
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने आर्थिक नाड्या आवळण्यासाठी पाकिस्तानसोबतचा व्यापार पूर्ण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. भारताकडून पाकिस्तानला निर्यात होणाऱ्या उत्पादनांचं प्रमाण आणि त्याची एकूण उलाढाल आयातीपेक्षा बरीच जास्त असल्यामुळे या निर्णयाचा प्रामुख्याने पाकिस्तानला मोठा फटका बसू शकतो. पाकिस्तानमध्ये या वस्तूंच्या किंमती वाढतील. पण हे नुकसान एकतर्फी नसेल, तर हा व्यापार बुडाल्याने भारतालाही आर्थिक फटका बसेल, असा अंदाज वर्तवला जातो आहे. पाकिस्तान (आणि भारतही) गरजेच्या वस्तू अरब देशांमार्फत चढ्या भावाने खरेदी करेल, अशी अटकळ आहे.
२०१९ मध्ये पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतरच भारत आणि पाकिस्तानमधील औपचारिक व्यापार जवळपास थांबला होता. दोन्ही देशांनी एकमेकांचा 'एमएफएन' (मोस्ट फेवर्ड नेशन) दर्जाही काढून घेतला होता. मात्र तरीही काही अत्यावश्यक घटकांची आयात–निर्यात सुरू होती. त्यावर भारताने उच्च आयात शुल्क (२०० टक्के) लादलं होतं. हा व्यापार अटारी-वाघा भूबंदरातून सुरू होता. आता तो व्यापारही थांबवण्यात आला आहे.
व्यापाराचं स्वरूप
• भारत-पाकिस्तानमध्ये प्रामुख्याने मुख्य अटारी-वाघा सीमा, मुंबई-कराची सागरी मार्ग आणि हवाई मालवाहतूक अशा तीन मार्गाने व्यापार करण्यात येत होता.
• २०१८-१९ मध्ये भारत-पाकिस्तान व्यापार ४३७०.७८ कोटी रुपये होता. २०२२-२३ मध्ये तो २२५७.५५ कोटी रुपयांवर घसरला. मात्र, २०२३-२४ मध्ये हा व्यापार पुन्हा ३८८६.५३ कोटींवर पोहचला होता. गेल्या पाच वर्षांतील हा सर्वाधिक व्यापार होता.
• भारताकडून पाकिस्तानमध्ये सोयाबीन, पोल्ट्री, भाज्या, लाल मिरची, रसायनं, औषधं, कापूस, चहा, कॉफी, कांदे, टोमॅटो, साखर इत्यादी शेतमालाची निर्यात केली जात होती.
• पाकिस्तानकडून भारतात प्रामुख्याने हिमालयीन गुलाबी मीठ, खजूर, जर्दाळू, बदाम, फळे, सुका मेवा, तेलबिया आणि औषधी वनस्पती इत्यादी शेतमालाची आयात होत होती.
• बिगर कृषी क्षेत्रात भारताकडून पाकिस्तानात प्लास्टिक मणी, प्लास्टिक धागे, ऑटोमोबाईलचे विविध सुटे भाग, लोखंड, स्टील, रंग, पेट्रोलियम उत्पादनं इत्यादीची निर्यात होते.
• पाकिस्तानकडून चष्म्यांसाठी वापरल्या जाणाऱ्या ऑप्टिकल लेन्स, काचेचा काही कच्चा माल, हस्तनिर्मित चामड्याच्या वस्तू, पारंपरिक कपडे, विशेष भरतकाम केलेलं कापड आणि दुपट्टे इत्यादींची आयात केली जात होती. सीमावर्ती परिसरात सिमेंट, दगड आणि चुनाही पाकिस्तानमधून आयात होत होता.
• पण एकूणच भारतातून पाकिस्तानला निर्यात होणाऱ्या कृषी आणि बिगर कृषी अशा दोन्ही घटकांचं प्रमाण जास्त असून, त्यामानाने आयात अत्यल्प आहे.
• भारतीय भू-बंदर प्राधिकरणाच्या अहवालानुसार, २०२३-२४ साली अटारी- वाघा सीमेवरून ३,८८६.५३ कोटी रुपयांचा व्यापार झाला, ज्यामध्ये ६,८७१ ट्रकची वाहतूक आणि ७१,५६३ प्रवाशांची वाहतूक समाविष्ट होती.
