गावातला एक भिकारी मेला. एकाच जागेवर, एकाच झाडाखाली ३० वर्षं तो भीक मागत होता. एक दिवस तिथेच मरून पडला. लोक जमा झाले. ‘अरेरे, बिचारा तीस वर्षं भीक मागत मागत अखेर मेला.' असं म्हणत लोक उभे होते. त्या जागेवर, त्या झाडाखाली, भिकाऱ्याने बरंच भंगार जमा केलं होतं. “अरे ते सामान फेका, आणि जागाही स्वच्छ करा.” नगर अधिकाऱ्याने आदेश दिला. पुढे म्हणाला, “आणि हो ती जागा स्वच्छ करताना, जमीन थोडी उकरून घ्या, तीस वर्षं तिथेच बसायचा तो”
माणसं आली. खराटा, कुदळ-फावडी वाजू लागली. स्वच्छता सुरू झाली आणि काय आश्चर्य! जमीन थोडी उकरताच तिथे सोन्याची नाणी असलेला हंडा सापडला. लोक चकित होऊन हसायला लागले. काय दुर्दैवी खेळ होता. तीस वर्षं जिथे बसून त्याने भीक मागितली, तिथेच अवघ्या दोन फूट खाली सोन्याच्या नाण्यांचा हंडा होता. तेवढ्यात गर्दीमधला एक फकीर, लोकांकडे हात करत मोठ्याने हसत सुटला. फकिराचं डोकं सटकलं, की काय अशा नजरेनं गर्दी त्यांच्याकडे बघायला लागली. मोठ्या आवाजात फकीर म्हणाला, “मूर्खांनो, त्या भिकाऱ्याला हसता; पण तुम्ही काय वेगळे आहात? तुमच्या मनात आनंदाचा खजिना भरला आहे. पण तुम्हाला ठाऊक नाही! सोन्याच्या नाण्यांच्या हंड्यावर बसून तो अन्नाची भीक मागायचा, तर तुम्ही मनातील संपत्तीवर बसून आनंदाची भीक मागत जगता..''
मुकुंद कुलकर्णी | mukund59@gmail.com
मुकुंद कुलकर्णी हे प्रदीर्घ पत्रकारी अनुभव असलेले माजी संपादक आहेत. मध्य भारतातील आदिवासी समाजाचे आणि त्यांच्या प्रश्नांचे ते अभ्यासक आहेत. शिवाय ईशान्य भारतातील समाज, तसंच विविध धर्म आणि त्यांचं तत्त्वज्ञान हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहे.