आम्ही कोण?
ले 

झरीन : एका चाइल्ड प्रॉस्टिट्यूटची शोकांतिका

  • समीर गायकवाड
  • 11.02.26
  • वाचनवेळ 8 मि.
epstein files red light diaries

रेड लाइट एरियातला सर्वात जीवघेणा आणि किळसवाणा प्रकार म्हणजे चाइल्ड प्रॉस्टिट्यूट.

एक काळ होता जेव्हा विशीच्या आसपासच्या मुलीच जास्त करून लाईनमध्ये असायच्या मात्र दिवस वेगाने बदलत गेले. धंद्यातल्या बाईचं वय वेगाने खाली येत गेलं, सभ्यता, मानवता आणि लज्जा सर्वांचे आलेखही उतरत गेले.

झरीनची केस प्रातिनिधिक म्हटली जावी अशापैकी एक. झरीन मूळची बांग्लादेशची. तिच्यावर आठ वर्षांची असताना बलात्कार झालेला. घरच्या कर्मठ मंडळींनी तिला समजून घेण्याऐवजी तिला जाच सुरू केला. ती पळून गेली आणि नको त्या माणसाच्या हाती लागली.

त्याने तिला आधी पश्चिमी मिदनापूरमधील आपल्या शेतात ठेवलं. नंतर काही दिवसांनी सोनागाचीत विकलं. त्यानंतर तिच्यासोबत जे घडलं त्यावर अनेकांचा विश्वास बसणार नाही, कित्येकांना ही अतिशयोक्ती, अतिरंजित बाब वाटू शकेल. इतकं भयंकर आयुष्य तिच्या वाट्याला आलं.

झरीन. जेव्हा कस्टमर नसे तेव्हा झरीनला बाहुल्यांशी खेळायला आवडे. ती इथे भरती झाली तेव्हा कधीतरी सगळ्या लहान मुली मिळून बंगाली बडबड गीतं गात असत. पुढे जाऊन तिने बोलणंच बंद केलं, गाणं तर खूप लांबची गोष्ट झाली. न्हाण येणं म्हणजे काय हे झरीनला सांगोवांगी ऐकून, वा घरातल्या बायकांच्या चर्चेतूनच थोडंफार ठाऊक होतं. तिला याविषयी प्रत्यक्ष काही माहिती नव्हती आणि ती माहिती असण्याचं तिचं वयही नव्हतं.

नात्यातल्या पाच मुलांनी तिला नासवलं, तेव्हा तिला खूप रक्तस्त्राव झालेला. प्रकरण घरातल्या घरात दाबून टाकण्यात आलं. मुलांनी झरीनवरच किटाळ आणलं, तिनेच उकसवलं अशी उलटी बोंब मारली. साहजिकच झरीनला घरी तोंड दाखवणं कठीण होऊन बसलं. तिच्या आई-वडिलांना तिच्यासह सहा मुली होत्या. त्यामुळे तिच्या एकटीसाठी फार जीव तोडून शोक करण्यात वा तिच्यासाठी कुठली लढाई लढण्यात त्यांना शहाणपणा दिसत नव्हता.

हेही वाचा - हायवे सेक्स ट्रेंडमागे बंचरा समाजातली अमानुष प्रथा?

तो अत्याचार तिने सहन केला याचा अर्थ लैंगिक शोषणास तिची मूक सहमती आहे, असा गृहीत धरला जाऊ लागला आणि तिथेच सारं विस्कटलं. झरीनला भारतात आणणाऱ्या दलालास तिची दया येण्याचा प्रश्नच नव्हता कारण ते त्याचं रोजच्या जीवनाचं काम होतं. तिचं पुढं काय झालं याच्याशी त्याला सोयरसुतक नव्हतं.

झरीनला पहिली मेन्स्ट्रूअल सायकल आली तेव्हा तिला ‘ते’ कळलंदेखील नव्हतं. कारण अंतर्भागात इजा झाल्यामुळे अशा प्रकारचा स्त्राव तिला पाच-सहा वेळा तरी झाला होता.

