“काय मामा, बरं हाय का?”
मी सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये रस्त्यावरचे कपडे विकत घेणाऱ्याला विचा
रत होतो.
“कसा दिसतोय?” तो मला म्हणाला. तो कपड्यांचा ढीग उपसत होता.
मी विचारलं, “ही कापडं घेताय?”
“मं, हा कापडांचा ढीग का लावला असंल? तुमाला काय वाटतंय?” त्याने गुगली टाकली.
माझ्या चेहऱ्यावरचं प्रश्नचिन्ह बघून त्याने सांगायला सुरुवात केली, “हीच माझ्यासाठी नवी कापडं. स्वस्तात मिळतात! श्रीमंताने कुठं एकदा-दोनदा वापरलेले असतात. तेच कपडे काम-धंदा करताना वापरले तर काय होतंय. कुठं आपण श्रीमंताची अवलाद हाय. जुने हाय की नवीन घेतले, हे कुणाला समजून येत नाय. नव्यासारखेच असतात. उग म्हणायला जुने कपडे!”
हे होते ऊसतोड मजूर संजय घुले. बोलताना त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. चांगल्या दर्जाचे कपडे अगदी कमी किमतीत मिळाल्याची.
वर्षातला चार महिन्यांचा हंगाम संपला, की ऊसतोडणी मजुरांच्या हाताला काम नसतं. पुढचा हंगाम येईपर्यंत हातात असतील त्या पैशांवरच त्यांचं घर कसंबसं चालणार असतं. त्यांच्यासारखे आणखी कितीतरी प्रकारचे कामगार, शेतमजूर.. ते सगळे असेच कपडे खरेदी करत असतील का?
गेली काही वर्षं मी ग्रामीण महाराष्ट्रात फिरतोय. रिपोर्टिंग करतोय, मुलाखती घेतोय, रोजंदारीवर जगणाऱ्या माणसांचं जगणं जवळून पाहतोय. जुन्या कपड्यांच्या बाजाराची एक वेगळी दुनिया आहे, हे मला एका उन्हाळी दुपारी कराडच्या बाजारात समजलं. त्या दिवशी दोन जीन्स दोनशे रुपयांत घेण्यासाठी रांगेत उभे असलेले लोक दिसले. त्यांच्या आनंदी चेहऱ्याच्या तळाशी एक कटू वास्तवही लपलेलं होतं. ‘नवे' कपडे त्यांना परवडत नव्हते. जुन्या कपड्यांचं वाढतं मार्केट हा कुतूहलाचा विषय होताच. या बाजाराचं, इथल्या उलाढालींचं, इथे कपडे घेणाऱ्या माणसांचं आणि रस्त्यावर कपडे विकणाऱ्यांचंही एक वेगळं जग पाहण्यासाठी फिरायचं असं ठरवलं.
शहरांमध्ये स्टॉल किंवा जमिनीवरच चटई पसरून त्यावर विक्रीसाठी कपडे ठेवलेले दिसतात. या कपड्यांच्या किमती खूपच कमी असतात. शर्टची किंमत शंभर ते दोनशे रुपयांपर्यंत, खूपच चांगला दणकट शर्ट किंवा पँट असेल तर जास्तीत जास्त दोनशे रुपये. अनेक दुकानदारांशी चर्चा केल्यावर हे जुने कपडे असल्याचं समजलं. गेल्या १० वर्षांत ग्रामीण भागातील आठवडी बाजारातही असे कपडे दिसताहेत. जुन्या कपड्यांचा व्यवसाय जाणून घेण्यासाठी साताऱ्याच्या कराडपासून बीडच्या नेकनूरपर्यंत, नाशिकच्या सिन्नरपासून पिरंगुट एमआयडीसीतल्या गल्लीपर्यंत अनेक ठिकाणी गेलो. तिथे कपडे घेणाऱ्यांच्या कहाण्या जवळून पाहिल्यावर उलगडलं गरिबांच्या ‘ब्रँडेड मॉल'चं वेगळं जग!
