ज्येष्ठ साहित्यिक धनंजय चिंचोलीकर यांचं १४ डिसेंबर २०२५ रोजी निधन झालं. बब्रुवान रुद्रकंठवार या टोपणनावाने त्यांनी विनोदी शैलीत विपुल लेखन केलं आहे. 'कॉमेडी कट्टा' २०१७ दिवाळी अंकातलं त्याचं हे विनोदी ललित पोर्टलच्या वाचकांसाठी...
परवाची गोष्टै. दोन बऱ्या बया रेल्वे स्टेशनच्या बाकड्यावर बसलेल्या व्हत्या. यक बाई ल्हान्या पोरीला गोष्ट सांगत व्हती, गुदगुल्या करत व्हती, तिच्यासंगं खेळत व्हती, तं दुसरी बाई मोबाइलमंदी गर्क व्हती. गाडी अर्धा घंटा लेट व्हती. नंतरच्याला गाडीची अनाउन्समेंट झाली तसं मोबाइलवाल्या बाईनं डचकून मोबाइल बंद केला, बॅग सावरली, बावचळून आजूबाजूला बगितलं आन् शेजारच्या बाईकडून पोरीला खसकन ओढून ती बाकड्यावरनं उठली. इतका टाइम पोरीला खेळवनारी पैली बाई मोबाइलवालीला म्हन्ली, “मॅडम, तुमची पोरगी लैच गुणाचीहे!” उत्तरादाखल मोबाइलवालीनं तिच्याकडं मुक्यानं हासून बगितलं आन् आपल्या पोरीला कडेवर घेत तिचा मुका घेतला. ल्हानी पोर आनंदून गेली. मंग डायलॉग आजूक वाडवत पैली बाई म्हन्ली, ‘'दिसायला राजकुमारीच हाये तुमची पोर! फेसबुकवर फोटो टाका तिचा.” मोबाइलवाली जरासक थांबली, बारकासा आवाज काडून हास्ली आन् गाडीच्या दिशेनं निंगून गेली. पैल्या बाईनंबी डबा पकडला.
बस्स! ह्यो सीन इथंच संपला; पन नंतरच्याला माझ्या मनामंदी ही गोष्ट लैच आटकून बसली. पैल्या बाईनं मोबाइलवालीला फेसबुकवर फोटो टाकन्याचा जो ॲडव्हाइस दिला व्हता त्यो साधासिम्पल डायलॉग व्हता की खौट टाँट व्हता? की तिला सोताला पोरगी नव्हती? की तिच्याकडं मोबाइल नव्हता? की फोटो टाकल्यानं पोरीचं व्हर्च्युअल कवतुक व्हईल आशी तिला आशा व्हती? की... आशे लै प्रश्न माझ्या डोक्यामंदी भन्न करू लागले व्हते.
म्या मंग दोस्ताला ह्यो किस्सा वुईथ लोकेशन डिट्टो सांगितला आन् त्याचं मत इचारलं, तं त्यो म्हन्ला,
“बबऱ्या, तू सोशल अँगलनं इचार करत आसशीन तं गड्या जमानाच तसा आलाय. सांप्रतला ल्हान्या पोरीबी म्हतारीला, 'आज्जे, यखांदी चांगली पोस्ट सांग ना' आसंच म्हनू लागल्यात. बरं, आज्याबी कमी न्हाईत. त्या तयारीतच आस्तेत. 'सांगते बरं लेकरा. यका गावामंदी एक कावळा व्हता आन् यक चिमणी व्हती. कावळ्याकडं व्हता लॅपटॉप तं चिमणीकडं पीसी...' तं काय, की जिथं आजीबाईच आशा मोबाइलनिशी रेडी आस्तेत तिथं आजूक काय व्हनार? इन द सेन्स बबऱ्या, ही लैच कॉमन गोष्टहे. म्हनून त्या दोन बयांच्या डायलॉगबाजीला तू इमोशनल कलर देऊ नगोस. पन...”
“पन काय दोस्ता?”
“पन तू जर त्या बयांकडं 'तसल्या' नजरेनं बगत आसशीन तं तुझ्याबद्दल टोटलच इचार करायचा टाइम आलाहे आसं समज.”
“दोस्ता, कायबी बोलतोस काय?”