अवघ्या काही शे रुपयांत या चिमुरड्या विकल्या जातात. गरिबीपासून ते अनैतिक संततीपर्यंत अनेक प्रश्नांनी ग्रासलेली लोकं आपल्या पोटच्या गोळ्यांना दलालांच्या हाती सोपवतात. आजघडीला मेट्रो सिटीजसह देशातील प्रमुख महानगरं व जवळपास प्रत्येक राज्यातील मोठ्या शहरात चाइल्ड सेक्स वर्कर्स आढळतात.

चाईल्ड सेक्स वर्कर्स म्हणजे बालवेश्यांचा कारभार वाढीस लागण्यात इंटरनेटचा आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा हातभार खूप मोठा आहे. जसजसं इंटरनेटचं जाळं वाढत गेलं तसतसा पॉर्नचा विळखा घट्ट होत गेला. विविध कॅटेगरीचे पॉर्न प्रचलित झाले. त्यात चाईल्ड पॉर्नोग्राफीचं वेड वाढत गेलं. त्यातून बालकांचं, बालिकांचं शोषण जोमात आलं. त्याची पुढची पायरी म्हणजे लहान मुलींना धंद्यात आणलं जाऊ लागलं. थायलंड, इंडोनेशियात याने बाळसं धरलं आणि जगभरात त्याचा द्रुतगतीने प्रसार झाला. आता आपल्या देशातील छोट्या-मोठ्या शहरांतही कोडवर्डद्वारे या मुलींचा पुरवठा केला जातो.

यातूनच पुढे जाऊन ग्राहकांचं या मुलींमधलं स्वारस्य संपू नये म्हणून नवनवे फंडे त्यातून जन्माला आले. त्यापैकीच एक म्हणजे मुलींसाठी ड्रग्जचा वापर. श्रीलंका, म्यानमार, बांग्लादेशमार्गे पश्चिम बंगाल आणि तिथून आपल्या देशातील सर्व मेट्रो शहरातल्या वेश्यावस्तीतही हे खूळ आलंय.

हेही वाचा - एक संशयास्पद जाहिरात आणि माझं स्टिंग ऑपरेशन

हा वासनाविकार फोफावण्याचं आणखी एक कारण म्हणजे संकटकाळी या मुलींना लपवणं सोपं जातं. पोटमाळा, लोखंडी संदूका, लाकडी कपाटं, अलमारी, पाण्याच्या टाक्या यात त्यांना दडवलं जातं. त्यांच्या हातावर टिकवला जाणारा कमाईतला हिस्सा प्रौढ वेश्येच्या मानाने अर्धाही नसतो, शिवाय त्यांच्या डिमांडही फारशा नसतात, त्यांना मागणीही बऱ्यापैकी असल्याने रिस्क पत्करून पोलिस यंत्रणांना रीतसर मॅनेज करून त्यांना ‘ठेवलं’ जातं.

यामुळे मुलींचा ठावठिकाणा लागणं गुंतागुंतीचं होऊन जातं. मुली थोड्या जुन्या झाल्या, किंचित मोठ्या झाल्या की त्यांच्या अंगावर विशिष्ट ठिकाणी ‘गोलाई’ यावी म्हणून त्यांना गोळ्या आणि इंजेक्शन देण्यास सुरुवात होते. यात प्रामुख्याने काही विशिष्ट स्टीरॉईड्सचा समावेश होतो.

