आम्ही कोण?
आडवा छेद 

वस्त्रोद्योगासाठी कापूस उत्पादक शेतकरी वाऱ्यावर?

  • सोमिनाथ घोळवे
  • 25.08.25
  • वाचनवेळ 5 मि.
cotton import

एकापाठोपाठ घडलेल्या घटना पाहा.

एक. गेल्या काही वर्षांत योग्य भाव मिळत नसल्याने देशांतर्गत कापूस उत्पादन कमी होत आहे.

दोन. त्यामुळे केंद्र सरकार परदेशातून कापूस आयात करत आहे.

तीन. या आयात कापसावर सरकारने ११ टक्के सीमाशुल्क लावलेला होता, जेणेकरून आयातीवर मर्यादा राहील

चार. मात्र भारतातील कापड उद्योगाचं म्हणणं होतं की देशातला वस्रोद्योग वाचवण्यासाठी सरकारने सीमाशुल्क रद्द करावं.

पाच. सरकारने ही मागणी मान्य केली आणि तसा निर्णय घेतला.

‘देशातील शेतकरी हितासाठी कोणतीही किंमत मोजायला तयार आहे; पण कुठलीही तडजोड करणार नाही’ असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते. पण या घटनाक्रमामुळे जे शेतकरीहित मोदी करू पाहत होते त्याबद्दल शेतकऱ्यांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

हा निर्णय सरकारने का घेतला?

भारताच्या एकूण कापड निर्यातीमधलं तब्बल ३५ टक्के कापड अमेरिकेला निर्यात होतं. त्यामुळे ट्रम्प यांनी लादलेल्या ५० टक्के टॅरिफचा परिणाम कापड उद्योग आणि कापड निर्यात या दोन्हींवर होणार आहे. हा परिणाम टाळण्यासाठी भारतातील वस्त्र उद्योगांकडून कापसावरील आयात शुल्क हटवण्याची मागणी होत होती. या मागणीला प्रतिसाद म्हणून केंद्र सरकारने आयात होणाऱ्या कापसावरचं ११ टक्के सीमाशुल्क रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.

मुळात भारताला कापसाची आयात का करावी लागते?

देशात कापूस उत्पादक राज्यांमध्ये गुजरात प्रथम तर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. याशिवाय आंध्र प्रदेश, पंजाब, राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेश, कर्नाटक या राज्यांतही कापसाचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. मात्र कोरोना काळापासून कापसाचे भाव सातत्याने घसरत आहेत. त्यामुळे कापसाची लागवड कमी झाली आहे. चालू वर्षी कापसाखालील लागवड क्षेत्र सुमारे ३ टक्क्याने घसरलं आहे, तर कापसाचं उत्पादन ३९० लाख गाठींवरून ३०० लाख गाठींवर आलं आहे. कापूस उत्पादनाची अशी घसरण गेल्या दहा वर्षांपासून चालू आहे. त्यामुळे कापसाचा प्रमुख निर्यातदार देश अशी भारताची असलेली ओळख आता पुसली जाऊन भारत आयातदार बनला आहे. त्याला परदेशातून कापूस विकत घ्यावा लागत आहे.

बाहेरून येणाऱ्या या कापसावर सीमा शुल्क लावून भारतातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं हित जपण्याचा प्रयत्न आजवर सरकारकडून केला जात होता. पण आता ते सीमाशुल्क ४० दिवसांसाठी रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे भारतीय वस्त्रोद्योग क्षेत्राला दिलासा मिळणार आहे. मात्र त्याचवेळी भारतीय कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.

कसा?

सरकारने निर्णय जाहीर केल्यानंतर दोन दिवसांमध्ये कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (सीसीआय) कापसाचे भाव प्रति गाठीमागे ११०० रुपयांनी कमी केले आहेत. बाजारातील भावदेखील प्रती क्विंटलमागे १५०० रुपयांनी कमी झाले आहेत. याशिवाय कापूस उद्योगासाठी लागणाऱ्या सुताचे भावही क्विंटलमागे २०० ते ३०० रुपये घसरले आहेत. याचा अर्थ वस्त्रोद्योगासाठी स्वस्त कापूस उपलब्ध होईल पण शेतकऱ्यांना त्यांच्या कापसाचा योग्य भाव मिळणार नाही.