• चालू आर्थिक वर्षात (एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२५), पाकिस्तानसोबत व्यापार बंदी असूनही भारताने ४४७.७ दशलक्ष डॉलर्स (सुमारे ३,७२० कोटी रुपये) किंमतीच्या वस्तूंची निर्यात केली. त्यात प्रामुख्य़ाने औषधांचा समावेश आहे.
पर्याय काय आहेत?
• पाकिस्तान अनौपचारिक मार्गाने संयुक्त अरब अमिराती आणि सिंगापूर मार्गे भारतीय घटकांची आयात करू शकतो. विशेषतः औषधं आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील उत्पादनांसाठी त्यांना चढ्या भावाने खरेदी करावी लागू शकते.
• भारतालाही इतर देशांकडून अप्रत्यक्षरीत्या पाकिस्तानी वस्तूंची आयात करावी लागेल. त्यामुळे दोन्ही देशांना मध्यस्थ म्हणून अरब देशांकडे वळावं लागणार आहे.
दोन्ही देशांवर परिणाम
• २०२४ सालच्या आकडेवारीनुसार भारताच्या एकूण विदेशी व्यापारात पाकिस्तानचा वाटा केवळ ८०.५३ कोटी (०.०६ टक्के) होता. मात्र, भारतातून पाकिस्तानमध्ये ३,७२० कोटी निर्यात झाली. ही पाकिस्तानसाठी मोठी निर्यात आहे.
• त्यापैकी काही निर्यात अरब देशांमार्फत सुरू राहिली तरी भारतालाही त्याचा काही प्रमाणात आर्थिक फटका बसेल, अशी शक्यता आहेच.
• भारताच्या व्यापार बंदी निर्णयाला प्रत्त्युत्तर म्हणून पाकिस्तानने आपली हवाई हद्द भारतीय विमानांसाठी बंद केल्याचं जाहीर केलं. भारताच्या विमान वाहतुकीला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. भारतातून पश्चिम आशिया, युरोप, उत्तर अमेरिका येथे जाणाऱ्या विमानांना पाकिस्तानला वळसा घालून जावं लागेल. त्यामुळे इंधनखर्च आणि प्रवासवेळही वाढणार आहे.
अमृतसर शहरापासून अटारी–वाघा सीमा केवळ २८ किमी आहे. या सीमेवरील व्यापार थांबल्याने पंजाबमधील अमृतसर आणि आसपासच्या ५० गावांच्या अर्थकारणावर परिणाम होऊ शकतो. या गावांमध्ये वाहतूक, हमाली, छोटे दुकानदार आणि संबंधित उद्योगांमधील प्रत्यक्ष–अप्रत्यक्ष ५ ते ७ हजार लोक या व्यापारावर अवलंबून आहेत. तसंच पाकिस्तानातीलही अनेक गावांमध्ये लोकांचा रोजगार बुडेल अशी शक्यता आहे.
अफगाणिस्तानातील सुका मेवा, लसूण आणि इतर काही घटक पाकिस्तानमार्गे भारतात येतात. त्यावरही पाकिस्तानने बंदी घातली आहे. त्यामुळे भारत– अफगाणिस्तान व्यापारावरही त्याचा परिणाम होऊ शकतो. ही आयात भारताला समुद्री मार्गाने करावी लागू शकते. त्यामुळे या वस्तूंच्या किंमती वाढू शकतात.
भारताची अर्थव्यवस्था पाकिस्तानच्या तुलनेत प्रचंड मोठी आणि वैविध्यपूर्ण असल्यामुळे नुकसान मर्यादित आणि तात्पुरतं असेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे. मात्र पाकिस्तानमधील आर्थिक मंदीत या व्यापारबंदीमुळे होणाऱ्या महागाईची भर पडली तर त्याचा दीर्घकालीन आर्थिक आणि राजकीय परिणाम होऊ शकतो, असं म्हटलं जात आहे.
सोमिनाथ घोळवे | 9881988362 | sominath.gholwe@gmail.com
सोमिनाथ घोळवे हे ग्रामीण समाज व्यवस्थेचे अभ्यासक आहेत.