निवडणुकीच्या रणांगणात गेल्या काही वर्षांत रणनीतीकार नावाच्या पक्षबाह्य पात्राची भर पडली आहे. लोकांच्या मनात कोणते मुद्दे आहेत, ते कोणत्या भाषेत प्रचारात आणता येतील, त्यासाठी कोणत्या स्वरूपाचे कार्यक्रम करावे लागतील, उमेदवारांची निवड करताना कुठे काय धोरण ठरवावं लागेल, विजयासाठी कोणकोणते तिकडम करावे लागतील, वगैरे बाबी ठरवून देण्यात हे पात्र महत्त्वाचं ठरू लागलं आहे. या पात्रांतील सर्वांत प्रमुख आहे प्रशांत किशोर.
युनायटेड नेशन्समधील दहा वर्षांची नोकरी आटोपल्यावर प्रशांत किशोर यांनी २०१४ मध्ये नरेंद्र मोदींसाठी काम केलं. त्यानंतर ममता बॅनर्जींपासून अनेक नेत्यांच्या विजयामध्ये त्यांनी वाटा उचलला. त्यातून ते भारतातले सर्वांत मोठे निवडणूक रणनीतीकार म्हणून पुढे आले. आपण जर इतरांना निवडून आणू शकतो, तर आपणच आपला पक्ष काढून यशस्वी का होऊ नये, असा विचार त्याच्या मनात आला असणार. राजकारणात अनेकदा उद्योगपती आणि गुन्हेगार महत्त्वाची भूमिका पार पाडत असतात. बहुतेकवेळा हे गुप्तपणे चाललेलं असतं. मग कधी त्यांना वाटतं की पडद्याआड राहून हे उद्योग करण्याऐवजी आपणच पुढारी बनावं. तसंच प्रशांत किशोर अर्थात पीके यांना वाटलं की काय हे त्यांनाच माहीत!
पण त्यांनी जाहीर पत्रकार परिषदेत ‘आपण आता व्यूहनीती आखून देण्याचं काम थांबवणार आहोत आणि प्रत्यक्ष राजकीय कामात उतरणार आहोत' असं जाहीर करून टाकलं. पाठोपाठ त्यांनी जन सुराज अभियान नावाचं व्यासपीठ उभारलं. २०२२च्या २ ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या मुहूर्तावर त्यांनी बिहारमधील चंपारण येथील गांधी आश्रमातून पदयात्रेला सुरुवात केली. पुढे ६६५ दिवस म्हणजे तब्बल दोन वर्षं ते खेड्यापाड्यांतून चालत राहिले. या काळात त्यांनी अडीच हजारहून अधिक गावांमध्ये संचार केला. ३५०० किलोमीटर चालून बिहारच्या गाव-खेड्यांतली परिस्थिती समजून घेतली. बिहारची दुर्दशा का झाली याबद्दल लोकांशी संवाद साधला. या पदयात्रेची सांगता दोन वर्षांनी पाटण्यात एका जाहीर सभेत झाली. त्यात दोनेक लाख लोकांच्या साक्षीने त्यांनी स्वत:च्या पक्षाची स्थापना केली. आज तारखेला या पक्षाला ६० लाख संस्थापक सदस्य लाभले आहेत म्हणतात. शिवाय त्यांच्याकडे किमान दीडेक कोटी मतदारांचा डेटा जमा झालाय म्हणतात.
