आम्ही कोण?
काय सांगता!  

सेनेगलच्या विळख्यात गांबिया

  • प्रीति छत्रे
  • 09.07.25
  • वाचनवेळ 1 मि.
gambia and senegal

सेनेगल आणि गांबिया, पश्चिम आफ्रिकेतले दोन लहानसे देश. आफ्रिका खंडाच्या नकाशात हे दोन देश शोधा. पश्चिमेकडे अटलांटिक समुद्राची लहानशी किनारपट्टी सोडली तर गांबियाला सेनेगलने पूर्ण विळखा घातलेला आहे. गांबियाची सीमारेषा अशी कशी काय बनली? त्यामागे साम्राज्यशाहीचा इतिहास आहे.

१९ व्या शतकात ब्रिटिश आणि फ्रेंच वसाहतकार पश्चिम आफ्रिकेवर वर्चस्व मिळवण्याची खटपट करत होते. त्या भागातली एक प्रमुख नदी म्हणजे गांबिया नदी. आफ्रिकेच्या अंतर्गत भागातल्या व्यापारासाठी ही नदी महत्त्वाची होती. ब्रिटिशांनी गांबिया नदीवर ताबा मिळवला. त्यापलीकडच्या भागावर फ्रेंचांनी कब्जा केला. दोघांनी आपापल्या सीमा कशा ठरवल्या असतील?

ब्रिटिशांनी निर्णय घेतला, की गांबिया नदीतल्या आपल्या एखाद्या बोटीवरून डागलेला तोफगोळा जिथपर्यंत जाऊ शकेल तेवढा भाग आपला. थोडक्यात नागमोडी जाणारी नदी आणि तिच्या दोन्ही किनार्‍यांलगतचे चिंचोळे पट्टे इतका प्रदेश. त्यापलीकडे फ्रेंचांनी काय हवं ते करावं.

विसाव्या शतकात सेनेगल आणि गांबिया दोन्ही देश स्वतंत्र झाले. पण त्यांच्या सीमारेषा तशाच राहिल्या. गांबियाची पूर्व-पश्चिम लांबी ३२० किमी आहे, आणि दक्षिणोत्तर लांबी जेमतेम ३०-४० किमी आहे. त्यामुळे नकाशात तो देश म्हणजे सेनेगलच्या पोटात वळवळणार्या एखाद्या किड्यासारखा वाटतो.

वसाहतवाद्यांनी जगभरात किती ठिकाणी आणि किती प्रकारे अशी पाचर मारून ठेवली आहे, त्याची गणतीच नाही.

प्रीति छत्रे | preeti.chhatre22@gmail.com

प्रीति छत्रे 'युनिक फीचर्स पोर्टल'च्या सहसंपादक आहेत. अनुभवपर ललितलेखन आणि अनुवाद यात त्यांना विशेष रस आहे.







प्रतिक्रिया लिहा...

gangotree homes advertisement

Select search criteria first for better results