आम्ही कोण?
आडवा छेद 

गाझाचा कोंडवाडा

  • निळू दामले
  • 11.08.25
  • वाचनवेळ 5 मि.
gaza nilu damle

इस्रायलनं गाझा शहर पूर्णपणे ताब्यात घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शहराचा तीन चतुर्थांश भाग इस्रायलनं आधीच नष्ट केला आहे.

इस्रायल पॅलेस्टाईन नष्ट करत आहे. परंतु पॅलेस्टाईन हा इस्रायलबरोबरच नांदणारा एक सार्वभौम देश निर्माण करावा असा युनोचा ठराव आहे; १४० देशांनी पॅलेस्टाईन हे सार्वभौम राष्ट्र निर्माण करावं असं म्हटलेलं आहे. तरीही इस्रायल जगाला धुडकावत आहे.

गाझा शहर ताब्यात घेऊन इस्रायलला पाच उद्दिष्टं साध्य करायची आहेत. हमास निःशस्त्र करणं, हमासनं पकडलले ओलीस सोडवणं, गाझा निर्लष्कर करणं, गाझावर इस्रायल सुरक्षित करणारी नियंत्रणं स्थापित करणं, गाझावर एक स्वतंत्र व्यवस्थापन बसवणं ज्यात हमास किंवा पॅलेस्टाईन ऑथॉरिटीही नसेल.

ही पाच उद्दीष्टं पार पडली की गाझामधे ऑक्टोबर २०२३ पासून सुरु केलेलं युद्ध संपेल असं इस्रायलचं म्हणणं आहे. गाझा पूर्णपणे इस्रायलच्या सेनेनं वेढलेलं असेल आणि गाझातला कारभार इस्रायलच्या मर्जीनुसार चालेल हा गाझातल्या कारवाईचा परिणाम असेल. सुरवातीला गाझात इस्रायलचे हजारो सैनिक तळ ठोकतील. उद्दिष्टं पार पडली की इस्रायलची सेना गाझाच्या बाहेर पडेल.

gaza nilu damle

ओलीस सोडवणं हे वरील मोहिमेतलं एक कलम आहे. इस्रायलची वरील मोहिम जाहीर झाल्यावर हमासनं म्हटलंय की इस्रायल अशा रीतीनं गाझाचा ताबा घेणार असेल तर ओलीसांची सुटका विसरा. अजून वीसेक ओलीस शिल्लक आहेत. एका ओलिसाचे फोटो आणि व्हिडियो काही दिवसांपूर्वी हमासनं माध्यमांत ठेवले आहेत. इस्रायली ओलीसाचा हाडाचा सांगाडा उरला आहे. त्याला अत्यंत मर्यादित, अपुरं आणि आरोग्याला आवश्यक असलेल्या गोष्टींचा अभाव असलेलं खाणं दिलं जातं. हा क्रूरपणा आहे. तुम्ही गाझातल्या हजारो माणसांना जसं वागवत आहात तसंच आम्ही इस्रायली ओलिसाला वागवत आहोत असं हमासनं म्हटलंय.

हमासनं सुरवातीला २५० आणि आता २० माणसं ओलीस ठेवलीत. इस्रायलनं २५ लाख पॅलेस्टिनी ओलीस ठेवलेत. हमासनं १२० ओलीस आणि १५०० इस्रायली माणसं मारली. इस्रायलनं ६० हजार पॅलेस्टिनी मारलेत आणि २५ लाख ओलीस ठेवलेत.

क्रौर्याची स्पर्धा लागलीय

हमासनं भूमिगत बोगदे खणून माणसं अशा रीतीनं लपवलीत की सर्व पाशवी शक्ती पणाला लावूनही इस्रायलला ती अजूनही सोडवता येत नाहीयेत. दुसरी अशीही एक ॲबसर्ड शक्यता आहे की इस्रायलला ओलीस सोडवायची इच्छाच नाहीये. जोवर ओलीस सुटत नाहीत तोवर इस्रायलला लढाई करायचा परवाना मिळतो. ओलीस सुटत नाहीत तोवर इस्रायली जनतेचं ब्लॅक मेलिंग करून नेतान्याहू सत्ता ताब्यात ठेवू शकतात. गोळाबेरीज अशी की ओलिस सुटणं लांबणार आणि इस्रायलला पॅलेस्टाईन उध्वस्थ करण्याची आणि माणसं मारण्याची मोहीम चालवता येणार. ओलीस ओलीस रहाणार आणि युद्ध सुरु रहाणार.