बीड जिल्ह्यातल्या नेकनूर गावातील आठवडी बाजारात गेलो. संध्याकाळचे चार वाजत आले होते. बाजार बहरात आला होता. गर्दीने रस्ता फुलला होता. तिथे जुन्या कपड्यांचे तीन गाडे लागलेले दिसले. त्याभोवती उभी राहून काही माणसं कपडे पाहत होती. परीटघडीचे कपडे प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये व्यवस्थित रचून ठेवलेले होते. अगदी नव्यासारखेच दिसत होते. विक्रेते जाहिरात करत होते, ‘ब्रँडेड कपडे स्वस्तात घ्या' ते लोकांचं लक्ष वेधून घेत होते.
मीही कपडे पाहिले. एक शर्ट उचलून विक्रेत्याला विचारलं, “या शर्टाची किंमत किती?”
तो म्हणाला, “कोणताही शर्ट घ्या. शंभर रुपये.”
‘हे जुने कपडे असतील का नवीन', असा विचार करत असतानाच विक्रेते म्हणाले, ‘या मालक. बघा, हे जुने कपडे असले तरी अगदी नव्यासारखेच आहेत.”
यांचं नाव मोमीन पठाण. ते बीडचेच आहेत. गेल्या चार वर्षांपासून ते हे काम करतायत.
त्यांना उत्सुकतेने विचारलं, “जुने कपडे कुठून आणता?”
मोमीन सांगू लागले, “हे कपडे मी मुंबईतून मागवतो. तिथे जुन्या कपड्यांची दुकानं आहेत. व्यवसाय सुरू केल्यावर सुरुवातीला मी तीन-चार वेळा मुंबईला गेलो होतो. आता व्हाट्सॲपवर मेसेज पाठवला की ते दुकानदार लगेच कपडे पाठवतात. ऑनलाइन पैसे पाठवले, की व्यवहार क्लिअर! आता हे कपडे पुरवणाऱ्या व्यावसायिकांशी विश्वास ठेवावा एवढी ओळखही झाली आहे. पण ते दुकानदार कपडे कुठून जमा करतात हे माहीत नाही.”
हे कपडे घेण्यासाठी गर्दीही होती. पठाण यांना विचारलं, “आठवडी बाजारात एका दिवसात किती कपड्यांची विक्री होते?”
आलेल्या ग्राहकांना कपडे दाखवताना एकीकडे त्यांनी माहिती दिली- “आठवड्याचा हा मोठा बाजार आहे, त्यामुळे इथे गिऱ्हाईक जास्त मिळतं. दिवसभरात गाड्यावरील सर्व कपडे विकले तर खर्च वजा जाता, पंधराशे ते दोन हजार रुपये शिल्लक राहतात. आठवड्यात नेकनूरसारखे वेगवेगळे चार आठवडी बाजार करतो. त्यामुळे आठवड्याला ६ ते ७ हजार रुपये शिल्लक राहतात.”
जुने कपडे नव्यासारखे करून विकायचे म्हणजे सोपं काम नाही. तसं मोमीन यांना विचारल्यावर ते लगेच म्हणाले, “मग काय! कपडे विकण्याआधी खूप मेहनत घ्यावी लागते. एखादा कपडा कधी कुठे उसवलेला असू शकतो, एखाद्याचं बटण तुटलेलं असू शकतं किंवा आणखी काही, ग्राहक असे कपडे बाजूला फेकून देतात. म्हणूनच हे कपडे माझ्याकडे येतात तेव्हा ते धुणं, त्याला इस्त्री करणं, नव्या कपड्यांसारखी घडी घालणं, त्यांची अत्यंत काळजीपूर्वक हाताळणी करणं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेतानाही विशेष काळजी घेणं, दिवसभर बाजारात थांबून राहणं, हे डोळ्यांत तेल घालून करावं लागतं. हे सर्व एका माणसाचं काम नाही. मी बाजारात आलो तरी घरी कपड्यांचं काम चालू राहतं. बायको मदत करते म्हणून हा व्यवसाय होतोय, नाहीतर चारऐवजी दोनच आठवडी बाजार करता आले असते. शिल्लक फारशी राहिली नसती. एवढ्याशा पैशांत कुटुंब कसं चाललं असतं? एका नगामागे (शर्ट किंवा पॅन्ट) २० किंवा ३० रुपये मिळतात.”
