आम्ही कोण?
आडवा छेद 

दर सहावी व्यक्ती एकटेपणाची शिकार; दरवर्षी होतायत ९ लाख आत्महत्या

  • योगेश जगताप
  • 21.07.25
  • वाचनवेळ 4 मि.
loneliness in people

आज सोशल मीडिया क्रांतीमुळे जग जास्त कनेक्टेड झालंय असं आपल्याला वाटत असतं. पण एकटेपणाने ग्रस्त असलेल्या लोकांची आकडेवारी या समजाला आव्हान देताना दिसतेय. जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) ताज्या अहवालानुसार जगातील सहापैकी एक माणूस एकटेपणाशी झुंजत आहे. आश्चर्य म्हणजे यामध्ये गरीब देशांतील तरुणांची संख्या सर्वाधिक आहे. एकटेपणाला कंटाळून दरवर्षी ९ लाख लोक स्वतःचं जीवन संपवत असल्याची धक्कादायक माहितीही या अहवालातून समोर आली आहे.

१३ ते २९ वर्षं वयोगटातील जवळपास १७ ते २० टक्के तरुण सर्वाधिक एकटेपणा अनुभवत आहेत. गरीब देशांतील सुमारे २४ टक्के लोक एकटेपणाचा सामना करताहेत. मध्यम आणि श्रीमंत देशांतील गरीबांमध्ये एकटेपणाचं हेच प्रमाण ११ टक्के आहे. ‘वाढत्या डिजिटल कनेक्टीव्हिटीमुळे आपण सामाजिक आरोग्याकडे दुर्लक्ष करत चाललो आहोत आणि त्यातूनच हा एकटेपणा वाढत आहे. एकटेपणा म्हणजे कुणाची सोबत नसणं एवढचं नाही, तर मनात खोलवर तुटलेपणाची भावना सतत जाणवत राहणं. या भावनेमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत,’ असं WHOचे महासंचालक टेद्रोस अधानोम घेब्रासस यांनी हा अहवाल सादर करताना म्हटलं आहे.

आपल्यापैकी बहुतांश जण आयुष्यात कधी ना कधी एकटेपणाचा अनुभव घेत असतात. परंतु एखाद्याला सातत्याने एकटेपणा कवटाळत असेल तर ते धोकादायक आहे. त्याचे फक्त मानसिकच नव्हे, तर शारीरिक दुष्परिणामही जाणवतात. सामाजिक तुटलेपणाची भावना वाढल्याने लोकांमध्ये हृदयविकार, उच्च रक्तदाब, भीती, चिंता, नैराश्य या आरोग्यविषयक तक्रारी मोठ्या प्रमाणात दिसू लागल्या आहेत. एकटेपणामुळे लोकांच्या दैनंदिन कामावर परिणाम होत आहे. चांगलं आणि उत्पादक काम कमी होणं ही सामाजिक आरोग्याच्या आणि देशाच्या विकासाच्या दृष्टीनेही धोकादायक गोष्ट असल्याचं या अहवालात नोंदवलं आहे.

एकांत आवडणं आणि एकटेपणा या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. काही जणांना एकटं रहावसं वाटतं. लोकांमध्ये किंवा समाजात मिसळणं त्यांना आवडत नाही. याला सामाजिक अलिप्तता असं म्हणतात. ही अलिप्तता एकटेपणापेक्षा वेगळी आहे. या प्रकारातील व्यक्तीला एकटेपणा जाणवेलच असं नाही. अर्थात, दीर्घकाळ सामाजिकदृष्ट्या अलिप्त राहणाऱ्या लोकांनाही शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरं जावं लागू शकतं. १९९० ते २०२२ या काळात तीनपैकी एका व्यक्तीला सामाजिक अलिप्ततेमुळे अशा प्रकारचा त्रास झाला. तर २००३ ते २०१८ दरम्यान केल्या गेलेल्या किशोरवयीन मुलांच्या अभ्यासात हेच प्रमाण चारपैकी एक असल्याचं आढळून आलं.