हेही वाचा - जगण्याचे प्रश्न ऐरणीवर; पण समीकरणं तेजीत जातींची
प्रशांत किशोर यांनी स्थापन केलेला जनसुराज हा पक्ष तुलनेने खूपच कमी काळात उभा राहिला आहे. पीकेंना ना कौटुंबिक राजकीय वारसा आहे, ना ते कोणत्या जुन्या-नव्या चळवळ किंवा आंदोलनाचे केजरीवाल-टाइप प्रॉडक्ट आहेत. त्यांनी गेल्या दहा वर्षांत नाना विचारांच्या पक्षांसाठी काम केलेलं आहे. त्यामुळे ते कोणत्या ठराविक विचारसरणीचे आहेत असंही नाही. पण राजकारणात उतरल्यानंतर त्यांनी महात्मा गांधींचा आदर्श आपल्यासमोर असल्याचं आवर्जून सांगायला सुरुवात केली आहे. सोबतच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नावही ते आदराने घेत असतात. गरिबी, विषमता, सामाजिक न्याय, जनकेंद्री विकास वगैरे मुद्दे ते आग्रहाने मांडत असतात. धार्मिक दुही, जातीय भेद याबद्दलही बोलतात. त्यामुळे रूढार्थाने ते मध्यममार्गी किंवा डावीकडे झुकलेले आहेत, असं मानलं जातं. पण त्यांच्या पक्षाचा नारा ‘सही लोग, सही सोच, और सामुहिक प्रयास' असा ढोबळ आहे. निवडणुकीनंतर त्यांना कोणते लोक सही वाटतील नि कोणती सोच सही आहे असं ते सांगतील याबद्दल आज ठोसपणे कुणी सांगू शकत नाही.
प्रशांत किशोर यांनी निवडणूक जाहीर होण्याअगोदरच प्रचाराचे तोफगोळे उडवायला सुरुवात केली होती. बिहारचं राजकारण दोन सक्षम आघाड्यांमध्ये विभागलेलं असल्यामुळे त्यात स्वत:ची जागा निर्माण करणं त्यांच्यासाठी मोठंच आव्हानात्मक होतं. त्यामुळे त्यांनी राजद आणि जदयू या दोन्ही पक्षांविरोधात जोरदार आघाडी उघडली. भ्रष्टाचार, घराणेशाही, मागासलेपणा या मुद्द्यांभोवती त्यांनी लालूप्रसाद-तेजस्वी, नीतीशकुमार-सम्राट चौधरी, मोदी-शहा यांवर टीकेची झोड उठवली. त्यांचं स्थानिक भाषेचा फ्लेवर असलेलं बोलणं, आक्रमक शैली, लोकांच्या मनातलं बोलण्याची कला, प्रसंगी मतदारांनाही आरसा दाखवण्याचं तंत्र, सोशल मीडियाचा प्रभावी वापर यांमुळे पाहता पाहता ते ‘टॉक ऑफ द स्टेट’ बनले. राज्याच्या मागासलेपणाला दोन प्रस्थापित आघाड्याच जबाबदार आहेत, ही गोष्ट त्यांनी प्रभावीपणे लोकांच्या गळी उतरवली. त्यातूनच आपण सत्तेचे दावेदार आहोत, ही बाब पुढे आणली. मधे तर ‘बिहारमधली मुख्य लढत रालोआ आणि जनसुराज मध्येच आहे,’ असंही विधान त्यांनी केलं. ते यशस्वी रणनीतीकार असल्याने व्यूहनीतीचा भाग म्हणूनच ते असं बोलू लागले असणार.
बिहारच्या निवडणुकीत कोणताही एक पक्ष सर्व २४३ जागांवर उभा नाही. सर्व पक्ष आघाड्यांमार्फत लढत आहेत. जनसुराज हा एकमेव अपवाद. आपण कोणत्याही पक्षासोबत युती करणार नाही, हे त्यांनी आधीच जाहीर करून टाकलं होतं. अन्य पक्षाबद्दलची नकारात्मक मतं आपल्याला चिकटू नयेत, याची ती खबरदारी होती. आपल्याबद्दल सकारात्मकता तयार व्हावी यासाठी त्यांनी अनेक नामवंत डॉक्टर्स, वकील, निवृत्त प्राध्यापक, पोलिस अधिकारी, गायक, नामवंत सामाजिक कार्यकर्ते वगैरेंना तिकिटं दिली. कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या लोकांचा मोठाच भरणा त्यांच्या उमेदवारांमध्ये आहे. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि नुकताच भारतरत्न पुरस्कार दिले गेलेले कर्पुरी ठाकूर यांच्या नातीलाही त्यांनी तिकिट दिलं. बिहारच्या गुन्हेगारीने बरबटलेल्या राजकारणाला आपण सभ्य पर्याय देतो आहे हे ठसवण्यासाठीच त्यांचा हा प्रयत्न होता.
