आम्ही कोण?
आडवा छेद 

तरुणाईलाही डायबिटीसचा विळखा

  • योगेश जगताप
  • 18.07.25
  • वाचनवेळ 3 मि.
diabetic patient in india

डायबिटीस (टाइप-२) हा सहसा चाळिशीनंतर होणारा रोग. पण गेल्या काही वर्षांमध्ये तो तरुणाईतही बळावत चालला आहे. जगप्रसिद्ध लॅन्सेट जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधन अहवालानुसार आशिया खंडातील तरुण मंडळींमध्ये डायबिटीसचं प्रमाण वाढत असून काही देशांत तर ते जवळपास ७ ते १५ टक्क्यांच्या आसपास आहे.

डायबिटीसच्या रुग्णांच्या संख्येत मागील १०-१२ वर्षांत लक्षणीय वाढ होते आहे. २०१३ साली जगभरात २० ते ३९ वयोगटातील २.९ टक्के म्हणजेच ६ कोटी ३० लाख तरुण मधुमेहग्रस्त होते. २०२१ साली हा आकडा वाढून ३.८ टक्के म्हणजेच जवळपास २६ कोटींच्या घरात गेला आहे. जगातली घरटी एक व्यक्ती डायबिटीसची शिकार बनते आहे. हा रोग प्रामुख्याने श्रीमंत देशांमधला रोग आहे, तसंच विकसनशील देशांतही तो श्रीमंतांमध्येच आढळतो, असं पूर्वी मानलं जायचं. पण लान्सेटच्या नव्या संशोधनानुसार आशिया खंडातल्या विकसनशील देशांमध्ये, तेही तरुणांमध्ये डायबिटीसचं प्रमाण वाढतं आहे. कमी वयात झालेल्या डायबिटीसमुळे पेशंटचं जीवनमान तब्बल १५ वर्षांनी कमी होण्याचा, तसंच एकुणात आयुष्याचा दर्जा घसरण्याचाही धोका असल्याचं लॅन्सेटच्या अहवालात म्हटलं आहे.

टाइप-२ प्रकारात १८ ते ४० वर्षं वयोगटाला होणारा डायबिटीस अर्ली ऑनसेट म्हणून ओळखला जातो. तर चाळीशीनंतरचा डायबिटीस हा लेट ऑनसेट म्हणून ओळखला जातो. टाइप-२ डायबिटीस झालेल्या तरुणांमध्ये ज्येष्ठांच्या तुलनेत अधिक समस्या आढळून येताहेत. तिशीच्या आत डायबिटीसचं निदान झालेल्या तरुणांमध्ये जीवनमान कमी होणं, रक्तवाहिन्यासंदर्भातील गुंतागुंतीचे आजार, तसंच महिलांमध्ये गर्भधारणेत अडचणी येण्याचं प्रमाणही वाढतं आहे.

अतिलठ्ठपणा हे तरुणांना डायबिटीस होण्याच्या प्रमुख कारण आहे. गेल्या ३० वर्षांत जगभरात लठ्ठपणाच्या प्रमाणात तब्बल २४४ टक्के वाढ झालेली आहे. पाश्चिमात्य देशांबरोबरच आता विकसनशील देशांतही लठ्ठपणा वाढतो आहे. लठ्ठपणाचं मोजमाप करण्यासाठी बॉडी मास इंडेक्स ही चाचणी केली जाते. बॉडी मास इंडेक्सने धोक्याची पातळी ओलांडली असेल तर डायबिटीस होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर वाढते. पण त्याचबरोबर बॉडी मास इंडेक्स योग्य असेल, वजन कमी असेल तरीही डायबिटीस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ओटीपोटातील व्हिसरल फॅट या चरबीचं प्रमाण वाढलेलं असेल तरीही डायबिटीसचा धोका असतो. त्यामुळे डायबिटीसच्या प्रतिबंधात अडथळे येताहेत.

तरुण मंडळींमधला लठ्ठपणा कमी करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने साखर असलेल्या आणि वजन वाढवणाऱ्या शीतपेयांवर मजबूत कर आकारणी करण्याचा उपाय सुचवला होता. जगातल्या जवळपास १०० देशांनी त्याची अंमलबजावणी केली. त्यातून शीतपेय खरेदी करणाऱ्यांचं जागतिक प्रमाण १५ टक्क्यांनी कमी झाल्याचं आढळून आलं आहे. त्यातून तिथे लठ्ठपणा आणि दातांच्या समस्याही कमी झाल्याचं समोर येतंय.

तरुणांमधील डायबिटीसचं प्रमाण कमी करायचं असेल तर किशोरवयीन मुला-मुलींना आरोग्यदायी जीवनशैली अवलंबण्यासाठी प्रवृत्त करावं लागेल, असंही लान्सेटच्या अहवालात म्हटलं आहे. त्यासाठी केवळ वैयक्तिक हस्तक्षेप उपयोगी नाही, तर मुला-मुलींच्या आसपासची परिस्थितीच बदलली पाहिजे. पुढील काळात तरुणांना निरोगी आयुष्य जगण्याची संधी मिळावी असं वाटत असेल तर त्यांना चुकीच्या सवयींकडे घेऊन जाणारं वातावरण बदलावं लागेल, असा इशाराही लान्सेटच्या या अहवालात दिला गेलाय.

योगेश जगताप | 9561190500 | yogeshjagtap8819@gmail.com







प्रतिक्रिया लिहा...

प्रतिक्रिया 1

Sunil20.07.25
खरं आहे. लेखाच्या शेवटी म्हटलंय " वातावरण बदलायला लागेल." पण हे पवित्र कार्य कोण करेल? कटू सत्य काय आहे? दररोज लाखो प्लॅस्टिक डब्यातून गरम अन्नपदार्थ विकणार्‍या सोमॅटोचे मालकाने गुरगाव येथे बावन्न कोटीचा फ्लॅट घेतला आहे .त्याच्याकडे दीडशे कोटीची प्रॉपर्टी आहे. हा लॅम्बोर्गिनी, फेरारी, ऑस्टिन मार्टिन , पोर्शे , मर्सिडिज, बीएमडब्ल्यू इत्यादी अनेक आलीशान गाड्या देखील उडवतो. मागील शेकडो वर्षे घरी स्वयंपाक बनवून सकस , निकोप, निरोगी अन्न सेवन करणार्‍या महान भारतीय संस्कृतीला नष्ट करून तरुणाईला पार्सल सवयी लावुन त्यायोगे डायबेटीस,हृदयविकार,ओबीसीटी आणि तत्सम रोग देवून त्या बदल्यात स्वत:ची तुंबडी भरणार्‍याचा मनःपूर्वक जयजयकार. "चलो इस बहाणे मंगवाओ गरमागरम सोमॅटो पार्सल चिकन करी पनीर टिक्का"

Select search criteria first for better results