याचं कारण सरळ आहे. येत्या काही दिवसांत विदेशातून आयात झालेला कापूस, व्यापारी वर्गाने साठवण केलेला कापूस आणि भारतीय शेतकऱ्यांकडचा कापूस असा सगळा कापूस एकाचवेळी बाजारात उपलब्ध होणार आहे. एवढा कापूस विक्रीसाठी बाजारात आला, की भाव पडणार हे नक्की. परिणामी शासनाने जाहीर केलेला हमीभावही (कापसाच्या आखूड धाग्याच्या ७७१७/- रुपये, तर लांब धाग्याच्या ८११०/- रुपये प्रति क्विंटल) मिळणार नाही, असं बहुतांश शेतकऱ्यांचं मत आहे.

टॅरिफच्या वादळात आम्ही शेतकऱ्यांचं नुकसान होऊ देणार नाही, असं सरकारने सांगितलेलं असलं, तरी वस्त्र उद्योगाचा प्रश्न सोडवण्याच्या नादात सरकारने आम्हाला संकटात ढकललं असल्याची भावना कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये निर्माण होत आहे.

निर्णयाला विरोध का?

आयात शुल्क रद्द करण्याच्या निर्णयाला देश पातळीवर कार्यरत असलेल्या संयुक्त किसान मोर्चाने (एसकेएम) विरोध केला आहे. ‘कापूस उत्पादन क्षेत्र हा भारतातील सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त प्रदेश आहे. त्यात कापसावरील आयात शुल्क रद्द केल्याने कापसाच्या देशांतर्गत किंमतीवर परिणाम होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसून लाखो शेतकऱ्यांना कर्जबाजारीपणाचा सामना करावा लागेल’, असं संयुक्त किसान मोर्चाने म्हटलं आहे.

“गेल्या सहा वर्षात कापसाची उच्चांकी आयात झाली आहे. वर आता कापड उद्योगाला शुल्क मुक्त आयातीची परवानगी दिल्यामुळे अतिरेकी आयात होण्याची भीती आहे. आयात भरपूर झाल्यास केंद्र सरकारने ठरवून दिलेला हमीभावही मिळणार नाही, हे उघड आहे. महाराष्ट्रात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये कापूस बाजारात येईल, तेव्हा कापसाचे दर पडलेले असतील”, अशी भीती कापूस प्रश्नांचे अभ्यासक, शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी व्यक्त केली.

यावर उपाय काय?

वस्त्रोद्योगाचं नुकसान टाळायचं आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना वाचवायचं असं दोन्ही साध्य करायचं असेल तर, शेतकऱ्यांचा कापूस बाजारात यायला सुरुवात झाली की शासनाने तत्काळ हमीभावाने कापूस खरेदी करणं हा एकच उपाय आहे, असं तज्ज्ञ सांगतात.

आज कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न निर्माण झालेला असला, तरी पुढे अशा सरकारी निर्णयांचा फटका इतर शेतकऱ्यांनाही बसू शकतो. सोयाबीन, इथेनॉल, मका आदी पिकांची अशीच आयात होत राहिली, तर शेतकऱ्यांनी केलेल्या गुंतवणुकीचा परतावा मिळणं कठीण होऊ शकतं. एकूणच ‘शेतकऱ्यांचं हित प्रथम’ असं सरकारचं म्हणणं असलं तरी निर्णय करताना मात्र त्याउलट भूमिका घेतली जात असेल तर शेतकऱ्यांचं कंबरडं मोडणार हे सांगण्याची गरज नाही.

Key highlights- India is currently importing cotton due to a decrease in domestic production and low prices. In response to pressure from the textile industry to eliminate import duties, the government has decided to take action that may negatively impact local cotton farmers by reducing prices further.

सोमिनाथ घोळवे | 9881988362 | sominath.gholwe@gmail.com

सोमिनाथ घोळवे हे ग्रामीण समाज व्यवस्थेचे अभ्यासक आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 8