आमची चर्चा चालू असताना, ५० ते ५५ वर्षांचे एक शेतकरी दुकानावर आले. शर्ट, पॅन्ट आणि लहान मुलांच्या कपड्यांचे भाव विचारू लागले. त्यांच्याशी बोललो. त्यांचं नाव जनार्दन शिंदे. त्यांच्याशी बोलल्यावर लोक जुन्या कपड्याकडे का वळतात, याचं आणखी एक कारण कळलं. शिंदे सांगू लागले, “इथे शेजारीच माझं गाव आहे. तीन एकर कोरडवाहू शेती आहे. दरवर्षी खरीप हंगाम संपला, की पोटापाण्यासाठी ऊसतोडणीला जावं लागतं. शेतात काम करतो किंवा ऊसतोडणी करतो तेव्हा नवीन कपडे लवकर खराब होतात. त्यामुळे हे जुने कपडे घेतो. ते मळले किंवा फाटले तरी वाईट वाटत नाही. स्वस्तात मिळतात ना! खरीप हंगाम सुरू होईल तेव्हा शेतात काम (मोगडा, पेरणी) करण्यासाठी घरात जुने कपडे नसल्यामुळे हे कपडे घ्यायला आलोय. किमान तीन-चार वेळा असे कपडे घेतले तरी वर्षभराचं काम भागतं. शिवाय इथे एका नवीन ड्रेसच्या पैशात आम्ही दहा कपडे घेतो.”
“पण मुलांसाठीही जुनेच कपडे?” त्यांना विचारलं.
त्यांचा चेहरा जरा उतरला. ते सांगायला लागले, “महागाई किती वाढलीय! डोक्यावर कर्ज आहे. मग कुठं पैसे वाचवता येतील, ते पाहतो. आपल्या मुलांनी जुने कपडे वापरावेत, असं कुणालाच वाटणार नाही. पण काय करणार?” मग गुपित उलगडल्यासारखं ते हळूच पुढे म्हणाले, “गावातले अनेकजण वापरतात, त्यांची परिस्थिती माझ्यासारखीच आहे. पण सगळं गपगुमान चालू असतं. कपड्यांचा रंग, आकार पाहिला की ते लक्षात येतं. अंदाजे २५ ते ३० टक्के तरी कुटुंबं अशी असतील.”
यावरून आठवलं गावा-शिवारांमध्ये फिरत असताना अनेकांना विचारलं, की ‘कपडे कुठून घेतले', तर लोक गप्प होतात. काही वेळा लाजतात. काहीजण उत्तर देतात, ‘बायकोने घेतलं, मला माहीत नाही.' कपडे दिसायला चांगले असले की झालं, असं म्हणून उत्तर टाळतानाही अनेकजण दिसले.
शेतमजूर दुसऱ्यांच्या शेतात राबतात. ऊसतोड चालू होते तेव्हा कामगार कुटुंबकबिला घेऊन स्थलांतर करतात. एका ट्रॅक्टरमध्ये संसार भरून कामाच्या ठिकाणी आपलं तात्पुरतं कच्चं घर उभं करतात. त्यांचं उत्पन्न अगदी कमी असतं. काम संपलं की बेरोजगारी! या गरिबीच्या दुष्टचक्रात वर्षानुवर्षं अडकलेल्या लोकांसाठी कमीत कमी पैशांत चांगले कपडे मिळणं हीच खरी मदत असते. गेल्या काही वर्षांत मी पाहतोय ती या गरीब, कष्टाळू लोकांची महागाईशी असलेली लढाई. शिक्षण, किराणा, वीज, दवाखाना, भाजीपाला हीसुद्धा त्यांच्यासाठी चैन ठरते आहे. शिधावाटप केंद्रातून कमी पैशांत मिळणारं अन्नधान्यही त्यांच्यासाठी ‘महागच' असतं. अन्न-वस्त्र-निवारा या तर मूलभूत गरजा; तेव्हा जुने कपडे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरताहेत.
पुणे जिल्ह्यात चिंचवडच्या एका बसस्टॉपवर उभा होतो. संध्याकाळी पाचचा सुमार असेल. तिथून थोड्या अंतरावर कपड्याचा एक गाडा लावलेला होता. माझ्या शेजारी असलेल्या मजुरांच्या हातात वायरची पिशवी होती. ते बिगारी मजूर असल्याचं लक्षात आलं. त्या कपड्यांच्या गाड्यावरून त्यांनी कपडे घेतले असावेत, हे लक्षात आल्यावर मी त्यांच्यापाशी गेलो.
