आम्ही कोण?
आडवा छेद 

वन्यजीव संरक्षणः कशासाठी? पर्यटनासाठी!

  • मृदगंधा दीक्षित
  • 04.12.25
  • वाचनवेळ 5 मि.
masai mara

पृथ्वी आपल्या मालकीची आहे आणि आपण इतर प्राण्यांना त्यावर अभय देतोय, असं माणसाला कायमच वाटत आलंय. आरक्षित जंगलं, कॉरिडॉर्स, अभयारण्यं यांच्यावर अतिक्रमणं होतात ती त्यामुळेच. हा भ्रम अलीकडच्या काळात चांगलाच बळावलाय. आपल्याला जंगल सफारीला जाता यावं यासाठीच आपण प्राण्यांचं संवर्धन करतो की काय अशी परिस्थिती सध्या तयार झाली आहे. हा दृष्टिकोन किती चुकीचा आहे, हे माणसाला कळलं असतं तर पर्यटनाच्या नादात संवर्धनाचा बोऱ्या वाजला नसता. हे लिहिण्याचं ताजं निमित्त म्हणजे मसाई मारा मधल्या द ग्रेट मायग्रेशनवर आलेलं मानवी अतिक्रमणाचं संकट. केवळ मसाई माराच नव्हे, तर जगात आणि भारतातही अनेक ठिकाणी पर्यटनामुळे वन्यजीव संवर्धन धोक्यात येऊ लागलं आहे. नैसर्गिक परिसंस्थेतील वन्यजीव स्थलांतराचे मार्ग हे त्या त्या प्रदेशाच्या पर्यावरणाचे आणि जैवविविधतेचे आधारस्तंभ असतात. पण वाढतं मानवी अतिक्रमण आणि व्यावसायिक स्वार्थ यांमुळे या मार्गांमध्ये अडथळे निर्माण होतात.

masai mara

मसाई मारा: ‘द ग्रेट मायग्रेशन’ मार्गावरील मानवी अतिक्रमण

टांझानियामधील सेरेनगेटी ते केनियामधील मसाई मारा नॅशनल रिझर्व्हपर्यंत पसरलेला ‘द ग्रेट मायग्रेशन’ हा मार्ग म्हणजे अनेक वन्यजीवांची लाईफलाईन आहे. साधारण १५ लाखांहून अधिक वाइल्डबीस्ट आणि लाखो झेब्रे गेली अनेक दशकं दर वर्षी अन्न आणि पाण्याच्या शोधात या वाटेवरून स्थलांतर करतात. परंतु, या भागात पर्यटन मोठ्या प्रमाणावर वाढलं असल्याने इथल्या खासगी जमीन मालकांनी तिथे लक्झरी टुरिझम लॉजेस आणि हॉटेलं बांधली आहेत. या बेबंद बांधकामामुळे स्थलांतर मार्गांवर प्रत्यक्ष अडथळे निर्माण झाले आहेत. ‘केनिया वन्यजीव सेवा’ या शासकीय संस्थेने हे आरोप फेटाळले असले तरी अनेक वन्यजीव कार्यकर्ते आणि संस्थांच्या अहवालांतून खरी परिस्थिती जगासमोर आली आहे.

masai mara

या मसाई मारा भागातच एक सकारात्मक चळवळ सुद्धा उभी राहते आहे. इथल्या काही खासगी जमीन मालकांनी आपल्या जमिनी कुरणांसाठी अभयारण्याला भाडेतत्वावर दिल्या आहेत. या जमिनींचा वापर वन्यजीव कॉरिडॉर संरक्षित करण्यासाठी केला जातोय. परंतु अशा जमीन मालकांची संख्या तुटपुंजी आहे. याउलट मुळच्या पशूपालन करणाऱ्या मसाई समुदायाच्या जमिनी, टुरिझम कंपन्यांना सर्रास भाड्याने दिल्या जातात. त्यामुळे स्थानिक लोकांचा आणि वन्यजीवांचा परंपरागत अधिवास धोक्यात येतो आहे. आफ्रिकेतील अनेक भागांत हत्तींच्या प्राचीन स्थलांतर मार्गांवरही मानवी वस्ती आणि शेतीमुळे अडथळे आले आहेत. तिथे मनुष्य-प्राणी संघर्ष वाढला आहे.

स्लॉथ 'सेल्फी'साठी तस्करीचा क्रूर खेळ

आजच्या डिजिटल युगात सोशल मीडियावरील एक साधा ‘सेल्फी’ वन्यजीवनासाठी मोठा धोका बनला आहे. स्लॉथ या प्राण्याबद्दल त्यांच्या शांत स्वभावामुळे आणि हसऱ्या चेहऱ्यामुळे पर्यटकांना खूप आकर्षण आहे. याच कारणामुळे स्लॉथच्या तस्करीचं प्रमाण वाढलं आहे. यामध्ये स्लॉथच्या पिल्लांना त्यांच्या आईपासून जबरदस्तीने वेगळे केलं जातं. त्यांना हाताळणं पर्यटकांना सोपं जावं म्हणून त्यांची नखं किंवा कधीकधी बोटांची टोकंदेखील कापली जातात. अशा रीतीने पकडलेल्या ९९ टक्के स्लॉथच्या पिल्लांचा मृत्यू होतो. ब्राझील, कोस्टा रिका आणि पनामासारख्या देशांनी आता या प्राण्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर कडक निर्बंध आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