या औषधांनी त्यांना तात्पुरता आराम मिळतो, अंगाचा शीणवटा जातो, अंग हलकं होतं. जोडीला रंगीबेरंगी कपड्यालत्त्याचं अन् खेळण्याचं आमिष दाखवलं जातं. या अल्पवयीन, अज्ञानी अल्पशिक्षित मुलींना टॉनिकच्या गोंडस नावाखाली या गोळ्या हातावर ठेवल्या जातात. गोळ्या खाल्ल्या नाहीत तर त्यांची उपासमार केली जाते. वेळप्रसंगी मारहाणदेखील होते. या गोळ्या नेमक्या कशासाठी दिल्या जाताहेत हे त्या मुलींना सांगितलं जात नाही. मुली आधी जबरदस्तीने, मग गरजेपोटी आणि अखेरीस ॲडिक्ट होऊन त्या औषधाच्या आहारी जातात. या औषधामुळे त्यांच्या अंगावर सूज येते, छाती आणि मांड्या फुगीर होतात. चेहऱ्यावरचा कोवळेपणा जाऊन तिथे रासवटपणा येतो.

त्यांच्या देहाची गोलाई वेगाने वाढावी म्हणून जनावरांना दिला जाणारा हेवी डोस त्यांना दिला जातो. याच्या औषधाच्या दुष्परिणामांची कुठलीही पूर्वकल्पना न देता ही औषधं दिली जातात. मात्र त्यांच्या हाडांची वेगाने झीज होऊ लागते. अवघ्या वीस वर्षांच्या आयुष्यात त्यांच्या हाडांचा भुगा होऊन जातो. कारण डेक्सामिथेसोन हे स्टिरॉईड ड्रग आहे. मनुष्यासाठी त्याची २, ५ मिलीग्रामची गोळी उपलब्ध आहे. यात व्हेटर्नरीचे डोसेस चाळीस ते शंभर मिलीग्राम पॅकचे असतात. मरतुकडी जनावरं फुगीर दिसावीत, त्यांचे आचळ फुगून यावे म्हणून अनेक अडाणचोट शेतकरी हे औषध त्यांच्या अशक्त, मरणासन्न, विक्रीस काढलेल्या गायी म्हशींना खाऊ घालतात. वास्तवात हा त्या गोळ्यांचा उपयोग नसून साईड इफेक्ट आहे.

या चिमुकल्यांना चाळीस एमजीचा डोस दिल्यावर त्यांची अवस्था कशी होत असेल याची कल्पना न केलेली बरी. गोळ्यांच्या सेवनानंतर आपल्याला काय होतंय हे त्यांना कळतच नाही. कारण या गोळीमुळे स्नायू ताठरून जातात आणि अंग ठणकणं, मांड्या भरून येणं, ओटीपोट ताणलं जाणं यापैकी काहीच जाणवत नाही. खरं तर हाही एक साईड इफेक्टच आहे, त्यामुळे धंद्याच्या तक्रारीस जागा राहत नाही. रात्रभरात ती दमून जाऊ नये म्हणून या औषधाचा असा पाशवी उपयोग होतो. पुढे जाऊन एक वेळ अशी येते, की ती मुलगी त्या गोळीच्या व्यसनाधीन होते. गोळी खाल्ली नाही तर तिला बेचैनी वाटू लागते! मग ती स्वतः होऊन गोळी मागू लागते.

एका सायकोरेपिस्टने या गोळ्या एका मुलीला खाऊ घातल्या आणि अनाहूतपणे त्यातून एक नवा शोध 'चमडीबजार'च्या हाती आला. बघता बघता याचं लोण पूर्ण दक्षिण आशियायी देशात पसरलंय. या गोळ्या कुठल्याही पशुऔषधी दुकानात मिळतात. नानाविध ब्रांडनेम्सने त्या आपल्याकडे उपलब्ध आहेत. या गोळ्या मुलींना खाऊ घालण्याच्या पाशवी प्रयोगास दशकाहून अधिक काळ उलटून गेलाय मात्र त्याचा खरा आणि मोठा साईड इफेक्ट अलीकडे समोर येतोय.