“कपडे घेतले का?” पिशवीकडे पाहत त्यांना विचारलं. त्यांच्यापैकी एकजण परभणी जिल्ह्यातील पालमहून आलेले सूर्यभान शिरसाट होते. त्यांनी सांगितलं, “हो, एक शर्ट घेतलाय. अंगावरचा खूपच फाटलाय. त्याला किती ठिगळं लावणार? त्यापेक्षा हा बरा. अडीचशे रुपये सांगत होते, पण शंभरला घेतला.”
शर्ट पाहून ‘मलाही आवडला' असं त्यांना दाखवलं. त्यांना विचारलं, “खूपच स्वस्त आहे. मीपण घेऊ का?” ते म्हणाले, “मी कामाच्या वेळी घालायला म्हणून कापडं घेतली. तुम्ही कशाला घेता?” गप्पा सुरू राहिल्या. गावांकडील आठवणी निघाल्या. मीपण मराठवाड्यातलाच आहे, हे सांगितल्यावर ते अधिक खुलले.
“नवीन कपडे का घेतले नाहीत?” असं सहज विचारलं.
सूर्यभान म्हणाले, “बिगारी कामगार आहे. काम आणि पैसेही रोज मिळत नाहीत. घर कसं चालवायचं?”
“गाव का सोडावं लागलं? चांगलं होतं की तिथं! शहरात महागाई भरपूर...” मी म्हणालो.
“आमच्यासारख्या बिगारी काम करणाऱ्यांना गावाकडे कोणीही समजून घ्यायला तयार नाहीत. सर्व सोंग आणता येतं; पण पैशाचं कसं आणावं? जगायला पैसे लागतात. कामाच्या शोधात इथे आलो आणि आता कसंबसं पोट भरतोय. बायकोची, मुलांची काळजी वाटते. चांगल्या महाग कपड्यांपेक्षा दोन वेळचं जेवण महत्त्वाचं. मुलांना उपाशी ठेवून नवे कपडे कसे घेऊ?” ते डोळ्यांत पाणी आणून म्हणाले.
एका रविवारी सायंकाळी पिरंगुटमधल्या घोटावडे फाट्याला चहाच्या टपरीवर गेलो. तिथेही कडेला जुन्या कपड्यांचं दुकान दिसलं. दुकानात गेलो. दुकानदाराशी छान गप्पा झाल्या. ते दुकान उत्तर प्रदेशातून रोजीरोटीसाठी आलेल्या अस्लम शेख यांचं होतं. बोलता बोलता त्यांनी, ते पाच ते सहा वर्षांपासून हा व्यवसाय करत असल्याचं सांगितलं. ते म्हणाले, “माझ्या एका मित्राने या व्यवसायाची माहिती दिली. त्यातले खाचखळगे सांगितले. मीही हा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायासाठी तुमचं नेटवर्क चांगलं असायला हवं. सातत्य हवं. मेहनत हवी. आता आम्ही एक ग्रुपही तयार केला आहे. त्यामुळे ऑनलाइन कपडे मागवायला सोपं जातं.”
त्यांच्या दुकानात काही कपडे पाहिले. एक टीशर्ट दिसला- ‘ओरिजिनल ॲदिदास'चा. किंमत? फक्त ७० रुपये. असे मोठ्या ब्रँडचेही कपडे असतात. अस्लम यांना रोजचा खर्च वजा जाता सातशे ते नऊशे रुपये मिळतात. कपड्यांच्या विक्रीच्या प्रमाणावर मजुरी ठरते. इतर कोणत्याही कामापेक्षा त्यांना हा व्यवसाय अधिक चांगला वाटतो. अर्थातच व्यवसायासाठी पुणे जिल्हा निवडल्यामुळे गावाकडच्यासारख्या त्यांच्या इथे ओळखी नाहीत. ते आठवड्यातून दोन दिवस इथे येतात आणि कपडे विकतात. तसंच चिंचवडमध्ये तीन दिवस जाऊन तिथेही हा व्यवसाय करतात. आठवड्यातील उरलेल्या दोन दिवसांत कपडे मागवणं, काही कपडे धुणं, त्यांना इस्त्री करणं आणि व्यवस्थित ठेवणं यात जातात.
त्यांना विचारलं, “रस्त्यावर कपडे विकण्यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागली का? कोणी पैसे मागितले का?” (थोडक्यात जागेचा हप्ता दिला
जातो का?)
