कॅथरीन हेपबर्न हे 1930च्या दशकातील हॉलिवूडमधील आघाडीचं नाव. त्या काळात बॉक्स ऑफिसवर त्यांच्या चित्रपटांनी धुमाकूळ घातला. त्यांच्या कणखर आणि ठाम स्वभावाचा हा एक आगळावेगळा किस्सा.
स्त्रियांच्या वेषभूषेवरून सतत काही ना काही गदारोळ उठत असतो. १९३० च्या दशकातही तो होताच. तेव्हा स्कर्ट हा स्त्रियांसाठी आदर्श पोशाख मानला जाई. पॅन्ट घालणारी स्त्री म्हणजे वाईट चालीची, अशी समजूत होती. विशेषतः सिनेक्षेत्रात काम करणाऱ्या स्त्रिया असतील तर समाजाला मान्य नसणारे कपडे घालणं म्हणजे करियरच्या दृष्टीने आत्महत्याच.
कॅथरीन हेपबर्न यांनी मात्र सामाजिक बंधनं पाळण्यापेक्षा स्वतःला आरामदायी आणि योग्य वाटणारे कपडे घालण्याला प्राधान्य दिलं. आणि करियरच्या सर्वोच्च बिंदूवर असताना चक्क पॅन्ट वापरायला सुरुवात केली.
तेव्हा पॅन्ट ही पुरुषांची मक्तेदारी होती. I wear the pants in the house अशी एक म्हणही इंग्रजीमध्ये आहे. त्यातून पुरुषांचे अधिकार आणि श्रेष्ठत्व दाखवलं जातं. स्त्रियांनी पॅन्ट घालणं हे त्यांच्या शारीरिक स्वायत्ततेला (bodily autonomy) ला मान्यता देणारं आणि पितृसत्तेवर घाला घालणारं होतं.
कॅथरीन हेपबर्न यांनी I too wear the pants in the house असं म्हणत वैयक्तिक आयुष्यातच नव्हे, तर चित्रपटातही पँट वापरायला सुरुवात केली. ‘ख्रिस्तोफर स्ट्राँग’ आणि ‘द फिलडेल्फिया स्टोरी’या चित्रपटांतील त्यांची पॅन्ट घातलेली दृश्यं खूप प्रसिद्ध झाली. त्यावरून खूप गदारोळही झाला. वृत्तपत्रांमधून ‘स्त्रियांनी पॅन्ट आणि ट्राउजर्स घालणे हे हास्यास्पद आणि मूर्खपणाचे आहे’याबद्दल मथळेच्या मथळे भरून लिहिलं जाऊ लागलं. कॅथरीन यांनी पॅन्ट वापरू नये यासाठी त्यांच्या चित्रपटाच्या निर्मिती संस्थेने त्यांची पॅन्ट जप्त करून घेतली होती. हिरॉइनने स्कर्ट न वापरता पॅन्ट वापरणं हे संस्थेसाठी बदनामी करणारं आहे, असं त्यांचं म्हणणं होतं.
स्त्रियांनी पॅन्ट वापरणं हे तेव्हाच्या इतर स्त्रियांनाही पचत नव्हतं. कॉन्स्टन्स बेनेट या तेव्हाच्या दुसऱ्या एका आघाडीच्या अभिनेत्रीने या प्रकाराबद्दल जाहीर नाराजी व्यक्त केली होती.
कॅथरीनना यापायी बऱ्याच चित्रपटांना मुकावं लागलं. हॉलिवूडने त्यांच्यावर अघोषित बंदी घातली. पण त्या अशा सर्व विरोधाला पुरून उरल्या. त्यांनी पुढे आपलं करियर प्रचंड यशस्वी केलं.