“बबऱ्या, आंगावर येऊ नगोस. समजून घे. त्यात लाज वाटन्याजोगी गोष्ट न्हाई. ते नॅचरल हाये; पन मनावर घेतलं तं हांड्रेड पर्सेंट कंट्रोल करता येतं.”
“दोस्ता, म्या तशातला न्हाई.”
“बबऱ्या, पैल्यांदा कुनीच मानत नस्तंय, पन तसंच आस्तंय. मानूस आसो, बया आसो, तसल्या नजरेनं बगायचं व्यसन आस्तंय. कॉमन रोगै ह्यो. आता आता तं म्होरच्या मान्सालाबी तुमची नजर ध्यानात यायलीहे आन् ऑकवर्ड फील व्हायलंय.”
“दोस्ता, तसली म्हंजे कसली? पैले खुलासा कर.”
“तसली म्हंजे क्लिअरकट बुबुक्षित. पोस्टचं मटेरियल म्हनून बगनारी, बगून लाळ गाळनारी. जिथं कुठं, जवा कवा ज्याच्या त्याच्याकडं बगताना तुमच्या नजरेत 'पोस्ट की नो पोस्ट'चा आदमास चालू ऱ्हातो. म्होरचा मानूस परेशान व्हऊन जातो. आपुन रिजेक्ट व्हतो की सिलेक्ट व्हतो ह्याच्या टेन्शनमंदी त्याचं पानी पानी व्हऊन जातं आन् तळ्यातलं पानी आटून जातं. पुरानी देवळं बगा, लेण्या बगा, मोबाइलं उपसून तुमी रेडीच! आरं, तिथली शिल्पंबी शरमून चाल्लीत तुमच्या नजरा बगून! बरं, यक गेला तं दुसरा हायेच थुतरीचा! गुहेफियेमंदी हाये तेवडं बास, जगभरात कामून बोभाटा, आशा इचारानं सोतातल्याच दगडावर डोकं आपटून घ्यायलेत त्यातले यक्ष-यक्षिणी. तरीबी तुमच्यातल्या दगडान्ला पाझर फुटंना. शिळान्लाबी शीळ घालन्याचा पराक्रम स्सालं आपलेच लोकं करू जाने! तुमी ल्हेता पोस्टी, बोलता पोस्टी, जेवता पोस्टी... कवा थांबनारै बबऱ्या हे?'
म्या कायच बोल्लो न्हाई. दोस्तानं फुकाच चिक्की तानून धरली. त्याला सब्जेक्टच पायजेल आस्तो. आपन जरासंक लूज बोल्लो की त्यो आसा आंगावर येनारच. आत्ताबी स्टेशनवरल्या बयांचा किस्सा रबरावानी खेचन्यात काईबी मतलब नव्हता. त्यात पुना अन्नेसेसरी सोशल मीडियाला वडायची गरज नव्हती. पन त्यो दोस्तच. थांबनार कसा? त्याला खरं तं म्या यका पत्रकाराची गोष्ट सांगनार व्हतो. त्या पत्रकाराला कथा ल्हेयाची लै हौस व्हती. त्याला लेखक व्हायचं व्हतं. पन कुना यका हितचिंतकानं त्याला सांगितलं, की भऊ, तुला लेखक म्हनून लौकर स्टँड व्हायचं आसंन तं पैले पत्रकार व्हय, दोन-पाच वर्षं काड आन् मंग लेखक व्हय. लागलीच स्टँड व्हशीन. निस्तंच लेखक म्हन्लं तं धा-बारा साल फुकट जातीन आन् तरीबी कुनी तुला गिनंलच आसं न्हाई. तं त्यानं तसं केलं. त्यो पत्रकार झाला. त्यानं इमानदारीनं दोन-पाच साल त्यात घालवले. जरासाक कॉन्फिडन्स आला तवा साइड बाय साइड स्टोऱ्या ल्हेयायला सुरवात केली; पन ल्हेयाला बसलं की त्याच्याकडून एन्ट्रोच निंगायचा. पैल्याच पॅऱ्यात झिस्ट आलं तं मंग पुडची कथा कुठं, कशी टर्न मारनार? त्यो परेशान व्हऊन जायचा. त्याच्या मेंदूमंदी जी 'एन्ट्रो' नावाची थिंंकिंग प्रोसेस व्हती ती जायला त्याला लै मेहनत घ्यावी लागली. त्यानं जेमतेम पाच-सात कथा ल्हेल्या आस्तीन-नस्तीन तं हे पोस्टचं खूळ आलं. न्हाय-हो म्हन्ता म्हन्ता त्योबी तिकडं वळला आन् चक्रात आडकून बसला. सांप्रतला त्याला निस्त्या पोस्टच सुचत ऱ्हातेत. पोस्टच्या आजूबाजूला मंग त्यो लै पसारा मांडून बगतो; पन त्यो मॅचच व्हत न्हाई. कथा तशीच पेंडिंग ऱ्हाऊन जाती. आसल्या तुकड्यांनी त्याची वॉल, त्याचा मेंदू आन् त्याच्या डायऱ्यांमंदी निस्ता राडारोडा करून ठिवला हाये.