अस्लम म्हणाले, “स्थानिक दुकानदारांची, जागामालकाची परवानगी घेतली आहे. एवढंच नाही तर या जागेचं सातशे रुपये भाडं दिवसाकाठी द्यावं लागतं.”
अस्लम यांच्याकडे येणारा ग्राहकवर्ग हा बिगारी काम करणारा आहे. विशेषतः उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, बिहारमधून आलेले कामगार कपडे घेतात. याशिवाय, मराठी कामगार देखील घेतात, पण त्यांचं प्रमाण कमी आहे. साखर कारखान्यांच्या परिसरात, शेत-शिवारात किंवा महानगरांत कामगारांची आवश्यकता असते. तिथे येणाऱ्या कामगारांची संख्या लक्षात घेऊन अशा परिसरातच अशी दुकानं थाटावी लागतात. त्यामुळे जुने कपडे विकणाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर ग्राहक मिळतात.
अस्लम यांच्याकडे हे कपडे मुंबईहून येतात. तिथे जुने कपडे गोळा करून विकणाऱ्या अनेक संस्था आहेत. आता तर काही संस्था त्यांच्या ब्रॅडनेमअंतर्गत या कपड्यांची विक्री करतात. या कपड्यांचं वाढतं मार्केट पाहून त्यात उतरलेल्या अनेक संस्था सोशल मीडियाचाही वापर करत आहेत. त्यांच्यात स्पर्धाही आहे. त्यांच्याकडे नट-नट्यांपासून नवश्रीमंत वर्गापर्यंत सगळ्यांचे एक-दोनदाच घातलेले कपडे जमा होतात. ते ॲपवर टाकले जातात. व्हॉट्सअपच्या माध्यमातून मागवले जातात. काही माल पुण्यातून देखील मिळतो. हे कपडे कधी नगावर तर कधी किलोवर स्थानिक विक्रेत्यांकडून विकत घेतले जातात. गुणवत्ता आणि वजन यानुसार किंमत ठरते. त्यानंतर ते सेकंडहँड कपडे आठवडी बाजार किंवा मोठ्या उद्योगधंद्यांजवळील परिसरात अत्यल्प किमतीत विकले जातात.
पुणे जिल्ह्यातच अशी कितीतरी दुकानं आहेत. मुळशी तालुक्यातील पिरंगुटमध्ये गेलो तेव्हा चार जणांचा घोळका उभा होता. हा घोळका अशाच दुकानातून कपडे खरेदी करण्यात गुंग होता. त्यांची चर्चा ऐकत होतो. कधी कधी नुसती कानसेनाची भूमिका घेतली तरी बरंच काही समजतं. त्यातल्या एकाने पँट हातात घेतली आणि कितीला, असं विचारलं. दुकानदाराने दीडशे रुपयांची असल्याचं सांगितलं. अर्थातच घासाघीस करत प्रत्येकी १०० रुपयांना ३ पँट घेण्याचं फायनल झालं.
खरेदी करून निघालेल्या महेश नावाच्या युवकाला विचारलं, “काय काम करता?”
त्याने सांगितलं, “गेली चार वर्षं आम्ही सहाजण एकत्रच राहतो. एकाच कंपनीत कामाला आहे. असेच कपडे विकत घेतो. हे कपडे आमच्यासाठी नवे असतात. नवीन कपड्याच्या किमतीत तीन ते चार ड्रेस मिळतात. पगार १२ ते १५ हजारांच्या घरात असताना आम्हाला दीड-दोन हजारांचा ड्रेस घेणं परवडेल का? खोलीचं भाडं, घरखर्च, प्रवास, जेवण, कधी लागली तर औषधं... कितीतरी खर्च असतो. सेकंडहँड कपडे घेऊन आम्ही काही पैशांची बचत करायचा प्रयत्न करतो. काही पैसे गावी पाठवतो.” महेश हिंदीभाषक राज्यातून आलेला होता.
महेशशी बोलणं झाल्यावर तिथे आणखी एकजण आले. त्यांनी मराठीत बोलायला सुरुवात केली. यवतमाळहून पिरंगुटच्या एमआयडीसीत बिगारी कामासाठी आलेले तुकाराम चव्हाण यांचीही पसंती जुन्या कपड्यांनाच असल्याचं दिसलं. त्यांनी स्वतःसाठी आणि त्यांच्या मुलांसाठीही दोन ड्रेस घेतले. त्यांना विचारलं, “हे सगळे कपडे कितीला मिळाले?”
