आम्ही कोण?
आडवा छेद 

केरळ : डायलेसिस आणीबाणी

  • सुहास कुलकर्णी
  • 19.03.25
  • वाचनवेळ 3 मि.
  • Share on Tweeter
  • Share on Whatsapp
  • Share on Facebook
keral dialysis

किडनी निकामी होऊन दर आठवड्याला डायलेसिसचे उपचार घ्यावे लागणाऱ्या रुग्णांची संख्या भारतात दरवर्षी वाढत आहे. रक्तदाब आणि मधुमेह या दोन आजारांमुळे भारतात किडनीचे आजार वाढत असल्याचं सांगितलं जातं. देशात दरवर्षी वाढत जाणारे रुग्ण ही काळजीची बाब आहेच, पण त्यातही केरळमधील परिस्थिती अधिकच बिकट झालेली दिसते.

गेल्या तीन वर्षांत केरळमध्ये डायलेसिस उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या ३४१ टक्क्यांनी वाढल्याचं नुकतंच पुढे आलं आहे. केरळमध्ये अशा रुग्णांची संख्या २०२० मध्ये ४३ हजार होती. ती २०२१ मध्ये ९१ हजार झाली आणि २०२२ मध्ये १ लाख ३० हजार. वर्षांमागून वर्ष हे आकडे तुफानी वेगाने वाढतच चालले आहेत. आलेल्या या सुनामीमुळे केरळच्या आरोग्यव्यवस्थेवर जबरदस्त ताण आलेला आहे आणि कितीही व्यवस्था उभारल्या तरी त्या कमीच पडत आहेत. एका अर्थाने वैद्यकीय आणीबाणीच तिथे निर्माण झाली आहे.

आजतारखेला केरळमध्ये राज्य सरकारच्या १०५ रुग्णालयांत डायलेसिसची सोय उपलब्ध आहे. त्यात १२७१ मशिन्समार्फत उपचार होऊ शकतात. त्याशिवाय सुमारे २०० खासगी रुग्णालयांमध्ये डायलेसिस सेवा दिली जाते. मात्र इथे प्रत्येक डायलेसिससाठी १५०० ते २५०० रुपये खर्च येतो. अनेक रुग्णांना आठवड्यातून तीनदा हा उपचार घ्यावा लागतो. याचा अर्थ आठवड्याला ५ हजार म्हणजेच महिन्याला २० हजार रुपये खर्चावे लागतात. एवढे पैसे सामान्य माणसांकडे कुठून येणार? शिवाय डायलेसिस करून आजार बरा होत नाही. रुग्णाला प्रत्यारोपणासाठी किडनीदाता मिळत नाही किंवा त्याचा मृत्यू होत नाही, तोवर डायलेसिस करावंच लागतं. काही वर्षं हे चक्र चाललं तर माणसं आणि त्यांची कुटुंबं दिवाळखोरीतच येणार!

आज केरळमध्ये अशी परिस्थिती आहे की डायलेसिससाठी प्रचंड मोठी वेटिंग लिस्ट आहे. आधीच्या पेशंटसचं ऑपरेशन झाल्याशिवाय किंवा मृत पावल्याशिवाय गरजू पेशंटला डायलेसिस मशिन मिळू शकत नाही. अशी भीषण परिस्थिती तयार झाली आहे. एकेका गावात शंभर-शंभर पेशंट्स असल्याने ही परिस्थिती ओढवली आहे.

भारतात मधुमेही रुग्णांची संख्या सरासरी ११.४ टक्के आहे. केरळमध्ये मात्र ही टक्केवारी २३.६ टक्के आहे. ज्या रुग्णांमध्ये रक्तदाबाचाही आजार आहे, त्या रुग्णांना डायलेसिससारख्या उपचारांची आवश्यकता निर्माण होते. अशा पेशंट्सपैकी ६० ते ७० टक्के लोक या यंत्रापर्यंत पोहचतात. अशा परिस्थितीत पूवीची वैद्यकीय व्यवस्था कशी पुरी पडणार?

भारतातील इतर मोठ्या राज्यांच्या तुलनेत केरळमधील आरोग्य सुविधा कितीतरी अधिक सक्षम असल्या तरी ही परिस्थिती आहे हे विशेष. उत्तरप्रदेशसारख्या मोठ्या राज्यात फक्त ८८४ डायलेसिस मशिन्स आहेत तर गुजरातमध्ये १२८६. या तुलनेत केरळमध्ये १२७१ आहेत. याचा अर्थ लोकसंख्येच्या मानाने ते अधिक सक्षम आहेत. पण आव्हानच इतकं मोठं उभं राहिलं आहे की उपलब्ध यंत्रणा अपुरी पडत आहे.

केरळमध्येही ही परिस्थिती का उद्भवली हा अर्थातच शोधाचा विषय आहे. रक्तदाब, मधुमेह आणि लठ्ठपणा याच्याशिवाय सर्रास वेदनाशमक औषधं घेणं, पोटाच्या तक्रारींवर परस्पर औषधं घेणं यामुळेही शरीरावर परिणाम होतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अर्थातच त्याची आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र केरळच्या आरोग्य विभागाने एक मोठं सर्वेक्षण हाती घेतलं आहे. त्यात ३० वर्षावरील १.७७ कोटी लोकांना जीवनशैलीशी संबंधित आजार आहेत हे तपासलं जात आहे. आत्तापर्यंत ज्या ३२ लाख लोकांची चौकशी केली गेली, त्यातील निम्मे म्हणजे १५ लाख लोक या आजारांच्या बाबतीत धोक्याच्या छायेखाली आहेत, असं लक्षात आलं आहे. ४.३० लाख लोकांना रक्तदाब आणि २.९ लाख लोकांना मधुमेह झालेला आहे. हे आकडे पाहता येत्या काळात किडनी विकाराचं आणि डायलेसिसचं आव्हान किती मोठं असणार आहे, याचा अंदाज येऊ शकतो.

सुहास कुलकर्णी | uniquefeatures.portal@gmail.com

सुहास कुलकर्णी हे युनिक फीचर्स आणि समकालीन प्रकाशनाचे सहसंस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. गेली तीन दशकं ते राजकीय प्रक्रियांचं विश्लेषण करत आले आहेत.







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 4

Sanjay wazarkar24.03.25
एकदम बरोबर,आजकाल लोकं काहीही विचार न करता आपल्याच मताने, यू ट्यूब, व इतर मार्गाने माहिती मिळवून औषधी घेत असतात.त्या मुळे किडनी विकार फार होत आहे.त्या मुळे डायलिसिस वाढत आहे. छान माहिती
डॉ.अस्मिता फडके23.03.25
बापरे !
Monika 20.03.25
मी याचा अनुभवला...परिस्थिती अतिशय विदारक आहे
NATU VIKAS S.19.03.25
छान. या विषयातील निष्णात वैद्यकीय व्यावसायिकांनी जाणीव जागृती केली पाहिजे
See More

Select search criteria first for better results