masai mara

भारतात हत्तींच्या स्थलांतर मार्गांवर अडथळा

भारतात, विशेषतः छत्तीसगड आणि उत्तराखंड सारख्या राज्यांमध्ये हत्तींचे स्थलांतर मार्ग मानवी विकास आणि औद्योगिकरणामुळे संपत चालले आहेत. छत्तीसगडमध्ये कोळसा आणि इतर खनिजांसाठी मोठ्या प्रमाणात खाणकाम होतं. त्याने हत्तींच्या मार्गात अडथळा निर्माण होतो. नैसर्गिक अधिवास खंडित झाल्यामुळे हत्तींना त्यांचा नैसर्गिक आहार आणि पाणी मिळणं कठीण होतं. अशावेळी ते मानवी वस्तीत येतात. त्यातून मनुष्य-हत्ती संघर्ष वाढतो आहे. अशा परिस्थितीत माणसांना तर धोका निर्माण होतोच, पण साहजिकच हत्तींची शिकार करण्याचं प्रमाणही वाढतं. हत्तींच्या अनेक कॉरिडॉरवर रेल्वे लाईन आणि महामार्ग बांधले गेले आहेत. त्यामुळे ते ओलांडताना हत्तींचे अपघात होतात.

हत्तींच्या संवर्धनासाठी ‘प्रोजेक्ट एलिफंट’ सारख्या योजना असूनही अवैध बांधकाम आणि अतिक्रमण सुरूच आहे. फ्रंटलाईन या पाक्षिकाच्या अहवालानुसार, छत्तीसगडमधील खाणींमुळे आदिवासींचं आणि हत्तींचं जीवन धोक्यात आहे. उत्तराखंडमध्ये हत्तींची संख्या वाढली असली तरी, मानवी हस्तक्षेपामुळे त्यांचं संवर्धन आजही धोक्यात आहे.

masai mara

जिम कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये हत्ती सफारीचं पुनरागमन

उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट आणि राजाजी नॅशनल पार्कमध्ये सात वर्षांच्या बंदीनंतर हत्ती सफारी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वन विभागाच्या मते, हत्ती सफारीमुळे पर्यटकांना बिना अडथळा फिरता येतं आणि शिवाय सरकारला त्यातून महसूलही मिळतो. मात्र, प्राणी संवर्धनासाठी काम करणाऱ्या तज्ज्ञांच्या मते, हत्ती सफारी करणं, त्यासाठी हत्तींना ट्रेनिंग देणं क्रूर आहे.

कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानातील बफर आणि मुख्य क्षेत्रांमध्ये पर्यटकांसाठीच्या जिप्सी वाहनांची संख्या आणि नियमन हाही वादाचा मुद्दा आहे. अनेकदा, पर्यटन कंपन्या आणि काही सरकारी अधिकारी नियमांना डावलून, परवानगीपेक्षा अधिक जिप्सी गाड्यांना परमिट जारी करतात. यामुळे उद्यानाच्या संवेदनशील भागांमध्ये वाहनांची गर्दी वाढते. यातून वन्यजीव, विशेषत: वाघ आणि त्याचं खाद्य असलेल्या प्राण्यांच्या नैसर्गिक वावराला अडथळा निर्माण होतो. या वाढलेल्या मानवी हस्तक्षेपामुळे अधिवासाचा ऱ्हास होतो आणि प्राण्यांवर तणाव येतो.

masai mara

खरंतर व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्यानं, आरक्षित जंगलं यांचा मूळ उद्देश पर्यटन नव्हे, तर वन्यजीव संवर्धन आहे. मसाई मारा असो वा भारतातील हत्तींचा कॉरिडॉर, जगभरात वन्यजीव स्थलांतर मार्गांचं संरक्षण आज गंभीर स्थितीत आहे, एवढं नक्की. मायग्रेशन कॉरिडॉरचं संरक्षण हे केवळ त्या त्या प्रजातींसाठी नाही, तर संपूर्ण परिसंस्थेच्या आरोग्यासाठी आवश्यक असतं. वन्यजीवांचं हित हे सर्वोच्च प्राधान्य ठेवून शाश्वत पर्यटन आणि संवर्धन यांमध्ये योग्य संतुलन साधणं हा यावरचा उपाय आहे. यातही उद्देशाविषयी स्पष्टता असेल तर कृती अवघड नाहीय. पण प्रश्न असाय की, आपल्याला वन्यजीव अधिवासाचं संरक्षण करायचंय की आपण केवळ पर्यटनासाठी-व्यवसायासाठी प्राण्यांचं संवर्धन करतोय?

या प्रश्नाचं प्रामाणिक उत्तर देण्याची वेळ आली आहे.

मृदगंधा दीक्षित | mrudgandha.uniqueportal@gmail.com

मृदगंधा दीक्षित युनिक फीचर्समध्ये संपादकीय विभागात कार्यरत असून त्यांना कथा-कादंबरी-कविता लिहिण्यातही रस आहे.







प्रतिक्रिया लिहा...

Select search criteria first for better results