गुरुत्वाकर्षणाचा शोध लावणाऱ्या न्यूटनचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, "मी अवकाशीय ग्रह-ताऱ्यांच्या हालचालींची गणितं मांडू शकतो, पण मानवी वेडेपणाचा अंदाज बांधू शकत नाही." अनेक विचारवंतांच्या प्रज्ञेला, कवींच्या प्रतिभेला आणि नाटककारांच्या लेखणीला आव्हान देत आलेलं हे मानवी मन कधी तळ्यासारखं स्तब्ध असतं, तर कधी सर्वकाही नियंत्रणात वाटत असतानाही आत महापूर उसळलेला असतो. याच मानसिक कल्लोळाला शब्दरूप देणारी कलाकृती म्हणजे सतीश आळेकर लिखित नाटक 'महापूर'.
सध्या 'महापूर' या नाटकाचे प्रयोग 'वाईड विंग्ज मीडिया' या संस्थेतर्फे नव्याने सादर केले जात आहेत. प्रेक्षकांकडूनही या प्रयोगांना उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या नव्या संचाचं दिग्दर्शन ऋषी मनोहर यांनी केलं आहे. दिलीप जोगळेकर, प्रसाद वनारसे, रेणुका दफ्तरदार, धीरेश जोशी, रेशम श्रीवर्धनकर, आरोह वेलणकर या नव्या पिढीतील कलाकारांनी हे नाटक नव्या दृष्टिकोनातून रंगमंचावर आणलं आहे.
नाटकाचा नायक गोविंद कवठेकर हा एक कॉलेजवयीन तरुण आहे. त्याचं आई-वडिलांशी फारसं पटत नाही. त्याची सर्वात जवळची व्यक्ती म्हणजे बालमैत्रीण सुलभा. पण तिचं लग्न दुसरीकडे ठरल्याची बातमी येते आणि गोविंदाचा या जगाशी असलेला शेवटचा धागाही तुटतो.
गोविंदाला सुलभाच्या लग्नाचा त्रास होत असला, तरी ते त्याच्या वेडेपणाचं एकमेव कारण नाही. त्याला अभ्यासात गती नाही, कशातच रस नाही आणि जुन्या काळात रमलेले त्याचे आई-वडील त्याच्या वर्तमानाकडे लक्ष देत नाहीत. या सगळ्याला तत्कालीन सामाजिक परिस्थितीची जोड मिळाल्याने आपलं आयुष्य दिशाहीन झाल्याची जाणीव गोविंदाला आहे. ही भावना त्या काळातील अनेक मध्यमवर्गीय तरुणाईचं दाहक वास्तव होतं. आणीबाणी, महाराष्ट्रातील दुष्काळ, बेरोजगारी आणि गरिबी या सत्तरच्या दशकातील घटनांमुळे त्या काळातल्या तरुणाईमध्ये भयंकर अस्वस्थता आणि रोष होता. हिंदी सिनेसृष्टीत याच काळात अमिताभ बच्चनचा 'अँग्री यंग मॅन' उदयाला आला.
सुलभाचं लग्न ठरल्यानंतर रंगमंचावर दिसणारा गोविंदाचा संघर्ष हा दुसरं तिसरं काही नसून, गोविंदाला शहाणपणाच्या जगात परत खेचण्याचा प्रयत्न करणारा त्याचा विवेक आणि सारे बंध झुगारून स्वैराचाराकडे झेपावणारी त्याची वेडी भावना यांच्यातला संघर्ष आहे.
'वेडेपण' या स्थितीच्या अनेक व्याख्या आहेत, पण "कुठल्याही विचाराने किंवा ध्येयाने झपाटून जाणे म्हणजे वेडेपण" ही व्याख्या मला अधिक भावते. यात 'ध्येयाने झपाटून जाणे' हा सकारात्मक अर्थ घेतला, तर विठोबाच्या नादात वैश्विक सत्य शोधणारे तुकाराम किंवा मानवी मनातील अव्यक्त वेदनेचा ठाव घेणारे कवी ग्रेस आठवतात. पण ही वेडेपणाची केवळ एक बाजू झाली. न्यूटनच्याच 'स्पेक्ट्रम ऑफ लाईट'च्या सिद्धांताप्रमाणे वेडेपणाचेही एक स्पेक्ट्रम असते. या स्पेक्ट्रमच्या एका टोकाला तुकाराम-ग्रेस आहेत, तर दुसऱ्या टोकाला आहे गोविंदा कवठेकर. आळेकरांचं लेखक म्हणून मोठेपण हे की, त्यांनी कुठेही वेडेपणाबद्दल आपलं वैयक्तिक मत न मांडता हा संपूर्ण स्पेक्ट्रम तटस्थपणे प्रेक्षकांसमोर ठेवला आहे. विशेष म्हणजे, हे नाटक लिहिलं तेव्हा आळेकरांचं वय पंचविशीच्या आसपास होतं, नाटकाच्या नायकाचं वयही साधारण तेवढंच आणि मीही आज त्याच टप्प्यावर आहे. कदाचित त्यामुळेही हे नाटक मला इतकं जवळचं वाटलं.
१९७५ मध्ये बारामतीला या नाटकाचा पहिला प्रयोग झाला होता. मोहन गोखले यांनी त्याचं दिग्दर्शन केलं होतं. त्या काळात एवढं भेदक नाटक रंगमंचावर कसं उभं केलं असेल, याची कल्पना करणंही अवघड आहे. मूळ संहितेत असे अनेक प्रसंग आहेत, जे आजही अंगावर काटा आणणारे आणि सादर करण्यास आव्हानात्मक आहेत. उदाहरणार्थ, सुलभाचे बाहेर आलेले आतडे किंवा आपल्याच आई-वडिलांना मारून त्यांची प्रेतं पाण्याच्या टाकीत टाकल्याच्या कल्पनेने गोविंदावर पडणारा रक्ताचा काल्पनिक पाऊस. हे प्रसंग दिग्दर्शक मोहन गोखले यांनी तत्कालीन तंत्रज्ञानाच्या मर्यादा सांभाळून कसे उभे केले असतील?
ही दृश्यं साकारायला जरी अवघड असली, तरी तीच या नाटकाला इतर कलाकृतींपेक्षा वेगळं आणि कालातीत ठरवतात. एका सामान्य माणसाच्या डोक्यात इतके टोकाचे आणि विकृत विचार कसे येऊ शकतात, हा प्रश्न त्यातूनच जन्माला येतो. याचे उत्तर एकच – परिस्थिती. परिस्थिती माणसाची सर्वात जुनी शत्रू आहे. तिच्यापुढे अनेकांनी हात टेकले, तर तिच्यावर मात करण्यासाठीच अनेकांनी महान शोध लावले. तुमच्या-आमच्यासारख्या सामान्य माणसाच्या मनातही असे बीभत्स विचार जन्माला घालणारी परिस्थिती आणि त्यावर अनपेक्षित प्रतिसाद देणारे आपले मन, यांचे द्वंद्व मानवाच्या उत्क्रांतीइतकेच जुने आहे.
या नाटकाला यंदा पन्नास वर्षं पूर्ण झाली, पण मनातला महापूर ओसरला नाही. आजच्या काळातही तंत्रज्ञानामुळे दोन पिढ्यांमध्ये दुरावा निर्माण झाला आहे. संपूर्ण जग खुलं झाल्याने अनेक तरुणांना दिशाहीन वाटत आहे. ढासळणारी कुटुंबव्यवस्था आणि कोणत्याही विषयावर टोकाची भूमिका घेणारा समाज पाहता, हे नाटक आजही तितकंच प्रस्तुत वाटतं.
