पुणे शहरातील राजकारण १९५२ पासून आजपावेतो मुख्यत्वे काँग्रेस, समाजवादी आणि हिंदुत्ववादी पक्षांच्या भोवती फिरत राहिलेलं दिसतं. न. वि. ऊर्फ काकासाहेब गाडगीळ यांच्यापासून ना. ग. गोरे, एस.एम. जोशी, शंकरराव मोरे, मोहन धारिया, बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, सुरेश कलमाडी, अण्णा जोशी, विठ्ठल तुपे, प्रदीप रावत, अनिल शिरोळे आणि गिरीश बापट इथपर्यंतच्या नेत्यांनी पुणे शहराचं राष्ट्रीय संसदेमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. या नेत्यांबरोबरच पुण्यातील वा पुण्याबाहेरील इतर अनेक नेत्यांचाही पुणे शहरातील राजकारणामध्ये प्रभाव होता. त्यामध्ये आधीच्या पिढीतील बाबुराव सणस, भाऊसाहेब शिरोळे, रामभाऊ म्हाळगी, जयंतराव टिळक, शरदराव पवार, भाई वैद्य, प्रा. रामकृष्ण मोरे वगैरे नेत्यांचा उल्लेख करता येईल.
मात्र, निव्वळ शहराच्या राजकारणाचा विचार करायचा तर या सर्व नावांमध्ये सुरेश कलमाडी यांचा प्रभाव सर्वांत अधिक काळ टिकला, असं म्हणता येईल. भारतीय वायूसेनेतील पायलट म्हणून १९६५ आणि १९७१च्या पाकिस्तानविरोधी युद्धात प्रत्यक्षात भाग घेतलेल्या सुरेश कलमाडींचं विमान १९७५मध्ये पुण्याच्या राजकारणात लाँच झालं. पुढे १९८२मध्ये म्हणजे पहिल्यांदा राज्यसभेत निवडून आल्यानंतर त्यांच्या नेतृत्वाचं विमान राजकीय, क्रीडा आणि सांस्कृतिक अवकाशात सुसाट वेगाने भरपूर उंचीवर गेलं.
पुण्यात जन्मलेल्या सुरेश कलमाडी यांचं शिक्षण सेंट व्हिन्सेंटमधून आणि नंतर फर्ग्युसन महाविद्यालयातून झालं. लहानपणापासूनच गतीचं विलक्षण आकर्षण असणाऱ्या सुरेशभाईंनी १९६०मध्ये खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) प्रवेश घेतला आणि १९६३ मध्ये तिथून पदवी घेतली. त्यानंतर जोधपूर आणि अलाहाबाद (आता प्रयागराज) येथील एअरफोर्स फ्लाइंग कॉलेजमधून उत्तीर्ण झाल्यानंतर १९६५ मध्ये वायूसेनेत रीतसर दाखल झाले आणि १९७४ पर्यंत वायूसेनेत कार्यरत राहून ‘स्क्वाड्रन लीडर' म्हणून निवृत्त झाले. हवाईदलातील कामगिरीबद्दल त्यांना आठ पदकं मिळाली आहेत. निवृत्तीनंतर त्यांनी व्यवसायात उतरायचं ठरवलं. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असणारे आणि इंग्रजी व कन्नड भाषेतील कर्नाटक शाळेचे एक संस्थापक असलेले त्यांचे वडील डॉ. शामराव कलमाडी यांचे अगदी जवळचे मित्र निळूभाऊ लिमये यांच्याकडून सुरेशभाईंनी डेक्कन जिमखाना बसस्टँडसमोरील ‘पूना कॉफी हाऊस' १९७४ दरम्यान विकत घेतलं आणि व्यवसायात पदार्पण केलं.
सार्वजनिक जीवनात प्रवेश
सुरेश कलमाडी यांचं व्यक्तिमत्त्व अमाप ऊर्जा व उत्साहाने भारलेलं व भरलेलं होतं. सार्वजनिक कामाची लहानपणापासूनच आवड असणाऱ्या सुरेशभाईंना समाजकार्यात स्वतःला गुंतवणं फार गरजेचं वाटत असल्याने त्यांनी ‘जायंट्स इंटरनॅशनल'चं सदस्यत्व घेतलं आणि रक्तदान शिबिरं व इतर लोकोपयोगी उपक्रमांचं आयोजन सुरू केलं. जायंट्स इंटरनॅशनलमुळे त्यांचा मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, कोलकाता आदी शहरांतील मान्यवरांशी परिचय घडला. त्यामध्ये मुंबईचे माजी शेरीफ असलेले नाना चुडासामा यांचा समावेश होता. त्यांच्यामार्फत कलमाडींची शरदराव पवार यांच्याशी ओळख झाली.
प्रारंभापासूनच कलमाडी काँग्रेसच्या विचाराकडे झुकलेले होते. याच दशकात पुण्यातील काँग्रेस पक्ष आणि त्यातही विशेषतः युवक काँग्रेसची टीम फुल फॉर्मात होती. काही ना काही सामाजिक उपक्रम, आवश्यक वाटलं तर आंदोलनं व निदर्शनं केली जात असल्याने युवक काँग्रेस सतत प्रकाशझोतात होती. पुणे शहर आणि पुणे जिल्हा युवक काँग्रेस या दोन्ही संघटनांमध्ये जैविक नातं होतं. प्रामुख्याने प्रा. रामकृष्ण मोरे ग्रामीण भागात सक्रिय होते; तर, उल्हासदादा पवार हे शहरातील युवक काँग्रेसच्या आणि नंतर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी होते. त्यांच्या नेतृत्वात अनेक उत्साही युवक-युवतींचा सक्रिय सहभाग असल्यामुळे ‘युवक काँग्रेस'ची संघटना ऊर्जा व उत्साहाने रसरसलेली असायची.
पुणे शहर व जिल्हा युवक काँग्रेसची टीम एकत्रितपणे पुण्यात दर गुरुवारी भेटून विविध राजकीय विचारधारा, देश व राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी आदी विषयांवर अभ्यासपूर्ण चर्चा करायची. हा उपक्रम साधारणतः १९७० ते १९८०पर्यंत सुरू होता. सुरेश कलमाडी हे १९७५ नंतर युवक काँग्रेसमध्ये दाखल झाले. ते अधूनमधून गुरुवारच्या बैठकीत येत. या अर्थाने त्यांचा सहभाग फार सक्रिय नव्हता. पण भारतीय वायूसेनेची पार्श्वभूमी लाभलेल्या आणि उच्चभ्रू समाजात वावर असलेल्या सुरेश कलमाडींसारख्या तिशीतील सुशिक्षित युवकामुळे संघटनेला अधिक बळकटी येईल, अशा विचाराने आणि शरदराव पवार यांनी सुचवल्यानुसार उल्हासदादा यांनी १९७७ मध्ये कलमाडींवर पुणे शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. शहर युवक काँग्रेस आणि युवक काँग्रेसच्या दृष्टीने ही एक महत्त्वाची घटना होती.
कलमाडी हे मूळ कन्नडभाषक असल्याने आणि त्यांचं शिक्षण सेंट व्हिन्सेंटमधून झालं असल्याने मराठी बोलण्याची त्यांना फारशी सवय नव्हती. त्यामुळे कोठेही बोलण्याचा प्रसंग येणार असल्यास ते उल्हासदादा आणि इतरांकडून ‘इनपुट्स' घ्यायचे. याविषयीची उल्हासदादांनी एक मजेशीर आठवण सांगितली. १९७५ किंवा १९७६मध्ये युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची एक बैठक अंकुश काकडे यांच्या नव्या पेठेतील काळ्या दंतमंजनाच्या कारखान्यात झाली होती. या बैठकीत कलमाडी यांनी पहिल्यांदा मराठीतून भाषण केलं होतं. या बैठकीत काही मिनिटं बोलल्यानंतर त्यांनी सर्वांसमोरच उल्हासदादांना अगदी इनोसंटली विचारलं, “दादा, तुम्ही पुढचा मुद्दा कोणता सांगितला होता?” यावर बैठकीतील सर्वांच्या चेहऱ्यांवर हसू उमटलं. कलमाडीदेखील या हसण्यात सामील झाले. मात्र, कलमाडी यांच्यातील काही ना काही करत राहण्याची ऊर्मी, मनाची अस्वस्थता आणि अंगभूत असलेली धडाडी साऱ्यांचं लक्ष वेधून घेई. समाजातील विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या वजनदार व्यक्तींबरोबरची कलमाडींची ऊठबस आणि विशेषकरून पत्रकारांशी जडलेली मैत्री त्यांना पुढील कारकिर्दीसाठी खूपच उपयुक्त ठरली.
पुणे शहर युवक काँग्रेसमध्ये सक्रिय झालेले सुरेश कलमाडी हे संजय गांधींच्या व्यक्तित्वाने भारावून गेले होते. तो काळ आणीबाणीचा होता. उल्हासदादा आणि प्रदेश युवक काँग्रेसने १९७६च्या सुमारास संजय आणि मेनका गांधी यांचा महाराष्ट्राचा दौरा आखला होता. त्यानुसार हे दांपत्य पुण्यालाही आलं आणि शनिवारवाड्यावर त्यांची जाहीर सभाही आयोजित केली गेली. तोपर्यंत संजय गांधी हे पक्षाचे सर्वांत शक्तिवान नेते बनले होते. इंदिराजींच्या वीस कलमी कार्यक्रमाबरोबरच संजय गांधी यांनी युवक काँग्रेससाठी पाच कलमी कार्यक्रम जाहीर केला होता. ‘मारुती' गाडी तयार करण्यास सरकारने परवानगी दिल्यामुळे आधीच विरोधकांच्या टीकेचे धनी बनलेले संजय गांधी पुढील काही महिन्यांत सक्तीच्या नसबंदी कार्यक्रमामुळे चांगलेच वादग्रस्त ठरले होते. कलमाडी यांनी संजय गांधींच्या पाच कलमी कार्यक्रमाचा जोरदार प्रचार सुरू केला होता. तोपर्यंत पूना कॉफी हाऊस हा एक सक्रिय राजकीय अड्डा बनलेला होता. कलमाडी यांनी स्वतःच्या हॉटेलबाहेरही पाच कलमी कार्यक्रमाची भली मोठी जाहिरात लावली होती. कलमाडींनी वृक्षारोपण, हुंडाबंदी, कुटुंब नियोजन, साक्षरता प्रसार आणि अस्पृश्यता निवारण यातील अनेक उपक्रम शहरातील ससून, केईएम, ताराचंद हॉस्पिटल आणि इतर वेगवेगळ्या ठिकाणी आयोजित केले होते. या सर्व उपक्रमांना वर्तमानपत्रांतून भरपूर प्रसिद्धीही लाभली. त्या काळी डिजिटल प्रिंटिंग वगैरे तंत्रज्ञान नसल्यामुळे बॅनर्स, पोस्टर्स कलाकारांकडून खास रंगवून करून घ्यावी लागत असत. कल्पकतेची भरपूर आवड असल्याने त्या काळी पाच कलमी कार्यक्रमांचं बहुतेक सर्व प्रचारसाहित्य हे गफूरभाई यांच्या अजिंठा आर्ट्समधून करून घेण्याची जबाबदारी कलमाडी यांनी स्वतःवर घेतली होती.
आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत दक्षिण भारत वगळता काँग्रेस पक्षाची पार दाणादाण उडाल्याचा इतिहास सर्वांनाच माहीत आहे. १९७७च्या निवडणुकीत जे देशात घडलं तेच पुण्यातही घडलं. पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे पण आणीबाणीमुळे जनता पक्षात गेलेले मोहन धारिया इथून निवडून आले. दिल्लीत मोरारजी देसाई पंतप्रधानपदी आरूढ झाले.
एका घटनेचा कारनामा
मोरारजीभाई देसाई यांनी १९७७ साली पंतप्रधानपदाची सूत्रं हाती घेतल्यानंतर, पुण्यातील टिळक स्मारक मंदिरात ते एका कार्यक्रमासाठी येणार होते. पंतप्रधानांची गाडी टिळक स्मारक इथे पोहोचली, तेव्हा त्या वेळी युवक काँग्रेस, दलित पँथर आणि सरकारी कर्मचारी संघटना यांची तीन स्वतंत्र निदर्शनं सुरू होती. इंदिरा गांधी यांना जनता पक्षाचं सरकार सूडबुद्धीने वागवत असल्याचा आरोप व राग देशभरातील काँग्रेसजनांमध्ये होता. त्याचा निषेध म्हणून युवक काँग्रेसची निदर्शनं सुरू होती. पंतप्रधानांसोबत राज्याचे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, केंद्रीय मंत्री मोहन धारिया गाडीत होते. जोरदार घोषणा सुरू असतानाच पंतप्रधानांच्या गाडीवर एक चप्पल येऊन आदळली. अगदी अरुंद रस्त्यावर नेमकं काय घडत आहे याची पोलिसांनाही कल्पना आली नाही. मात्र, कलमाडी यांनी ही चप्पल फेकली अशी बातमी शहरात वेगाने पसरली आणि ती देशभर पोहोचायलाही वेळ लागला नाही. या प्रकारानंतर उल्हासदादा, कलमाडी आदींसह युवक काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांना आणि इतर संघटनांच्या निदर्शकांनाही पोलिसांनी त्वरित अटक केली.
पुणेकरांमध्ये या प्रकाराबद्दल प्रतिकूल प्रतिक्रिया उमटली असली, तरी कलमाडींचं नाव मात्र देशभर चांगलं दुमदुमू लागलं. संजय गांधी यांनी उल्हासदादा पवार यांना खास फोन करून हे ‘साहस' कोणी केलं, अशी विचारणाही केली होती म्हणतात. त्यानंतर कलमाडी यांना संजय गांधी यांच्या जवळच्या गोटात प्रवेश मिळाला, आणि १९७८ मध्ये त्यांना पुणे शहर युवक काँग्रेसचं अध्यक्षपद दिलं गेलं. शिवाय शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून पक्षाचं तिकीटही मिळालं. वर्षभरातच कलमाडी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. नंतर मात्र ते शरद-रावांबरोबर त्यांच्या समाजवादी काँग्रेस पक्षात दाखल झाले आणि १९८१ साली युवक काँग्रेस (एस) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षही बनले. अशा रीतीने चप्पलफेकीच्या उपक्रमामुळे कलमाडी राजकारणातल्या पायऱ्या झटपट चढायला लागले.
१९७८ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत कलमाडी यांचा सामना जनता पक्षाच्या शांती नाईक यांच्यासोबत झाला. त्या लोहियावादी नेत्या होत्या. लढाऊ बाणा असलेल्या कलमाडींनी प्रचाराचा धुमधडाका उडवून दिला. ३६,३९३ इतकी भरघोस मतं मिळूनही कलमाडींचा पराभव झाला. मात्र, त्याद्वारे पुण्यातील राजकारणात कलमाडी यांचं जोरदार ‘लाँचिंग' झालं.
आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर जयप्रकाश नारायण, चंद्रशेखर, अटल बिहारी वाजपेयी आदी नेत्यांच्या प्रभावामुळे लाखो युवक-युवती देशभरातील राजकारणामध्ये दाखल झाले. मीदेखील त्यातील एक तरूण होतो. १९७८मध्ये मी पदवीधर झालो होतो आणि लोकसभेच्या निवडणुकीत दीप बंगला चौक परिसरात चांगलाच सक्रिय झालो होतो. भारावलेल्या वातावरणात जनता पक्षाच्या प्रचारात मी स्वतःला अहोरात्र झोकून दिलं होतं. १९७७च्या निवडणुकीनंतर काही महिन्यांतच मी त्या वेळच्या वॉर्ड क्र. ११ मधील जनता पक्षाचा अध्यक्षही बनलो होतो. १९७७ मधील लोकसभा आणि १९७८ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुका प्रचाराच्या निमित्ताने मी वॉर्ड क्र. ११ मधील जवळपास प्रत्येक घरात पोहोचलो होतो. अर्थातच माझं राजकारण काँग्रेसच्या विरोधात होतं.
जुलै १९७८ मध्ये राज्याच्या राजकारणात एक मोठी घटना घडली. शरद पवार यांनी वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि ४० आमदारांसह समाजवादी काँग्रेसची स्थापना केली. विधानसभेच्या निवडणुकीत ९९ जागा मिळवलेल्या जनता पक्षाबरोबर पवारांनी युती करून पुरोगामी लोकशाही दलाचं (पुलोद) सरकार स्थापन केलं आणि सर्वांत तरुण मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. या घडामोडीमुळे काँग्रेसची राज्यातील ताकद नक्कीच कमी झाली होती. कलमाडींनीदेखील पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता.
अशा बदललेल्या राजकीय वातावरणात पुणे महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या. जयप्रकाशजींचं ‘संपूर्ण क्रांती'चं स्वप्न पुरं करण्याची जबाबदारी जणू माझ्यावरच आहे आणि ते तडीस नेण्यासाठी मला पुणे मनपाची निवडणूक लढवली पाहिजे, अशा आविर्भावात मी १९७९मध्ये जनता पक्षाकडे मनपा निवडणुकीचं तिकीट मागितलं. पक्षात माझी रीतसर मुलाखतही पार पडली. तेव्हा जनता पक्षाला अनुकूल वातावरण असल्यामुळेही मी निवडून येण्याची शक्यता दाट होती. मात्र, काँग्रेस (एस) व जनता पक्षामध्ये युती झाली आणि माझा वॉर्ड क्र. ११ हा काँग्रेस (एस)साठी सोडला गेला. काँग्रेस (एस)च्या तिकीटवाटपात शरद पवारांचे विश्वासू या नात्याने कलमाडींचा महत्त्वाचा सहभाग होता. या वॉर्डातून कलमाडींनी प्रमोद महाले यांना तिकीट दिलं. एका अर्थाने मनपाच्या राजकारणात कलमाडींचा हा चंचूप्रवेश होता. त्या वेळी मी जनता पक्षात बंडखोरी करून निवडणूक लढवण्याची महाले यांना शक्यता वाटल्याने त्यांनी कलमाडींच्या कानावर ही बाब घातली. दुसऱ्याच दिवशी कलमाडी हे प्रमोद महाले आणि इतर अनेक कार्यकर्त्यांसोबत मला भेटायला घरी आले आणि बंडखोरी करू नये अशी विनंतीही केली. कलमाडींबरोबरची माझी ही पहिलीवहिली भेट होती. नंतरच्या काळात माझी त्यांच्याशी वरच्यावर भेट होऊ लागली आणि या भेटींमधून आमचा ‘दोस्ताना' सुरू झाला.
मला आठवतंय, त्या वेळी कलमाडींची पत्नी मीरा भाभी, त्यांची एक मैत्रीण आणि मी, प्रमोद महाले यांच्यासाठी शिवाजी हाउसिंग सोसायटीमध्ये डोअर-टु-डोअर प्रचारही केला होता. या निवडणुकीनंतर काही दिवसांनी माझा एक मित्र त्याच्या क्लबच्या कार्यक्रमासाठी मीरा भाभींना पाहुण्या म्हणून निमंत्रण देण्यासाठी सुरेशभाईंना भेटला. मी समोरच होतो. तेव्हा चांगल्या मूडमध्ये असलेल्या सुरेशभाईंनी माझ्या मित्राला सांगितलं, “तू प्रशांतलाच सांग ना. माझ्यापेक्षा मीराकडे त्याचाच वशिला जास्त आहे.” हे ऐकताच आम्ही सारे हास्यकल्लोळात रंगून गेलो.
सुरेश कलमाडींचं व्यक्तिमत्त्व आकर्षक आणि सर्वांवर छाप पाडणारं होतं. त्यांची धडपड आणि कामातील गती लक्षात येणारी होती. त्यांच्याकडे राजकारणात लागणारी जबरदस्त महत्त्वाकांक्षा तर होतीच, सोबत महत्त्वाकांक्षेला मूर्त रूप देण्यासाठीचा ड्राइव्ह, धाडसीपणा आणि कठोरपणाही त्यांच्यात होता. त्यांनी स्वतःला साधनशुचितेच्या बंधनात फारसं अडकवून घेतलं नाही. तरीदेखील लोक काय म्हणतील याचा ते नक्कीच विचार करत. त्याचबरोबर दूर पल्ल्याचं राजकारण करायचं असेल तर व्यवसायातही उत्तम जम बसवणं किती महत्त्वाचं आहे, याचं त्यांना पूर्ण भान होतं. त्यामुळेच १९७४ मध्ये पूना कॉफी हाऊस ताब्यात घेतल्यानंतर पुढील काही वर्षांत त्यांनी जंगली महाराज रस्त्यावरच ‘साई सर्व्हिस सेंटर' आणि पेट्रोल पंप सुरू केला. १९८५मध्ये साई सर्व्हिस स्टेशन लि. ही कंपनी स्थापन करून त्यांनी मारुती गाड्यांची डीलरशिप मिळवली. १९८६ मध्ये बजाज ऑटोची डीलरशिप घेतली. पुण्यातील पहिलीवहिली ‘रेंट-अ-कार' ही सेवा त्यांनी सुरू केली. साई कंपनीची मुंबई, कोल्हापूर, कोची आणि गोवा इथे भव्य दालनं सुरू केली. मारुती कंपनीचा उत्कृष्ट डीलर म्हणून चार वेळा पहिला क्रमांक पटकावला, तर बजाज ऑटोचा सर्वांत आघाडीचा डीलर म्हणून नावलौकीक मिळवला. अशा रीतीने ते व्यवसाय वाढवत गेले आणि पुढच्या काळात त्यांनी स्वतःची एक मोठी आर्थिक शक्ती उभी करण्यात चांगलंच यश मिळवलं.
