आपल्या देशात राजकीय पक्षांना काही कमी नाही. देशात सहा राष्ट्रीय पक्ष आहेत, तर ६७ प्रादेशिक पक्ष आहेत. निवडणूक आयोगाने शिवाय पावणेतीन हजार पक्षांची नोंदणी करून घेतलेली आहे. या आकड्यांत अधूनमधून वाढही होत असते. पक्षापक्षांमध्ये स्पर्धेपायी खेचताण चाललेली असते, त्यातून पक्ष फुटतात, नवे पक्ष जन्माला येतात. कधी पक्ष फोडून नवे गट तयार केले जातात; मग त्यांचे पक्ष बनतात. अशा रीतीने देशभर पक्षांचा दंगा चाललेला असतो.
या पार्श्वभूमीवर भारताच्या इशान्य भागात भलतंच वेगळं काही घडत आहे. तिथल्या काही प्रमुख नेत्यांनी आपापल्या पक्षांच्या चुली विझवून एकच एक मोठा पक्ष स्थापन करण्याचा इरादा जाहीर केला आहे. तूर्त त्यांनी चार पक्षांची एक आघाडी स्थापन केली आहे. तिचं नाव ठेवलंय, ‘वन नॉर्थ इस्ट’. त्यात पहिल्या टप्प्यात मेघालयात सत्तेवर असलेली नॅशनल पीपल्स पार्टी, त्रिपुरात सत्तेत वाटेकरी असलेली तिप्रा मोथा पार्टी आणि आसाममधील पीपल्स पार्टी आसाम सहभागी झाले आहेत. शिवाय भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी काम केलेले नागालँडमधील माजी मंत्री मुन्लुम्मो किकॉन यांनीही या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे.
या आघाडीत सध्या दोन महत्त्वाचे नेते आहेत. एक आहेत मेघालयचे मुख्यमंत्री कोन्राड संगमा आणि दुसरे आहेत तिप्रा मोथा या पक्षाचे प्रद्योत बर्मन माणिक्य. इशान्य भारतातील सात राज्यांचे हितसंबंध सारखेच आहेत, त्यामुळे या भागातल्या सर्व पक्षांनी एकत्र येऊन एकच एक पक्ष स्थापन करावा, असं त्यांचं म्हणणं आहे. आजपर्यंत इथले पक्ष लोकांच्या प्रश्नांबरोबरच बोलत आणि संघर्ष करत आले आहेत, पण वेगवेगळ्या आवाजात बोललं गेल्यामुळे तो आवाज प्रखर बनत नाही. सर्वांनी मिळून एका आवाजात बोललं तर ते परिणामकारक ठरेल, असं त्यांना वाटतं आहे.
इशान्य भारत हा एकेकाळी काँग्रेस पक्षाचा गड होता. इथे प्रादेशिक पक्षही होते, पण त्यातले बरेच काँग्रेससोबत जुळवून घेत होते. दिल्लीतली काँग्रेसची सद्दी संपली तशी या पक्षांनी भाजपसोबत जुळवून घ्यायला सुरुवात केली. भाजपनेही ‘नॉर्थ इस्ट डेमोक्रॅटिक अलायन्स’ नावाची आघाडी स्थापन केली आणि त्या दीड डझन पक्षांना त्यात सामील करून घेतलं. त्या आघाडीचं अध्यक्षपद आसामच्या मुख्यमंत्र्यांकडे सोपवलं. या आघाडीमुळे भाजपची ईशान्येत आणि देशातही पकड वाढायला मदतच झाली. या आघाडीकडे या भागातील १४ पैकी १२ राज्यसभेच्या जागा आहेत, तर लोकसभेच्या २५ पैकी १६. इशान्येतील सर्व राज्यांच्या विधानसभेतील जागांची बेरीज केली, तर ४९८ पैकी ३९३ जागा या आघाडीकडे आहेत. इथल्या आठपैकी सात राज्यांमध्ये त्यांची सत्ता आहे. पैकी चार ठिकाणी भाजप सत्तेत आहे, तर तीन ठिकाणी त्यांचे मित्रपक्ष. एकेकाळी जे पक्ष भाजपला जवळ येऊ देत नसत, तेच आता भाजपच्या मांडीवर जाऊन बसले आहेत.
इशान्य भारतातील या बदलामुळे मोदींच्या कार्यकाळात या भागात मोठ्या पायाभूत सुविधा विकसित केल्या गेल्या. इथे विमानतळं आली, रेल्वेचा विस्तार केला गेला. रस्त्यांचं जाळं वाढवलं गेलं, मोठे रस्ते बांधले गेले. काही उद्योगही आले. त्यामुळे भाजपने या भागात आपलं बस्तान चांगलंच बसवलं आहे. शिवाय काँग्रेसचे नेते फोडून त्यांना पक्षात घेणं, मुख्यमंत्री करणं, प्रादेशिक पक्षांतील नेत्यांना पक्षात घेणं हे मार्ग अवलंबले गेलेच. पण या साऱ्यामुळे भाजप हा इशान्येतील जनतेसाठी परका पक्ष राहिलेला नाही. माणसं या पक्षासाठी स्वेच्छेने मतदान करू लागली आहेत.