नीचपणाचा कळस झालाय

२००६ साली गाझात निवडणुका झाल्या होत्या, हमास त्या निवडणुकीत निवडून आलं होतं. २००५ सालापर्यंत गाझावर इस्रायलचा ताबा होता, गाझात इस्रायलचं सैन्य होतं, गाझाला चारही बाजूनी वेढा होता. इस्रायलचं ताजं धोरण गाझाची परिस्थिती २००५ सालात नेऊन ठेवणारं आहे. २००६ साली इस्रायलचा प्रयत्न होता की गाझाचा कारभार इस्रायल समर्थकांच्या हाती जावा. इस्रायलनं पैसे पेरून, लाचबाजी करून, दमदाटी करून काही पॅलेस्टिनी गोळा करून त्यांना व्यवस्थापनात बसवण्याचा प्रयत्न केला होता. एके काळी अगदी हाच प्रयत्न पाकिस्तानच्या अय्युब खान आणि याह्याखान यांनी केला होता. गायडेड डेमॉक्रसी असं त्या प्रयोगाचं नाव होतं. पूर्व आणि पश्चिम पाकिस्तानात लष्करी प्रशासकाच्या मर्जीतल्या हस्तकांचे राजकीय पक्ष तयार करायचे आणि त्यांनी राज्य करायचं. पण ते फुस्स झालं, पूर्व पाकिस्तान फुटला, बांगलादेश तयार झाला.

gaza nilu damle

तसंच २००६ नंतर इस्रायलच्या हडेलहप्पीला प्रत्युत्तर देण्यासाठी हमास तयार झालं, हमासनं बंडं केली, पुढं हमास अधिकाधिक हिंसक होत गेलं आणि शेवटी ७ ऑक्टोबरची घटना घडली. नेमकी तीच पुनरावृत्ती इस्रायलला करायची आहे काय? नव्या धोरणानुसार गाझावर इस्रायल ताबा बसवून दादागिरी सुरु करेल आणि गाझात प्रतिकार सुरु होईल. हे अटळ आहे. लाखभर माणसं मारली, लाखो निर्वासित केले हा दाहक अनुभव पॅलेस्टिनी कसा विसरतील? इस्रायल जुन्या जखमा नाहिशा करणं तर सोडाच, नव्या जखमा करत सुटलंय.

जी कोणी पॅलेस्टिनी माणसं गाझात उरतील त्यांचे निर्णय इस्रायलनं का घ्यावेत? इस्रायलच्या मर्जीतलं सरकार तिथं कां असावं? यालाच ऑक्युपेशन असा शब्द वापरला जातो. वसाहती अशाच रीतीनं तयार झाल्या होत्या आणि कालांतरानं वसाहतींनी बंड करून स्वातंत्र्य मिळवलं होतं.

गाझा हा एक घेट्टो इस्रायलला करायचा आहे. हिटलरनं ज्युंचं जे केलं ते नेतान्याहू पॅलेस्टिनींचं करत आहे.

इस्रायलचं हे धोरण आंतरराष्ट्रीय कायदा,संकेत यांना धरून नाही. ते क्रूर आहे, ते अमानवी आहे. अमेरिका सोडता कोणीही या धोरणाचा पुरस्कार केलेला नाही. अमेरिकेच्या दादागिरीपुढं जगानं मान तुकवलीय, देश मुळमुळीत ठराव करत आहेत.

फ्रान्स, ब्रीटन, जर्मनी, ऑस्ट्रेलिया इत्यादी देशांनी पॅलेस्टाईन या देशाला मान्यता देणार असं जाहीर केलं आहे. याचा अर्थ ते देश गाझामधे त्यांचे दूतावास उघडतील. हे दूतावास स्वतंत्र देशात असतील की घेट्टोत असतील याचा निर्णय त्या देशांना घ्यायचा आहे.

७ ऑक्टोबरला हमासनं केलेल्या हल्ल्याला इस्रायलच्या क्रौर्याची कितीही सबब असली तरी तो हल्ला क्रूरच होता. त्यानंतर इस्रायलचं पॅलेस्टाईनवर चालवलेला नरसंहार किती तरी पटीनं जास्त क्रूर आहे त्याला ७ ऑक्टोबरची सबब असली तरीही.

नेतान्याहू या माणसाची सत्तेची हपापा आणि डोनल्ड ट्रंप या एका लहरी माकडवाण्या माणसाचा पाठिंबा हे पॅलेस्टाईनमधील हिंसाचार घडवणारे मुख्य घटक आहेत. दोन्ही देशांतल्या जनतेनंच आता यातून मार्ग काढायला हवा.