पन ही गोष्ट म्या दोस्ताला सांगितली न्हाई. त्यानं त्यात आजूकच कायबाय हुडकलं आस्तं आन् माझं ‘आ बैल मुझे मार' झालं आस्तं. त्याला कोंडीत पकडायचं तं जरा कॉम्प्लिकेटेड, जरा इमोशनल आन् जरा करन्ट गोष्ट सांगायला पायजेल व्हती.
माझ्याकडं व्हतीच. म्या स्टार्ट केली.
“यक सिम्पलसाधासज्जन मानूस व्हता. दिसामाजी काय तरी पोस्टायचा त्याचा नेम व्हता. त्यानं त्यात कंदी खंड पडू दिला न्हाई. त्यो सकाळी लौकर उठायचा आन् थेट पोस्टायला बसायचा. त्या दिवसाचं सारं पोष्टून झाल्यावरच रिमेनिंग कारेक्रमाच्या मागं लागायचा. त्याचं ते रूटिनच व्हऊन गेलं व्हतं, तरीबी त्याला कंदी कटाळा आला नव्हता. यखांद्या दिशी सुचन्याचा प्रॉब्लेम व्हायचा. मंग त्यो जुनेपाने तुकडे पोस्टीत कन्व्हर्ट करून धकवून न्यायचा, पन त्यानं नेम कंदी हुकू दिला न्हाई. कामामंदी कन्सिस्टन्सी ठिवन्याचा ह्यो थॉट त्याच्या आंगात मुरलेला व्हता.
तं त्या दिवशीबी त्यो आसाच सकाळी सकाळी पोस्टायला बसला. त्यानं कायबाय पोस्ट ल्हेल्या आन् दुपारच्याला जेवणखाण करून मरून गेला.”
“काय, यवडा रेग्युलर पोस्ट ल्हेनारा मानूस मरून गेला?”
“त्यात डचकन्यावानी कायहे दोस्ता? रेग्युलर पोस्टल्यानं मान्साचं वय जागीच थांबून ऱ्हातं थोडंच? मरन तं येनारच.”
“त्याचं पुडं पोस्टमार्टम.....”
“मेलेल्या प्रत्येकाचंच पोस्टमार्टम कंपल्सरी आस्तं काय दोस्ता? त्याचा नंबर वेटिंगमंदी व्हता, त्यो गेला, बस्स!”
“आरं पन मंग... त्याच्या रिमेनिंग पोस्ट?”
“दोस्ता, तुमाला मेलेल्या मान्साच्या पोस्टची काळजीहे, मंग पोस्ट मेलेल्या मान्सांचं काय?”
“आता हे पोस्ट मेलेले मान्सं कुठून आन्लेस बबऱ्या?”
“आस्तेत ना दोस्ता. ज्यांच्या पोष्टला स्पर्शच झालेला नस्तो, कन्टेट आस्तानाबी मार्केटमंदी त्या तशाच ऱ्हाऊन जातेत... साऱ्या गोष्टी जागेवर आस्तानाबी काई बाया-मान्सावर बिनलग्नाचा ठप्पा बसून जातो, तसंच काई पोस्टच्या नशिबामंदी आस्तं... कोरं करकरीत एकटेपन...”