पुण्याच्या राजकारणात मुसंडी
व्यवसायात जम बसवत असतानाच ऐंशीच्या दशकात कलमाडींनी पुण्याच्या राजकारणात जोरदार मुसंडी मारली. त्या काळी पुणे विद्यापीठातील ‘स्टुडंट्स कौन्सिल'च्या निवडणुकांना राजकारणात फार महत्त्व होतं. त्यामध्ये मुख्यत्वे काँग्रेसची विद्यार्थी संघटना असलेली एन.एस.यू.आय आणि अ.भा.वि.प.मध्ये चुरस असायची. एन.एस.यू.आय.च्या वतीने कलमाडी यांच्याकडे या निवडणुकांची पूर्ण सूत्रं आली. पुढील अनेक वर्षं कलमाडींनी एन.एस.यू.आय.ची पॅनेल्स निवडून आणली. त्यामुळे राज्यभरातील काँग्रेस विचारांशी बांधिलकी असणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत त्यांचं नाव पोहोचत गेलं.
कलमाडींची धडाडी खऱ्या अर्थाने दिसली ती १९८२च्या राज्यसभा निवडणुकीवेळी. तेव्हा कलमाडी पवारांच्या काँग्रेस (एस)मध्ये होते. त्या वेळी काँग्रेस (एस)कडे केवळ सहा की आठ आमदार होते. पण काँग्रेस व इतर अपक्ष आमदारांकडून ४५ मतांची बेगमी करून पवारसाहेबांनी कलमाडींना निवडून आणलं. कलमाडींच्या रूपाने पवारांनी एक खंदा, धडाडीचा आणि देशभर सर्व क्षेत्रांतील नामवंतांशी उत्तम संपर्क असलेला एक शक्तिशाली शिष्य मिळवला. कलमाडींनी पवारांच्या सहकार्य व मार्गदर्शनातून १९८३च्या ऑगस्ट महिन्यात पुणे शहरात ‘युथ फॉर नॅशनल रिकन्स्ट्रक्शन' या नावाने काँग्रेस विरोधी पक्ष व युवा संघटनांचं एक राजकीय संमेलन आयोजित केलं. चंद्रशेखर, फारूख अब्दुल्ला, आय. के. गुजराल, मोहन धारिया, हेमवतीनंदन बहुगुणा, अंबिका सोनी, प्रमोद महाजन, प्रकाश जावडेकर, ‘आसू' या आसाम विद्यार्थी संघटनेचे प्रफुलकुमार महंतो व भृगुकुमार फुकन, गुजरात नवनिर्माण आंदोलनातील नेते रोहित पटेल आदी अनेक राष्ट्रीय नेते या संमेलनात सहभागी झाले होते. संजय गांधींच्या आकस्मित अपघाती मृत्यूनंतर त्यांची पत्नी श्रीमती मनेका गांधी यांनी इंदिराजींपासून फारकत घेऊन घर सोडलं होतं आणि त्यांनी ‘संजय विचार मंच' या राजकीय पक्षाची स्थापना केली होती. त्याही या संमेलनात सहभागी झाल्या होत्या आणि त्यांची उपस्थिती चर्चेचा विषयही ठरली होती.
या संमेलनाच्या नियोजनासाठी सुरेश कलमाडी यांनी अनेक युवा व अनुभवी नेत्यांची मोट बांधली होती. त्यावेळी काँग्रेसविरोधी असलेल्या माझ्यासारख्या अनेक मित्रांनाही त्यांनी संयोजनात सहभागी करून घेतलं होतं. त्या महिना-दोन महिन्यांमध्ये कलमाडींचा उत्साह, रात्रंदिन काम करण्याची शारीरिक व मानसिक तयारी आणि कार्यक्षमताही मला जवळून पाहता आली. संमेलनासाठी येणाऱ्या राष्ट्रीय व विविध राज्यांतील नेत्यांच्या राहण्याची आणि प्रवासाची पंचतारांकित सोय करण्याचं त्यांचं नियोजन होतं. या राजकीय युवा संमेलनाचं वृत्तांकन ठळकपणे व्हावं म्हणून देशभरातील सर्व वर्तमानपत्रांचे प्रतिनिधी आणि त्यांचे मित्र असलेल्या प्रसिद्ध पत्रकार मंडळींना त्यांनी निमंत्रित केलं होतं. त्यांच्या निवासाची आणि मानमरातब राखून स्वागत करण्याची जबाबदारी कलमाडींनी मुकेश या त्यांच्या बंधूंसह माझ्यावर सोपवली होती. आगामी काळात कलमाडींच्या भपकेबाज कार्यशैलीची ती रंगीत तालीम होती. ती मी जवळून अनुभवली. १९८०मध्ये इंदिराजी पुन्हा एकदा पंतप्रधान झालेल्या असताना काँग्रेसविरोधी पक्ष व संघटनांची आघाडी उभी करण्याचा ‘बेधडकपणा' सुरेशभाईंनी पवारसाहेबांच्या साथीने दाखवला होता.
क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रावर मोहोर
१९८३मध्ये सुरेशभाईंनी पुण्यातील पहिलीवहिली आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन आयोजित केली. योगायोगाचा भाग म्हणजे पुण्यासारख्या शहराला मॅरेथॉन स्पर्धेचा इतिहास होता. १९१८ साली पुण्यातील डेक्कन जिमखाना क्लबच्या वतीने भारतीय ऑलिंपिक असोशिएशनची पहिली बैठक पार पडली होती आणि त्यामध्ये निर्णय झाल्यानुसार १९१९ साली शहरातील पहिली राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर त्या उपक्रमात खंड पडला होता. या स्पर्धेचं पुनरुज्जीवन करून त्याला आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्याचा मान कलमाडींकडे जातो.
पुढील एक-दोन वर्षांतच या स्पर्धेचं मोठ्या उत्सवात रूपांतर झालं. प्रत्येक वर्षीच्या स्पर्धेकरिता ‘रन फॉर फन अँन्ड फिटनेस', ‘रन टु फाइट अगेन्स्ट पोलिओ', ‘रन टु फाईट अगेन्स्ट एड्स', ‘रन फॉर सेव्हिंग गर्ल चाइल्ड', ‘रन फॉर ऑलिंपिक सपोर्ट', ‘रन फॉर रिलीफ फंड फॉर कारगिल मॉर्टिर्स', ‘रन फॉर रिलीफ फंड फॉर स्टॉर्म अफेक्टेड पीपल ऑफ आंध्र' इत्यादी स्वरूपाच्या आकर्षक घोषणा दिल्यामुळे पुणेकरांशी मॅरेथॉन स्पर्धेशी भावनिक नातंही जोडलं गेलं. तोपर्यंत शरद पवार काँग्रेसमध्ये परतले होते. १९८६ साली कलमाडींनी पंतप्रधान राजीव गांधी यांना मॅरेथॉनमध्ये पुण्यातील रस्त्याहून काही वेळ धावायला लावलं होतं. या स्पर्धेला झेंडा दाखवून प्रारंभ करण्यासाठी सोनिया गांधी, माजी पंतप्रधान आय. के. गुजराल, शरद पवार, विलासराव देशमुख, मनोहर जोशी, फारूक अब्दुल्ला, विजयकुमार गोयल, शशी थरूर, आदी राष्ट्रीय नेत्यांना पाचारण केलं गेलं. त्याचप्रमाणे जाहीर गौरव करण्यासाठी म्हणून मिल्खा सिंग, पी. टी. उषा, लिएंडर पेस, सुनील गावस्कर, अंजू बॉबी जॉर्ज, प्रकाश पदुकोण, कीर्ती आझाद, धनंजय पिल्ले आदी नामवंत क्रीडापटूंना विशेष आमंत्रित केलं गेलं. शशी कपूर, राजेश खन्ना, हेमा मालिनी, सलमान खान, आमिर खान, राहुल बोस यांसारखे अनेक चित्रपट अभिनेतेही त्यामध्ये उत्साहाने सहभागी व्हायचे. आजवर सुमारे ३५ हून अधिक देशांतील तसेच भारतातील अनेक राज्यांतील १५ लाखांहून अधिक धावपटूंनी या स्पर्धेत भाग घेऊन स्पर्धेची आणि पुण्याची कीर्ती जगभर पोहोचवली आहे. दिवंगत प्रल्हाद सावंत या क्रीडापटू व पत्रकाराने ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रक्त आटवलं होतं, हे या निमित्ताने नमूद करणं गरजेचं आहे.
या एका स्पर्धेमुळे पुढील काळात पुण्यातील म्हाळुंगे, बालेवाडी इथे भव्यदिव्य अशी ‘छत्रपत्री शिवाजी क्रीडानगरी' उभी राहण्याची बीजं रोवली गेली. नंतर याच ठिकाणी नॅशनल गेम्स (१९९४) आणि कॉमनवेल्थ युथ गेम्स (२००८) यांसारख्या स्पर्धांचं आयोजन यशस्वी करून कलमाडी यांनी पुण्याला नवीनच ओळख मिळवून दिली.
१९८८ साली सलग दुसऱ्यांदा राज्यसभेवर निवड झाल्यावर सुरेश कलमाडी यांची विविध इव्हेंट्सची मालिका अधिकच गतिमान झाली. १९८८ मध्ये ते एम.टी.डी.सी.चे चेअरमन झाले. पुढच्याच वर्षी १९८९ मध्ये पहिलावहिला ‘पुणे (गणेश) फेस्टिव्हल' आयोजित करण्याचं त्यांनी ठरवलं. त्यांच्या ‘इव्हेंट्स'चा आकृतिबंध ठरलेला होता. कोणताही कार्यक्रम वा उपक्रम असो, त्यामध्ये झगमगाट, भव्यदिव्य व्यवस्था, राष्ट्रीय व राज्यातील सर्वपक्षीय नेते, हिंदी चित्रपटसृष्टीतले प्रसिद्ध अभिनेते व अभिनेत्री, देशभरातील पाहुण्यांबरोबरच अनेक देशांतील परदेशी पाहुण्यांची उपस्थिती ठरलेली. बरोबरीनेच लक्षवेधक मिरवणूक आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित कलावंतांचा सहभाग असलेले वैविध्यपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रम या बाबी त्यांच्या इव्हेंटचा अविभाज्य भाग असायच्या. या प्रकारच्या इव्हेंटसाठी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारच्या पर्यटन विकास विभागांना संयोजक म्हणून सहभागी करून घेत असतानाच, मोठमोठ्या उद्योगसमूहांनाही त्याचा भाग बनवण्याचा चाणाक्षपणा कलमाडींनी दाखवला. एकाच वेळी शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करून समस्त पुणेकरांना महोत्सवाचा आनंद घेता येईल, अशी या फेस्टिवलची मूलतः रचना केली असल्याने कलमाडी हे पुणेकरांच्या आकर्षणाचा विषय बनले होते.