आठ वर्षाची असताना झरीनने या गोळ्या पहिल्यांदा खाल्ल्या. नंतर किती वेळा आणि किती खाल्ल्या हे तिला नेमकं आठवत नाही. पण आता त्या गोळ्यांमुळे ती पुरती अधू होऊन गेलीय! तिचे गुडघे पूर्ण ठिसूळ होऊन त्याचा भुगा झालाय. साठीत होणारं ऑस्टिओपोरॅसिस तिला सोळाव्या वर्षी झालंय. आता तर तिच्याकडे 'गिऱ्हाईक'ही येत नाही. कारण तिचा देह म्हणजे निव्वळ अस्थिपंजर उरलाय! हे संकट मोठं आहे, यातून सावरण्यासाठी काही हात पुढे सरसावत असले तरी त्याचं प्रमाण व्यस्त आहे. झरीनला सावरण्यासाठी कधी कधी काठी वापरावी लागते. तिला वेगाने धावता येत नाही की सरासरा जिने चढता येत नाहीत. तिचा एखादा सांधा ठिसूळ झाला असता तर इतके हाल झाले नसते मात्र तिचे सगळेच सांधे भुगा झालेल्या अवस्थेत पोहोचले असल्याने तिला मरणयातना भोगाव्या लागताहेत.

एस्कॉर्ट एजंट्सनी तिच्यावर दया दाखवत तिला पुन्हा तिच्या मायदेशी नेलं. दौलतदियामध्ये तिला एका एनजीओच्या स्वाधीन केलं, इथपर्यंतची अखेरची अपडेट होती. झरीनसोबत जे काही घडलं यात तिचा काही दोष होता का?

या गोळ्यांचं सेवन किती हानिकारक आहे हे यात गुंतलेल्या अड्डेवाल्या आंटींच्या गळ्यात उतरवणं जिकीरीचं काम आहे पण अशक्य नाही. या मुलींना धंद्यात आणण्यापासून आपण रोखू शकत नसू तर किमान या औषधाच्या वापरापासून तरी त्यांना अडवलं पाहिजे. मात्र आपली यंत्रणा फार हुशार आहे. ती कायद्यावर बोट ठेवते. हे काम अन्न आणि औषध विभागाचं आहे की पोलिसांचं यावर आधी किस पाडला जातो. मग दोषी नेमकं कोणास ठरवायचं हा प्रॉब्लेम हेतुतः समोर आणला जातो. गुन्हा नेमका कोणता आणि कोणावर नोंदवायचा याचीच इतकी चालढकल केली जाते की न्याय नको पण डोकेदुखी आवर अशी परिस्थिती येते. चुकून गुन्हानिश्चिती झालीच तर मग गुन्हा कुठल्या ठाण्याच्या एरियात घडला याच्या सीमा ठरवल्या जातात. तोवर तक्रारदार एनजीओवाल्याचा 'कंड' जिरलेला असतो.

गोळ्या आणणारा औषध दुकानात चिठ्ठी दाखवून गोळ्या घेऊन येतो; गोळ्या आणणारा, विकणारा हे कायद्याच्या कात्रीत अडकत नाहीत. तीच बाब खाऊ घालणाऱ्या व्यक्तीसाठी लागू होते. यामुळे गुन्हेगार निश्चिती होणं महाकठीण होऊन बसतं.

या अंधाराचे अनेक पापुद्रे आहेत, जितकं मला शक्य होतं ते सर्व या पुस्तकात मी लिहिलंय. तरीही वाटतं की माझी माहिती शून्य आहे! एप्स्टीन फाइल्समधून जे समोर येतंय ते भयावहच आहे मात्र आपल्या अवतीभवती देखील हे सुरू असतं तेव्हाही आपण त्यापासून अनभिज्ञ असतो आणि याची माहिती मिळाली तरी आपण केवळ हतबलच असतो!

समीर गायकवाड







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 1

Yogesh Janrao11.02.26
समीर गायकवाड यांचे लेख फेसबुक पेजवर वाचत असतो.वास्तववादी आणि छान लिहिलेले असतात.

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results