एकटेपणाचा सामना कराव्या लागणाऱ्या गटांमध्ये पारलिंगी (LGBTQI+), धार्मिक आणि जातीय अल्पसंख्याक, निर्वासित किंवा स्थलांतरित यांचा समावेश होतो. अनेक ठिकाणी समाजमान्यता न मिळाल्याने, हेतुपुरस्सर भेदभावाची वागणूक मिळाल्याने या गटातील लोकांमध्ये एकटेपणाची भावना वाढीस लागते.

एकटेपणा आणि एकाकीपणाच्या वेगवेगळ्या कारणांचा शोध अहवालात घेण्यात आला आहे. यामध्ये ढासळलेलं आरोग्य, दुय्यम शिक्षण, सोशल मीडियाचा अतिवापर, स्थलांतर, गरिबी, व्यक्तिमत्वातील दोष, समाज किंवा परिस्थितीचा दोष, नोकरी गमवावी लागणे, प्रेमभंग, एखाद्या घटनेमुळे बसलेला तीव्र मानसिक धक्का अशा कारणांचा प्रामुख्याने समावेश होतो. या समस्येवर उपाय म्हणून सामाजिक संबंध सुधारण्याच्या वेगवेगळ्या पर्यायांचा अवलंब करायला हवं असं जागतिक आरोग्य संघटनेने सुचवलं आहे. यामध्ये अनुभवी लोकांचा गट तयार करणं, त्यांच्यामार्फत वेगवेगळ्या कृतीशील मोहिमा काढणं आणि यातून सामाजिक संबंधांचं नेटवर्क उभारणं गरजेचं असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे.

आजवर जगभरातील आठ देशांनी सामाजिक संबंध (Social Connection) या विषयाचा त्यांच्या राष्ट्रीय धोरणात समावेश केला आहे. यामध्ये अमेरिका, युके, जपान, जर्मनी, स्वीडन, डेन्मार्क, फिनलँड आणि नेदरलँड्स या देशांचा समावेश होतो. या धोरणामध्ये एकटेपणा आणि एकाकीपणा या विषयावर जनजागृती मोहीम राबवणं, त्याविषयी असलेली भीती आणि लाज कमी करणं, त्याविषयी संशोधन करणं आणि प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या लोकांना सोबत घेऊन अधिक चांगली धोरणनिर्मिती करणं या गोष्टी केल्या जात आहेत. या धोरणांची अंमलबजावणी करण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती, पुरेसा निधी याबरोबरच सरकार आणि समाजातील वेगवेगळ्या घटकांमध्ये समन्वय असणं गरजेचं आहे. आठ देशांनी सुरू केलेल्या धोरण अभ्यासातून सामाजिक संबंध सुधारण्याचे वेगवेगळे पर्याय समोर येतील. इतर देशांनाही ते मार्गदर्शक ठरतील असा विश्वास जागतिक आरोग्य संघटनेला वाटतो.

बगीचे, जॉगिंग ट्रॅक, निवांत बसण्यासाठी आणि मनमोकळ्या गप्पा मारण्यासाठी जागा, मैदानं अशा सामाजिक पायाभूत सुविधा बळकट झाल्या तर लोकांमधील एकटेपणा घालवण्यास आणि त्यायोगे सामाजिक संबंध सुधारण्यास मदत होईल. गरीब आणि विकसनशील देशांमध्ये हे पर्याय लागू करण्यासाठी अधिक संशोधनाची गरज लागेल, असं जागतिक आरोग्य संघटनेला वाटतं. याशिवाय कॉग्निटीव्ह बिहेवियरल थेरपी, माइंडफुलनेस प्रोग्रॅम आणि सोशल स्किल्स ट्रेनिंग हे मानसोपचारही एकटेपणावर प्रभावी ठरताना दिसतायत.

योगेश जगताप | 9561190500 | yogeshjagtap8819@gmail.com







प्रतिक्रिया लिहा...

Select search criteria first for better results