पहिल्या फेस्टिव्हलच्या वेळची एक आठवण सांगतो. त्या वेळी उपराष्ट्रपती असलेले आणि नंतर राष्ट्रपतिपदी निवड झालेले डॉ. शंकर दयाल शर्मा यांच्या हस्ते फेस्टिव्हलचं उद्घाटन होणार होतं. देशातील या प्रकारचे सर्वोच्च नेते जेव्हा कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होण्यास मान्यता देतात, त्या वेळी संयोजक संस्थेने त्यांना संभाव्य भाषणाचा मसुदा पाठवावा लागतो. सुरेशभाईंनी ही जबाबदारी माझ्यावर सोपवली होती. या प्रकारचं काम मी पहिल्यांदाच करत होतो. त्यामुळे मसूदा लिहून देण्यास माझ्याकडून दोन-तीन दिवस उशीर झाला. तेव्हा ते मला म्हणाले होते, ‘टाइम इज दि इसेन्स'! ही गोष्ट ते स्वत: कटाक्षाने पाळत होतेच. मी लगेचच दोन दिवसांत इंग्रजीतून मसुदा तयार करून त्यांच्याकडे सुपूर्त केला. त्यांना तो आवडलाही.
माझ्याकडे आणखीन एक काम असायचं. कलमाडींचं इंग्रजी संभाषणावर प्रभुत्व होतं; मात्र मराठीतून भाषण करताना त्यांच्यावर दडपण येत असे. त्यामुळे मी फेस्टिव्हलच्या उद्घाटनाआधी चार-पाच दिवस सकाळी ७.३० ला त्यांच्या घरी जायचो आणि भाषणाच्या सुरूवातीला काही वाक्यं मराठीतून बोलता यावीत म्हणून त्यांना सोपी वाक्यं लिहून द्यायचो. त्याबरोबर ती प्रत्यक्ष बोलण्याचा त्यांच्याकडून सरावही करून घ्यायचो. मराठी आपली भाषा नाही, परंतु पुण्यात किंवा महाराष्ट्रात मराठी बोलावंच लागणार आहे याची जाणीव ठेवत, त्यांनी त्याबाबत मेहनत करण्यात कोणताही कमीपणा मानला नाही. त्यासाठी आवश्यक तेवढा सराव करण्याचा कलमाडींचा गुण लक्षात घेण्यासारखा आहे.
पुणे फेस्टिव्हलचं काम ज्या हॉटेल पथिकवरून चालायचं त्याच्या संयोजनाची पूर्ण जबाबदारी सुरेश कलमाडी यांनी त्यांचे जुने मित्र कृष्णकांत कुदळे यांच्यावर सोपवली होती. कृष्णकांतजींनी त्या निमित्ताने एक भली मोठी टीम उभी केली. पुणे फेस्टिव्हलमध्ये १९८९ पासून आजपर्यंत जे कलावंत, नेते व पाहुणे येऊन गेले त्यांची यादी पाहिली, तर या संपूर्ण महाइव्हेंटच्या भव्यतेची आणि त्यातील वैविध्यपूर्ण परिमाणाची कल्पना येऊ शकेल. पहिल्या वर्षीचं ‘गणेश फेस्टिव्हल' हे नाव दुसऱ्या वर्षी बदललं आणि हा उत्सव शहराच्या नावे ओळखला जावा म्हणून ‘पुणे फेस्टिव्हल' हे नाव घेतलं. त्यावर भाजप व संघ परिवारातील काहींनी टीकाही केली होती. मात्र, पुढील वर्ष-दोन वर्षांतच त्यातील मंडळी ‘पुणे फेस्टिव्हल'मध्ये दरवर्षी उपस्थिती लावू लागली आणि हा विरोध मावळत गेला. विरोधकांना कसं हाताळावं हे कलमाडींना आधीपासूनच माहिती होतं. पुढील काळात तेच त्यांचं सामर्थ्य ठरत गेलं.
मॅरेथॉन स्पर्धा आणि पुणे फेस्टिव्हलपाठोपाठ कलमाडींनी जानेवारी १५ ते २५, १९९४ मध्ये भव्यतम राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन करून संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं. त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या शरद पवार यांच्या संपूर्ण सहकार्यामुळे कलमाडी यांनी म्हाळुंगे, बालेवाडी इथे ऑलिंपिकच्या मानकांनी सज्ज असलेली शिवछत्रपती क्रीडानगरी उभी केली. त्यासाठी त्यांनी महाराष्ट्र व केंद्र सरकारची संपूर्ण ताकद पणाला लावली होती. कलमाडींनी हा सारा आटापिटा केला, त्यामुळेच पुणे परिसरात विविध प्रकारच्या खेळांच्या सुविधा असलेली व्यवस्था उभी राहू शकली. पुढे २००८ साली याच क्रीडानगरीत कलमाडी यांनी राष्ट्रकुल युवा क्रीडास्पर्धा यशस्वी केल्या. १९९४ मधील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांच्या उद्घाटन व समारोपाची भव्यता ज्यांनी पाहिली असेल, त्यांच्या दृष्टीने तो अविस्मरणीय अनुभव म्हणता येईल. या निमित्ताने ‘कलमाडी काय चीज आहे' हे भल्याभल्यांना लक्षात आलं. त्यावेळचे पंतप्रधान नरसिंह राव आणि मुख्यमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत सांगता समारंभ पार पडला होता. त्या वेळी आयोजित केलेल्या सैन्यदलातील जवानांच्या साहसपूर्ण कसरती, श्यामक दावर आणि रेमो फर्नांडिस यांनी कोरिओग्राफ केलेलं आधुनिक नृत्यप्रकारांवर आधारित समूहनृत्य, आदी सांस्कृतिक कार्यक्रमांनी सगळ्यांच्या डोळ्यांचं पारणं फेडलं होतं. या इव्हेंटमुळे या प्रकारचं संयोजन फक्त सुरेश कलमाडीच करू शकतात, ते काहीही ‘मॅनेज' करू शकतात, असं पुणेकरांच्या मनावर चांगलंच ठसलं. तत्पूर्वी राजीव गांधी यांच्या हत्येनंतर लोकसभा निवडणुकीत, शरदराव पवार यांची पंतप्रधानपदाची दावेदारी भक्कम करण्याकरता कलमाडी यांनी भगीरथ प्रयत्न केले होते. या प्रयत्नांची माहिती लपून राहिली नव्हती.
याच काळात महाराष्ट्रात भलतंच राजकारण शिजत होतं. १९९४ मध्ये कलमाडींची राज्यसभेतील दुसरी टर्म संपणार होती, आणि आपल्याला तिसरी टर्म सहज मिळेल अशी त्यांना खात्री होती. मात्र राजकारणात काहीही गृहीत धरता येत नाही, हा धडा कलमाडींना मिळायचा होता. तेव्हा महाराष्ट्रातील काँग्रेसचं राजकारण शरद पवारांच्या हातात होतं. त्यांनी पाठवलेल्या यादीत कलमाडींचं नाव नसल्याची खबर कलमाडींना दिल्लीतील मित्रांकडून लागली. त्यामुळे कमलनाथसारख्या दिग्गज नेत्याच्या सहकार्याने कलमाडी यांनी जोरकस प्रयत्न करून पंतप्रधान नरसिंह राव यांच्या गटातून तिसऱ्या टर्मसाठी तिकीट मिळवलं. महाराष्ट्राच्या यादीत नाव नसताना कलमाडींना राज्यसभेची तिसरी टर्म मिळाली, याचा अर्थ पवारसाहेबांना लगेचच कळला. कलमाडी दिल्लीतील सत्ताधारी पक्षाच्या पवारविरोधी गोटात शिरले असल्याचं अनेकांच्या लक्षात आलं.
पवारांसोबत कित्येक वर्षांपासून जुळलेली नाळ तुटायला लागल्याचं प्रतिबिंब दोघांच्या ‘बॉडी लँग्वेज'मध्ये पडत असल्याचं कळत होतं. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा सुरू असतानाच हे सर्व नाट्य घडत होतं. कलमाडी यांचं मराठी व इंग्रजी भाषण मी तयार केलेलं असल्यामुळे शेवटच्या क्षणी काही बदल करायचे झाल्यास माझ्याशी बोलता यावं म्हणून सुरेशभाईंनी मला त्यांच्या मागील दोन रांगांजवळच बसायची सूचना केली होती. त्यामुळे बदललेल्या राजकारणाचे थोडे कवडसे मला टिपता आले होते.
राजकारणातील चढउतार
राज्यसभेत तिसरी टर्म मिळाल्यानंतर कलमाडींच्या राजकीय कारकिर्दीची रेल्वे स्वतंत्र रुळावरून धावू लागली. १६ सप्टेंबर १९९५ ते १६ मे १९९६ या कालावधीत कलमाडींना रेल्वे राज्यमंत्री म्हणून नरसिंह राव यांच्या मंत्रिडळात स्थान लाभलं. या खात्याचा स्वतंत्र कारभार सांभाळताना त्यांना अंदाजपत्रक मांडायचीही संधी लाभली. केवळ आठ महिन्यांच्या काळात त्यांच्या धडाकेबाज कार्यपद्धतीचा देशाला पुन्हा एकदा परिचय झाला. मुंबईतील ‘व्हिक्टोरिया टर्मिनस'चं नाव बदलून ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस' करण्याचा त्यांचा पहिलावहिला निर्णय फारच गाजला. त्याचबरोबर, पुण्याला रेल्वेचा एक स्वतंत्र विभाग (डिव्हिजन) म्हणून मिळालेली मान्यता, पुणे ते नाशिक रेल्वे सुरू व्हावी म्हणून सर्वेक्षण करण्याचे आदेश, पुणे रेल्वेस्थानकाचा केलेला कायापालट, पुण्यापासून अनेक शहरांना जोडणाऱ्या नव्या गाड्या सुरू करणं, आदी अनेक निर्णयांचा धडाकाच त्यांनी लावला होता. याच मालिकेतील आणखी एक निर्णय नमूद करणं गरजेचं आहे. जपानच्या एका कंपनीशी पुणे-मुंबई-अहमदाबाद शहरांना जोडणाऱ्या ‘बुलेट ट्रेन'च्या प्रकल्पाच्या वाटाघाटी करण्यास त्यांनी हिरवा कंदील दाखवला होता. त्यांना आणखीन वेळ मिळाला असता तर त्यांनी हा प्रकल्प १९९५-९६ मध्येच रेटून नेला असता, अशी मला खात्री वाटते.
