरा लुप्त झाली असं अनेकदा बोललं जातं. ‘मराठी कवितेत आता दम उरला नाही' असंही काहीजण म्हणतात. पण ‘कवितेच्या पाना'ने मला वेगळाच साक्षात्कार झाला. या लेखात उल्लेख केलेल्या थोर कवींची परंपरा चालवणारी नीरजा, अरुणा ढेरे, सौमित्र, संदीप खरे, दासू वैद्य ही मंडळी आहेतच. पण यांच्या नंतरच्या पिढीतले उत्तम कवीही मला गवसले, ज्यांचं ‘कवितेचं पान' करताना मला विशेष आनंद मिळाला. यामध्ये नागपूरची शशी डंभारे, लातूरचा चैतन्य जोशी, चिपळूणची रश्मी मर्डी किंवा मोहोळचा नितीन जाधव यासारखी किती तरी नावं सांगता येतील. या सगळ्यांच्या कविता म्हणजे मराठी कवितेच्या भवितव्यासाठी ‘आश्वासन' आहे असं मला वाटतं. माझं ‘कवितेचं पान' रंगत जाण्यामागे या सगळ्यांचं असणंही मोलाचं ठरलं.
अगदी पहिल्या भागापासूनच ‘कवितेचं पान' लोकांना आवडलं. मी फेसबुकवर त्याचे व्हिडिओ पोस्ट करायचे. केवळ भारतातूनच नव्हे तर जगभरातल्या मराठी माणसांनी त्याचं स्वागत केलं. लोक अक्षरश: पुढचा भाग कधी येतोय याची वाट बघायचे. बाहेरच्या देशांमध्ये राहणारे, मराठीवर प्रेम असणारे अनेक असे होते, ज्यांची तिथे मराठी साहित्याअभावी, विशेषत: कवितेअभावी उपासमार झाली होती. तेव्हा ‘कवितेचं पान'मुळे त्यांना मेजवानीच मिळाली असं कित्येकजण सांगायचे. विशेषत: कोरोनाच्या टाळेबंदीच्या काळात लोकांना या कार्यक्रमामुळे एक प्रकारचा दिलासा मिळाला. त्यानंतर ‘मी कवितासंग्रह विकत घेतला' असं सांगणारेही फोन, मेसेज आले.
काही भाग झाल्यानंतर मी लोकांना आवाहन केलं, की पुढचे भाग शूट करण्यासाठी मला आर्थिक मदतीची गरज आहे, अन्यथा नाइलाजाने मला हा कार्यक्रम बंद करावा लागेल. त्यालाही खूप चांगला प्रतिसाद मिळाला. अमेरिकेतल्या भरत लागू यांनी तर चक्क एक लाख रुपये पाठवले. त्यांनी मला कळकळीची विनंती केली- माझ्या बायकोला हा कार्यक्रम खूप आवडतो, बंद करू नका.
मी स्वत:ही या कवितांमध्ये खूप रमले. एकच कविता आपल्याला काही वर्षांपूर्वी जशी कळलेली असते, त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने ती आता कळते आहे असं जाणवलं. इतकंच नाही, तर आपण वाचलेली कविता जेव्हा दुसरा कोणी वाचतो तेव्हाही तिचा वेगळा अर्थ समोर येतो, हेदेखील दिसलं. कविता निवडीपासून इतर संशोधनापासून ते प्रेक्षकांच्या प्रतिक्रियांपर्यंत हे सगळं मी अगदी मनापासून एन्जॉय केलं.
एका वर्षी दिवाळीच्या निमित्ताने अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसोबत मी एपिसोड केला. शेतकरी आत्महत्येच्या मागची वेदना मांडणारा ‘गाभ्रीचा पाऊस' या चित्रपटाची आठवण तिने सांगितली. एका व्यथित गावात या चित्रपटाचं चित्रीकरण झालं होतं. तिथल्या महिलांच्या डोळ्यांतली वेदना अनुभवताना सोनालीने नकळत एक कविता लिहिली होती. ती कविता तिने माझ्यासमोर अशा व्याकुळतेने सादर केली की आम्ही दोघीही आतल्या आत भिजत राहिलो.
आणखी एक अनुभव कवी अरुण म्हात्रे यांच्या एपिसोडचा सांगता येईल. ते राष्ट्र सेवा दलाचे कार्यकर्तेआहेत. कविता लिहो अथवा न लिहो, प्रत्येक सामाजिक कार्यकर्ता हा मनाने कवी असतोच, असं त्यांना ठामपणे वाटतं. ‘त्या अर्थाने महात्मा गांधीही कवी होतेच' असंही ते म्हणाले. चळवळीत काम करताना वेगळ्याच रूपात म्हात्र्यांना कविता भेटायची. कधी आंदोलन तीव्र झालं असेल आणि दुसऱ्या दिवशी पोलिस कार्यकर्त्यांना अटक करणार असतील तर आदल्या रात्री उशिरापर्यंत चर्चा चालायची. पण ती झाल्यावर कोणी तरी तलत मेहमूद म्हणायचा, कोणी गुलाम अली गायचा, तर कोणाला कबीर आठवायचा. चळवळीतली उत्तररात्र ही अशी असायची.
नंतर मी, शर्वरी जमेनीस आणि कौशल इनामदार असे तिघं कवितांचा एक रंगमंचीय कार्यक्रमही सादर करायला लागलो. अबुधाबी, कतार, सिंगापूर आणि महाराष्ट्रातही काही ठिकाणी ते कार्यक्रम केले.
