आम्ही कोण?
काय सांगता?  

आज फेसबुक २१ वर्षांचं होतंय.

  • प्रीति छत्रे
  • 04.02.25
  • वाचनवेळ 2 मि.
  • Share on Tweeter
  • Share on Whatsapp
  • Share on Facebook
mark zuckerberg

कॉलेजवयीन खोड्या ते कोट्यवधी डॉलर्सचा व्यवसाय, असा हा फेसबुकचा दोन दशकांचा प्रवास आहे. तेव्हा त्या खोड्या करणार्‍या मार्क झुकरबर्गने देखील याची कल्पना केली नसेल.

सन २००३. मार्क झुकरबर्ग हार्वर्ड विद्यापिठात शिकत होता. फावल्या वेळात हॉस्टेलच्या खोलीत बसल्या बसल्या त्याने विद्यापीठाच्या डेटाबेसमध्ये छुप्या पद्धतीने शिरकाव केला (hack), तिथून कॉलेज विद्यार्थिनींचे अनेक फोटो मिळवले. Facemash नावाची एक वेबसाइट तयार केली. तिथे ते फोटो टाकले. वापरकर्त्यांनी त्यातून सुंदर मुलींची निवड करायची, असा तो प्रकार होता. कॉलेजची मुलं बघताबघता याकडे आकर्षित झाली. अर्थात काहीच दिवसांत विद्यापीठात यावरून गदारोळ झाला. फेसमॅश बंद झालं.

मात्र यातूनच हार्वर्डमधल्या विद्यार्थ्यांच्या माहितीचा एक डेटाबेस असेल तर उपयोग होऊ शकतो, ही कल्पना समोर आली. आणि ४ फेब्रुवारी २००४ या दिवशी TheFacebook ची सुरुवात झाली. त्यामागेही झुकरबर्गच होता. त्याने ही नवी वेबसाइट अवघ्या दोन महिन्यांत तयार केली होती. आता त्याच्या जोडीला त्याचे आणखी चार मित्रही होते.

काही महिन्यांमध्ये TheFacebook चं लोण अमेरिकेतल्या इतर विद्यापीठांमध्येही पसरलं. वर्षभरात कंपनीचं नाव TheFacebook वरून नुसतं Facebook असं झालं. पुढची व्यावसायिक प्रगती झपाट्याने होत गेली.

‘जो गुण बाळा, तो जन्मकाळा’ या म्हणीनुसार फेसमॅश-फेसबुकचे सुरुवातीचे गुण त्या साईटने पुढेही उधळलेच. दुसर्‍यांच्या खासगी आयुष्यात लुडबुड करणं, छुप्या पद्धतीने लोकांची माहिती गोळा करणं, हे पुढेही होत राहिलंच. त्यावरून वेळोवेळी गदारोळही झालेच. तरीही, इंटरनेट वापरणार्‍या सर्वसामान्य लोकांना ‘सोशल मिडिया’ची चटक फेसबुकनेच लावली, असंही म्हणावं लागतं.

अमेरिकेत फेसबुक स्टोरी उलगडत होती तेव्हा आपल्याकडे शहरी विभागात ब्रॉडबॅन्ड नुकतंच प्रवेश करत होतं. स्मार्टफोन्स अजून यायचे होते. ‘ऑनलाइन सोशल नेटवर्किंग’ हे प्रकरण कुणालाच माहिती नव्हतं. आणि आज, जगभरात सर्वाधिक फेसबुक वापरकर्ते भारतात आहेत.

... मार्क झुकरबर्गने तेव्हा याचीही कल्पना केली नसेल!

प्रीति छत्रे | preeti.chhatre22@gmail.com

प्रीति छत्रे 'युनिक फीचर्स पोर्टल'च्या सहसंपादक आहेत. अनुभवपर ललितलेखन आणि अनुवाद यात त्यांना विशेष रस आहे.







प्रतिक्रिया लिहा...

Select search criteria first for better results