मे १९९६ मध्ये लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि रेल्वेमंत्री म्हणून केलेल्या नेत्रदीपक कामगिरीच्या जोरावर त्यांना पुण्यातून काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळाली. जबरदस्त धडाकेबाज पद्धतीने प्रचार करून कलमाडींनी ती निवडणूक लढवली आणि भाजपच्या गिरीश बापट यांचा ८६,९९५ मतांनी पराभव करून ते निवडून आले. मात्र, या निवडणुकीत बहुमत न मिळाल्याने राष्ट्रीय पातळीवर काँग्रेस सत्तेबाहेर पडली आणि कलमाडींचं मंत्रिपदही गेलं. पण त्यामुळे पुण्यावरील कलमाडींचा प्रभाव कमी झाला असं मात्र घडलं नाही. बॅ. विठ्ठलराव गाडगीळ, जयंतराव टिळक, प्रकाश ढेरे या ज्येष्ठ नेत्यांचा प्रभाव ओसरून कलमाडी पुण्याच्या काँग्रेसचे सर्वेसर्वा बनले. पुणे महानगरपालिका आणि पुण्यातील विधानसभेच्या निवडणुकांवरही कलमाडींचं संपूर्ण वर्चस्व प्रस्थापित झालं.
राष्ट्रीय पातळीवर १९९६ ते ९८ या काळात राजकीय अस्थिरता होती. दोन वर्षांत दोन पंतप्रधान होऊन गेले होते. काँग्रेसही सत्ता गेल्यानंतर सीताराम केसरी यांच्या अध्यक्षतेखाली घसरणीला लागली होती. तेव्हा कलमाडींची गणना नरसिंह राव यांच्या गटात होत असे. पण आता काँग्रेसचं अध्यक्षपद रावविरोधी गटाकडे आलं होतं. त्यामुळे अस्थिरतेपायी निवडणुका लागल्या तर पक्षांतर्गत गटतटांमुळे आपल्याला तिकीट मिळणार नाही असं कलमाडींना वाटू लागलं असावं. परिणामी, २६ डिसेंबर १९९७ रोजी त्यांनी अचानकपणे दिल्लीत पत्रकार परिषद बोलावली आणि काँग्रेस पक्षाच्या आणखी काही खासदारांसह काँग्रेस पक्ष सोडण्याची धक्कादायक घोषणा केली.
पुण्यात ही बातमी पोहोचताच काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि जनसामान्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली. या पत्रकार परिषदेनंतर दोन-तीन तासानंतर कलमाडी यांनी पुण्यातील त्यांच्या राजकीय आणि अराजकीय मित्रांना फोन करून वरील निर्णयाबाबत कानोसा घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मलाही त्याच दिवशी फोन केला आणि हा निर्णय कसा वाटला, अशी विचारणा केली. मला हा निर्णय पटलेला नव्हताच. अशा पद्धतीने पक्षांतर करणं पुणेकरांना आवडणार नाही, असं मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं. हे ऐकल्यावर त्यांच्या स्वरात नाराजी उमटल्याचं मला फोनवर जाणवलं.
१९९८मध्ये लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि काँग्रेस पक्ष सोडलेल्या कलमाडी यांनी ‘पुणे विकास आघाडी'मार्फत लोकसभा निवडणूक लढवण्याचं ठरवलं. त्यांच्याजवळील काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची पंचाईत झाली होती. नव्या परिस्थितीत कलमाडींना भाजप व शिवसेनेच्या नाकदुऱ्या काढाव्या लागणं हे स्वाभाविकच होतं. शिवसेनेने पाठिंबा द्यावा म्हणून कलमाडींचे स्नेही असलेल्या फारूक अब्दुल्ला यांनी बाळासाहेब ठाकरे यांना गळ घातली आणि त्यांचं मन वळवलं. भाजपमधील प्रमोद महाजनांशी सुरेशभाईंची दोस्ती होतीच. निवडणुकीनंतर भाजपला काही खासदार कमी पडले तर कलमाडीसारखा तरबेज नेता अनेक खासदारांना ‘मॅनेज' करू शकेल, असाही विचार प्रमोद महाजन यांनी केला असावा. अखेर भाजप व शिवसेनेने कलमाडींच्या उमेदवारीला पाठिंबा जाहीर केला.
दुसऱ्या बाजूस शरद पवारांनी काँग्रेसच्या वतीने विठ्ठल तुपे या पूर्वाश्रमीच्या समाजवादी नेत्यास कलमाडींच्या विरोधात उभं केलं. कलमाडीविरुद्ध तुपे या लढाईत काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची फार कुचंबणा झाली. आज कलमाडी काँग्रेसबाहेर असले, तरी आज ना उद्या ते काँग्रेसमध्ये येऊन पुन्हा आपल्या डोक्यावर बसणार हे काँग्रेसींना चांगलंच ठाऊक होतं! त्यामुळे त्यांच्याशी थेट वाकडं घ्यायला कुणी तयार नव्हतं. कलमाडींच्या अगदी जवळ असणाऱ्या काँग्रेसजनांनीही तारेवरची कसरत करत आतून कलमाडी यांचं काम करण्याचं आणि उघडपणे काँग्रेस पक्षासोबत राहण्याचं ‘दूरदृष्टी'चं धोरण अवलंबलं. माझ्यासारख्याने विठ्ठल तुपे यांचा जाहीर प्रचार केला.
कलमाडींच्या प्रचारार्थ दस्तुरखुद्द अटलजींनी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणात मोठी सभा केली. भाजप व शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्त्यांनीही कलमाडी यांच्या आर्थिक औदार्याचा अनुभव घेत त्यांचा प्रचार केला. मात्र, या गाजलेल्या निवडणुकीत कलमाडींची ‘बेडूक उडी' फसली आणि विठ्ठल तुपे तब्बल ९३,२१८ मतांच्या अधिक्याने निवडून आले.
पण या पराभवाने खचून गेले तर ते कलमाडी कसले..! त्यांनी दिल्लीला येऊन पुन्हा एकदा सारी जुळवाजुळव केली. राजकारणाच्या मुख्य प्रवाहात राहिल्याशिवाय सत्तेच्या मॅरेथॉनमध्ये टिकून राहणं शक्य नाही हे त्यांना चांगलंच ठाऊक होतं. त्यामुळे त्यांनी १९९८ मध्येच अपक्ष म्हणून राज्यसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्रातील अनेक काँग्रेस व अपक्ष आमदारांचं ‘अर्थपूर्ण' सहकार्य मिळवलं. त्यापायी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार व गांधी परिवाराचे निकटवर्ती माजी केंद्रीय सचिव राम प्रधान यांचा पराभव झाला.
राजकारण हे सदासर्वदा गतिमान राहत असतं आणि राजकीय धकाधकीत वैयक्तिक रागलोभ फार काळ टिकून राहत नाही याची प्रचिती लोकांना त्या काळात येतच होती. सोनिया गांधी यांच्या परदेशी जन्माचा मुद्दा उपस्थित करत १० जून १९९९ला शरद पवार काँग्रेस पक्षातून बाहेर पडले आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना करण्याचं जाहीर केलं. पवारांच्या धक्कादायक तंत्राचा फटका बसलेल्या काँग्रेसच्या हायकमांडला कलमाडींसारख्या कुशल संघटक असलेल्या मातब्बर नेत्यास फार काळ दूर ठेवणं व्यवहार्य वाटलं नाही. कलमाडी परत काँग्रेस पक्षात दाखल झाले. त्यानंतर लगेचच सप्टेंबरमध्ये महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादी हे स्वतंत्रपणे लढले, तर शिवसेना आणि भाजपची युती आधीपासून होतीच. या निवडणुकीत कलमाडींकडे राज्याच्या प्रचार समितीची जबाबदारी सोपवली गेली होती.
लोकसभेत पुनर्प्रवेश
राष्ट्रीय पातळीवर वाजपेयींचं १३ महिन्यांचं सरकार कोसळल्यामुळे १९९९ मध्ये देशाला पुन्हा निवडणुकांना सामोरं जावं लागलं. पुण्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील तिरंगी लढतीत भाजपचे प्रदीप रावत विजयी झाले. काँग्रेसचे मोहन जोशी दुसऱ्या क्रमांकावर, तर विद्यमान खासदार असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे विठ्ठल तुपे तिसऱ्या क्रमांकावर गेले. त्यानंतर २००४मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षातर्फे कलमाडींना पुन्हा संधी मिळाली. प्रचाराच्या तयारीचा भाग म्हणून एका सायंकाळी कलमाडी हाऊसवर सुरेशभाईंबरोबर आमच्या अनौपचारिक गप्पा सुरू होत्या. त्या वेळी बोलता बोलता मी ‘विकासाची आघाडी सुरेश कलमाडी' हे प्रचाराचं मुख्य ब्रीद असावं असं सुचवलं. त्यांना ही ‘थीम' खूपच आवडली आणि त्यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना ही थीम सर्व शहरभर जाऊ द्या, अशा सूचना दिल्या. अशा तऱ्हेने या निवडणुकीत मी हिरिरीने सहभागी होण्याची सुरूवात झाली.
या निवडणुकीच्या प्रचारात रोजचा ‘पंच' काय असला पाहिजे, भाषण व पत्रकार परिषदेसाठी महत्त्वाचे मुद्दे कोणते असले पाहिजेत, तसेच भाजपच्या रोजच्या प्रचाराला नेमकं प्रत्युत्तर काय द्यायचं, या संदर्भात काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेशभाई सोनावणे आणि मी काम सुरू केलं. आदल्या दिवशीच्या ठळक घटना आणि प्रचाराचं नियोजन करण्यासाठी कलमाडी हाऊसवर त्यांच्यासोबत रोज सकाळी आठ वाजता एक बैठक व्हायची. या बैठकीत पक्षातील आणि पक्षाबाहेरील अनेक विचारशील मंडळींसमवेत चर्चा व्हायची. प्रत्येकाने आपल्या कामाचा अहवाल थोडक्यात सादर करणं अपेक्षित असायचं. डॉ. सतीश देसाई आणि प्रवीण वाळिंबे यांच्यावर प्रसिद्धी समितीमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी होती. बैठकांना माझ्यासह डॉ. देसाई, सुरेश सोनावणे, वंदना चव्हाण, रंगा गोडबोले, आनंद अवधानी, डॉ. शैलेश गुजर, काका धर्मावत, उस्मान हिरोली आदी नियमितपणे हजर असायचे. काँग्रेस भवनवर होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकींना उल्हासदादा पवार, चंद्रकांत छाजेड, विजय नालम, मोहन जोशी, कमलताई व्यवहारे, रजनी त्रिभुवन, राजलक्ष्मी भोसले, अभय छाजेड, वंदना चव्हाण, शरद रणपिसे, बाळासाहेब शिवलकर, श्रीकांत शिरोळे, धनंजय थोरात, दीप्ती चवधरी, रमेश बागवे, अंकुश काकडे, शांतिलाल सुरतवाला, आबा बागुल, अरविंद शिंदे, नीता परदेशी, संगीता तिवारी, अंजनी निम्हण, संजय बालगुडे, ऍड. जयदेव गायकवाड, रियाझ वस्ताद, दीपक मानकर, अनिल सोंडकर, बाळासाहेब दाभेकर, दत्ता एकबोटे, अजित दरेकर, रमेश अय्यर, बाळासाहेब अमराळे, नुरुद्दिन सोमजी, विठ्ठल मेहता आदी जुनीजाणती मंडळी सहभागी व्हायची. त्या वेळचे महापौर दत्ता गायकवाड यांच्यावर कलमाडी हाऊसवर सुरेशभाईंना सकाळी भेटायला येणाऱ्या नेत्यांचं व पाहुण्यांचं स्वागत करण्याची खास जबाबदारी होती. दिलेलं काम चोखपणे पार पाडलं नाही तर आपली काही खैर नाही, याचा धसका घेतलेला असल्यामुळे कामं नीट पार पाडली जात.