“फक्त चारशे रुपये. चांगले असतात.”
तुकाराम यांचं आई, पत्नी आणि दोन मुलं असं पाचजणांचं कुटुंब आहे. त्यांची आणि भावाची मिळून गावाकडे अडीच एकर कोरडवाहू जमीन आहे. त्यातून काय उत्पन्न मिळणार? शिवाय त्या शेतीवर भाऊ कसाबसा आपला फाटलेला संसार शिवण्याचा प्रयत्न करतो. शहरात आल्यावर तुकाराम यांची पत्नीही बिगारी कामावर जाते. शहरात एकाच्या कमाईवर घर चालणारच नाही. महागाईच्या प्रमाणात मजुरी वाढत नसल्याने आलेला पैसा केव्हा भुर्रकन उडून जातो, ते कळत नाही. जुने कपडे हा बचतीचा चांगला मार्ग असल्याचं त्यांना वाटतं. ते नेहमीच्या वापराला इथूनच कपडे घेतात. नात्यातलं लग्न, धार्मिक कार्यक्रम किंवा उत्सव असेल तरच नवीन कपडे घेतले जातात. तुकाराम यांनी गप्पांच्या ओघात सांगितलं, की गेल्या आठ वर्षांत त्यांनी स्वतःसाठी नवीन कपडे घेतलेले नव्हते.
इथे आणखी बरेच ग्राहक भेटले. हे सगळे गरीब, दारिद्य्ररेषेखालच्या आर्थिक वर्गातले होते. असंघटित क्षेत्रातील मजूर, बिगारी कामगार, रोजंदारी करणारे, वॉचमन, कंपन्यांमधील हजेरी तत्वावरील मजूर, अंगमेहनतीची छोटी-मोठी कामं करणारे, छोट्या-मोठ्या दुकानात हेल्पर असलेले, महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून आणि यूपी-बिहार राज्यांतून स्थलांतरित झालेले होते. सतत वाढणारी महागाई आणि उत्पन्न अत्यल्प असल्याचं, एकाने सांगितलं. बचत तर दूरच पण कपड्यांच्या बाबतीत काटकसर केली तर निदान दोन वेळचं अन्न तरी पोटाला मिळेल, असंही मत एकाने मांडलं.
जुन्या कपड्यांच्या थेट विक्रीप्रमाणे आता ऑनलाइन विक्रीचं प्रमाणही वाढलं आहे. प्रत्यक्ष दुकानावर, स्टॉलवर न जाता मोबाईल ॲप आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून खरेदी करणारा एक वर्गदेखील पाहण्यास मिळतो. यात प्रामुख्याने ओएलक्स, फेसबुक मार्केटप्लेस, टूयुज्झ इबेबी, मीशो हे लोकप्रिय ॲप आणि सोशल साईट आहेत. याशिवाय पॉशमार्क, डेपॉप आणि थ्रेडअपसारखे प्लॅटफॉर्मदेखील आहेत.
आजकाल मध्यमवर्गीयांमध्येही वापरलेल्या कपड्यांच्या खरेदीचं प्रमाण वाढताना दिसत आहे. हा वर्ग प्रामुख्याने अशी खरेदी ऑनलाईनच करतो. एकीकडे महागाई, फॅशनेबल राहणीमानाचं आकर्षण; पण दुसरीकडे सामाजिक प्रतिष्ठा आणि दर्जा; यामुळे वापरलेल्या कपड्यांची ऑनलाईन खरेदी करण्याकडे त्यांचा कल असतो.
भांडवलशाही व्यवस्थेतून उभी राहिलेली ही पडद्यामागची बाजारपेठ आहे. दुसऱ्यांनी वापरलेले कपडे घालायचे का नाही, हा चॉईसच इथल्या गिऱ्हाइकांकडे नाहीये. ती आता त्यांची अपरिहार्यता झालीय.
(या लेखाचं शब्दांकन-संपादन शिल्पा दातार-जोशी यांनी केलं आहे.)
सोमिनाथ घोळवे | 9881988362 | sominath.gholwe@gmail.com
सोमिनाथ घोळवे हे ग्रामीण समाज व्यवस्थेचे अभ्यासक आहेत.