हेही वाचा - बिहार : दोन आघाड्यांतील दोन लक्षवेधी पक्ष
एकीकडे गरिबी, विषमता, मागासलेपणाची चर्चा आणि दुसरीकडे सभ्य उमेदवारांचा पर्याय यांमार्फत ग्रामीण गरीब आणि शहरी मध्यमवर्गीय दोघांनाही आकर्षित करण्याचा प्रशांत किशोर यांचा प्रयत्न दिसतोय. पीके हे जन्माने ब्राह्मण आहेत. बिहारमध्ये उच्चजातीय समजले जाणारे लोक अभिमानाने आपल्या जातीबद्दल बोलतात, तसे पीके बोलत नाहीत. उच्चजातीयांनी आपल्याकडे पाहून मतदान करावं असंही ते म्हणत नाहीत. पण त्यांची मोहिनी या वर्गावर चालली आणि काही प्रमाणात मतं तिकडे वळली तरी भाजपचं नुकसान होऊ शकतं. त्याचप्रमाणे ग्रामीण गरीब हा महाआघाडीकडे कल असलेला वर्ग. त्यांवर प्रभाव पडून त्यातील काही भाग पीकेंकडे वळला तर यांचा तोटा होणार. प्रत्यक्षात काय होईल हे निकालानंतरच कळणार! पण पीकेंना मिळणारा प्रतिसाद रालोआ-महाआघाडी या दोघांचीही धडधड वाढवणारा आहे हे निश्चित.
खुद्द पीके यांनी आपल्याला एकतर १५० पेक्षा जास्त जागा मिळतील किंवा १० पेक्षाही कमी, असं धाडसी विधान केलं आहे. ऐन निवडणुकीत असं म्हणण्याची हिंमत कोणी करत नाही. पण पीके याबाबतही अपवाद. आपण एकतर जिंकू किंवा हरू, पण ‘वोट कटवा' ठरणार नाही ही बाब मतदारांच्या मनात उतरवण्यासाठीची ही नीती असणार. त्यामुळे नवखा पक्ष आणि नवख्या उमेदवारांना मतं देण्याचं लोक टाळणार की प्रशांत किशोर आणि त्यांचा पक्ष नवा पर्याय ठरणार. याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
आपल्याकडे निवडणुका जिंकण्यासाठी आवश्यक यंत्रणा नाही, पुरेसे कार्यकर्ते आणि संघटना नाही, पैसेवाले सक्षम उमेदवारही नाहीत याची जाणीव पीकेंना आहे. पण या मर्यादांनाच आपल्या बलस्थानांमध्ये बदलण्याच्या प्रयत्नात ते आहेत. गेल्या वर्षी बिहारमध्ये झालेल्या चार जागांसाठीच्या पोट निवडणुकीत एका ठिकाणी त्यांच्या उमेदवाराने २२ टक्के मतं मिळवली होती. त्याला आता एक वर्ष होऊन गेलं आहे. पीकेंनी स्वत:ला आणि स्वत:च्या मुद्द्यांना निवडणुकीच्या रंगमंचावर ठळक स्थान मिळवून दिलं आहे. त्यामुळेच ते सत्तेचे दावेदार बनून पुढे आले आहेत.
अर्थात, ते किंग बनणार, किंगमेकर बनणार की ऑल्सो रॅनच्या यादीत येणार हे निकालानंतरच स्पष्ट होईल.
सुहास कुलकर्णी | uniquefeatures.portal@gmail.com
सुहास कुलकर्णी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. गेली तीन दशकं ते राजकीय प्रक्रियांचं विश्लेषण करत आले आहेत.