दोस्तानं यकवार माझ्याकडं बगितलं. नंतरच्याला खिशामंदून जर्दा काडली. मळ्ळी, लावली. नंतर म्हन्ला,
“बबऱ्या, जरा सोप्या भाषेमंदी सांगू शकतो का?”
मंग म्या त्याला यक इमोशनल गोष्ट सांगितली.
“आमचा यक चुलता व्हता. त्याचा शेवटचा काळ चालू व्हता. त्यो सरकारी नोकरीतून रिटायर्ड झालेला. रेग्युलर कार्डफिर्ड टाकून नातलगाकडं हवापान्याची चौकशी केली पायजेल, पत्रंफित्रं आले-गेले पायजेत आसा त्याचा दंडक व्हता. त्याच्या काळात त्यानं त्यो पाळलाबी व्हता; पन सांप्रतला ते पॉसिबल व्हायचं न्हाई. ल्हेता यायचं न्हाई. हात थरथरायचे. कार्डावर आक्षर नीट उमटायचं न्हाई. मंग त्यो चुलतीकडं आशेनं बगायचा. चुलतीला वाटायचं, सारे जगन्याच्या मगजमाऱ्यामंदी आडकलेत, त्यान्ला कुठं टाइमै पत्राचं उत्तर द्यायला? ती इग्नोअर करायची. चुलता आस्वस्थ व्हायचा. रोजचं उठलं, की ‘पत्र आलं का? पत्र पाठवायचं का?' आशी त्याची प्रश्नावली सुरू व्हायची आन् चुलती कटाळून जायची. नंतर यकदा चुलत्याची तब्येत ढासळली आन् चुलती हादरली. तिला वाटलं, म्हताऱ्याच्या मनामंदी हाये तं आपन त्याची पत्राची इच्छा पुरी केली पायजेल. त्याच्यासाठी का व्हईना, पत्र ल्हेले पायजेत. तिनं मंग पत्राचं काम हातामंदी घेतलं. चुलता रोज दोन-पाच लोकान्ला पत्र सांगायचा आन् चुलती ते ल्हेऊन घ्यायची. त्याच्या हट्टापायी कवा कवा साताठ पत्रं ल्हेवावे लागायचे. चुलती कुरकुरायची न्हाई, पत्र खर्डत ऱ्हायची. हप्त्याभरात तं चुलत्याला यकदम आराम पडला. त्याला चांगली झोप लागायला लागली. सकाळपास्नं पत्राच्या मायन्याचा इचार करता करता त्याचा दुपारपत्तोरचा टाइम कटून जायचा. नंतरचा टाइम पत्र डिक्टेट करन्यात. आसंच मंग पंधरा दिवस गेले. पत्र ल्हेऊन तृप्तावलेला चुलता आता पत्राची वाट बगू लागला. आमुक रिलेटिव्हला पत्र भेटलं आसंन, त्यानं आमुक आमुक ल्हेलं आसंन, आता ते पत्र येईन, आसं त्याचं इमॅजिनेशन चालायचं; पन प्रत्यक्षामंदी यकबी पत्र यायचंच न्हाई. त्यो चुलतीला इचारायचा. ती म्हनायची, पोष्टाचा घोळ, दुसरं काय? दोन दिवसांनंतर पुन्यांदा ह्योच डायलॉग व्हायचा आन् नव्या पत्राचं डिक्टेशनबी चालायचं.
पत्र ल्हेलं पायजेल, ख्यालीखुशाली इचारली पायजेल; पन उलट टपालाची आपेक्षा ठिवली न्हाई पायजेल, आशा जुन्या उदात्त इचाराचे संस्कार चुलत्यावर व्हते, त्यामुळं चुलता जादा तकतक करायचा न्हाई. तरीबी मान्साला आशा आस्तीच. तं काय, की पत्राची वाट बगत बगत चुलता यक दिशी निंगून गेला. चुलतीनं मंग गाव सोडलं. सामानाची आवराआवर केली तवा तिच्या बोचक्यामंदी दोनेकशे कार्डांचा गठ्ठा सापडला. सारे कार्ड समास सोडून सिस्टिमॅटिक ल्हेलेले व्हते पन यकावरबी पत्ता टाकलेला नव्हता.'
