
द. मा. मिरासदार माझे आवडते कथाकार आहेत. ते माझे मित्रही होते. त्यांच्या बहुतेक कथा मी एकदा वाचलेल्या असल्या तरी त्यातल्या काही पुनःपुन्हा वाचाव्याशा वाटणाऱ्या आहेत. माझ्या शयनगृहात काही पुस्तके ठेवलेली आहेत, त्यात मिरासदारांची पुस्तकं प्रामुख्याने आहेत. कित्येक वेळा झोप हट्टी बनते आणि ती येतच नाही. अशा वेळी त्यांचा एखादा कथासंग्रह काढायचा आणि तो वाचत असताना झोपेला प्राप्त करून घ्यायचे असा माझा रिवाज आहे.
मिरासदारांच्या कथांची एक विशिष्ट प्रकृती आहे. त्यांच्या कथांना शोभेल अशी त्यांची शब्दकळाही आहे. एखादी कथा वाचली, की तिचे लेखक मिरासदार किंवा शंकर पाटील असावेत हे चटदिशी लक्षात येते. मिरासदारांच्या बहुतेक कथा एखाद्या खेड्यात घडतात. तो काळही फारसा जुना नसतो. त्यांच्या दोन कथा मात्र अगदीच वेगळ्या आहेत. ‘कोणे एके काळी' व ‘तैलबुद्धी देवदत्त' या त्या दोन कथा आहेत. मिरासदारांच्या कथाविश्वात त्या कशा काय आल्या हे सांगणे अवघड आहे.
या दोन कथा अगदी दूरदेशी घडतात. छोटी छोटी राज्ये होती, राजांच्या समोर फारसे काही प्रश्न नव्हते. शेजारच्या राज्याशी मित्रसंबंध असल्यामुळे त्याच्या राज्यात जाऊन नगरभ्रमण करावे, कधी तिथल्या महाराजांनी भोजनास बोलावले म्हणजे त्याचा आस्वाद घ्यावा, एवढीच कामे राजाला होती. एक मात्र होते, त्या काळी गावात दोन-चार तरी धनवान श्रेष्ठी असत. त्यांना सुंदर कन्या असणे स्वाभाविकच होते. राजाच्या पदरी एक विदूषक असे. आताचे विदूषक सर्कशीत किंवा इतरत्र लोकांना हसवण्याचे काम करतात. त्यावेळच्या विदूषकांचे काम आपल्या मालकाला हसवणे, त्याचे मनोरंजन करणे एवढेच होते. काही विदूषक नुसते शारीरिक चाळे किंवा भाषिक विनोद करत नसत. ते बुद्धिमान असत, चतुर असत. त्यांना व्यवहाराचे ज्ञान असे, पण तरीही ते आपले चातुर्य लपवत चाकरी करत असत. ‘कोणे एके काळी' कथेतील वातावरण असे आहे. मिरासदारांच्या इतर कथांपेक्षा हे वातावरण पूर्णपणे भिन्न आहे. एका विशिष्ट घराण्याचे गाणे गळ्यावर आयुष्यभर घोटल्यानंतर सहज त्याहून अगदी भिन्न घराण्याचे स्वर बाहेर पडावेत, पण त्यांनाही स्वतःचे वेगळे सौंदर्य असावे, अशाच प्रकारची ही कथा आहे.
एके दिवशी बराच वेळ निद्रा आलीच नाही. शेवटी मी मिरासदारांची ‘कोणे एके काळी' ही कथा वाचू लागलो. वाचता वाचता कधी झोप लागली हे कळलेच नाही. थोड्या वेळात पुन्हा जाग आली, अजून पुरेसे उजाडलेही नव्हते. दारावर हलकीशी टिचकी वाजली म्हणून माझ्या पत्नीने दार उघडले. समोर एक शुचिर्भूत आणि चेहऱ्यावर विद्येचे तेज दिसणारा मध्यमवयीन ब्राह्मण उभा होता. त्याचे पुरुषी सौंदर्य त्यांच्या शालीनतेशी स्पर्धा करत होते. त्याच्या आगमनाबरोबरच हलकासा सुगंध असलेली वाऱ्याची एक झुळुक घरात आली. अतिथीचे आम्ही स्वागत केले. आसनस्थ होण्यापूर्वी तो इकडे-तिकडे पाहू लागला. माझ्या लक्षात आले, की माझ्या घरातली सध्याची आसने त्याच्या परिचयाची नाहीत. शेवटी देवघरात पूजा करणाऱ्याला बसण्यासाठी एक पाट होता तो माझ्या पत्नीने बाहेर आणला. तो मांडला आणि अतिथीला त्यावर बसण्याची विनंती केली. मीही कामापुरते आवरून त्याच्याजवळ सतरंजीवर बसलो. त्याने हळूहळू बोलायला सुरुवात केली- “मिरासदारांनी मला अर्वाचीन काळात पुन्हा जन्म दिला, पण माझ्यावर अन्यायसुद्धा केला. खरे म्हणजे मी त्यांच्याच घरी जाऊन याबद्दल तक्रार करणार होतो, पण नंतर कळाले की, मिरासदार आता भूलोकावर नाहीत. मग त्यांचे मित्र म्हणून तुमचे नाव कळले. म्हणून आता तुम्हाला माझी व्यथा सांगण्यासाठी मी आलो आहे.”