Key highlights :

Israel's military operation in Gaza is facing international criticism.

Sparked by the October 7th Hamas attack, the conflict has resulted in a significant loss of life on both sides.

Israel's strategy of occupying Gaza and establishing a puppet government is a historical injustice, say critics.

The article highlights the role of political ambition and a lack of international consensus about the Palestine issue.

निळू दामले | 9820971567 | damlenilkanth@gmail.com

निळू दामले हे जगभरातील विविध विषयांवर अभ्यासपूर्ण आणि सहज शैलीत लिखाण करणारे ज्येष्ठ पत्रकार आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 1

बबन ठोके16.08.25
लेख छान आहे. अजून आपण हे लक्षात घ्यायला हवं की, इस्त्रायल गाझामध्ये नरसंहार घडवून आणत असताना जगभरातील नागरिक आणि प्रगतिशील कार्यकर्ते रस्त्यावर उतरून त्याचा तीव्र विरोध करत आहेत. परंतु भारतात मात्र जायनवादी इस्त्रायलशी जवळीक असलेल्या हिंदुत्ववादी भाजप सरकारने अशी परिस्थिती निर्माण केली आहे की, या विरोधात साधी नागरिकांची निदर्शने देखील होऊ दिली जात नाहीत. या विषयावर आवाज उठवणं सरकारला अजिबात खपवून घेत नाही. जर कुणी असं धाडस केलं तर त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल केले जातात, तपास यंत्रणांना ससेमिरा पाठी लावून निर्घृण दमन केलं जातं, हे फासिस्ट भाजपचे ठरलेले धोरण आहे. खरं तर, स्वातंत्र्यानंतर भारताचं अधिकृत परराष्ट्र धोरण नेहमीच पॅलेस्टाईनच्या बाजूने राहिलं आहे. पण भाजप सत्तेत आल्यानंतर जायनवाद आणि हिंदुत्व यांच्यातील जवळीक प्रचंड वाढली. केवळ आंतरराष्ट्रीय व्यापारापुरतीच नव्हे, तर गुप्त आणि अनधिकृत संबंधांची जाळीही तयार झाली. उदा, पेगासिससारखे हेरगिरी सॉफ्टवेअर इस्त्रायल कडून बेकायदेशीररीत्या घेऊन देशातील हिंदुत्वविरोधक, राजकीय विरोधक आणि कार्यकर्त्यांवर पाळत ठेवणे, त्यांच्या मोबाईलमध्ये खोटे पुरावे बसवणे, आणि त्यानंतर तपास यंत्रणांचा गैरवापर करून त्यांच्यावर कारवाई करणे. हे घृणास्पद प्रकार उघडपणे घडले आहेत. अनेक विरोधकांना वर्षानुवर्ष तुरुंगात डांबून ठेवणं हीच यंत्रणा पद्धतशीरपणे वापरली जात आहे. जायनवादी नेतन्याहूसोबत साटेलोटे करून भाजपने भारताची स्वाभिमानी आणि ऐतिहासिक परराष्ट्र भूमिका कलंकित केली आहे. हे लक्षात ठेवायला हवं की आपणही कधीकाळी वसाहतीच्या दीर्घ गुलामीत होतो, आणि आज तीच परिस्थिती पॅलेस्टाईन भोगत आहे. त्यामुळे आपली जबाबदारी आहे की, एकविसाव्या शतकातील या घृणास्पद मानवी नरसंहाराविरोधात आपण केवळ आंतरराष्ट्रीय पातळीवरच नव्हे तर देशांतर्गत पातळीवरही ठाम आणि उघड भूमिका घ्यावी. आपलं धोरण स्पष्ट असावं ज्यात नरसंहाराच्या विरोधात बोलण्याचा, लिहिण्याचा आणि उघडपणे विरोध करण्याचा नागरिकांचा लोकशाही अधिकार जपला जाईल. मात्र भाजप आणि संघाची सर्व प्रचारयंत्रणा मुस्लिमविरोधी विचारधारा आणि जायनवादाशी असलेल्या वैचारिक साधर्म्य व सत्ता-हितसंबंधांमधून अधिकृत व्यापारिक संबंध तर वाढवतच आहे, शिवाय गुप्त करार आणि पेगासिससारख्या साधनांचा वापर करून आपल्या देशातील नागरिकांच्या लोकशाही अधिकारांवर थेट हल्ला करत आहे. हा अधिकार हिरावून घेण्यासाठी ते पद्धतशीरपणे काम करत आहेत.

Select search criteria first for better results