कोणी एखादी गोष्ट, बातमी वा सूचना केली की, ‘ही कल्पना कशी वाटते', असं विचारण्याची कलमाडींची सवय होती. अर्थात ते करायचे ते स्वतःच्या मनाचंच!
मुळात वैमानिक असलेल्या कलमाडींचा चुटकीसरशी निर्णय घेण्याचा स्वभाव होता. मात्र, त्यांच्या कामाची विलक्षण गती आणि धडाकेबाज पद्धत यामुळे त्यांच्याबरोबर जुळवून घेणं अनेक नेत्यांना, व्यावसायिकांना आणि कार्यकर्त्यांनाही जमायचं नाही. त्यांची दमछाक व्हायची. परिणामी, आधीच तापट स्वभावाचे असलेले सुरेशभाई खूपच चिडायचे. अशातच सकाळी कोणी मोठ्या नेत्याने एखादी प्रतिकूल बातमी वा प्रतिक्रिया कानावर घातलेली असली की मग काय विचारता! जो पहिला भेटेल त्याच्यावर कलमाडींच्या ‘रागदारी'चा फुगा फुटायचा! पण हेही खरं, की त्यांचा रागाचा पारा झटदिशी खालीही यायचा. रोज सकाळी सुरेशभाईंचा रक्तदाब तपासणारे त्यांचे बंधू डॉ. प्रकाश कलमाडी सुरेशभाईंना ‘किमान ब्लडप्रेशर तपासताना तरी शांत राहत जा नं', असं सांगायचे, तेव्हा सतीश देसाई की रंगा गोडबोले यापैकी कोणी तरी बोलून गेलं, की ‘प्रकाशभाई, आमच्या सर्वांचंही बीपी तपासा..!' हे ऐकताच सुरेशभाईंसह आम्ही सारेच हास्यकल्लोळात बुडालो.
कलमाडींच्या आक्रमक स्वभावाला न घाबरता स्पष्टपणाने अप्रिय गोष्टीदेखील सांगणारे अगदी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकेच नेते होते. त्यामध्ये सुरेश सोनावणे, व वंदना चव्हाण महत्त्वाचे. सुरेश सोनावणे तर कलमाडींना राजकीय वास्तवाची स्पष्टपणे जाण करून द्यायला अजिबात मागेपुढे पाहत नसत. सोनावणे अभ्यासू होते. त्यांचे मुद्दे बिनतोड व निवडणुकीसाठी फायद्याचेच असल्याने कलमाडी त्यांचं मत निमूटपणे ऐकून घेत. पण ते वगळता बाकीच्यांच्या दृष्टीने कलमाडी मास्तरांच्या शाळेतील सकाळचा हा तणावयुक्त तास संपला की चेहऱ्यावर ‘सुटलो एकदाचे' असा भाव असायचा!
कलमाडींच्या इनर सर्कलमध्ये निवडणुकीच्या काळात त्यांच्या या रागलोभाची चर्चा नेहमीच व्हायची. सुरेश सोनावण्यांनी तर मीराभाभींना सांगितलं, की ‘सुरेशला जरा सांगा, तो नक्की निवडून येणार आहे. तो एवढी चिडचिड का करतो?' दुसऱ्याच दिवशी मीराभाभींनी कलमाडींना एका आध्यात्मिक गुरुजींकडे नेऊन आणलं. राग येऊ नये वा त्याच्यावर नियंत्रण असावं म्हणून गुरुजींनी सुरेशभाईंना बोटात घालायला दिलेली अंगठी त्यांनीच आम्हा सर्वांना दाखवली. तेव्हा त्यांच्या मागे असणाऱ्या श्रीकांत शिरोळे यांनी आपल्या हजरजबाबीपणाची वकिली चमक दाखवत ‘तुम्हाला एका अंगठीने काय होणार? तुम्हाला तर अंगठ्यांची माळच घालावी लागेल', असं उच्चारता क्षणीच भवताली हास्याचं मोठं कारंजं उडालं!
कलमाडींचा स्वभाव शीघ्रकोपी व रागीट असला तरी त्यांचं मन उदार होतं. खर्च वा कार्यकर्त्यांना पैसे देण्याबाबत त्यांचं मन मोठं होतं. कार्यकर्ते असोत वा नेते, किंवा वेगवेगळ्या सेवा देणारे सर्व्हिस प्रोव्हायडर, काम उत्कृष्ट दर्जाचं झालं तर ते मोबदलाही खणखणीत द्यायचे. त्यांची ही ‘दिलदारी' अक्षरशः हजारो लोकांनी अनुभवलेली आहे.
शहरविकासाचा धडाका
कलमाडी ऐंशीच्या दशकात राजकारणात आलेले असले तरी साधारणपणे १९९० पासून शहरविकासाच्या कामात लक्ष घालू लागले. १९९४ व २०१० मधील क्रीडास्पर्धांच्या निमित्ताने पुणे शहरातील रस्त्यांचं रुंदीकरण, सुशोभीकरण, विविध सेवासुविधा उभारणं, आदी कामांना गती मिळाली. पुण्याच्या विकासात विविध क्षेत्रांतील मान्यवर तज्ज्ञांचा सहभाग मिळावा या हेतूने कलमाडी यांनी ‘पुणे व्यासपीठ' सुरू केलं. त्यामार्फत शहराच्या सर्वांगीण विकासाबाबत सांगोपांग चर्चा होऊ लागल्या आणि त्यानुसार पुणे मनपा ते केंद्र सरकारमध्ये विविध प्रकारच्या विकासयोजना आखल्या जाऊ लागल्या. अशाच बैठकीतून ‘परिसर' संस्थेच्या सुजित पटवर्धन आणि सहकारी मित्रांनी त्यांच्यापुढे कोलंबियाच्या ‘बोगोटा' शहरातील ‘बीआरटी' म्हणजेच ‘बस रॅपिड ट्रान्झिट'विषयी प्रभावी सादरीकरण केलं होतं. ती कल्पना कलमाडींनी उचलून धरली आणि जेएनएनयूआरएममार्फत बीआरटीचे मार्ग बनवले गेले. ती योजना विविध कारणांमुळे वादग्रस्त बनली आणि तिचा पुणेकरांना लाभ होऊ शकला नाही; पण त्याला कलमाडी यांना जबाबदार धरणं सयुक्तिक ठरणार नाही.
सुरेश कलमाडी हे ‘हाय प्रोफाइल' आणि उच्चभ्रू समाजातील राजकारणी म्हणून ओळखले जात असले, तरी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक, आमदार आणि शासकीय अधिकारी यांच्यामार्फत झोपडवासीयांपर्यंत विविध विकास योजना पोहोचवण्याबाबतही त्यांचं बारीक लक्ष असायचं. ‘जेएनएनयूआरएम'सारख्या शहरांच्या पुनर्विकासासाठी केंद्रीय योजनांतर्गत शहरातील पायाभूत सुविधांचं नूतनीकरण करणं, शहरातील वाहतूक व्यवस्था सुधारण्याकरता नव्या बसेस घेणं, तसंच पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या टेकड्यांवर वा नदीकिनारी राहणाऱ्या गोरगरिबांचं पुनर्वसन करण्याकरिता झालेल्या निर्णयांची नीट अंमलबजावणी होत आहे की नाही, याबाबत कलमाडी आपल्या व्यग्र वेळापत्रकातून खास लक्ष देत असत. विविध कामांची प्रगती कशी सुरू आहे याची माहिती ते नगरसेवक व मनपातील पक्षाचे पदाधिकारी व अधिकारी यांच्याकडून वरच्यावर घेत असत. त्यामुळे विशेषतः नगरसेवक व इतर पदाधिकाऱ्यांना नेहमीच ‘अलर्ट मोड'मध्ये राहावं लागत असे. कधी बॉसचा फोन येईल आणि ते काय विचारतील याची पदाधिकाऱ्यांना धास्ती असे.
त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे पुण्यात कलमाडी आणि काँग्रेस यांचा प्रभाव तयार झाला. त्यातून १९९२, १९९७ आणि २००२ साली झालेल्या मनपाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाला प्रचंड यश लाभलं. कलमाडींची एकहाती सत्ताही अधिक भक्कम झाली. ते सतत दिल्लीत असत आणि मुख्यत्वेकरून शुक्रवारी पुण्याला येत असत. शनिवार व रविवारी दिवसभर विविध कार्यक्रमांत सहभागी होत. राजकीय नेते, पदाधिकारी व नागरिकांच्या भेटीगाठी घेत. विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांबरोबर विचारविनिमय करत. विशेषतः शासकीय यंत्रणेला कामाला लावणं आणि त्यांच्यावर सतत दबाव ठेवण्याबाबत त्यांचा कोणीही हात धरू शकायचं नाही.
त्यांनी मार्गी लावलेल्या अनेक कामांमध्ये बंद पाइपलायनीतून शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासारख्या महत्त्वाच्या कामाचा समावेश होता. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) योजनेअंतर्गत प्रत्येक झोपडीधारकाला २५० स्क्वेअर फुटांऐवजी ३५० स्क्वेअर फुटांचं घर मिळावं म्हणून कलमाडींनी हजारो झोपडपट्टीवासीयांचा काँग्रेसभवन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भर पावसात एक भला मोठा मोर्चा काढला होता. त्या वेळी मुख्यमंत्री असलेल्या विलासराव देशमुख यांनी त्यांची ही मागणी मान्य केली. मनपा शाळांमधून शिकणाऱ्या गरीब कुटुंबांतील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळेल, त्यांना आधुनिक सेवासुविधा उपलब्ध होतील, संगणकाचं मूलभूत ज्ञान मिळेल याबद्दलही ते सतर्क होते. त्याचबरोबर, शहरातील सार्वजनिक आरोग्यसेवा सुधारण्यावर आणि मनपाचे दवाखाने व इस्पितळामध्ये अत्याधुनिक तांत्रिक व तंत्रज्ञानाच्या सेवा मिळाव्यात यासाठीही ते प्रयत्नशील असायचे. कलमाडींच्या सत्तेचा सूर्य जेव्हा तळपत होता, त्या काळात त्यांनी कमल व्यवहारे, वंदना चव्हाण, वत्सला आंदेकर, दीप्ती चवधरी आणि रजनी त्रिभुवन या महिलांची महापौर म्हणून निवड केली होती. त्यापैकी कमल व्यवहारे पहिल्या महिला महापौर ठरल्या, तर रजनी त्रिभुवन या दलित समाजातील पहिल्या महापौर ठरल्या. नजमा खान या पहिल्या मुस्लिम महिला उपमहापौर झाल्या.