मी भलताच आचर्यचकित झालो. कोणे एके काळातील एक व्यक्ती काळाची सगळी अंतरे तोडून तिचे मनोगत सांगायला माझ्याकडे आली होती आणि विश्वासाने काही सांगत होती. त्यामुळे मीही उत्सुक झालो होतो. अनेक आशंका मनात होत्या; पण शांत राहावे आणि अतिथीचे म्हणणे ऐकून घ्यावे असे मी ठरवले. माझ्या पत्नीने अतिथीला प्रश्न केला- “तुम्ही चहा वगैरे घेत नसाल, थोडेसे दूध मी आपल्याला देऊ का?” त्याने सांगितले, “मी एवढ्या प्रातःकाली काहीच घेत नाही.”
नंतर त्याने पुन्हा बोलायला सुरुवात केली. तो म्हणाला, “माझे खरे नाव सोमशर्मा. पण महाराजांकडे नोकरी लागली आणि त्यांच्या आणि दरबारी मंडळींच्या मनोरंजनासाठी माझे नाव वक्रतुंड असे ठेवण्यात आले. लोकांना हसवण्यासाठी तोंड वाकडे करणे हाच माझा व्यवसाय झाला. पण बाकीचे ठीक होते. राहायला घर होते. योगक्षेम चालेल याची काळजी महाराजांचे कारभारी घेत होते. फक्त एवढेच, की महाराजांच्या मर्जीने चालावे लागत होते. एकदा महाराजांनीच मला त्याबद्दलची समज दिली होती. ते म्हणाले होते, ‘विनोद तुझ्या लहरीने नव्हे, माझ्या लहरीने झाला पाहिजे.'
एकदा शेजारच्या चित्रसेन महाराजांच्या राज्यात त्यांच्या निमंत्रणावरून काही दिवस घालवण्यासाठी आम्ही गेलो होतो आणि त्या निवासाच्या काळात हा सगळा प्रकार घडला.
एके दिवशी आमच्या महाराजांना चित्रसेनांच्या राजधानीत नगरभ्रमण करावेसे वाटले. ते एका उपवनात गेले असताना तेथे त्यांच्या नजरेला एक अद्वितीय सौंदर्य पडले आणि महाराज त्या स्त्रीच्या दर्शनाने अक्षरशः वेडे झाले. त्यांनी मला बोलावून घेऊन या रत्नाचा शोध घेण्याची आज्ञा केली. बऱ्याच युक्त्याप्रयुक्त्यांनी मी तिचा शोध लावला. गावातल्या धनाढ्य नगरश्रेष्ठीची ती कन्या होती. तिच्या निवासस्थानाचाही मी शोध घेतला; पण पुढे काहीच करता येत नव्हते. हिंसेचा किंवा आपल्या सैनिकांचा वापर करून पाहिजे ती वस्तू प्राप्त करण्याचा मार्ग या राज्यात उपलब्ध नव्हता. मला असेही कळले होते, की त्या सुंदरीला संपत्तीचे किंवा सत्तेचे कसलेच आकर्षण नव्हते, तिला फक्त चतुर आणि बुद्धिमान असा जोडीदार हवा होता. महाराजांना स्वतः या विषयात आपले प्रावीण्य सिद्ध करता येणे अवघड होते, म्हणून महाराजांना माझी मदत हवी होती.
