आम्ही कोण?
ले 

ट्रंप यांच्या 'धमकी' फॉर्म्युल्याने नेमकं काय साधलं?

  • निळू दामले
  • 14.10.25
  • वाचनवेळ 4 मि.
gaza war ceasefire

गाझात लढाई स्थगित झाली. शस्त्रसंधी झाली. म्हटलं तर ही शस्त्रसंधी एकतर्फी आहे. गाझाच्या हातात दंडुके होते, इस्रायलकडे अत्याधुनिक महाघातक शस्त्रं होती. ट्रंप यांनी नेतान्याहूंना धमकावलं, त्यांचे हात पाठी बांधले. इस्रायलने रॅाकेट, तोफगोळे आणि बॉम्बवर्षाव थांबवला.

एवढंच झालं. बाकी सर्व देखावा होता.

ज्या कारणांसाठी इस्रायल आणि गाझा यांच्यात लढाई झाली ती कारणं शिल्लक आहेत.

इस्रायलला सुरक्षा हवीय. अरब जगाने ती द्यायचं मान्य केलंय, इस्रायलचं अस्तित्व मान्य करून त्यांच्यासोबत सहकार्य करत जगायचं मान्य केलंय. तसे करार केलेत, व्यापार उदीम सुरू केलाय. पॅलेस्टाईन तयार आहे, त्यांची एक अट आहे. त्यांना एक देश हवाय आणि इस्रायलकडून अनाक्रमणाची, दादागिरी न करण्याची हमी हवीय. ती हमी शस्त्रसंधी करारात नाही.

ट्रंप यांच्या वीस कलमी कार्यक्रमात हमासबद्दल उल्लेख आहे, पॅलेस्टाईनचा उल्लेख नाही. हमासनं शस्त्रं खाली ठेवावीत, गाझाच्या सरकारात हमास असू नये, असं ट्रंप म्हणतात. पण गाझा-वेस्ट बॅंक मिळून एक पॅलेस्टाईन हा देश होईल असं ट्रंप म्हणत नाहीत. नेतान्याहू आणि त्यांचे सहकारी पक्ष पॅलेस्टाईनचं अस्तित्व मान्य करत नाहीत. गाझा रिकामं करावं, वेस्ट बॅंकमधल्या लोकांना हाकलून द्यावं, दोन्ही जागी ज्यूंच्या वस्त्या करून सर्व पॅलेस्टाईन व्यापावं, असं नेतान्याहू आजही बोलत आहेत.

इस्रायलचं असणं एकेकाळी अरब जगाला मान्य नव्हतं. ती भूमिका अरबांनी सोडली. पॅलेस्टाईनमधे हमासच्या एका गटानं ती भूमिका सोडली, सिनवार गट (सिनवार जिवंत नाहीत) सोडता काही हमासवाले इस्रायलबरोबर जगायला तयार आहेत. १९६७ साली जेवढा इस्रायल होता तेवढा राहू द्या,त्या वेळी जेवढं पॅलेस्टाईन होतं तेवढं मान्य करून पॅलेस्टाईन या देशाला सीमा आणि सार्वभौमत्व द्या, असं बहुसंख्य पॅलेस्टिनींचं आणि अरब जगाचं म्हणणं आहे. नेतान्याहू आणि काही ज्यूंचा मुळात पॅलेस्टाईनलाच विरोध आहे. तिथं गाडं अडलं आहे. ट्रंप त्यावर गप्प आहेत.

ही कोंडी गेली कित्येक वर्षं आहे. ट्रंप यांनी ती कोंडी तशीच ठेवलीय. ७ ॲाक्टोबरच्या हल्ल्यानंतर इस्रायलनं सुरू केलेली लढाई थांबवावी यासाठी किमान तीन वेळा करार झाले. हमासने ओलीस सोडावेत, इस्रायलनं पकडलेले पॅलेस्टिनी सोडावेत, युद्ध थांबवावं आणि नंतर व्यापक प्रश्नावर चर्चा करावी, असा प्रस्ताव तीन वेळा होता. तिन्ही वेळा हमास आणि इस्रायलनं तो काही तरी सबबी काढून नाकारला. अगदी तोच प्रस्ताव ट्रंप यांनी हमास, नेतान्याहूंच्या गळी उतरवलाय.

हे कसं घडलं?