या पार्श्वभूमीवर कोन्राड संगमा आणि प्रद्योत बर्मन यांनी स्वतंत्र आघाडी आणि पक्ष स्थापन करण्याचं जाहीर केलं आहे. इशान्य भारतात ख्रिश्चन धर्मियांचं प्रमाण मोठं आहे. अनेक आदिवासी जमातींमध्ये ते विभागले गेलेले आहेत. एकेका राज्यातही अनेक जमाती आहेत. शिवाय एकच जमात शेजारच्या दोन-तीन राज्यांमध्ये विभागली गेली आहे. त्यातून अनेक वर्षं ताण आणि संघर्ष घडत आले आहेत. अलिकडच्या काळात मणिपूरसारख्या राज्यात आंतरधर्मीय झगडेही घडले आहेत. स्थानिक लोकांतील या फाटाफुटीचा इथल्या विकासावर परिणाम होणं स्वाभाविक आहे. ही फूट सांधता येईल का असा प्रयत्न नव्या आघाडीमार्फत होणार असल्याचं सूचित केलं जात आहे. ‘धर्मनिरपेक्षता हे भारताच्या राज्यघटनेतील एक महत्त्वाचं तत्त्व आहे आणि त्यामुळे लोकांचा धर्म किंवा वांशिकता कोणतीही असो, ज्यांचे घटनात्मक अधिकार नाकारले जातात, त्यांच्यासोबत उभं राहणं हे आम्ही आमचं कर्तव्य मानतो’, असं या नेत्यांनी म्हटलं आहे. ‘आमच्या आमच्यात मतभेद आहेत, काही मुद्द्यांवर टोकाचे मतभेद आहेत. पण आमच्यात गृहयुद्धासारखी परिस्थिती नाही’, असंही ते म्हणत आहेत. जे पक्ष दीर्घकाळ राजकारणात असतात त्यांचे इतर पक्षांशी वेळोवेळी संबंध येऊन गेलेले असतात. आघाड्या-युत्या-संमिश्र सरकारं वगैरे घडून गेलेली असतात. सध्या जे दोन नेते बोलत आहेत, ते दोघेही भाजप आघाडीतील सदस्य आहेत.
इशान्येत उद्योग-व्यापार-शेतीबाबत फारशी प्रगती झालेली नसल्याने ही राज्यं आर्थिकदृष्ट्या केंद्र सरकारवर अवलंबून असतात. त्यामुळे दिल्लीसोबत पंगा घेणं त्यांना परवडणारं नसतं. त्यामुळेच आम्ही भाजपसोबतच आहोत, पण पुढील निवडणुका स्वतंत्रपणे लढवणार आहोत, असा खुलासा त्यांनी केला आहे. इशान्येतील पक्षांनी एकत्र येऊन भाजप-विरोधात लढणं ही भाजपसाठी निश्चितच धोक्याची घंटा आहे.
पण नवी आघाडी जाहीर झाली आणि नवा एकत्रित पक्ष स्थापन करण्याचा इरादा व्यक्त केला म्हणून सगळे पक्ष एका झेंड्याखाली येतील, असं निश्चितच नाही. ज्याअर्थी या भागात पन्नासेक पक्ष तयार झाले आणि टिकून राहिले, त्याअर्थी त्यांची गरज लोकांना वाटते हे सरळ आहे. जमातींच्या अस्मितेचे प्रश्न तिकडे इतके टोकदार आहेत, की त्यापायी माणसं आणि पक्ष एकमेकांच्या उरावर बसतात, हे अनेकदा दिसून आलं आहे. त्यामुळे या सगळ्या माणसांची आणि त्यांच्या हितसंबंधाची मोट कशी बांधली जाणार? त्यासाठी सत्तेच्या पदापलिकडे जाऊन नेतृत्व देणारा कुणी महानुभाव हवा. तो सध्या तरी दृष्टीपथात नाही.
या कामी पुढाकार घेतलेल्या कोन्राड संगमा यांच्या मेघालयातही व्हॉइस ऑफ द पीपल्स पार्टी, युनायटेड डेमोक्रॅटिक पार्टी, हिल स्टेट पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी नावाचे प्रादेशिक पक्ष आहेत. बर्मन यांच्या त्रिपुरातही इंडिजिनस नॅशनलिस्ट पार्टी ऑफ त्विप्रा आणि इंडिजिनस पीपल्स फ्रंट ऑफ त्रिपुरा नावाचे पक्ष आहेत. या पक्षांना ते सोबत कसे घेणार? याशिवाय मणिपूरमध्ये मणिपूर डेमोक्रॅटिक पीपल्स फ्रंट, सिक्कीममध्ये सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा आणि सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंट हे पक्ष आहेत. नागालँडमध्ये नागा पीपल्स फ्रंट हा मजबूत पक्ष आहे. नागा लोक इतरही राज्यांत वास्तव्यास असल्यामुळे या पक्षाचा वावर राज्याबाहेरही असतो. तीच परिस्थिती मिझो लोकांबाबत लागू आहे. मिझोराममध्ये मिझो नॅशनल फ्रंट आणि झोराम पीपल्स मूव्हमेंट हे पक्ष आपापली ताकद राखून आहेत. यातील अनेक पक्ष वेगवेगळ्या कारणांपायी एकमेकांशी शत्रुत्व बाळगून आहेत. एकमेकांशी लढले तरच त्यांचं अस्तित्व टिकून राहणार आहे. अशा परिस्थितीत एकच एक पक्ष करूयात हे संगमा-बर्मन यांचं म्हणणं कोण ऐकणार?
पण हा प्रयत्न चालू राहिला आणि त्यात अगदी सगळे नसले तरी बरेच पक्ष एकत्र आले तर ती समकालीन भारतीय राजकारणातली महत्त्वाची घडामोड ठरेल.
सुहास कुलकर्णी | uniquefeatures.portal@gmail.com
सुहास कुलकर्णी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. गेली तीन दशकं ते राजकीय प्रक्रियांचं विश्लेषण करत आले आहेत.