ती सुंदरी, मोहिनी प्रणयसंकेतांची चांगलीच जाणकार होती. आपण कोणता संकेत दर्शवला म्हणजे त्यातून कोणता अर्थ निघेल व आपल्या मनात काय आहे हे समोरच्याला कसे जाणवेल हे तिला माहीत होते.
गवाक्षातला दीप, सुगंधी द्रव्याने भरलेला द्रोण आणि शेजारी ठेवलेली फुले यात करावयाची निवड, दूतिकेच्या गालावर उमटावयाची चंदनाच्या उटीची तीन बोटे आणि नंतर पौर्णिमेचे सूचन करण्यासाठी काढावयाचे वर्तुळ हे सगळे संकेत मला माहीत होते. क्रमाक्रमाने व्यक्त होणारे त्या सुंदरीचे- मोहिनीचे मन मला समजत होते. त्याचा अर्थ मी महाराजांना सांगत होतो. त्यांचा विश्वास बसत नव्हता. त्यांना असा चतुर संवाद नको होता. त्यांना धसमुसळेपणाने सर्व गोष्टी मिळवण्याची सवय होती.
शेवटी माझ्या शिष्टाईवर महाराजांना विश्वास ठेवावाच लागला. ती महाराजांवर लुब्ध झाली आहे व मिलनास तयार आहे, हे मी सांगितल्यावर महाराज खूपच आनंदित झाले. त्यांनी तिला घेऊन येण्याची मला आज्ञा केली. राजाची आज्ञा पाळावीच लागणार होती; पण का कुणास ठाऊक, माझी पावले जड झाली होती. मी नदीकाठावर पोहोचलो. थोड्या वेळातच मला एक कोमल आवाज ऐकू आला “मी आले आहे-” क्षणभर मला काहीच कळले नाही. पण नंतर तिने पुन्हा सांगितले, “मी आले आहे.” ते तिचे शब्द जणू घुंगूर लावून आले होते. त्यांच्या निनादात काही वेळ मी त्या अप्रतिम सौंदर्याला न्याहाळत होतो. पुढे माझा-तिचा थोडासा संवाद झाला. त्या वेळी नदीच्या पात्रावर पडलेले चांदणे आणि शेजारचा शांत पहुडलेला निसर्ग यांचे मी वर्णन करू लागलो. माझे काही बोलणे ऐकून ती म्हणाली, “तुम्ही मोठे रसिक आहात.” मग मला म्हणाली, “खरेच तुम्ही कोण हे मला समजलेच नाही.” मी म्हणालो, “माझी एवढी योग्यता नाही.” शेवटी तिच्या आग्रहाने मी सांगितले, की ‘माझे नाव सोमशर्मा.' नंतर ती म्हणाली, “तुम्ही तर नावाचे वक्रतुंड दिसता. तुमचे मुख काही वाकडे नाही, चांगले नीटनेटके आहे.” परंतु व्यवसायानिमित्त मला ते वाकडे करावे लागते असे मी म्हणालो.
आम्ही दोघे त्या चांदण्यात महालाकडे पदक्रमण करत निघालो. कधी दोघेही शांत होतो, कधी ती आपल्या मधुर आवाजात काही थोडेसे मनातले सांगत होती. बोलता बोलता तिने स्वतःच आपल्या मनातला प्रियकर कसा असावा याबद्दलची आपली कल्पना सांगितली. “प्रियकर तरुण सुंदर असावा, ऐश्वर्यपूर्ण असावा असे कोणाला वाटणार नाही? पण त्याहीपेक्षा तो खराखुरा चतुर पुरुष असावा, बुद्धिमान असावा. बुद्धी हीच पुरुषाची शोभा.” माझ्याकडे वळून ती म्हणाली, “तुम्हाला नाही असे वाटत?” उत्तरादाखल थोडे हसणे आवश्यक होते, ते मी प्रयत्नपूर्वक केले. नंतर ती पुन्हा म्हणाली, “माझा पती बुद्धिमान हवा. तो फारसा रूपवान नसला तरी चालेल. एवढेच काय, तो दरिद्री असला तरी चालेल.” मला तिचे हे बोलणे ऐकून शक्तिपात झाल्यासारखे वाटू लागले. हात-पाय गळून गेले. कसाबसा मी सावरलो.