सोमिनाथ घोळवे28.08.25
Shrinidhi Nadgauda यांनी त्यांच्या पोस्टमध्ये जूनपर्यंत त्यांनी (शेतकऱ्यांनी) त्यांचा कापूस खाजगी व्यापाऱ्यांना किंवा भारतीय कापूस महामंडळाला त्यांच्या आर्थिक निकडीमुळे किमान आधारभूत किमतीवर किंवा त्याहून अधिक किमतीत विकला असेल. म्हणून, कमी कालावधीसाठी म्हणजेच ३० सप्टेंबरपर्यंत आयात शुल्क कमी केल्याने वैयक्तिक शेतकऱ्यावर काहीही परिणाम होणार नाही कारण त्याच्याकडे कापूस शिल्लक नाही. असे एक मत नोंदवले आहे. हे मत अंदाजे माहितीवर आधारित आहे. मी अनेक कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भेटलो आहे. त्यांच्याशी चर्चा देखील केली आहे. शेतकऱ्यांनी सांगितलेल्या वास्तवानुसार गेल्या वर्षी msp पेक्षा एक हजाराने भाव कमी राहिला आहे. Msp ने विकण्यासाठी अटी आणि शर्ती खूप आहेत, शिवाय पैसे मिळण्यास किमान दोन महिन्याचा कालावधी लागतो. त्यामुळे शेतकरी कापूस विकण्यासाठी व्यापाऱ्यांना प्राधान्य देतात. दुसरे, गेल्या वर्षी कापसाला बाजारभाव मिळाला नाही म्हणून अनेक मध्यम आणि मोठ्या शेतकऱ्यांनी कापूस घरातच साठवण करून ठेवलेला आहे. ते बाजारभाव केव्हा वाढतोय याची वाट पहात आहेत.

संतोष कायंदे 28.08.25
कापसावरील आयात शुल्क माफ केल्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे विशेषतः कॉटन बेल्ट असलेल्या विदर्भातील शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि भारतीय वस्त्रोद्योग व कापूस उत्पादक शेतकरी या दोघांचेही नुकसान टाळण्यासाठी करावयाचे उपाय विशद करणारा सुंदर विश्लेषणात्मक लेख.👍

Shrinidhi Nadgauda27.08.25
The article has been written with an agenda of portraying anti-farmer image of current govt without having holistic view of cotton cultivation n textile industry. Just to clarify, We are at fag end of the cotton season. Generally, in India, cotton farmers sell their produce from November till March-April. By June they wud have already sold their cotton to private traders or Cotton corporation of India at or above MSP price depending on their economic urgency. So by reducing the import duty for shorter time ie till 30th September will not affect the individual farmer at all as he doesn’t have any cotton left with him. Also I doubt how many mills can take advantage of import duty waiver as the time period is too short to complete contracts and that too when there is no demand for cotton yarn/ fabric in International market. Every year during this period there is dearth of good quality long staple cotton as India is not able improve productivity of long staple cotton and thus we have a shortage of good quality of cotton. This affects the fabric quality and v need to import cotton from Egypt or USA to meet international quality standards. For some weird reasons, govt had applied import duty of 11% on cotton which has made high end cotton textile expensive thus losing competitiveness. Now that we hv lost a major market due to tariff war, we need to explore other markets and to penetrate these newer market we should be competitive and therefore our cotton prices should be at international level.

Tatyaji pawar 27.08.25
कापूस आयतीचा भारतीय कापूस शेतीवर व पर्यायाने कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या उत्पादनावर कसा दुष्परिणाम होत आहे. ही बाब समजून घेता आली. धन्यवाद

भारत मोहोळकर26.08.25
कापूस आयातीचे वेगवेगळे अँगल समजून घेता आले. Thank you sir

संज्योत राऊत26.08.25
तारापूर एमआयडीसी मधे टेक्सटाईल आणि फार्मास्युटीकल अशा दोन्ही कंपन्या आहेत. मात्र कर्मचाऱ्यांचा ओढा टेक्सटाईल कडे कमी आहे कारण तिथे पगार कमी मिळतो. पण टेक्सटाईल कंपन्या तिन्ही शिफ्टमधे चालतात. भिवंडीतील लूम उद्योगाची सपशेल वाताहात झाली आहे. बांगलादेशात टेक्सटाईल उद्योग चांगला चालला आहे. शेतकऱ्यांनी वस्त्रोद्योग स्वतःच्या पायावर चालवायला शिकले पाहिजे. भारतीय भांडवलदार त्यांच्यासाठी फायदेशीर नाही.

Mangesh 26.08.25
या घडामोडी भारतीय राज्यसंस्थेच्या स्वरूपाशी आणि वर्गीय शक्तींच्या बदलत्या संतुलनाशी संबंधित आहेत काय?

आशीष वेले 25.08.25
माहिती पूर्ण लेख

See More

Select search criteria first for better results