'काय म्हन्तो बबऱ्या? म्हंजे म्हतारीनं पत्र पोष्टात टाकलेच नव्हते का काय? कामून आसं?'
'दोस्ता, पत्राला कुनी उत्तर पाठवनारच न्हाई आन् पाठवलं तरी त्यात मनाजोगता मजकूर नसनार, ह्या भरोशातनं सीनियर सिटिझन आपल्याभवती आसं नेपथ्य हुबं करीत आस्तेत. त्यांना मंग एक्स्ट्रॉ कलाकारांची गरज पडत नस्ती. चुलत्याला आराम पडावा म्हनून चुलतीनं खेळलेला त्यो पत्राचा यक टाइमपास खेळ व्हता. चुलत्याचा तेवडा टाइम पास्टबी व्हऊन गेला. आशा टायमाला त्या खेळात बघ्या नातलगांनी शिरूने ह्याची प्रिकॉशन तं घ्यावीच लागनार ना? पत्ते कोरे ठेवून, साऱ्यांना बेदखल करत चुलतीनं ती घेतली व्हती.'
दोस्त सुन्न झाला. त्याला इमीजिएट कायबी बोलता येईना. मंग लंबाचवडा पॉज गेला. स्टोरीत खोट काडता येत नव्हती, उलट ती आस्वस्थ करत व्हती. स्सालं पत्र तं ल्हेलंहे, ते आपल्यालाच ल्हेलेलंहे; पन त्यावर हाटकून आपलं नाव न्हाई आसं कळालं की मानूस हाबकून जात आस्तो. हुब्या हुब्या त्याला घेरी येऊ शकती. आपन यवडे निग्लेक्टेड पर्सन आसू शकतो हे बिलीव्ह करायला आवगड जातं मान्साला. दोस्तानं घेनं ना देनं ही गोष्ट सोताशी इमॅजिन करून बगितली आसनार.
त्यानं मंग रुमालानं यकदा चेहरा पुसून घेतला. त्याच्यावरलं डस्ट गेलं, पन भाव पैलेच व्हते. मंग आवाज बारीक करीत म्हन्ला,
“बबऱ्या, तुझी स्टोरी जबरा इमोशनल हाये. स्सालं डोळ्यांतून पानी काडलं तिनं. पन मला यक सांग, आपला सब्जेक्ट पोस्टचा व्हता, तू त्यो पोष्टाकडं कामून नेलास? दोन गोष्टींची गल्लत कामून केलीस?”
“दोस्ता, तेच तं सांगून ऱ्हायलोय. पैल्या गोष्टीमंदीच दुसरी गोष्ट हाये. ते पोष्ट काय आन् ती पोस्ट काय, दोगांची स्पीड, पाठवन्याचं टेक्निक आल्लग आसलं तरी उत्तराच्या द्रष्टीनं फीलिंगमंदी फरक नस्तो दोस्ता. यकात मानूस खंगून खंगून मरतो तं दुसऱ्यात पोष्टून पोष्टून.”
“बबऱ्या, म्या चुलत्याच्या मरनाचं समजू शकतो; पन पोस्टवाल्याला मरायला काय धाड झाली? पोचलं- न्हाई पोचलंचा ब्लेम करायला तिथं कुठं पोष्टाचा घोळ व्हता? तिथं तं मान्सं हातात बोटंच घिऊन बस्लेले ऱ्हातेत आंगठा दाखवायला. चुकूनमाकून का व्हईना, कुना यखांद्यानं इमोजी टाकलीच आसंन ना बबऱ्या. कोरं किरिंग काई ऱ्हात नस्तंय तिथं.”
“तुझं हांड्रेड पर्सेंट बराबरै दोस्ता; पन मंग त्याच्यासाठी पोस्ट पब्लिश तं करावं लागंन का न्हाई? त्या वॉलवर डकवाव्या तं लागतीन का न्हाई?”
“म्हंजे? त्यानं त्या पब्लिश केल्याच नव्हत्या?”
“दोस्ता, पोस्ट ल्हेन्यामागं त्याचा पर्टिक्युलर इचार नव्हता, तसंच त्या पब्लिश न करन्यामागं आल्लग थिंकिंग नव्हतं. पोस्ट पब्लिश करायच्याच न्हाईत, ह्यो त्याच्या मर्जीचा डिसीजन व्हता. त्याच्या डायरीमंदी त्या तारीखवार निस्त्याच पडून व्हत्या.”