ती पुढे म्हणाली, “मला वाटत होते, की असाच एखादा दरिद्री पण पाणीदार डोळ्यांचा पुरुष केव्हा ना केव्हा माझ्या दारी येईल आणि तरीही दूर्वांकराने शोभणारी मधुकमाला मी त्याच्या गळ्यात आवडीने घालीन, त्याच्या दारिद्य्राची चिंता न करताना घालीन....”
तिचे हे बोलणे ऐकताना माझे हृदय दुभंगून जात होते. मी उरात फुटत होतो. तरीही मुखावर निश्चलता ठेवून मला चालावे लागत होते. दुःखाच्या आवेगात मी तिला एकदा ‘मोहिनी' अशी हाकही मारली. तिने माझ्याकडे क्षणभर पाहिलेही. पण आमचा प्रवास संपला होता आणि महाराजांचा महाल समोर आला होता.
मिरासदारांना आमच्या काळातल्या आणि आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी कळल्या होत्या. एखाद्या पटावरच्या सोंगट्यांप्रमाणे ते आम्हाला हलवीतही होते. ती सुंदरी एखाद्या धनहीन पण बुद्धिमान माणसालासुद्धा वरण्यासाठी तयार आहे, हे जेव्हा लक्षात आले तेव्हा मनात परिस्थितीच्या दडपणाने दाबून ठेवलेला अंकुर फुलून आला. हे मिरासदारांना कळले नाही का? त्यांनी मीच तो खरा चतुर आहे हे त्या मोहिनीला का सांगितले नाही? माझी धनहीनता दुर्लक्षून, माझे चातुर्य लक्षात घेऊन तिने मला वरलेही असते. महाराजांच्या सत्ता आणि संपत्तीचे आकर्षण आडवे आले नसते; पण मी स्तब्ध राहिलो.”
विश्वकर्म्याने आपल्याला निर्माण करताना आपल्यावर अन्याय केला अशी तक्रार एखाद्या प्राण्याने करावी, तशीच तक्रार सोमशर्मा ऊर्फ वक्रतुंड माझ्याजवळ करत होते. मी वक्रतुंडांना विचारले, “तुम्ही स्वतः इतके चतुर आहात! मी स्वतः तुझ्यावर अनुरुक्त आहे हे तुम्ही समक्ष भेटीत तरी तिला का सांगू शकला नाहीत? तिने हे आडून आडून सुचवलेच होते; पण तुम्ही ही संधी का सोडली? गप्प का राहिलात?”
सोमशर्मा उपाख्य वक्रतुंड एवढा चतुर, एवढा हजरजबाबी, पण तो उत्तर न देता स्तब्ध उभा होता. त्याच्या डोळ्यांत पाणी मावत नव्हते. ते हळूहळू झरू लागले.
त्याला शांत होऊ द्यावे आणि मग उत्तर अपेक्षावे असे मी ठरवले. तो म्हणाला, “प्रीति ही माणसाला सगळी साहसे करण्याला उद्युक्त करते हे खरे आहे; पण सत्ता सर्वंकष असली की मनातले सगळे बोलता येतेच असे नाही. आपले बोलणे आता मनातच ठेवले पाहिजे. महाराजांना जो वस्तुलाभ हवा आहे, त्याची अभिलाषा आपण धरता उपयोगी नाही आणि आता तर खूपच उशीर झालेला आहे. आता बोलून काय उपयोग? महाराजांचा महाल आता जवळ आला आहे असे मला वाटले.”
मी त्या अतिथीला म्हणालो, “जी अडचण तुला जाणवली तीच मिरासदारांनाही जाणवली असणार. जगात चातुर्य वाखाणले जाते, पण ते सत्तेवर बसवले जात नाही. किंवा सत्ता त्याचा आदर करतेच असे नाही. काही वेळा दुर्दैव दोन चतुर आणि सुंदर आत्म्यांची नीट गाठच पडू देत नाही. असे ‘कोणी एके काळी'च घडते असे नाही. हे सर्वकाळ घडत असते. जीवनातली अशी पुष्कळ दुःखे गिळून टाकावी लागतात. एक तर वक्रतुंड व्हावे लागते किंवा सगळेच विसरून जावे लागते.”
जाग आली तेव्हा पत्नीला बोलावून मी मला पडलेले गमतीचे स्वप्न सांगितले. आम्ही दोघे बाहेरच्या हॉलमध्ये आलो. तेथे देवघरातला पाट तसाच होता.