ट्रंप ढोलावर थाप मारून म्हणाले आहेत की, मी संबंधितांना धमकी दिली. इस्रायलला ट्रंप यांनी सांगितलंय की, मान्य केलं नाहीत तर शस्त्रं आणि आर्थिक मदत बंद होईल, इस्रायली मालावर जबर जकात लावली जाईल. अरब देशांनाही तीच धमकी होती. ट्रंप यांनी धमकीचा एक फॅार्म तयार केलाय. मायन्यात देशाचं नाव बदलतात आणि जकातीचा आकडा बदलतात, फॅार्म पाठवून देतात. आताशा ट्रंप यांनाही लक्ष द्यावं लागत नाही, हाताखालची माणसं परस्पर फॅार्म पाठवतात इतकं रूटीन झालं असणार. अरब आणि ज्यू बळी पडले. रशिया, चीन, कॅनडा, ब्राझिल हे देश बळी पडले नाहीत. गाझातली लढाई तात्पुरती तरी थांबली, युक्रेन लढाई थांबली नाही.

सात युद्धं संपवली असं ट्रंप म्हणतात. कुठली सात युद्धं? टोटल लागत नाही. कांगोतलं युद्ध उदाहरणादाखल घ्या. युद्धात गुंतलेल्या दोन देशांच्या नेत्यांना ट्रंप यांनी व्हाईट हाऊसमधे बोलावलं. कॅमेऱ्यासमोर उभं केलं. सह्या करायला लावल्या. कांगो नकाशावर कुठं आहे तेही ट्रंप यांना माहीत असेल की नाही याबद्दल शंका आहे. कांगोत लढाई सुरूच आहे. नोबेल मिळावं यासाठी ट्रंप युद्धग्रस्त देशाच्या लोकांना बोलावतात, सह्यांचा देखावा मांडतात.

जगाला समजलंय की, डोनल्ड ट्रंप हा एक पर्वतावरचा निखळलेला दगड आहे. तो घरंगळत सुटलेला आहे. त्याला कोणी थांबवू शकत नाही. आपण त्या दगडाच्या वाटेतून दूर रहाणं यातच शहाणपण आहे. कधी तरी तो दगड कुठे तरी जाऊन आपटेल-थांबेल. त्या क्षणाची वाट पहात जग थांबलंय.

कीर स्टार्मर हा ब्रिटीश (बनिया) सतत ट्रंप यांची खुशामत करत फिरतो. खुशामतीला पैसै लागत नाहीत, फक्त विशेषणं हवी असतात. गाझा करारावर सह्या होत असताना हे महाराज तिथे पोचले. त्यांच्या मागोमाग मॅक्रॅान. ट्रंप यांना एवढं लोणी लावलं की ट्रंप आता टॅामहॅाक क्षेपणास्त्रं युक्रेनला द्यायला तयार झालेत. ही अस्त्रं खूप दूरवर, रशियात खोलवर, मारा करू शकतील. या चालीमुळ युक्रेन युद्ध अधिक तीव्र होईल, दीर्घ काळ चालेल.

अगदी कालचीच गोष्ट. ट्रंप विमानात पत्रकारांशी बोलत होते. जकातीचं शस्त्रं आपण कसं वापरतो त्याचं वर्णन करत होते. त्यांनी सांगून टाकलं की 'भारताला, पाकिस्तानला, आपण सांगितलं की बऱ्या बोलानं लढाई थांबवा नाही तर आर्थिक दणक्याला (जकातीला) तोंड द्यायला तयार रहा. पहा, त्यांनी कसं युद्ध थांबवलं!'

निसटलेला हा दगड आता इराणच्या दिशेने निघालाय. आता इराणवर तोडगा काढणार म्हणताहेच. त्याआधी दोनच दिवसांपूर्वी इराणशी वाटाघाटी करण्याबद्दल ट्रंप यांनी ओबामा, बायडन यांच्यावर कडवट टीका केली होती.

.. तर इस्रायल-पॅलेस्टाइनच्या शांतता वाटाघाटींचंही पुढे काय होतं बघायचं. ढोल वाजले, सनया वाजल्या. कलाकारांना बिदागी मिळाली. त्यांचं काम झालं. मांडव रिकामा झाला, वऱ्हाडी परतले. जबरदस्ती करून बोहल्यावर चढलेले नवरा नवरी काय करतात ते पुढल्या काही दिवसात दिसेल.

निळू दामले | 9820971567 | damlenilkanth@gmail.com

निळू दामले हे जगभरातील विविध विषयांवर अभ्यासपूर्ण आणि सहज शैलीत लिखाण करणारे ज्येष्ठ पत्रकार आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results