“बबऱ्या, फुकनीच्या, म्या येडा दिसू लागलो काय तुला? आसं कंंदी व्हत आस्तंय काय? मान्सं यवडीबी सायकिक झालेली न्हाईतं आजूक. भपाऱ्या मारनं बंद कर भऊ आता.”
“दोस्ता, खरंच सांगून ऱ्हायलोय...”
“सपोज, तू म्हन्तो तसं ठाहितमंदी धरलं तरी दुसरा यक सवाल हुभा ऱ्हातो बबऱ्या. ज्या पब्लिश केल्या जात न्हाईत, त्यांना पोस्ट म्हनत आस्तेत काय? यखांद्यानं उगाच डायरीमंदी काय तरी जपंफिपं खरडले म्हंजे त्याला पोस्ट म्हनायचं काय?”
“नगा म्हनू ना मंग. तुमच्या म्हनन्यावर थोडाच डिपेंड व्हता त्यो? लोक कविता ल्हेतेत, कथा ल्हेतेत, आजूक कायबाय ल्हेतेत... त्यानं पोस्ट ल्हेल्या. तुमी माना न्हाई तं नगा मानू. म्हना न्हाय तं नगा म्हनू.”
“बबऱ्या, आशी भूमिका आसंन तं मंग बोलनंच खुटून जातं की रं. च्यायला, पुडं काय बोलनार?”
'दोस्ता, तू काळाचं गणित ध्यानात घे. जसं चुलतीनं पत्रं पोस्टात टाकले न्हाईत तसं ह्यानंबी पोस्ट पब्लिश केल्या न्हाईत; पन दोगांनी ल्हेन्यात हायगय केली न्हाई, हे तुला मान्य करावं लागंन. उलट टपालाची आपेक्षा चुलतीनं आधीच उखडून टाकली, तसाच लाइकच्या आपेक्षेचा हात पोस्टवाल्यानं पैलेच कलम करून टाकला. म्हंजे काय, तं चुलतीला चुलत्याचं मन रमवायचं व्हतं तसंच ह्या मान्साला सोताला रमून घ्यायचं व्हतं. दोस्ता, दोनीमंदल्या सिमिलॅरिटी ध्यानात घे. मेलेल्या मान्साची पोस्ट आन् पोस्ट मेलेले मान्सं ह्यांच्यात हयातीचा डिफरन्स सोडला तं दोगांचंबी स्टेटस यकच आस्तं.'
दोस्त मंग निस्ताच बसून ऱ्हायला.
(ता. क.- यकदा यका कार्पोरेटरनं सोशल साइटवरल्या सोशल ॲक्टिव्हिस्टला लै जबरा धमकी दिली. म्हन्ला, ‘'भऊ, सोशल मीडियाच्या भरोशावर कुनाशीबी पंगा घिऊने मान्सानं... उद्या काय राडा झाला तं तिथल्ले मान्सं स्क्रिनमंदून भायेर येनार न्हाईत वाचवायला. आमालाच खांदा द्यावा लागंन आन् मसनखाईच्या पावत्याबी आमालाच फाडाव्या लागतीन, 'राम नाम सत्य है'मंदी आमालाच घशे तानावे लागतीन, यवडं ध्यानात ठिवा. त्याच्याबी नंतर डेथ सर्टिफिकेटसाठी वणवण फिरावं लागंन पोराबाळान्ला. पचाक पचाक ल्हेनारे आन् वचाक वचाक बोलनारे लोकं करून करून काय करतीन? लाइकवाल्या श्रद्धांजल्या वाहातीन, बस्स!” कार्पोरेटरच्या ह्या धमकीचा आपन इश्यू न्हाई केला पायजेल. उलटं, भाषेच्या अँगलनं त्याकडं बगन्याचा मोठेपना दाखवला पायजेल. ह्यांच्या त्वोंडातून सांप्रतला आयमाय निंगत न्हाई ह्यो केवडा चेंज हाये! आपल्याला ह्याचा कल्चरल आनंद झाला पायजेल.)
(कॉमेडी कट्टा, दिवाळी २०१७च्या अंकातून साभार)