कलमाडींचं एक वैशिष्ट्य म्हणजे विविध पक्षांचे नेते, विविध धर्मांतील धर्मगुरू आणि विविध क्षेत्रांतील कार्यकर्ते यांच्याशी त्यांचे चांगले संबंध होते. भाजपचे प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, अण्णा जोशी, अनिल शिरोळे, गिरीश बापट यांच्याशी त्यांची छान मैत्री होती. तसंच समाजातील सर्व थरांतील लोकांशी, शासकीय यंत्रणेशी, वृत्तपत्रादी माध्यमं, पत्रकार, एन.जी.ओ., सामाजिक संघटना व अनेक गणेश मंडळांशी त्यांचे उत्तम वैयक्तिक संपर्क व संबंध होते. असंख्य लोकांना, संस्थांना, संघटना, युवक व महिला संघटनांना वेळोवेळी, अडीअडचणीला सर्व प्रकारचं सहकार्य व मदत करण्यास ते कधी कचरले नाहीत.
या संदर्भाने एक उदाहरण बघण्यासारखं आहे. टेकड्यांवरील आरक्षण उठवून तिथे (सर्व्हे क्र. ४४) बांधकाम करण्यास ए.व्ही. भट या विकसक कंपनीला १९८८ साली राज्यसरकारने परवानगी दिल्यामुळे पुण्यातील ‘परिसर', ‘वनराई', ‘सोशल सिव्हिक ऍंड एन्व्हायर्नमेंट फोरम', ‘सेव्ह पूना कमिटी', ‘लोकविज्ञान संघटना' आदी अनेक पर्यावरणवादी संस्थांनी आंदोलनाचा आणि न्यायालयाचं दार ठोठावण्याचा पवित्रा घेतला होता. या संस्थांनी केलेल्या प्रयत्नांना यश लाभलं आणि टेकड्यांवरील आरक्षण उठवण्याचा निर्णय रद्द झाला. या कामी त्या वेळी काँग्रेसचे शांतिलाल सुरतवाला, वंदना चव्हाण, आदी नेत्यांनी सेवाभावी संस्थांना जोरकस साथ दिली होती. पक्षांतर्गत प्रभावी दबावाचा परिणाम म्हणून शहराच्या विकास आराखड्यात (डेव्हलमेंट प्लॅन) टेकड्यांवरील तसंच सार्वजनिक सेवासुविधांसाठीचं आरक्षण कायम ठेवण्याच्या धोरणाचं कलमाडी यांनी नेहमीच समर्थन केलं.
एकंदरीतच, त्यांनी पुढाकार घेऊन केलेल्या असंख्य कामांची आणि सांस्कृतिक व क्रीडास्पर्धांच्या वैविध्यपूर्ण उपक्रमांची यादी फार मोठी होईल. गणेश कला-क्रीडा हे टोलेजंग सभागृह ही त्यांचीच भेट आहे. प्रत्येक कार्य वा उपक्रमास योग्य ती प्रसिद्धी मिळेल याबाबत ते अतिशय जागरूक असत. त्यामुळे पुणेकरांना हा नेता कोणत्या ना कोणत्या कामात असल्याचं आणि त्यांच्या हातून विकासाची कामं होत असल्याचं सतत दिसत रहायचं.
जाता जाता आणखी एक मुद्दा नोंदवावासा वाटतो. बाबरी मशीद पडल्यामुळे देशभर दंगली झाल्या असल्या तरी पुणं पूर्णपणे शांत होतं. त्यादृष्टीने कलमाडी यांची भूमिका आणि धडपड फार महत्त्वाची होती.
कलमाडींची कार्यशैली
पुणे हे देशातील आधुनिक सेवासुविधायुक्त अग्रगण्य शहर बनवायचं कलमाडींचं स्वप्नं होतं. त्या दृष्टीने त्यांचे सर्वंकष प्रयत्न सुरूच होते. टप्प्याटप्प्याने झोपडपट्टीवासीयांचं पुनर्वसन करण्यासाठीही त्यांनी कंबर कसली होती. बीआरटीसारख्या योजनेचाही विचार सुरू झाला होता. त्याचबरोबर म्हणजे साधारणतः २००१ पासून कलमाडींनी ‘मेट्रो' प्रकल्पाचा पाठपुरावा करण्याचं काम सुरू केलं होतं. मेट्रो प्रकल्पाची उपयुक्तता त्यांनी दिल्लीमध्ये पाहिली होती. पुण्यासारख्या त्या वेळी २५ लाख लोकसंख्या असलेल्या शहरामध्ये सार्वजनिक वाहतुकीचे वेगवेगळे आणि आधुनिक पर्याय शोधण्याची गरज त्यांच्यासह अनेक नियोजनकारांना जाणवत होती. पुण्यासारख्या ऐतिहासिक शहराच्या मध्य भागातील दाट वस्ती आणि जागेची मर्यादा लक्षात घेता, लोक शहराच्या बाह्य भागात निवासासाठी पर्याय शोधतील आणि शहराची चोहीकडून वाढ होईल, या वास्तवाचं त्यांना भान होतं. अशा परिस्थितीत सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम, कार्यक्षम आणि स्वस्त केल्यास लाखो पुणेकरांचं जीवन सुसह्य होऊ शकेल याबद्दल त्यांच्या मनात स्पष्टता होती. २००८ मध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पुणे दौऱ्यात त्यांनी पंतप्रधानांना मेट्रोची निकड प्रभावीपणे पटवून दिली होती. अखेरीस २८ जून २०१२ रोजी राज्य सरकारने मेट्रोचा सविस्तर प्रकल्प प्रस्ताव सादर केला आणि जानेवारी २०१३ मध्ये केंद्रीय नागरी विकास मंत्री कमलनाथ आणि केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या समवेत झालेल्या बैठकीत या प्रकल्पाला तत्वतः मंजुरी लाभली. त्या वेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीदेखील कलमाडींनी ‘मेट्रो'साठी केलेल्या पाठपुराव्याचं जाहीर कौतुक केलं होतं.
सुरेश कलमाडी यांची कार्यपद्धती आक्रमक आणि प्रसिद्धिभिमुख होती. पुण्यासारख्या शहरात राजकारणात जम बसवायचा असेल तर कोणत्या ना कोणत्या प्रकारे सतत प्रकाशझोतात राहिल्याशिवाय लोकांचं लक्ष आपल्याकडे जाणार नाही याची त्यांनी मनाशी खूणगाठ बांधली होती. त्याचप्रकारे धडाकेबाज राजकारण केल्याशिवाय सार्वजनिक क्षेत्रात आपलं कामही लोकांच्या मनावर ठसणार नाही, असंही कलमाडींनी मनोमन पक्कं केलं होतं. सतत लोकांच्या नजरेत राहण्यासाठी मोठमोठे आणि चमकधमक असलेले कार्यक्रम (इव्हेंट्स) आयोजित करणं आणि त्यामध्ये वलयांकित नेते, अभिनेते, सामाजिक कार्यकर्ते, खेळाडू, आदींना सहभागी करून घेण्याची त्यांना विलक्षण गती होती. त्यामुळेच सुरेश कलमाडी म्हणजे सदैव कामात असणारा नेता, अशी प्रतिमा उभी राहण्यास हातभार लागला. त्या कारणास्तव हवा तेवढा पैसा खर्च करण्याची त्यांची सदैव तयारी व मनाची उदारता होती. एखादा मुद्दा वा कार्यक्रम जर त्यांना भावला आणि त्यामधून स्वतःचं राजकारण दोन पावलं पुढे जाण्याची शक्यता लक्षात आली की ते त्यामागे पूर्ण ताकदीनिशी उभे राहत आणि तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वस्व पणाला लावत. त्यांच्यातील प्रचंड ऊर्जा, उत्साह, अहोरात्र काम करण्याची शक्ती (स्टॅमिना) आणि गतिमान कार्यपद्धती लक्षात घेता भल्या भल्या कार्यकर्त्यांना व पुढाऱ्यांना त्याचं दडपण असे. कलमाडींना एक क्षणभरही दमलेलं, डोळे मिटून शांत बसून राहिलेलं मी २०१४ पर्यंत तरी पाहिलेलं नाही. २०१४ नंतर सारंच बदललं.
कलमाडी पुण्याचे सर्वशक्तिमान नेते बनलेले असताना आणि त्यांचं आक्रमक नेतृत्व नवनवीन क्षेत्रं पादाक्रांत करत असताना त्याचा परिणाम पुण्यातील पक्षसंघटनेचं स्वरूप, पक्षाचे कार्यक्रम आणि राजकारणावरही पडला. परिणामी, पक्षाची कार्यपद्धती आणि कार्यसंस्कृती बदलल्याचं दिसू लागलं. कलमाडी यांचं ‘लार्जर दॅन लाइफ' पद्धतीचं नेतृत्व विकसित होत असताना ‘कॉम्रेडशिप'ची भावना लोप पावत गेली आणि एका नेत्याची हुकमत वाढल्याने राजकारण त्यांच्याच भोवती फिरू लागलं. त्यांच्या विशाल सावलीत नवं नेतृत्व तयार होणं अवघडच होतं. त्यांच्या काळात ‘फाइव्ह स्टार कल्चर' बळावल्यामुळे आणि त्याचबरोबर शीघ्रकोपी स्वभावामुळे अनेक जुने कार्यकर्ते पक्षापासून दूर राहू लागले. तर काहीजण विरोधी गटात राहून स्वतःला झेपेल त्यानुसार राजकारण करू लागले. कलमाडींची कार्यशैली, जो त्यांचा प्लस पॉईंट होता, तोच पुढे वीक पॉइंट बनत गेला आणि त्याचा पुढे त्यांना मोठाच फटका बसला.