एक अभिनेत्री म्हणून मला स्वत:ला या दोन्ही कार्यक्रमांमधून खूप शिकायला मिळालं. कविता ही एखाद्या भावनेचं, अनुभवाचं संक्षिप्त रूप आहे. ती सादर करताना कुठे कसा आवाज लावायला हवा, कुठे जोर द्यायला हवा, कुठे हळुवार आवाज हवा, तर तिचा नेमका अर्थ पोहोचेल याचा अभ्यास करावा लागतो.
गेल्या तीन वर्षांत शूटिंगमुळे पुन्हा कवितेपासून काहीशी लांब गेलेय, पण वेळ मिळेल तेव्हा कविता वाचतेच. त्या कवितेतून काही नवीन अर्थ लक्षात येतो. माझी कवितांची निवडही आता बदललीय असं लक्षात येतं. आता मला थोड्या चौकटीबाहेरच्या कविता जास्त आवडतात. एक उदाहरण देते. आपल्याकडे एखादी स्त्री आई होणार असेल म्हणजे सगळं घरदार आनंदी असतं, असं एक समीकरण आपल्या माध्यमांनी करून टाकलंय. पण १९७० साली विंदांनी एका कवितेत इतकं वेगळं मांडलंय : एका बाईला जेव्हा कळतं की आपण आता आई होणार आहोत, तेव्हा तिच्या शेजारी झोपलेल्या पुरुषाचा जीव घ्यावासा वाटतोय असं ती म्हणते. कारण आता पुढचा प्रवास उलट्या देत, यातना सोसत, कदाचित मरणाच्या दारापर्यंत जात मला एकटीला करायचाय. हा अस्ताव्यस्त झोपलाय असं तिला वाटतं. हा असा विचार विंदांच्या डोक्यात कुठून येतो? आणि तो कवितेत कसा मांडता येतो? तर अशा हलवून टाकणाऱ्या, विचार करायला लावणाऱ्या कविता आता मला जास्त आवडतात. अशा कविता निवडून ‘कथिता' असा एक कार्यक्रम करण्याचं माझ्या डोक्यात आहे- कथा सांगणाऱ्या कविता म्हणून ‘कथिता'.
नुकतेच मी ऑस्ट्रेलियात कवितांचे दीड-दीड तासांचे तीन एकल कार्यक्रम केले. प्रत्येक कार्यक्रमात २२ ते २५ कविता वाचल्या. त्यात कुसुमाग्रज, विंदा, पद्मा गोळे हे जुने कवी होते; तसेच पुनीत मातकर, संजय चौधरी हे नवीन कवीसुद्धा होते. हे कार्यक्रमही चांगले झाले.
‘आई कुठे काय करते' या मालिकेमुळे वेगवेगळ्या टप्प्यांवर बाईच्या आयुष्यात होणारे भावनिक बदल माझ्या लक्षात आले. त्यातूनच मी मध्यंतरी ‘ती'च्या कविता असा एक कार्यक्रम केला. स्त्रीच्या आयुष्यात लहानपणापासून येणारे वेगवेगळे टप्पे अधोरेखित करणाऱ्या कविता त्यात घेतल्या. त्यात निवेदन ठेवलं नाही. त्या कविता वाचत असताना त्याला अनुरूप चित्रं मागे उलगडत जायची. त्यामुळे प्रेक्षक अलगदपणे त्या कवितेत शिरायचे. मी आणि रवींद्र करमरकर त्या कविता वाचायचो. तो रंगमंचीय कार्यक्रम होता. तोही खूप छान व्हायचा. मग कोरोना आला आणि तो बंद झाला. आता या मालिकेच्या शूटिंगमुळे तितका वेळ मिळत नाही. मला खरं तर अशी दैनंदिन मालिका करायची नव्हती. कारण मग बाकीच्या गोष्टींना वेळ देता येत नाही. आणि हे काम घेताना ही मालिका इतकी लोकप्रिय होईल असं वाटलंही नव्हतं. पण ते झालं. अर्थात ही भूमिका मीही मनापासून एन्जॉय करत आहे. आता पुढे जे कवितांचे कार्यक्रम करेन त्याला या लोकप्रियतेचा फायदा होईल असं वाटतं.
अभिनयाच्या क्षेत्रात असले तरी केवळ अभिनय एके अभिनय करत राहावं असं मला कधीच वाटलं नाही. उलट, आताही शूटिंगमुळे मला कवितांसाठी वेळ मिळत नाही याची रुखरुख लागते. कविता आयुष्यात असणं माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. एरवीच्या धकाधकीत कविता मनाला गारवा देते, उल्हसित करते, तर कधी खडबडून जागं करते. प्रत्येक कवितावाचन अधिकाधिक समृद्ध करत जातं.
माझी आणि कवितेची मैत्री दिवसेंदिवस घट्ट होत आहे, आणि माझ्यासाठी ही सर्वाधिक आनंदाची बाब आहे. ‘कवितेच्या पाना'प्रमाणेच हा लेख म्हणजेसुद्धा माझी आणि ‘अनुभव'च्या वाचकांची मैफलच आहे असं मला वाटतं. या मैफिलीची सांगता कवी मंगेश पाडगावकरांच्या ओळींनी करायला मला आवडेल.
ज्यांची हृदये झाडांची त्यांनाच फक्त फुले येतात,
तेच वाढतात, प्रकाश पितात, तेच ऋतू झेलून घेतात..
(अनुभव, जुलै २०२३च्या अंकातून साभार)
Actress Madhurani Prabhulkar's lifelong passion for poetry is highlighted in her journey. Through her YouTube series, "Kaviteche Pan," she has reconnected with this art form, sharing its beauty with a wider audience. The initiative features works from renowned Marathi poets like Kusumagraj and Vinda Karandikar, alongside new talents. This effort showcases her dedication to bringing the elegance of poetry to everyone, proving it's never just a childhood memory.