२००७ च्या पुणे मनपाच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस कलमाडींच्या विरोधात उभी ठाकली. त्या वेळी पवारसाहेबांनी केलेल्या ‘पुण्याचा कारभारी बदला' या गाजलेल्या आवाहनाचा मतदारांवर मोठा परिणाम झाला. राष्ट्रवादीला ४२ जागा मिळाल्या, तर काँग्रेसला ३५ जागा. या बदललेल्या परिस्थितीत कलमाडींच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्षाला मनपाच्या सत्तेबाहेर ठेवण्यासाठी राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेना यांनी एकत्र येऊन ‘पुणे पॅटर्न' तयार केला. जवळपास १५ वर्षांच्या कालावधीनंतर कलमाडींच्या एकहाती सत्तेला मोठा धक्का बसला होता. अशाही परिस्थितीत कलमाडींनी २००८ मध्ये तिसऱ्या राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धांचं पुण्यात भव्यदिव्य आयोजन करून या स्पर्धा यशस्वी केल्या. तसंच, २००९च्या लोकसभा निवडणुकीत कलमाडींनी भाजपचे अनिल शिरोळे यांना पराभूत करून आपली खासदारकीही टिकवली.
टर्निंग पॉइंट
२००९ हे वर्ष सुरेश कलमाडींच्या मॅरेथॉन राजकीय कारकिर्दीचा टर्निंग पॉइंट म्हणता येईल. तेव्हा क्रीडानगरी आणि आयटी-हब म्हणून पुण्याचं नाव देशभर आणि जगभर पोहोचवणारा जिद्दीचा नेता म्हणून ते देशभर ओळखले जात होते. कलमाडी म्हटलं की पुणे शहर, मॅरेथॉन, पुणे फेस्टिव्हल, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धा, पुणे आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल आदी सप्तरंगी उपक्रम डोळ्यांसमोर येत. मात्र, या नेत्याच्या धडाकेबाज राजकीय कारकिर्दीला २०१० मधील राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांमधील भ्रष्टाचाराच्या प्रकरणामुळे ग्रहण लागलं. राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेच्या संयोजन समितीचे प्रमुख म्हणून सर्वाधिकार असलेल्या कलमाडींना विविध स्पर्धांच्या निकालांशी संबंधित तंत्रज्ञानाचं कंत्राट चढ्या रकमेने एका स्विस कंपनीला दिल्याच्या आरोपाखाली सीबीआयने २५ एप्रिल २०११ रोजी अटक केली. भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांखाली त्यांना सुमारे नऊ महिने तिहार जेलमध्ये राहावं लागलं. पुढे त्यांना जामीन मिळाला तरी देश व परदेशांत त्यांची मोठी बदनामी झाली.
घराचे वासे फिरले की पूर्ण वाताहतीला सामोरं जावं लागतं असं म्हटलं जातं. नेमका हाच अनुभव कलमाडींना आला. अटकेच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना राष्ट्रकुल क्रीडास्पर्धांच्या संयोजन समितीच्या अध्यक्षपदावरून हटवण्यात आलं. लगोलग काँग्रेस पक्षातूनही काढून टाकण्यात आलं. दिल्ली उच्च न्यायालयानेही २५ जुलै २०१२ रोजी एक आदेश काढून कलमाडींना लंडन येथील ऑलिंपिक स्पर्धांच्या उद्घाटन समारंभात भारताचं प्रतिनिधित्व करण्यास मज्जाव केला.
अनेक वर्षं सर्वशक्तिमान बनून राहिलेल्या या नेत्यास अगदी थोडक्या दिवसांत धक्क्यावर धक्के बसत गेले. त्यांना देशभर आणि जगभरातील क्रीडाविश्वात मानहानीला सामोरं जावं लागलं. पुणे शहरातही विविध क्षेत्रांतील लोकांची नाराजी, टीका व निषेधाचे सूर उमटू लागले. काहींनी तर त्यांच्या खासदारकीचा राजीनामाही मागितला. ज्या पुणे शहरावर त्यांनी अनेक वर्षं अक्षरशः राज्य केलं आणि जिथे ते आदल्या वर्षीच खासदार म्हणून निवडून आले होते, त्याच शहरात वर्षभराच्या अंतराने नेहमीच्या रुबाबात फिरणं त्यांना अशक्य होऊन बसलं. एक-दोन सार्वजनिक कार्यक्रमांत अपमानही सहन करावा लागला. एक आक्रमक आणि जोशपूर्ण व्यक्तिमत्त्व असलेल्या या नेत्याच्या प्रतिमेस आणि आत्मविश्वासास तडे गेले. ते २०१४ पर्यंत पुण्याचे खासदार राहिले तरी त्यांच्या एकूण कामावर आणि लोकांशी संपर्क ठेवण्यावर मोठाच परिणाम झाला. त्यांचं नेतृत्व पाहता पाहता अस्ताला गेलं. त्यानंतर सलग दोन निवडणुका पुण्यात काँग्रेस पक्ष पराभूत होत राहिला. कलमाडी यांच्यानंतर त्यांच्या ताकदीचा व कुवतीचा नेता उभाच राहू शकला नाही. कलमाडींची क्षमता, अथक परिश्रम करण्याची तयारी, जोश व उत्साह, जबरदस्त इच्छाशक्ती, संघटनकौशल्य आणि धूर्तपणा असलेला नेता सहजासहजी तयारही होऊ शकत नसतो.
येत्या वर्षी कलमाडी वयाची ८० वर्षं पूर्ण करतील. त्यातली गेली किमान १० वर्षं तरी ते सार्वजनिक जीवनातून बाजूला गेले आहेत. त्यामुळे ते स्वत: किंवा त्यांचे फोटोही कुठे दिसेनासे झाले आहेत. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात त्यांनी पुणे महानगरपालिकेला भेट दिली, तेव्हा त्यांना पाहून अनेकांना धक्काच बसला. डोक्यावरील पांढरे केस, सफेद दाढी आणि हातात काठी घेतलेल्या सुरेशभाईंना ओळखणं अनेकांना कठीण गेलं. मनपा आयुक्त विक्रम कुमार यांना पुणे फेस्टिव्हलचं निमंत्रण देण्यासाठी ते तब्बल १०-१२ वर्षांनी मनपात आले होते. आजही सुरेशभाई पुणे फेस्टिव्हलला आणि इतर निवडक कार्यक्रमांमध्ये उपस्थित राहतात. पण त्यांच्यात पूर्वीच्या उत्साहाची झलक पाहायला मिळत नाही. वृद्धत्वाकडे झुकलेलं त्यांचं व्यक्तिमत्त्व त्यांच्या पूर्वीच्या तडफदार व्यक्तिमत्त्वापेक्षा सर्वस्वी निराळं भासतं.
एके काळी देशाच्या आणि पुण्याच्या राजकारणाचं पॉवरहाऊस असलेल्या या नेत्याला राष्ट्रकूल क्रीडास्पर्धांमधील भ्रष्टाचाराचे आरोप आणि तुरुंगवासामुळे झालेली मानहानी जिव्हारी लागणं आणि ते मनाने खचणं हे स्वाभाविकच म्हणायचं. त्यातच चार वर्षांपूर्वी पडल्यामुळे त्यांच्या खांद्याचं हाड मोडलं. त्यावर शस्त्रक्रिया करावी लागल्याने ते आणखीनच खचले. त्यातून बरं होऊन थोडीफार हालचाल करायला लागेपर्यंत त्यांना (व मीराभाभींना) कोविड झाला. या सर्व घडामोडींची परिणती अशक्तपणा वाढण्यात झाली. त्यामुळेही नैराश्य, औदासीन्य आणि काही प्रमाणात स्मृतिभ्रंशाने घेरण्यास सुरुवात झाली असल्याचं समजतं. परिणामी, त्यांची आजवरची शान, आगळावेगळा रुबाब, चमकधमक आणि त्यांच्याविषयी लोकांमध्ये असलेल्या आकर्षणाचं वलयही बऱ्याच प्रमाणात ओसरलं.
मागील अनेक वर्षांपासून ते बाहेर फिरतानाही क्वचितच दिसले आहेत. फार तर एखाद्या जवळच्या कार्यकर्त्याच्या घरातील विवाहाच्या स्वागत समारंभास उपस्थित राहण्यासाठी ते बाहेर पडतात. अलीकडेच माजी उपमहापौर आबा बागुल यांच्या घरातील लग्न समारंभात जेव्हा त्यांनी काठी टेकवत धीम्या गतीने ‘एंट्री' घेतली, तेव्हा लोकांचं लक्ष आपोआपच त्यांच्याकडे वेधलं गेलं आणि ‘बॉस' आले अशी चर्चाही झाली. त्या निमित्ताने अनेक नवे-जुने मित्र व कार्यकर्ते त्यांना आवर्जून भेटून गेले. उल्हासदादा पवार त्यांना भेटले, तेव्हा कलमाडी यांनी त्यांचा हात बराच वेळ धरून ठेवला होता. वयाच्या ऐंशीच्या टप्प्यावर आलेले हे दोन जुने मित्र तासभर एकमेकांच्या शेजारी बसून गप्पागोष्टी करत आहेत, हे दुर्मिळ दृश्य होतं.
एके काळी माणसांनी सतत फुललेलं ‘कलमाडी हाऊस'ही आज ओकंबोकं वाटू लागलं आहे. कलमाडी यांना जीवनातील विविध टप्प्यांवर जीवापाड साथ दिलेले दिवंगत राजा महाजन, तसंच महेश मिश्रा, शेखर देवरुखकर, मनोज भोरे या वैयक्तिक साहायकांपैकी कोणीही त्यांच्या जवळ नाहीत. मीराभाभींबरोबर हुबळीहून आलेल्या आणि त्यावेळी जेमतेम १८ वर्षांचा असलेल्या वासू पुजारी या कन्नड युवकाने पुढील अनेक वर्षं कलमाडी कुटुंबियांच्या जेवण्याखाण्याची उत्तम बडदास्त ठेवली. तोही काही वर्षांपूर्वीच दुबईला गेल्याचे समजते.
अधूनमधून घराच्या हॉलचे दरवाजे उघडे असले की बाहेरच्या हॉलमध्ये सुरेशभाई आणि त्यांना आयुष्यभर भरभक्कमपणे साथ देणाऱ्या मीराभाभी आरामखुर्चीत शांतपणे बसलेले दिसतात. मी जेव्हा जेव्हा त्यांच्या घरासमोरून जातो तेव्हा तेव्हा सुरेशभाईंची नजर शून्यात लागलेली दिसते. त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग असलेलं गतिमान राजकारण आता ‘विराम' पावत असल्याचं पाहून माझ्या मनात वेदनेची कळ उमटते. अनेक राजवटी आणि त्यातील सत्ताधाऱ्यांच्या चिरेबंद वाड्यांना तडे गेल्याचं आणि त्यांची राज्यं खालसा झाल्याचं आपण इतिहासात वाचत असतो. मात्र, आपण जवळून पाहिलेल्या आणि ज्यांच्या समवेत काम केलं अशा व्यक्तीच्या फुललेल्या कारकिर्दीला अशा प्रकारे उतरती कळा लागलेली पाहावी लागणं अस्वस्थ करतं.
(पुण्यभूषण दिवाळी २०२३च्या अंकातून साभार)
